घटना तशी जुनी आहे. ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धातील. महाराष्ट्रात तेव्हा शरद जोशींच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटना खूप प्रबळ होती. शेतीमालाच्या भावासाठी शेतकरी संघटनेची आंदोलने देशाचे लक्ष वेधून घेत असत. त्या वेळेस शरद जोशींनी एक आंदोलन जाहीर केले. दूध-भात आंदोलन. मागणी होती तांदळाच्या आणि दुधाच्या हमीभावाची. सरकारवर दबाव टाकण्यासाठी शरद जोशींनी जाहीर केले की शेतकऱ्यांनी शहराला होणारा दुधाचा पुरवठा रोखावा. हा निर्णय धाडसी होता. हातावरचे पोट असणारे शेतकरी दुधासारखा नाशवंत माल किती काळ साठवून ठेवू शकणार होते? पण बहुतांश दूध उत्पादक शेतकऱ्यांनी थोडा काळ तरी असे केले असते तर सरकारवर दुधाच्या भावासाठी मोठा दबाव येऊ शकेल असा विचार त्या धाडसी आंदोलनामागे होता. पण तसे घडले नाही. काही भागात शेतकऱ्यांनी दुधाचा पुरवठा बंद केला. पण बहुतांश दूध उत्पादक भागातून शहरांना दुधाचा पुरवठा सुरू राहिला. सरकारवर कोणताही दबाव येण्याची शक्यता नव्हती.
शरद जोशींनी लगेच पत्रकार परिषद बोलावली. बहुधा नाशिकमध्ये. ते या नामुष्कीमधून कसे बाहेर येतील, आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह कसा जिवंत ठेवतील याचे अंदाज बांधले जात होते. पत्रकार परिषदेत शरद जोशींनी पहिले वाक्य उच्चारले, ‘मी हरलेल्या सैन्याचा सेनापती म्हणून तुमच्यासमोर उभा आहे.’ दुसरे वाक्य उच्चारले, ‘दूध-भात आंदोलन पूर्ण फसले आहे आणि मी ते मागे घेत आहे.’
अशी प्रामाणिक कबुली देणे खूप धाडसाचे काम होते. यात अनेक धोके होते. आंदोलनांची तयारी म्हणून खेडोपाडी काही महिने कार्यकर्ते फिरलेले होते. त्या वेळेस मोबाइल नव्हते. दळणवळणाची साधने मर्यादित होती. अशा परिस्थितीत अपार कष्ट घेतलेल्या कार्यकर्त्यांना ‘तुमचे प्रयत्न पूर्ण फोल ठरले आहेत’, असे स्पष्टपणे सांगणे म्हणजे त्यांना कायमसाठी नाउमेद करण्याचा धोका होता. काहीतरी खोटी कारणे सांगून आंदोलनाच्या अपयशाची जबाबदारी दुसऱ्या कशावर तरी ढकलणे शरद जोशींना अशक्य नव्हते. स्वत:च्या प्रतिमेचे बंधनदेखील शरद जोशींवर असणार. पण त्यांनी ते ओलांडले. शरद जोशींच्या लोकप्रियतेत घट नाही झाली. उलट ती वाढली. शरद जोशींचा प्रामाणिकपणा शेतकऱ्यांना प्रचंड भावला. आपल्या एका आवाहनाने थोड्या काळात हजारो शेतकऱ्यांना एकत्र आणण्याची ताकद त्या वेळेस शरद जोशींच्या नेतृत्वात होती. पण त्याहीपेक्षा मोठी ताकद आपली अपयशासाठी खोटी कारणे द्यायची गरज न भासणे, प्रामाणिकपणा दाखवता येणे यात होती.
भारत पाक युद्धबंदीची घोषणा भारताने करायच्या काही तास आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यामुळे केंद्र सरकारची कुचंबणा झाली आहे. विरोधी पक्षाच्या टीकेला समर्थपणे उत्तर देणे त्यांना आव्हानात्मक ठरत आहे. आपण अशी कल्पना करूया की आज अटलबिहारी वाजपेयी पतंप्रधान आहेत. विरोधी पक्ष त्यांच्यावर ‘अमेरिकेच्या दबावामुळे ऑपरेशन सिंदूर थांबवले’ अशी टीका करत आहेत. आणि लोकसभेत वाजपेयी सांगत आहेत, की ‘‘हो, आम्हाला तसे करावे लागले. आणि तुम्ही ही परिस्थिती समजून घेतली पाहिजे. अमेरिका जगातील सर्वात श्रीमंत आणि सामर्थ्यशाली देश आहे हे सत्य आहे. आणि आज जागतिक परिस्थिती अशी आहे की आपल्याला हवा तो निर्णय घ्यायला भारत स्वतंत्र नाही. आपल्या देशाचे व्यापक हितसंबंध लक्षात घेऊन मी हा निर्णय घेतला’. समजा असे उत्तर वाजपेयींनी दिले असते तर त्यांची लोकप्रियता ओसरली असती का? बहुधा याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. शरद जोशींप्रमाणे वाजपेयींची लोकप्रियता कदाचित वाढली असती. आणि असा निष्कर्ष काढायला आपल्याला इतिहासात अनेक दाखले सापडतात.
१९७१ च्या युद्धात विजय मिळवून आणि पाकिस्तानची फाळणी करून ‘इंदिरा गांधींनी युगप्रवर्तक काम केले आहे’, असे ते मोकळेपणाने म्हणाले. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत अजिबात घट झाली नाही. उलट त्यांच्या राजकीय प्रतिमेला खोली प्राप्त झाली. आणि पुढे काँग्रेसचा पराभव करून ते देशाचे पंतप्रधान झाले. वाजपेयी नेहरूंबद्दल आदर व्यक्त करूनदेखील ते नेहरूंच्या धोरणाचे कठोर टीकाकार होऊ शकले. त्यांच्या काळात कारगिलमधे पाकिस्तानचे सैन्य घुसले म्हणून त्यांच्यावर विरोधी पक्षांनीदेखील सरकार गाफील राहिल्याबद्दल टोकाची टीका केली नाही. ‘पाकिस्तानने आगळीक केली म्हणून कारगिलचे युद्ध होत आहे. म्हणून आपल्याला ही संधी आहे. आता तुम्ही पीओके घेतलेच पाहिजे’ अशी अपेक्षाही त्यांच्याकडून केली गेली नाही. अशा अपेक्षा त्यांच्याकडून केल्या न जाणे हा त्यांचा दुबळेपणा नव्हता. ही वाजपेयींची ताकद होती.
वाजपेयी दोन वेळेस अत्यंत अल्पकाळासाठी पंतप्रधान झाले. १९९६ साली त्यांचे सरकार १३ दिवसांत पडले. १९९८-९९ साली ते सरकार १३ महिने टिकले. त्या वेळेस ‘आपल्याला बहुमत नाही आणि आपण राष्ट्रपतींकडे राजीनामा देण्यासाठी जात आहोत’, असे सांगणारे त्यांचे भाषण भाजपविरोधी असलेल्या माणसाच्याही भावनेला स्पर्श करणारे होते. त्यालादेखील वाईट वाटायला लावणारे होते. या भाषणात अभिनिवेश नव्हता. वास्तवतेचा मोकळेपणाने केलेला स्वीकार होता. लोकसभेत बहुमत न मिळवता येणे हा त्यांचा मोठा पराजय होता. पण त्या पराजयातूनदेखील वाजपेयींना खोल अर्थाने राजकीयदृष्ट्या विजयी करणारा आयाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला होता. त्यात त्यांची रणनीती नव्हती. ते अकृत्रिम होते. माणूस म्हणून भिडणारे होते. त्यात संदेश होता, ‘मी कोणीतरी अफाट व्यक्तिमत्त्वाचा राजकीय नेता नाही. मी तुमच्यासारखाच साधा माणूस आहे. परिस्थितीपुढे अगतिक ठरणारा’.
पण ही ताकद वाजपेयींना फक्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे नव्हती लाभलेली. त्या व्यक्तिमत्त्वाचा आदर असणाऱ्या भारतीय समाजाने ती त्यांना दिली होती. मग आपण समाज म्हणून तेव्हा वेगळे होतो का? आता खूप बदललो आहोत का?
आज आपल्याला अत्यंत प्रबळ नेतृत्वाची आस आहे. जगातील कोणत्याही दुसऱ्या शक्तीला न जुमानणारा नेता. जागतिक पटलावर आता एक सामर्थ्यशाली देश म्हणून भारताचे आगमन झाले आहे, असे जगाला ठणकावून सांगणारा नेता आपल्याला प्रिय आहे. आणि अशी आपली मानसिकता असताना आपल्याला वाजपेयी हे किती सामर्थ्यशाली होते हे कसे कळणार? वाजपेयींना प्रगत देशांच्या राष्ट्रप्रमुखांना भेटत. व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष त्यांचे स्वागत करत तेव्हा आपल्याला आपल्या देशाचा मोठा सन्मान होतो आहे, म्हणून मोहरून येत नसे. वाजपेयीच नाही तर नेहरू, इंदिरा गांधी, नरसिंह राव या सगळ्यांच्याच बाबतीत ते खरे होते. देश त्या वेळेस आर्थिकदृष्ट्या आजच्यापेक्षा कमी प्रगत होता. तरीही प्रगत देशात आपल्या पंतप्रधानांचे स्वागत कसे होते याबद्दल आपण संवेदनशील नव्हतो. ती आपली मानसिक गरज नव्हती. आणि तशी आपली गरज नसणे, ही आपली समाज म्हणून ताकद होती. म्हणून वाजपेयींचीदेखील ती ताकद होती.
राजकीय नेत्याचे सामर्थ्य कशात असते? ते असते त्याला असलेल्या स्वातंत्र्यात. वाजपेयींना मोठे स्वातंत्र्य होते. विरोधी पक्षाच्या नेत्यांची स्तुती करण्याचे स्वातंत्र्य होते. इंदिरा गांधी, नेहरू आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांच्या योगदानाची दिलखुलास स्तुती करण्याचे स्वातंत्र्य होते. वाजपेयी म्हणूनच एक अत्यंत प्रबळ नेते होते.
आज आपल्यावर राष्ट्रवाद प्रभाव गाजवतो आहे. तो आक्रमक आहे. पण सामर्थ्यशाली नाही. सामर्थ्यशाली राष्ट्रवादाला खोली असते. तो एखाद्या घटनेने गर्भगळीत नाही होत. आता आपण छोट्या छोट्या घटनेने नाराज होतो. आपले पंतप्रधान प्रगत देशांच्या नेत्यांच्या पहिल्या रांगेत उभे आहेत की दुसऱ्या याबद्दल आपण खूप संवेदनशील झालो आहोत. एखाद्या नार्सिस्ट माणसासारखा आपला देश कमालीचा नार्सिस्ट झाला आहे. जगाकडे आपण आपल्याच दृष्टिकोनातून पाहत आहोत. आपण एक विकसनशील देश आहोत. आपला जगाच्या व्यापारात वाटा खूप किरकोळ आहे, (तो अर्थातच आपल्याला वाढवायचा आहे) याचेही भान आपल्याला नसते. देशाच्या विकासासाठी उत्साह टिकायला हवाच. पण त्यासाठी आत्मभान हरवण्याची गरज नाही.
पण आज जगात आपल्या देशातील लोकांचे आत्मभान घालवणाऱ्या नेत्यांची चालती आहे. आणि या नेत्यांना दुसऱ्या देशातील तशाच व्यक्तिमत्त्वाच्या नेत्यांचे आकर्षण असते. डोनाल्ड ट्रम्प यांना पुतिनचे केवढे अप्रूप होते. योग्य-अयोग्यतेचा कोणताही विधिनिषेध न बाळगण्याच्या वृत्तीच्या ट्रम्प यांना असलेले कौतुक त्यांनी अनेकदा बोलून दाखवले आहे. जे नेते लोकशाहीचे संकेत पाळतात आणि पराभूत होतात किंवा काही मुद्द्यांवर माघार घेतात अशा नेत्यांची ट्रम्प ‘लूजर’ अशी संभावना करतात. ‘लूजर’ ही ट्रम्प यांच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठी शिवी. काहीही करा पण विजयी व्हा, हे त्यांचे एकमेव तत्त्व. त्यामुळे त्यांना आपल्याला राजकीय विरोधकांना क्रूरपणे नेस्तनाबूत करून लोकशाहीची वाट लावणारे पुतिन आवडणे स्वाभाविक होते. पण त्या मैत्रीची खोली तितपतच.
ट्रम्प आणि पुतिन यांचे नाते किती उथळ होते हे आता उघड झाले आहे. खोटा आत्मगौरव, स्वत:च्या देशातील राजकीय विरोधकांचा द्वेष आणि जगावर साम्राज्य गाजवण्याची इच्छा अशा प्रवृत्तीच्या नेत्यांमुळे जगाचे नुकसान होत आहे. दीर्घकालीन प्रयत्नांमधून, अफाट कष्ट करून उभारलेली जागतिक व्यापार संघटना आज निष्प्रभ ठरली आहे. जागतिक तापमानवाढीचे मोठे संकट झपाट्याने वाढत असताना जग मात्र उथळ, अहंकारी नेत्यांच्या तावडीत सापडले आहे. आज सर्व जगाला गरज आहे ती खोटी आश्वासने देऊन आत्मभान न घालवणाऱ्या, वरवर पाहता ‘कमकुवत’ भासणाऱ्या सामर्थ्यशाली नेतृत्वाची.
milind.murugkar@gmail.com