प्रसाद माधव कुलकर्णी

थोर तमिळ कवी आणि स्वातंत्र्यसैनिक सुब्रह्मण्य (सुब्रमण्यम) भारती यांची आठवण ठेवण्यासाठी, त्यांची जयंती (११ डिसेंबर) ‘भारतीय भाषा दिन’ म्हणून साजरी केली जाते. सुब्रह्मण्य भारती हे ११ डिसेंबर १८८२ रोजी जन्मले आणि १२ सप्टेंबर १९२१ रोजी कालवश झाले. अवघ्या ३९ वर्षाचे आयुष्य त्यांना लाभले. तमिळ कवितेमध्ये एक नवयुग निर्माण करणारे, देशप्रेम निर्माण करणारे कवी म्हणून त्यांचा मोठा लौकिक होता. ते लोककवी म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात बालसाहित्यही लिहिले. त्यांच्या रसाळ भाषेमुळे आणि उत्तम प्रतिभेमुळे त्यांना ‘भारती’ ही उपाधी रसिकांनी अत्यंत तरुण वयात बहाल केली. त्यांचा तमिळसह संस्कृत, हिंदी, इंग्रजी साहित्याचा गाढा व्यासंग होता. तमिळनाडूतील एका संस्थानात त्यांनी दोन वर्षे राजदरबारी कवी म्हणून काम केले. पण तो त्यांचा पिंड नव्हता. त्यामुळे ते पत्रकारितेत आले. त्यांनी मद्रासच्या ‘स्वदेश मित्रन’ या दैनिकात उपसंपादक म्हणून काम केले. त्यानंतर ‘इंडिया’ या साप्ताहिकाचे ते संपादक झाले. ते भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात ब्रिटिशविरोधी असणाऱ्या काँग्रेसचे कट्टर पुरस्कर्ते व कार्यकर्ते होते. काँग्रेसच्या अधिवेशनांत ते सक्रिय सहभागी होत असत.

Wardha, Notice, english school,
वर्धा : कारवाईची नोटीस! नामवंत इंग्रजी शाळा ठरणार अनधिकृत
Why does hatred of Gandhi remain even today
गांधीद्वेष आजही का उरतो?
ashish shelar replied to aditya thackeray
“मिहीर शाहच्या घरावर बुलडोझर कधी चालणार?” म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आशिष शेलारांचं प्रत्युत्तर म्हणाले…
monoj jarange replied to chandrakant patil
“तुम्हाला नातेवाईक आणि सगेसोयरे यांच्यातील फरक कळतो का?” मनोज जरांगेंचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर!
Upsc Preparation Indian Society and Social Issuाे
Upsc ची तयारी: भारतीय समाज आणि सामाजिक प्रश्न
Unnatural abuse, dog, abuse,
श्वानावर अनैसर्गिक अत्याचार, भारतीय न्याय संहितेत कलमाबाबत अस्पष्टता
Coo Indian competitor to Twitter shut down
‘कू’ची अवतारसमाप्ती; ‘ट्विटर’चे भारतीय स्पर्धक समाजमाध्यम बंद
UPSC Preparation Indian Society and Social Issues
upscची तयारी: भारतीय समाज आणि सामाजिक प्रश्न

भगिनी निवेदिता यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता त्यांनी त्यांना गुरुस्थानी मानले होते. राष्ट्रभक्ती, सामाजिक सुधारणा, समाज प्रबोधन आदि त्यांची जीवन ध्येये बनली. रवींद्र टागोरांपासून शेलीपर्यंतच्या अनेक साहित्यिकांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांनी काही काळ ‘शेली दासन’ या टोपण नावाने कविताही लिहिल्या. प्राचीन साहित्य, लोकसाहित्य आणि लोकभावना या साऱ्यांचा प्रभाव त्यांच्या कवितांतून दिसून येतो. त्यांचा कालखंड हा भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातला अत्यंत महत्त्वाचा कालखंड होता. एकीकडे १८८५ साली काँग्रेसची स्थापना झालेली होती आणि काँग्रेस हा भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा मध्यप्रवाह बनलेला होता. लोकमान्य टिळकांचे नेतृत्व मध्यवर्ती स्वरूपात होते. दादाभाई नौरोजी यांच्यापासून न्यायमूर्ती रानड्यांपर्यंत अनेक मंडळी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विषयांचा जागर करून ब्रिटिश विरोधी राजकारणाला गांभीर्य मिळवून देत होती. या साऱ्याचे प्रतिबिंब सुब्रमण्यम भारती यांच्या कवितेतून दिसून येत होते. त्यांच्या पत्रकारितेतूनही हा विचार पुढे जात होता. सामाजिक प्रश्नांच्या मुळापर्यंत भिडण्याची ताकद त्यांच्या कवितेत आणि पत्रकारितेत दिसून येत होती.

आणखी वाचा-महुआ मोईत्रांवरची ‘हकालपट्टी’ची कारवाई तकलादू ठरू शकते, ती का?

सामाजिक आणि राजकीय सुधारणा एकत्रित झाल्या पाहिजेत ही भूमिका घेऊन ते लेखन करत असत. समाजातील जातिभेद, अंधश्रद्धा, विषमता, दारिद्र्य या साऱ्या गोष्टींवर त्यांनी कवितेतून व लेखनातून प्रहार केले. ‘इंडिया’ साप्ताहिकातून त्यांनी ब्रिटिश सरकारवर सातत्याने प्रखर टीका केल्यामुळे या साप्ताहिकावर बंदी घालण्यात आली. त्यांना काही काळ तुरुंगवास भोगावा लागला. नंतर त्यांनी न्यू इंडिया कॉमनवेल्थ, आर्य अशा काही नियतकालिकातूनही लिखाण केले. पुढे योगी अरविंद यांच्या प्रभावामुळे त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचाही सखोल अभ्यास केला. अखेरच्या काळात ते पुन्हा ‘स्वदेश मित्रन’ या दैनिकात काम करू लागले.

भाषाविषयक कार्य केवळ एका भाषेपुरते मर्यादित नसते, हे सुब्रह्मण्य भारती यांच्या कार्याकडे पाहू उमगते. याबाबत मराठी विश्वकोशात म्हटले आहे, ‘प्रगतशील नव्या साहित्याला अनुकूल व पोषक अशी लोकाभिरुची घडविण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी तमिळमध्ये अनेक उत्तमोत्तम अनुवाद केले. उदा., विवेकानंदांची व्याख्याने, अरविंदांचे लेख, वेदांतील काही ऋचा, पातंजल योगसूत्रांतील समाधिपाद, भगवद्‌गीता इत्यादी. त्यांच्या या अनुवादित कृतींची गणना अभिजात तमिळ साहित्यात केली जाते. सुब्रह्मण्य भारतींनी पांडित्याच्या संकुचित विश्वात बंदिस्त होऊन पडलेले तमिळ साहित्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यास अमाप लोकप्रियता मिळवून दिली, तसेच सर्वसामान्यांच्या प्रचलित जिवंत भाषेत ते आणले, ही त्यांची कामगिरी अजोड मानली जाते.’

अशा या थोर साहित्यिकाचा, कवीचा, स्वातंत्र्यसैनिकाचा जन्मदिन हा भारतीय भाषा दिन म्हणून साजरा केला जातो ही अतिशय आनंददायी गोष्ट आहे. या निमित्ताने सर्वच भारतीय भाषांकडे गांभीर्याने पाहण्याची आज नितांत गरज आहे. आपण मराठी भाषिकांनी अपल्या मराठी भाषेकडेही अधिक गांभीर्याने पाहिले असे सांगणारा हा दिवस आहे. मराठी केवळ संपन्न नाही तर अभिजात भाषा आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मोठे संशोधन करून प्रस्तावही दिला आहे. केंद्र सरकारकडून तो कधी मंजूर होतो याची गेली काही वर्षे आपण वाट बघत आहोत. २७ फेब्रुवारी हा दिवस कुसुमाग्रजांचा जन्म दिन असतो. हा दिवस ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून आपण साजरा करतो. तसेच २१ फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जात असतो. तर ११ डिसेंबर हा दिवस भारतीय भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. भाषिक वैविध्य जागतिक संस्कृतीतील महत्त्व अधोरेखित करणे व जपणे हा त्यामागील उद्देश आहे.

आणखी वाचा-अमृतकाळातही भ्रष्टाचारी मोकाट कसे ? 

काही वर्षांपूर्वी भाषा तज्ञांच्या एका जागतिक परिषदेत अशी भीती व्यक्त केली गेली की, सध्या जगातील वीस ते पन्नास टक्के भाषा मुले शिकताना दिसत नाहीत. आदिवासींच्या प्रदेशावर बाहेरच्या लोकांचे आक्रमण, मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर आणि भाषा शिकण्याच्या प्रवृत्तीचा अभाव अशी काही या ऱ्हासाची महत्वाची कारणे आहेत. परिणामी जगातील सहा हजार भाषांपैकी ९५ टक्के भाषा पुढील शतकात नष्ट होणार आहेत किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

भाषेचे नीट जतन केले नाही तर तीन दुष्परिणाम संभवतात (१) जग आजच्या पेक्षा कमी रंजक वाटेल. (२) निराळ्या पद्धतीने विचार करण्याची माणसाची शक्ती कमी होईल. (३) आपल्या अस्तित्वाला आवश्यक असलेली मानवी विविधता कमी होईल. हे सारे टाळायचे असेल तर आपण भाषेकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. म्हणजेच आपल्या लेखनात आपल्याच भाषेतील शब्दांचा वापर केला पाहिजे. कोणत्याही भाषेवरील संकट हे हळूहळू येत असते. ते आपल्या भाषेवर येऊ नये म्हणून आपल्याच भाषेतील शब्दांचा वापर आग्रहपूर्वक केला पाहिजे.

आणखी वाचा-जम्मू काश्मीरमधील आरक्षण प्रस्तावामागे समाजकारण की राजकारण?

कुसुमाग्रजांना १९८८ साली ‘भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार’ मिळाला. तो स्वीकारताना ते म्हणाले की, “इंग्रजीवर एक संपन्न भाषा म्हणून माझेही प्रेम आहे. जगातील ज्ञान विज्ञानाशी संपर्क साधणारी ती एक खिडकी आहे. हे सुभाषित मलाही मान्य आहे. पण खिडकी म्हणजे घर नव्हे. आपण घराच्या चार भिंती न बांधता फक्त खिडक्याच उभ्या करत आहोत. आपल्या भाषा मागासलेल्या आहेत ही तक्रारही खरी नाही. कोणतीही भाषा माजघरात किंवा बाजारात वाढत नाही. तर ज्ञानविज्ञानाच्या, राज्यकारभाराच्या, आर्थिक व्यवहाराच्या प्रांतात तिचा प्रवेश झाला तरच ती वाढू शकते. तशी ती वाढू शकते हे अनेक राष्ट्रांनी सिद्ध केलेले आहे. आपण कल्पनेची कुंपणे निर्माण करत आहोत. आणि एका परस्थ भाषेच्या पायावर डोकं ठेवून ‘तूच आम्हाला तार’ म्हणून विनवणी करत आहोत. देशातील बहुसंख्यांना न समजणाऱ्या परस्थ भाषेचा पांगुळगाडा घेऊन सामाजिक परिवर्तनाचा, प्रगतीचा पर्वत आपण चढू पाहत आहोत. भाषाविषयक समस्या सोडवणे सोपे नाही हे खरेच .पण अवघड प्रश्न कपाटात अधिक अवघड होत जातात.आणि शेवटी संभाव्य उत्तरेही गमावून बसतात…. समाजाचे वैचारिक आणि जीवनात्मक संचित काळातून पुढे नेणारी आणि परिणामतः समाजाच्या बदलत्या जीवनाला अखंडता, आकार आणि आशय देणारी भाषा ही एक महाशक्ती असते. सूत्रात ओवलेल्या मण्याप्रमाणे समाज जीवनाच्या साऱ्या धारणा आणि विकासाच्या प्रेरणा तिच्यात ओवलेल्या असतात.” कवी सुब्रमण्यम भारती यांचा जन्मदिन ‘भारतीय भाषा दिन’ म्हणून साजरा करत असताना हे सर्व आपण ध्यानात घेण्याची नितांत गरज आहे.

लेखक इचलकरंजी येथील ‘समाजवादी प्रबोधिनी’चे कार्यकर्ते तसेच ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ नियतकालिकाचे संपादक आहेत.

prasad.kulkarni65@gmail.com