– प्रा. प्रकाश गुप्ते
विरोधी मत किंवा विचारसरणी बाळगणारी व्यक्ती शत्रू नसते. तिचा केवळ दृष्टिकोन वेगळा असतो. आपण एकतर तो बदलण्याचा प्रयत्न करू शकतो, त्यांची बाजू पटली तर स्वीकारू शकतो किंवा दोघांनाही चर्चेनंतर एकमतावर येता आलं नाही, तर व्यक्ती, विचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करून आपापल्या मतांवर ठाम राहू शकतो. राजकारणात आज हा समंजसपणा दुर्मीळ होताना दिसतो, मात्र काही वर्षांपूर्वीपर्यंत अशी स्थिती नव्हती. एकाच कुटुंबातील सदस्य भिन्न विचारसरणीच्या पक्षांत कार्यरत असत. राजकारणाच्या मैदानात परस्परांविरुद्ध शड्डू ठोकत, पण राजकीय जीवनातील भूमिका कधीही त्यांच्या नात्यांच्या आड आल्या नाहीत. अशात आता नणंद-भावजय असलेल्या सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार बारामतीत लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात परस्परांविरोधात उभ्या ठाकल्या आहेत.

एकाच कुटुंबात परस्परविरोधी विचारसरणीच्या राजकीय पक्षांचे नेते असल्याचं ठळक उदाहरण म्हणजे मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधील सिंदिया अर्थात शिंदे कुटुंब. महाराज जिवाजीराव यांच्या पत्नी राजमाता विजया राजे शिंदे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली, काँग्रेसच्या खासदार म्हणून. काँग्रेसच्या तिकिटावर त्या दोनदा लोकसभेत निवडून गेल्या. नंतर मात्र त्या जनसंघाशी जोडल्या गेल्या. कालांतराने भारतीय जनता पक्षाच्या एक प्रमुख नेत्या म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या. दुसरीकडे त्यांचे पुत्र माधवराव शिंदे १९७१ मध्ये जनसंघाच्या तिकिटावर निवडून आले, मात्र १९८०च्या सुमारास त्यांनी पक्षांतर केले आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचे पुत्र ज्योतिरादित्य शिंदेही काँग्रेसचे खासदार होते, मात्र २०२० मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाची वाट धरली. दरम्यानच्या काळात विजया राजेंच्या कन्या वसुंधरा राजे मात्र आईच्या पावलावर पाऊल टाकत भाजपबरोबरच राहिल्या. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचल्या. कुटुंबात असे राजकीय मतभेद असतानाही या कुटुंबाने आपल्या संस्थानिक परंपरेचा आब कायम राखला.

Gaurav Vallabh
अग्रलेख: प्रवक्त्यांची पक्षांतरे!
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!
loksatta editorial Shinde group bjp dispute over thane lok sabha seat
अग्रलेख: त्रिकोणाच्या त्रांगड्याची त्रेधा!
vijay kelkar
अग्रलेख: कराग्रे वसते लक्ष्मी..

हेही वाचा – निवडणुकीतला निष्पक्षपातीपणा टिकू शकतो, तो कसा? कुणामुळे?

मूळचे काँग्रेसचे आचार्य कृपलानी आणि त्यांच्या पत्नी सुचेता कृपलानी हे अशा विरोधी विचारसरणीच्या कुटुंबाचे आणखी एक उदाहरण. आचार्य कृपलानी यांनी पुढे काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि जनसंघाच्या पाठिंब्यावर निवडणूक जिंकले तेव्हा त्यांच्या पत्नी सुचेता कृपलानी काँग्रेसमध्ये होत्या आणि त्या उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रीही होत्या. एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती दोन टोकाच्या विचारसरणीच्या पक्षांत असू शकतात आणि तरीही गुण्यागोविंदाने नांदू शकतात, हे त्यांनी सिद्ध केले.

सध्या खडसे कुटुंबातही असाच पेच निर्माण झालेला दिसतो. देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज होऊन भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे या मात्र अद्यापही भाजपमध्येच आहेत. त्यांना रावेर मतदारसंघातून उमेदवारीही मिळाली आहे. आता खडसे आपल्या सुनेच्या विरोधात प्रचार करणार का, असा प्रश्न तिथे निर्माण झाला आहे. पण सध्या सर्वाधिक चर्चेत आहेत, ते पवार कुटुंब आणि बारामती मतदारसंघ. पवार कुटुंबातील कौटुंबिक जिव्हाळा महाराष्ट्र नेहमीच पाहत आला होता. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील स्नेहबंध प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांवर अनेकदा पाहायला मिळाले होते. अजित पवार यांनी फडणविसांबरोबर घेतलेली पाहाटेची शपथ आणि त्यानंतर पवार यांची ‘घरवापसी’ त्यावेळी सुप्रिया सुळे यांच्या प्रतिक्रिया हा साराच चर्चेचा विषय ठरला होता. तेव्हा जे टळले ते आता राष्ट्रवादीत फूट पडून अधिक मोठ्या प्रमाणात जगासमोर आले आहे. पवार कुटुंबातील पुढच्या पिढीतील रोहित पवार, पार्थ पवार यांच्यासह राजकारणात कधीही कार्यरत नसलेले पवार कुटुंबातील अन्य सदस्यही आता या वादात उतरलेले दिसतात.

हेही वाचा – काळाबरोबर वाहणं..

संसदेत सत्ताधाऱ्यांना सडेतोड आणि मुद्देसूद प्रश्न विचारणाऱ्या सुप्रिया सुळे आणि बारामतीत तळागाळापर्यंत संपर्क असलेल्या, तिथल्या सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुनेत्रा पवार यांपैकी कोण जिंकणार याविषयी केवळ बारामतीलाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे. सक्रिय राजकारणात प्रत्यक्ष कार्यरत असल्याचा प्रदीर्घ अनुभव सुप्रिया यांच्या पाठीशी आहे, तर अजित पवार यांचे बारामतीत कार्यकर्ता स्तारापर्यंत असलेले वर्चस्व ही सुनेत्रा पवारांसाठी जमेची बाजू आहे. जिंकून कोणीही येवो, या साऱ्या रणधुमाळीत कौटुंबिक जिव्हाळा शिल्लक राहील का, याविषयी साशंकताच आहे.

पूर्वी पक्षाची विचारसरणी आपल्या विचारांशी मिळतीजुळती आहे का, हे पाहून लोक पक्षाला पाठिंबा देत, त्या पक्षाचे कार्यकर्ते-नेते होत असत. त्यामुळे दोन विचारसरणीच्या व्यक्ती एका कुटुंबात गुण्यागोविंदाने राहणे शक्य होते. आजच्या राजकारणाबाबत असा दावा केला जाऊ शकतो का?

aparnaprakashgupte@gmail.com