विजय पांढरीपांडे
अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शाखेत प्रवेश हा गेल्या काही दशकांत पाल्य आणि पालक दोघांसाठीही शिवधनुष्य पेलण्याची परीक्षा घेणारे स्वयंवर होऊन बसले आहे. त्यासाठी अगदी सातवी- आठवीपासून हजारो रुपये फी असलेले ट्युशन क्लासेस, अन् मग कोटा, नारायणा, चैतन्यसारख्या ट्युशन इंडस्ट्रीतील छळवादी पिळवणूक हे नित्याचेच झाले आहे. याचे कारण आहे जेईई किंवा नीट सारख्या प्रवेश परीक्षांचे काठिण्य पातळी अधिकाधिक वाढविणारे स्वरूप. जेईई क्रॅक करणे म्हणजे गगनाला गवसणी घालणे! ही एकूणच पद्धत इतकी तांत्रिक, जीवघेणी झाली आहे की त्यापायी अनेक तरुण मानसिक विकृतीचे बळी ठरले आहेत. नैराश्यापोटी आत्महत्या करताहेत. खर्चामुळे अनेक पालकांचे दिवाळे निघत आहे, पण या दुष्परिणामांची कुणालाही चिंता नाही. हे सगळे बदलावे, सुधारावे असे कुणालाही वाटत नाही.

मुख्य म्हणजे अशा संस्थांतील प्रवेशासाठी एवढ्या कठीण परीक्षेची मुळात गरज आहे का? या दिव्यातून पार पडलेले अर्जुन, एकलव्य खरेच पुढे काय करतात? आयआयटीच्या नावामुळे त्यांना पटकन नोकरी मिळते, सहज परदेशी जाता येते हे खरे असले तरी खरेच ही मुले शहाणी होतात का? ज्ञान प्राप्त करणे अन् सर्वार्थाने शहाणे (विवेकी) होणे यात फरक आहे. ही मुले मुळात सर्वार्थाने हुशार असती तर आतापर्यंत आयआयटीच्या एकाही विद्यार्थ्याला वा प्राध्यापकाला नोबेल पुरस्कार का मिळाला नाही, यावरही विचार केला जाणे गरजेचे आहे.

आयआयटी परीक्षेची काठिण्य पातळी आणि त्यासाठी लागणाऱ्या तयारीचे स्वरूप लक्षात घेता ती श्रीमंत वर्गाची मक्तेदारी होऊन बसली आहे, हे स्पष्टच आहे. सामान्य घरातील, लहान गावखेड्यांतील मुलांसाठी हे अजूनही हाती न लागणारे दिवास्वप्नच ठरत आहे. विज्ञान गणितात येणारे प्रश्न सोडविता येणारेच तेवढे विद्वान आणि बाकी सगळे सरसकट सामान्य असे हे समीकरण सपशेल चुकीचे आहे. (आयआयटीत अध्ययन अध्यापन दोन्ही केले असल्याने मी हे विधान जबाबदारीने करतो आहे).

जर आयआयटीचे दरवाजे सामान्य गावातील गरीब मुलांसह सर्वांसाठी सताड उघडायचे असतील तर या परीक्षेचे स्वरूप आरपार बदलायला हवे. आधी मुलांचा बुद्ध्यांक तपासावा. त्याला तार्किक विचार करता येतो की नाही हे पाहावे. एखाद्या घटनेकडे, प्रश्नाकडे बघण्याचा स्वतंत्र दृष्टिकोन त्याच्यापाशी आहे का, हे तपासावे. कुठल्याही कठीण परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी करावी लागणारी विश्लेषण क्षमता ताडून पाहावी. गणितातली सूत्रे, विज्ञानातली उदाहरणे सोडविण्याची बुद्धी क्षमता तपासतानाच, त्याची भावनिक प्रगल्भता (इक्यू) बघावी. कारण बाकी इतर गोष्टी तो/ ती आयआयटीत आल्यावर शिकणारच आहे.

महत्वाचे म्हणजे त्याचे व्यक्तिमत्व इंजिनियर किंवा डॉक्टर होण्यायोग्य आहे का हे बघणे जास्त गरजेचे आहे. अन्यथा एखाद्या स्ट्राँग रुमच्या कुलुपासाठी चुकीची किल्ली शोधण्यासारखे होईल. नव्हे सध्या तेच होत आहे.

मुळात ज्या संस्थेच्या नावात टेक्नॉलॉजी आहे तिथे व्याख्येप्रमाणे ते तंत्रज्ञान (इंडस्ट्री प्रोसेस, प्रॉडक्टिव्हिटी, डिझाईन) किती शिकवली जाते, हा प्रश्नच आहे. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग नाव असलेल्या अभ्यासक्रमात नेमके सायन्स किती आणि इंजिनियरिंग किती, कोणते याचा कुणी शोध घेतला आहे का? विचार केला आहे का? सुशिक्षित पालकदेखील हा विचार करत नाहीत. मग कोवळी अपरिपक्व मुले कसला विचार करणार? कोणतीही गोष्ट गांभीर्याने न घेतल्याचा हा परिणाम आहे. शिक्षण, त्यातही इंजिनियरिंग मेडिकलचे उच्च शिक्षण हा असा हलक्यात घेण्याचा विषय नाही. आपण कोणतीच गोष्ट गांभीर्याने घेत नाही. पाल्य, पालक, शिक्षक, प्राध्यापक, संस्थाचालक, निर्णय घेणारे शासक अधिकारी, सरकारातले निवडून आलेले मंत्री सगळेच शिक्षणाच्या बाबतीत इतके अनभिज्ञ कसे याचे आश्चर्य वाटते.

आता तर आयआयटीची संख्या किती तरी पटींनी वाढली आहे. त्यात एनआयटीजची भर पडली आहे. यात प्रवेश घेणाऱ्यांची संख्याही कितीतरी पटींनी वाढली आहे. तेव्हा हे प्रवेश केवळ श्रीमंतांची मक्तेदारी म्हणून न राहता, सर्वसामान्य गरीब पण हुशार विद्यार्थ्यांसाठीदेखील सुलभ झाले पाहिजेत. त्याची सध्याची एकूण प्रक्रिया (प्रोसेस) काठिण्य पातळी बदलली पाहिजे. एकूणच प्रवेशाचे निकष बदलले पाहिजेत. जे पूर्वापार चालत आले आहे ते गेल्या काही दशकांतील बदल अन् भविष्यातील वेगळ्या गरजा लक्षात घेता मुळापासून बदलले पाहिजे. थोडक्यात कोऱ्या पाटीवर नवा अध्याय लिहिण्याची गरज आहे. ट्युशन इंडस्ट्रीला आळा घालायचा, कोवळ्या मुलांवरील ताण कमी करायचा तर हे बदल तातडीने व्हायला हवेत.

(लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)
vijaympande@yahoo.com