scorecardresearch

Premium

डॉ. आंबेडकरांची स्वप्ने कधी आणि कशी पूर्ण होणार?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उपेक्षितांच्या उद्धाराचा पाया घालून दिला, मात्र आपले जीवितकार्य पूर्णत्वास नेण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी आजचा समाज काय करू शकतो, याविषयी महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर केलेले चिंतन…

When and how will Dr Babasaheb Ambedkars dreams come true
डॉ. आंबेडकरांनी पाहिलेले स्वप्न सामाजिक- आर्थिकदृष्ट्या विकसित राष्ट्राचे होते.(फोटो- संग्रहित छायाचित्र)

प्रा.डॉ. विठ्ठल खंडुजी जायभाये
आज महापरिनिर्वाण दिन! जगात अनेक महान विभूती जन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंत परोपकारांसाठी झिजतात. या देदीप्यमान महामानवांच्या रांगेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अग्रस्थानी आहेत. काही व्यक्तींच्या कार्याचा व्यापच एवढा मोठा असतो की, एक आयुष्य अपुरे पडते, असे त्या व्यक्तीला आणि तिच्या अनुयायांनाही नेहमीच वाटते. ऐन उमेदीचा काळ, प्रगल्भता आणि अनेक लोकोपयोगी कामे शिल्लक असताना जीवन पटलावरून त्यांची झालेली एक्झिट ही सर्वांच्या काळजाला चटका लावून जाते!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्वास घेतला आणि अक्षरशः लाखो हृदये क्षणभर थांबली! आभाळ फाटले! कुणी कुणाचे सांत्वन करावे, हे कळेनासे झाले. लोक सैरभैर झाले होते! त्यादिवशी जगाच्या इतिहासात एखाद्या व्यक्तीच्या अंत्यदर्शनाला झालेल्या गर्दीचे विक्रम मोडीत निघाले. उपेक्षित, वंचितांचा आवाज हरपला! आबालवृद्ध अंत्यदर्शनाला गेले! अनेक जण गावातच रडत बसले, तर कित्येकांनी अन्न-पाणी सोडले! संपूर्ण देश शोकसागरात बुडाला.

readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
satyashodhak kamaltai vichare, satyashodhak kamaltai vichare information in marathi,
स्त्रियांच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या सत्यशोधक कमलताई विचारे
maharshi dayanand saraswati marathi article, swami dayanand saraswati marathi news
वेदांमधून बुद्धिप्रामाण्याकडे नेणारे महर्षी दयानंद!
politicians, new awakening, ideological decline,
राजकारण्यांच्या दृष्टीने जे नवप्रबोधन ती प्रत्यक्षात वैचारिक अधोगतीही असू शकते!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास अतिशय खडतर होता. त्यांच्या जीवनातील एकेका प्रसंगावर एक एक ग्रंथ लिहिता येईल, एवढा मोठा संघर्ष करून त्यांनी विविध क्षेत्रांत उत्तुंग कार्य केले. त्यांच्या आईचे लवकर निधन झाले असले तरी सुभेदार रामजींनी आपल्या लेकरांवर सन्मानाने जगण्याचे संस्कार केले. अभ्यास, वाचन यांची शिदोरी त्यांना बालवयातच लाभली. भीमराव चिकित्सक, चाणाक्ष आणि बुद्धिमान होते. याचा परिणाम म्हणजे ते शाळेत शिक्षकप्रिय विद्यार्थी झाले. गुरुजींनी विविध ग्रंथ देऊन त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण केली. एकापाठोपाठ एक यशाची शिखरे पादाक्रांत करत असताना त्यांना परदेशी शिक्षणाची संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीचे सोने केले. अत्यंत खडतर परिस्थितीत शिक्षण घेऊन अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवून ते डॉ. भीमराव आंबेडकर झाले.

आणखी वाचा-शिकल्यासवरल्या लोकांनी धोका दिला!

परदेशातून भारतात परतताच त्यांना जातीभेदाचे प्रचंड चटके सोसावे लागले. लहानपणी अजाण असलेले बाबासाहेब आता सुज्ञ झाले होते. सुरुवातीला बडोदा संस्थानात नोकरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु स्पृश्यास्पृश्यतेच्या झळांमुळे ते ती फार काळ करू शकले नाहीत. काही काळ वकिली केली, मात्र त्यांना गावकुसाबाहेरील माणसांच्या व्यथा-वेदना स्वस्थ बसू देत नव्हत्या. त्याचवेळी त्यांनी कुठेही नोकरी करायची नाही, केवळ समाजातील वंचित, उपेक्षित लोकांचा आवाज व्हायचे, असा निर्णय त्यांनी घेतला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे शिल्पकार होते. त्यांनी स्वतंत्र भारताची मजबूत उभारणी करण्यासाठी वाट निर्माण करून दिली. यामध्ये भारतीय राज्यघटना हे त्यांचे सर्वोच्च कार्य आहे. राज्यघटनेची बांधणी करताना काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचा विविध जाती, धर्म, पंथांचा भारत देश त्यांच्या समोर होता. इथला कोणताही माणूस कोणत्याही मूलभूत हक्कांपासून, सोयी-सुविधांपासून वंचित राहणार नाही, यासाठी आवश्यक सर्व तरतुदी त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्यघटनेत केल्या. त्यांच्या प्रयत्नांतूनच भारतीय राज्यघटना एका अत्युच्च शिखरावर पोहोचली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय राज्यघटना वाचल्यावरच येतो.

डॉ. आंबेडकरांनी आजच्या विकसित भारताची काही स्वप्ने पहिली होती. ते किती द्रष्टे होते हे याचा प्रत्यय त्यांच्या ग्रंथांतील विचारांवरून येतो. डॉ. आंबेडकरांनी पाहिलेले स्वप्न सामाजिक- आर्थिकदृष्ट्या विकसित राष्ट्राचे होते. येथील तरुण उच्च शिक्षित, विवेकी, शीलवंत, गुणवंत, प्रज्ञावंत, मनाने व शरीराने मजबूत झाला पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते आणि त्यासाठीच ‘शिका’ हा महामंत्र त्यांनी दिला. शिक्षणच माणसाला सर्वांगीण विकसित आणि मजबूत करते, अशी संपूर्ण खात्री त्यांना होती. त्याशिवाय ‘मी, संपूर्ण भारत बौद्धमय करेन!’ ही एक महत्त्वपूर्ण प्रतिज्ञा डॉ. आंबेडकरांनी केली होती. धर्मांतर केल्यानंतर त्यांना फारसे आयुष्य लाभले नाही, मात्र त्या अल्पकाळात त्यांनी येथील गावकुसाबाहेरील लोकांना आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार देणारा धम्म स्वतः स्वीकारला आणि त्याला मुख्य प्रवाहात आणले.

आणखी वाचा-नरेंद्र मोदींचं स्वतःच्याच प्रतिमेवर एवढं प्रेम का आहे?

माणसामाणसांत भेद करणारे कर्मकांडांसाठी आग्रही असणारे सर्वच धर्म त्यांनी नाकारले. देशातील वंचितांना कुणीतरी आपला विचार करणारा वाली आहे, याची जाणीव झाली. त्यानंतर पुन्हा एकदा बुद्ध धम्म वाढण्याची चळवळ देशभर उभी राहिली. याशिवाय ‘ॲनिहिलेशन ऑफ कास्ट’ (जातीअंत) हा निबंध लिहून भेदभावरहित जीवन जगण्यासाठी सर्व देशवासीयांना एका रेषेत आणण्याचे उपाय त्यांनी सुचविले. जातीजातींतील दरी संपविण्यासाठी आंतरजातीय विवाह हा उत्तम पर्याय त्यांनी सुचवला. अशी स्वावलंबनाची, एकात्मतेची अनेक स्वप्ने डॉ. बाबासाहेबांनी पहिली होती. परंतु त्यांची ही स्वप्ने पूर्ण होण्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. मग त्यांनी पाहिलेली स्वप्ने कोण पूर्ण करणार? हा प्रश्न आजही अनुत्तरीतच आहे.

महापरिनिर्वाणदिनी पडणारे प्रश्न…

खरंच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात आपण त्यांची स्वप्ने पूर्ण करणार आहोत का? आज जे स्वतःला त्यांचे कट्टर अनुयायी म्हणवतात ते काय करत आहेत? बाबासाहेबांची चळवळ कुठे आहे? त्यांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष कुठे आहे? त्यांनी स्थापन केलेल्या संस्था त्यांच्या तत्त्वावर मार्गक्रमण करत आहेत का? असे एक ना अनेक प्रश्न आज त्यांच्या महापरिनिर्वाणदिनी पडतात. त्यासाठी केवळ एखाद्या समूहावर विसंबून न राहता आज आपणा सर्वांनाच त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी झटावे लागणार आहे.

देशातील तरुणांनी काळाची पावले ओळखून कार्य करावे लागेल. आज देशाच्या तरुणाईला इंटरनेट, समाजमाध्यमांचे ग्रहण लागले आहे. दिवसेंदिवस तरुणांच्या आत्महत्या वाढत आहेत. ही उद्याच्या समृद्ध भारतासाठी मोठी धोक्याची घंटा आहे. शिक्षण हे केवळ नोकरीसाठीच आहे, ही धारणा दूर करावी लागेल. त्यासाठी व्यावसायिक शिक्षण घेऊन प्रत्येकाला स्वावलंबी व्हावेच लागेल. याच्या जोडीला देशातील जाती जातीतील वाढती कट्टरता कमी करावी लागेल. आपण सर्वांनी घटनात्मक मार्गाने आपल्या मागण्या सरकारसमोर ठेवल्याच पाहिजे. त्याचबरोबर जिथे कुठे आंतरजातीय विवाह घडून येत असतील तिथे त्या समाजाने मोठ्या मनाने ते स्वीकारून अशा विवाहांना समाजमान्यता दिली पाहिजे. पोकळ प्रतिष्ठेचा बाऊ करून ऑनर किलिंग सारखे प्रकार घडता कामा नयेत.

आणखी वाचा-नौदलाने असे यशस्वी केले ‘ऑपरेशन जॅकपॉट’…

देशभर सर्वत्र मोठ्या ताकदीने बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करून लोकांना जगात बौद्ध धम्म कसा महान, सर्वसमावेशक, सामानता प्रस्थापित करणारा आणि कर्मकांड विरहीत आहे, हे पटवून द्यावे लागेल. त्यासाठी बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करून गावागावांत व्याख्याने, प्रवचने आयोजित करावी लागतील. असे झाल्यास निश्चितपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेली स्वप्ने प्रत्यक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत.

लेखक व्याख्याते आणि कवी आहेत.

jayvithal@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mahaparinirvan diwas when and how will dr babasaheb ambedkars dreams come true mrj

First published on: 06-12-2023 at 09:31 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×