डॉ. अमित पाटील
जीवसृष्टीतील अन्नसाखळ्या अबाधित राहणे ही निसर्गसंवर्धनाच्या दृष्टीने अत्यावश्यक अशी बाब आहे. सध्या सर्वच सजीव सृष्टीवर, विशेषतः प्राणी जगतावर अन्नसाखळ्या बाधित झाल्यामुळे मोठे संकट ओढाले आहे. मी जवळपास २०१३-१४ पासून सापांचा अभ्यास करीत आहे, पश्चिम घाटांच्याचा एक भाग असणाऱ्या राधानगरी-दाजीपूर-गगनबावडा या जंगलपट्ट्यातील सापांचा अभ्यास करून त्यांच्या प्रजातींच्या नोंदी ठेवण्याचा वैयक्तिक प्रयत्न करत आहे. सापांची संख्या मोजणे हे एक अत्यंत गुंतागुंतीचे आणि कठीण काम आहे. त्यांच्या वावराचे थेट निरीक्षण करणे कठीण असल्याने वैज्ञानिक अनेक विशेष पद्धती वापरतात.
मार्क-रिकॅप्चर पद्धत, दृश्य निरीक्षण पद्धत, रेडिओ ट्रॅकिंग, ड्रिफ्ट फेन्स आणि ट्रॅप्स, पर्यावरणीय डीएनए मॅपिंग आणि कॅमेरा ट्रॅप्स या सापांची संख्या मोजण्याच्या मुख्य शास्त्रीय पद्धती आहेत. पण, साप लपून राहणारे, बहुधा रात्री सक्रिय, दाट जंगलात अवघड ठिकाणी राहणारे आणि बऱ्याचदा त्यांच्या विषामुळे धोकादायक असणारे जीव असल्यामुळे त्यांची संख्या इतर प्राण्यांप्रमाणे व्यवस्थितपणे मोजता येत नाही. शिवाय, सर्पगणनेच्या बऱ्याच पद्धती या महागड्या, सहजासहजी उपलब्ध न होणाऱ्या व सहजासहजी वापरता न येण्याजोग्या आहेत. साप समृद्ध भागात पूर्वी व आता दिसणारी सापांची संख्या यांवर माझे निरीक्षण ढोबळमानाने बेतलेले आहे.
मी वैद्यकीय क्षेत्रातला डॉक्टर असून पारंपरिक प्राणिशास्त्राचा विद्यार्थी नाही,. निसर्गाची आवड आणि त्यातल्या त्यात सापांबद्दलचे आकर्षण असल्यामुळे मी त्यांचे वर उल्लेख केलेल्या जंगलपट्ट्यात निरीक्षण करत आलो आहे. गेल्या काही वर्षांत माझ्या हे लक्षात आले आहे की काही ठराविक साप खूप कमी प्रमाणात आढळू लागले आहेत. हे गंभीर आहे, असे मला वाटते. सापांना शेतकऱ्यांचे मित्र मानले जाते. वस्तुतः साप हे फक्त शेतकऱ्यांचेच नाही, तर अखंड मानवजातीचेच मित्र आहेत असे म्हणायला हरकत नाही.
तिसऱ्या जगातल्या देशांत तर सापांचे महत्त्व वादातीत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे या देशांत केवळ एका जेवणावर दिवस काढणारे करोडो लोक आहेत. यांतील बरेचसे देश हे अन्नधान्याच्याबाबतीत स्वयंपूर्ण नाहीत. त्यामुळे जे काही धान्य पिकवले जाते त्याची नासाडी टाळणे गरजेचे ठरते. ‘भारतीय कृषी संशोधन संस्था’ आणि ‘फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या अंदाजानुसार मूषकवर्गीय प्राणी एकट्या भारतात दरवर्षी सुमारे २.५-३.५ कोटी टन धान्य फस्त करतात. याचे रूपांतर पैशांत केले तर हे नुकसान दरवर्षी अंदाजे ४५ हजार ते ६५ हजार कोटी रुपयांच्या घरात जाते. आपल्या देशातल्या काही राज्यांचे वार्षिक अर्थसंकल्पही इतक्या प्रचंड रकमेचे नाहीत. उंदीर नियंत्रणाचे काम फक्त सापच करू शकतात. सापांचे आपल्या लेखी इतके महत्त्व आहे.
गगनबावडा परिसरात मी जवळपास २७-२८ प्रकारच्या सापांच्या प्रजातींची नोंद केली आहे. त्यातील किमान तीन-चार प्रजातींच्या सापांची संख्या लक्षात येण्याइतपत कमी झाल्याचे मला प्रथमदर्शनी जाणवत आहे. (निव्वळ निरीक्षणाधारित अभ्यास) या प्रजाती म्हणजे, हिरवा हरणटोळ (Green Vine Snake), खापरखवल्या (Shieldtail), पश्चिम घाटांची शान असणारा मलबार चापडा (Malabar Pit Viper) आणि हिरवी घोणस (Bamboo Pit Viper) या होत! यातील मलबार चापडा व हिरवी घोणस हे साप मुख्यत्वे गगनबावडा जंगल पट्ट्यातील काही विशिष्ट भागांत आणि शक्यतो पावसाळ्यात आढळतात, तर इतर दोन प्रजाती कमी-जास्त प्रमाणात विस्तृत भूभागावर दिसून येतात. जगभरातही सापांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. आता यावर संशोधकांनी अभ्यास सुरू केले आहेत. त्यातून पुढे आलेल्या कारणांचा ऊहापोह करूया.
पहिले कारण म्हणजे, सातत्याने होणारा सापांच्या नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास. बेसुमार जंगलतोड, शेतीसाठी जमीन साफ करणे, शेतीचे यांत्रिकीकरण, शहरे आणि रस्ते बांधणी, जंगलतोडीची भरपाई म्हणून एकाच प्रकारच्या वृक्षांची बनविली जाणारी कृत्रिम वने यांमुळे सापांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. जंगलतोडीची भरपाई म्हणून जे वृक्षारोपण केले जाते, त्यात वृक्षांची गुणात्मक लागवड करण्याऐवजी केवळ संख्यात्मक भरपाई केली जाणे. साप हे शीत रक्ताचे सजीव आहेत. त्यांना स्वतःच्या शरीराचे तापमान स्वतः नियंत्रित करता येत नाही.
यामुळे थंड वातावरणात किंवा रात्रीच्या वेळी साप थांबण्यासाठी शक्यतो उबदार जागांची निवड करतात. नैसर्गिक पद्धतीने वाढलेल्या जंगलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे असल्यामुळे काही ठिकाणी जमिनीवर थेट सूर्यप्रकाश पोहोचतो, तर काही ठिकाणी वृक्षाच्छादनामुळे जमीन थंड राहते. या दोन्हींचा सापाला फायदा होतो; मात्र एकाच प्रकारच्या झाडांची जंगले असतील सापांचा अधिवासांचा आक्रसतो. भक्ष्यांच्या दुर्भिक्ष भेडसावते.
दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, हवामान बदल. सापांची प्रजोत्पत्ती, अन्न साखळी आणि अधिवास यांवर याचा विपरीत परिणाम होतो. पावसाची अनियमितता, पाऊस पडायला होणारा विलंब किंवा अचानक पडणारा तीव्र पाऊस यांमुळे पावसाच्या पाण्यावर जीवनचक्र अवलंबून असणाऱ्या ‘मलबार पिट वायपर’ची संख्या घटत चालली आहे. पावसाच्याच प्रदेशात वास्तव्य असणाऱ्या ‘बांबू पिट वायपर’ किंवा हिरवी घोणस या सापांची संख्याही घटताना दिसते.
तिसरे कारण म्हणजे, रस्ते अपघातांत मोठ्या प्रमाणावर सापांचे मृत्यू होणे हे होय! नोव्हेंबर २०२४ मध्ये धनंजय कुमार आणि दत्ताप्पा गायकवाड यांनी प्रकाशित केलेल्या एका शोधनिबंधात मध्य पश्चिम घाट परिसरातील सापांच्या मृत्यूच्या कारणांमध्ये हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे अधोरेखित केले आहे. हरणटोळ आणि खापरखवल्या या दोन्ही प्रजातींतील साप रस्त्यावर मंद हालचाली करतात व वाहनांचा धोका दिसताच पळून जाण्याऐवजी तिथल्या तिथेच थिजून जातात. परिणामी ते गाड्यांच्या चाकांखाली येतात. साप शक्यतो तापमान नियंत्रणासाठी किंवा भक्ष्याचा पाठलाग करत असताना रस्ते ओलांडतात. लांबीला जास्त वाढणाऱ्या सापांत लैंगिक परिपक्वता तुलनेने उशिरा येते. त्यामुळे, यातील मध्यम वयाचे साप, जे अजून लैंगिक अपरिपक्व आहेत, ते रस्त्यांवर मरतात. प्रजननक्षम सापांची संख्या कमी होऊन आपसूकच त्या प्रजातीतील सापांची संख्या रोडावते.
चौथे कारण म्हणजे, हल्ली शेतीमध्ये वाढलेला रासायनिक खते व कीटकनाशकांचा बेसुमार वापर. कीटकनाशकांचा अंश असणारी धान्ये उंदीर खातात आणि त्या उंदरांना सापांनी खाल्ल्यामुळे साप मरतात. काही कीटकनाशकांमुळे सापांच्या जनुकीय रचनेत काही बदल होतात का याचाही अभ्यास करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
पाचवे कारण म्हणजे वणवे. आपल्याकडे लागणारे वणवे हे बऱ्याचदा मानवनिर्मित असल्याचे माझे निरीक्षण आहे. अशावेळी आगीपासून वेगाने दूर पळता न आल्यामुळे सर्वच सरीसृपांचा (आणि पक्ष्यांच्या पिलांचा) जळून मृत्यू होतो. याशिवाय, आणखीन एक सर्वसामान्य कारण म्हणजे, भीतीमुळे सापांना मारले जाणे हे होय. बिनविषारी सापांना विषारी समजून मारले जाणे, साप डूख धरतो असे समजून समोर दिसणाऱ्या सापाला मारणे असे प्रकार तर रोजचेच आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सापांची त्वचा (शोभेच्या वस्तू किंवा बॅगा बनविण्यासाठी) आणि काही पारंपारिक औषधांत होणारा सापांचा (विष व हाडे) वापर यासाठी होणारी तस्करी हेही चिंतेचे कारण आहे. शिवाय, काही सर्पमित्र विषारी सापांना मौल्यवान विषासाठी पकडून त्यांची तस्करी करतात अशा बातम्याही अधूनमधून येतात.
उपाय काय?
उपरोल्लेखित कारणांवरील उपायांची विभागणी आपण ढोबळमानाने दोन प्रकारांत करू शकतो. एक म्हणजे, विस्तृत शासकीय व पर्यावरणीय स्तरावर करावयाचे उपाय आणि दुसरे म्हणजे, वैयक्तिक व सामाजिक स्तरावर करावयाचे उपाय.
शासकीय व पर्यावरणीय स्तरावर करावयाचे उपाय हे मुख्यत्वे सापांचा अधिवास शाबूत राखणे व अधिवासांचे संरक्षण-संवर्धन करणे या प्रकारचे आहे. यासाठी पर्यावरणप्रेमींचे अभ्यास व दबावगट निर्माण होणे गरजेचे आहे. राष्ट्रीय व्याघ्र कार्यक्रमांप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर ‘पर्यावरण व वने’विभागाच्या नेतृत्वाखाली ‘राष्ट्रीय सर्प संरक्षण व संवर्धन धोरण’ आखणे गरजेचे आहे. पश्चिम व पूर्व घाटात मोठ्या प्रमाणावर सुरू असणाऱ्या खनिकर्मामुळे तिथे होणारी अमर्याद जंगलतोड नियंत्रित करणे गरजेचे आहे. बरीच जंगलक्षेत्रे, गवताळ कुरणे, पाणथळ जागा हे अधिवास संरक्षित क्षेत्रे म्हणून घोषित करणे तातडीचे आहे. सर्पोद्यानांपेक्षा साप, त्यांचे भक्ष्य आणि अधिवास यांच्या संरक्षणासाठी विशेष सर्प-अभयारण्ये स्थापन करणे शक्य आहे का याची चाचपणी करून अशा प्रकल्पांची आर्थिक व पर्यावरणीय व्यावहार्यता पडताळून पाहिली पाहिजे. ‘जागतिक तापमानवाढ’ व ‘कर्बोत्सर्जना’चे वाढलेले प्रमाण ही आता कोणत्याही एका देशाची समस्या राहिली नसल्यामुळे त्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर काम होणे गरजेचे आहे. वृक्षाच्छादन वाढविणे, प्रदूषणावर नियंत्रण आणणे या गोष्टी देशपातळीवर प्रभावीपणे राबविणे शक्य आहे. जंगलतोडीची भरपाई करण्यासाठी स्थानिक जंगलांच्या संरचनेनुसार विविध प्रजातींच्या झाडांची लागवड करून नुकसान टाळता येईल. शिवाय, सापांच्या विस्कळीत अधिवासांना जोडण्यासाठी ‘अधिवास मार्गिका’ निर्माण करता येणे शक्य आहे.
मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून मानव–साप संघर्ष कमी करणे, प्रशिक्षित सर्पमित्रांची मदत घेऊन २४×७ कार्यरत असणारी सुसंघटित साप-बचाव व पुनर्वसन केंद्रांची जिल्हानिहाय स्थापना करणे, सर्पदूतांना संरक्षणासाठी व साप हाताळण्यासाठी सामग्री पुरविणे अशा गोष्टी करणे शक्य आहे.
सर्पदंशावर योग्यवेळी उपचार झाल्यास बऱ्याच प्रमाणात मानवी मृत्यू टाळता येतात हेही जनमनावर बिंबविणे गरजेचे आहे. सर्पविष प्रतिजैवकांची मुबलक निर्मिती व साठा करणे, सर्पदंशावर उपचारासाठी उपलब्ध मनुष्यबळातून डॉक्टर व स्टाफला प्रशिक्षित करणे, सर्पदंशावरील उपचारांसाठी विशेष रुग्णालयांची स्थापना करणे या गोष्टींनीही सापांना विनाकारण मारले जाण्याचे प्रमाण कमी होणे शक्य आहे. साप-समृद्ध अधिवासातून जाणाऱ्या रस्त्यांवर अंडरपास किंवा लहान बोगदे उभारणे, खबरदारीचे व वेगमर्यादेचे फलक लावणे, पावसाळ्यात व विशेषतः रात्रीच्या वेळी वाहने सावकाश चालविण्याचे निर्देश देणे आणि गरज पडल्यास अधिवासीय क्षेत्रांत गतिरोधक बसविणे या गोष्टींनी सापांचे होणारे मृत्यू कमी करता येतील. राष्ट्रीय कृषी धोरणात सेंद्रिय शेती व जैविक कीड नियंत्रण प्रोत्साहन देऊन रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर कमी करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचा मार्ग अवलंबता येईल. जंगलालगत रसायनमुक्त बफर पट्टे विकसित करता येतील का यावर विचारविनिमय केला जावा.
राष्ट्रीय साप लोकसंख्या निर्देशांक निर्माण करून सापांच्या संख्येचा प्रजातीवार ट्रेंड ट्रॅक करणे, कोणत्या भागात कोणत्या प्रजातीच्या सापांची संख्या किती आहे, धोकादायक प्रमाणात लोकसंख्या कमी झालेल्या प्रजाती कोणत्या आहेत याची नोंद घेण्यासाठी हौशी सर्प-अभ्यासकांमार्फत कमीत कमी खर्चात असे प्रकल्प राबविता येणे शक्य आहे. शिवाय, यासाठी विद्यापीठीय स्तरावर प्राणिशास्त्र विभागांचे संशोधनात्मक सहाय्य घेता येईल.
अगुंबेसारख्या (किंग कोब्रा अधिवास) भागांच्या धर्तीवर साप निरीक्षण-आधारित निसर्गपर्यटन विकसित करून त्यात स्थानिकांसाठी रोजगार निर्मितीच्या संधींचा शोध घेतला तर हेच लोक सर्पदूत म्हणूनही काम करू शकतील. असे सर्पदूत गावोगावी तयार करून मोठ्या प्रमाणावर शास्त्रीय पद्धतीने जनजागृती करता येईल.
सर्वच वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत असून ही पृथ्वी फक्त माणसाच्या मालकीची नसून तिच्यावर सर्व सजीवांचा समान हक्क आहे याची जाणीव आपल्याला वारंवार झाली पाहिजे. पर्यावरणाच्या सशक्तीकरणासाठी जैविक अन्नसाखळ्या टिकणे गरजेचे आहे. शिवाय, निसर्गाच्या संरक्षणाशिवाय मानव-वन्यजीव संघर्ष टाळणे यापुढे शक्य होणार नाही हेही आपण लक्षात घ्यायला हवे.
(लेखक एमबीबीएस, एमडी असून ग्रामीण रुग्णालय, गगनबावडा येथे वैद्यकीय अधिकारी आणि सर्प अभ्यासक व निरीक्षक आहेत.)