महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठीत बोलू न शकणाऱ्या दुकानदारांना चोप देण्याचे आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. या अलीकडील घडामोडीमुळे शहरातील बहुसंख्य व्यापाऱ्यांमध्ये विशेषतः गुजराती किंवा हिंदीभाषी उत्तर भारतीय राज्यांतील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
राज ठाकरे यांचे वडील हे शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे भाऊ होते. राज यांची आई बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नीची बहीण होती. म्हणजेच दोन भावांनी दोन बहिणींशी लग्न केले होते. राज यांनी आपल्या काकांचा, बाळ ठाकरे यांचा, बारकाईने अभ्यास केला. आणि त्यांच्या बोलण्याच्या तसेच नेतृत्वाच्या शैलीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही बाबतीत ते जवळपास यशस्वी झाले.
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेतृत्वपदासाठी आपल्या मुलाची, म्हणजे उद्धव ठाकरे यांची निवड केली, तेव्हा राज ठाकरे खूपच नाराज झाले. त्यानंतर त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यापासून फारकत घेतली आणि स्वतःची एक वेगळी ‘सेना’ स्थापन केली. बाळासाहेब ठाकरे यांचे बरेचसे चेले राज यांच्याकडे गेले, कारण रस्त्यावर भीती आणि दहशत पसरवण्यासाठी हिंसेचा वापर करण्यात राज मागेपुढे पाहणारे नव्हते. राज यांच्याभोवती गोळा झालेले बरेचसे लोक लुम्पेन एलिमेंट म्हणतात तशा प्रकारचे होते. बेरोजगारही होते. कारण आजच्या काळातील रोजगार मिळवण्यासाठी आवश्यक ती कौशल्ये त्यांच्याकडे नव्हती, हे पण तितकेच खरे.
याच गुंडगिरी करणाऱ्या आणि हाताला काम नसलेल्या बेरोजगार लोकांचा सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे यांनी राजकीय क्षेत्रातील लोकांना तसेच सर्वसामान्यांना आपली ताकद जाणवून देण्यासाठी वापर केला. त्यासाठी त्यांनी सुरुवात केली ती मुंबईतील दाक्षिणात्य लोक लक्ष्य असलेल्या ‘लुंगी हटाव’ मोहिमेपासून. त्यातून असा संदेश दिला गेला की, इंग्रजीतील प्रावीण्यामुळे स्थानिकांना मागे टाकून रेल्वे आणि इतर केंद्र सरकारच्या कार्यालयांतील सर्व शासकीय नोकऱ्या बळकावणाऱ्या दाक्षिणात्यांना यापुढे मुंबईत थारा दिला जाणार नाही.
बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना बँका, एअर इंडिया आणि मध्य आणि पश्चिम या दोन्ही रेल्वेंच्या व्यवस्थापनाला आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये अधिक मराठी लोकांना सामावून घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरली. यामुळे शिवसेना सामान्य मराठी माणसाच्या आयुष्यात अधिक महत्त्वाची ठरली आणि बाळासाहेब ठाकरे यांना राजकारणात आपले पंख विस्तारता आले. त्याकाळातील काँग्रेस सरकार शिवसेनेच्या बेकायदेशीर कृत्यांकडे डोळेझाक करत होते. कारण शिवसेनेमुळे कम्युनिस्ट आणि समाजवादी यांचा परस्पर काटा काढला जात होता, ही काँग्रेससाठी आनंदाची गोष्ट होती. त्यासाठी उजव्या विचारसरणीच्या सेनेने हातपाय पसरायला काँग्रेस सरकारची हरकत नव्हती.
भाजपने महाराष्ट्राच्या राजकीय परिघामध्ये प्रवेश केला तो शिवसेनेच्या पाठीवर बसून. पण तोपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत:ला “हिंदू हृदयसम्राट” म्हणून प्रस्थापित केले होते, आणि “मराठी माणसा”च्या अभिमानाला खतपाणी घालून शहरात आणि नंतर संपूर्ण राज्यात आघाडी मिळवली होती.
पण तोपर्यंत महाराष्ट्रात भाजपची राजकीय गणितं फळाला आली. शिवसेनेशी युती करण्याआधी महाराष्ट्रात भाजपला फारसे स्थान नव्हते. आता मात्र भाजप हा पक्ष सरकारमध्ये मोठा पक्ष आहे. दोन वर्षांपूर्वी भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी कौशल्याने केलेल्या फोडाफोडीमुळे, शिवसेनेतील मोठा गट फुटून शिंदे गटात सामील झाला आणि तो भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा भाग बनला. मुख्यमंत्रीपदाच्या आमिषामुळे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडली. २०२२ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारची जागा भाजपच्या मार्गदर्शनाखालील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने घेतली.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, आणि त्यामुळे बंडखोर एकनाथ शिंदेंना भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याशिवाय पर्याय उरला नाही.
बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील अखंड शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेवर जवळपास दशकभर सत्ता गाजवली होती. मुंबई महापालिका ताब्यात असणे म्हणजे पैशाचा ओघ कायम असणे. त्यामुळे रोजच्या तसेच निवडणूक खर्चासाठी शिवसेनेला तिथून पुरेसा पैसा मिळे, असे म्हटले जात असे. महापालिकेतील केवळ दहा टक्के ठेके पक्षाच्या गरजांसाठी वळवले तरी पक्षाला पुरेसे होते, असे सांगितले जाते.
कोविड-१९ ची साथ नियंत्रणात येऊन तीन वर्षे होऊनही महापालिका निवडणुका झालेल्या नाहीत. सध्या भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच मुंबई महानगरपालिकेचे प्रशासन पाहते आहे. हे प्रशासन महापालिका आयुक्तांच्या कार्यालयामार्फत चालवले जात आहे. आता डिसेंबरमध्ये निवडणुका होणार, अशी चर्चा आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेची प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी.उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येऊ पहात आहेत, ते महापालिका निवडणूक एकत्र लढले आणि राज ठाकरे यांनी शक्तीप्रदर्शनाची जबाबदारी घेतली, तर शिवसेना पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता वाढेल. कारण मुंबई शहरात शिवसेनेला नेहमीच यश मिळत आलं आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर शहरातील अमराठी दुकानदारांना राज ठाकरे यांच्या सैनिकांकडून लक्ष्य करण्यात आले. अर्थात मनसेला आपली ‘थप्पड मोहीम’ राबवण्याची सुवर्णसंधी मिळाली ती भाजपच्या हिंदी ही देशातील एकमेव संपर्क भाषा बनवण्याच्या अट्टहासामुळे. त्यासाठी अगदी अचानकपणे, महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून पाचवीपर्यंत हिंदी शिकवणे अनिवार्य असल्याचा आदेश देण्यात आला.
सध्या दोन भाषांच्या सूत्रानुसार सर्व शाळांमध्ये मराठी अनिवार्य आहे. त्यामुळे एखादी इंग्रजी माध्यमाची शाळा असेल, तर मराठीनंतर तिला हिंदीही शिकवावी लागेल – म्हणजे एकूण तीन भाषा शिकवाव्या लागतील. हा आदेश विद्यार्थ्यांच्या पालकांना अजिबात रुचला नाही आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही सेनेच्या नेत्यांना जनभावनेचा उपयोग करून घेण्यासाठी हवी तशी संधी मिळाली.
प्रत्यक्षात मुंबईतल्या हिंदीला हिंदुस्तानी असं म्हणतात, आणि ती भाषा शहरातील बहुतेक नागरिक बोलू आणि समजू शकतात. मी ९६ वर्षांपूर्वी मुंबईत (तेव्हाच्या बॉम्बेत) जन्मलो. मला कधीच रस्त्यावर किंवा कुठेही इतर नागरिकांशी संवाद साधताना अडचण आली नाही. ही भाषा कळ सोडून राजकारणी लोक ती आपापल्या राजकीय स्वार्थासाठी मुद्दाम मोठी करत आहेत, हिंदी ही दक्षिण भारतातही हळूहळू थोडीफार बोलली जाऊ लागली होती. पण भाजपने तिचा वापर राजकीय हेतूसाठी पुढे रेटून मोठी चूक केली आहे, याचा त्यांना नंतर पश्चात्ताप होईल. नोकरी मिळवण्यासाठी हिंदी शिकण्याची गरज उमजेल, तेव्हा लोक ती आपोआप शिकतील. सध्या मुंबईतील मराठी मध्यमवर्गीय कुटुंबं आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालतात, कारण त्यांना वाटतं की त्यामुळे नोकरी मिळण्याची शक्यता वाढेल. पण या इंग्रजी शाळांतील सगळी मुलं हिंदीही सहज बोलतात. माझे चार वर्षांचे दोन पणतू देखील हिंदी अगदी सहज बोलतात.
मागील शनिवारी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईत त्यांच्या ताकदीचे प्रदर्शन करणारी एक भव्य सभा घेतली. डिसेंबरमध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुका जनतेचा कल कुठे आहे हे स्पष्ट करतील. माझा अंदाज असा आहे की उद्धव यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे एकत्रितपणे शिंदे गटावर सरशी करतील आणि महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येतील. त्यांच्यामागोमाग भाजपचा क्रम लागेल, कारण गुजराती आणि हिंदी भाषिक नागरिकांचे बहुतेक मतदान भाजपकडे झुकण्याची शक्यता आहे.
दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या ‘थप्पड पथकां’ना कडक इशारा दिला आहे. नव्याने नियुक्त केलेले पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी अशा प्रकारच्या खोडसाळपणावर एक चांगली कल्पना सुचवली आहे. त्यानुसार दंगल घडवून आणल्याबद्दल केवळ गुन्हे दाखल करण्याव्यतिरिक्त, पोलिसांनी हिंसाचारात सहभागी झालेल्या मनसे कार्यकर्त्यांकडून यापुढच्या काळातील चांगल्या वर्तणुकीचे बॉण्ड भरून घेण्याचे ठरवले आहे. पूर्वीच्या फौजदारी दंड प्रक्रिया संहितेत याला ‘चॅप्टर प्रोसीडिंग्ज’ म्हणत. नव्या कायद्यानुसार याला काय म्हणतात ते मला माहीत नाही, पण ही कार्यपद्धती अशा ‘खोडसाळ’ लोकांना वठणीवर आणण्यासाठी प्रभावी ठरते. कारण थप्पड मारणे हा अदखलपात्र गुन्हा (non-cognizable offence) आहे, हे त्यांना नीट माहीत असतं.
जुलिओ रिबेरो (लेखक मुंबईचे निवृत्त पोलीस आयुक्त आहेत.)