संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हैदराबादनजीक ११व्या शतकातील संत श्री रामानुचार्य यांच्या २१६ फुटी ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ या पुतळ्याचे अनावरण, वाराणसीमध्ये काशी-तामीळ संगमचे उद्घघाटन, नवी दिल्लीत वीर बाल दिवस कार्यक्रमाला उपस्थिती. हे तिन्ही कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किंवा उपस्थितीत पार पडलेले. पंतप्रधानांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रम पार पडतात यामुळे या तीनच कार्यक्रमांमध्ये एवढे विशेष ते काय, असा प्रश्न साहजिकच पडणारा. भाजपची ताकद कमी असलेल्या राज्यांमध्ये किंवा भाषक/ धार्मिक गटांमध्ये लोकांच्या मनाला भावतील असे विषय हाती घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा भाजप आणि मोदी यांचा विशेष प्रयत्न आहे.

भाजप हा आज खऱ्या अर्थाने राष्ट्रव्यापी पक्ष आहे. देशातील १५ पेक्षा अधिक राज्यांमध्ये पक्षाची स्वबळावर किंवा आघाडीत सत्ता आहे. लोकसभेत बहुमत आहे. भाजपची गेल्या साडेआठ वर्षांत जी प्रगती झाली, तिचे सारे श्रेय अर्थातच मोदी यांना. उत्तर भारतात भाजपची पहिल्यापासून चांगली पकड आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा आदि पश्चिमेकडील राज्यांमध्ये भाजपचा चांगला जोर आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपने गेल्या आठ वर्षांत चांगल्या प्रकारे मुसंडी मारली. भाजपला फक्त दक्षिण भारत आणि पंजाबमध्ये जम बसविता आलेला नाही.

दक्षिणकडे कर्नाटक वगळता भाजपला फार काही यश मिळालेले नाही. केरळमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला भोपळाही फोडता आला नाही. तमिळनाडूत अण्णा द्रमुकशी युतीत दुहेरी आकडा गाठता आलेला नाही. पुदुचेरीत अन्य पक्षांमधील नेत्यांना बरोबर घेऊन भाजपने सत्तेत भागीदारी मिळवली. पण भाजपची म्हणावी तशी ताकद नाही. तेलंगण राज्याबद्दल भाजपला आशा वाटतात. या वर्षाअखेर तेलंगणात विधानसभेची निवडणूक आहे. त्याआधी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची पद्धतशीरपणे कोंडी भाजपकडून करण्यात येत आहे. चंद्रशेखर राव यांची कन्या कविता या सध्या ‘सीबीआय’ आणि ‘ईडी’ या तपासयंत्रणांच्या रडारवर आहेत. त्यांच्या विरोधात कारवाई झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.

अशा वेळी तेलंगणातील मतदारांची सहानुभूती मिळविण्याचे मोदी यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तेलंगणाची राजधानी हैदराबादजवळील समशेदाबाद येथे ११व्या शतकातील संत श्री रामानुचार्य यांच्या २१६ फुटी ब्राॅंझच्या पुतळ्याचे अनावरण मोदी यांच्या हस्ते फेब्रुवारी २०२२ मध्ये झाले . रामानुचार्य यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांच्या शिकवणीच्या मार्गाने जाण्याचा निर्धार मोदी यांनी या वेळी केला होता. तेलंगणातील मतदारांपर्यंत पोहचण्याचा मोदी यांचा एक प्रयत्न होता.

दक्षिणेकडील तमिळनाडूत भाजपला शिरकाव करता आलेला नाही. जयललिता यांच्या पश्चात अण्णा द्रमुकची ताकद घटली आहे. ही संधी साधत तमिळनाडूमध्ये भाजपची पाळेमुळे घट्ट करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. तमिळनाडूत हिंदुत्वाचा पुरस्कार भाजपने सुरू करणे हे द्रविडी संस्कृतीला आव्हान देण्यासारखेच आहे. यासाठी मोदी यांच्या वाराणसी या मतदारसंघात काशी-तामीळ संगमचे आयोजन नोव्हेंबरमध्ये करण्यात आले होते. सुमारे महिनाभर चाललेल्या या सोहळ्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले करण्यात आले तर समारोपाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. या सोहळ्यासाठी तमिळनाडूतून सुुमारे १० हजार युवकांना, राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी खर्चाने काशीमध्ये आणण्यात आले होते. तरुण वर्गात बदल करून भविष्यात तमिळनाडूत पाय रोवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तमिळनाडूत द्रविडी पक्ष हिंदीला विरोध करतात. एव्हाना हिंदी विरोधावर या पक्षांची पाळेमुळे घट्ट झाली होती. काशीत हा सोहळा आयोजित करून युवकांमध्ये हिंदीबद्दल आपुलकी निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप द्रमुकने केला आहे. या सोहळ्यापासून सत्ताधारी द्रमुक किंवा तमिळनाडू राज्य सरकार अलिप्तच राहिले.

गेल्याच आठवड्यात पंतप्रधान मोदी नवी दिल्लीत वीर बाल दिवसाला उपस्थित राहिले. गेल्या वर्षीच हा वीर बाल दिवस आयोजित करण्याची घोषणा मोदी यांनी केली होती. २६ डिसेंबर रोजी हा दिन साजरा केला जातो. शीख धर्मियांचे गुरू गोबिंद सिंग यांच्या दोन मुलांची मुघलांनी हत्या केली होती. या दोन मुलांच्या स्मरणार्थ मोदी सरकारने वीर बाल दिवस हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केला. पंजाबमध्ये भाजपला अजूनही बाळसे धरता आलेले नाही. अकाली दलाशी युतीमुळे भाजप सत्तेत भागीदार होता. पण शेतकरी कायद्यांच्या विरोधात अकाली दलाने भाजपपासून काडीमोड घेतल्यामुळे गेल्या वर्षी स्वतंत्रपणे लढण्याची वेळ भाजपवर आली. भाजपचे फक्त दोन आमदार निवडून आले. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये जास्त जागा जिंकता याव्यात या उद्देशाने मोदी व भाजपने गुरू गोंबिद सिंग यांच्या मुलांच्या स्मरणार्थ दिवस साजरा करून शीख समाजाची मते जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. पंजाबमधील शीख समुदायाचा भाजपला पाठिंबा मिळत नाही. यातूनच भाजपने ही खेळी केली आहे.

भाजपने पक्ष वाढीसाठी गेल्या आठ वर्षात विविध क्लुप्त्या केल्या. ईशान्येकडील राज्यांमध्ये लोकांची मते जिंकता येतील अशा अस्मितेचा पुरस्कार केला होता. पंजाब, तमिळनाडू आणि तेलंगणात मते जिंकण्याकरिता भाजपने अशीच खेळी केली आहे. ही यशस्वी होते हे कालांतराने स्पष्ट होईल. पण तमिळनाडूवरील द्रविड संस्कृतीचा पगडा कमी करण्याकरिता सावध पावले टाकण्यासह, नवनवे कल्पक मार्ग या पक्षाने चोखाळले आहेत, एवढे नक्की. ‘भारत जोडो यात्रे’चे कौतुक करणाऱ्या राजकीय विश्लेषकांना, कधी ना कधी या मार्गांचीही दखल घ्यावी लागेल.

santosh.pradhan@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi bjp campaign south india punjab north east asj
First published on: 02-01-2023 at 12:29 IST