कुठल्याही देशाच्या इतिहासात असे खूप कमी प्रसंग येतात, जेव्हा भव्य परिवर्तन पाहायला मिळते. २०१४ हे वर्ष भारताच्या राजकीय इतिहासात असेच भव्य परिवर्तनाचे वर्ष होते. त्यावेळी देशातील जनतेला अकार्यक्षम व भ्रष्ट प्रशासनापासून सुटका हवी होती; त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला परिवर्तनासाठी जनादेश दिला. २०१४ चा जनादेश परिवर्तनासाठी होता, तर २०१९ चा जनादेश परिवर्तनाच्या त्या प्रक्रियेतील विश्वासासाठी होता.
जनता जेव्हा एखाद्यावर विश्वास ठेवते, तेव्हा राजकीय व्यक्तीसाठी तो विश्वास धारण करणे एक मोठे आव्हान असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात असे अनेक निर्णय घेण्यात आले, जे भाजपाच्या वैचारिक अधिष्ठानाच्या विश्वासार्हतेचा आधार होते. त्यांना धाडस व दृढ निश्चय याची साथ देत मोदींनी ध्येयापर्यंत पोहोचवले. जनसंघाच्या काळापासून आतापर्यंत भाजपासाठी ही विश्वासार्हतेची कसोटी होती व मागील ९ वर्षांत मोदी त्या कसोटीवर शंभर टक्के खरे उतरले आहेत. त्यांनी भारताच्या सामान्य जनमानसात आपली व पक्षाची विश्वासार्हता वृद्धिंगत केली; तसेच प्रामाणिकपणे पाहिले तर भारताच्या राजकारणात विश्वासार्हतेच्या दृष्टीने मागील ९ वर्षं मोलाचे ठरले. राज्यस्तरावरून देशस्तरावर आणि देशस्तरावरून विश्वस्तरावर यांनी अविश्वसनीय छाप उमटविली आहे.
हेही वाचा – आरक्षण हा सरकारचा ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम नाही!
भारत हे दक्षिण आशियातील एकमेव धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आता आपण एक जागतिक शक्ती म्हणून उदयाला आलो आहोत, हे भारताच्या अध्यक्षतेत नुकत्याच पार पडलेल्या ‘जी-२०’ परिषदेमध्ये सिद्ध झाले आहे. ‘वसुधैव कुटुंबकम– एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भवितव्य’ ही भावनाच भारताच्या जी-२० अध्यक्षतेखालील संकल्पनेत त्यांनी मांडली. विशेष म्हणजे त्यांनी ‘जी-२०’ परिषदेसाठी तयार केलेले घोषणापत्र परिषदेने सर्वानुमते मंजूर केले. त्यावेळी जगातील मतभेद आडवे आले नाहीत, तर दुसरे म्हणजे आफ्रिकी युनियनला ‘जी-२०’ परिषदेचे सदस्यत्व मोदी यांच्या नेतृत्वाखाली बहाल करण्यात आले. चांगला जागतिक संदेश देण्याचे, सर्व देशांना जोडून ठेवण्याचे आणि भारताची विश्वासार्ह प्रतिमा जगापुढे मांडण्याचे काम मोदींनी केले. म्हणूनच नरेंद्र मोदी यांना विश्वगुरू म्हटले जाते. २०व्या भारत-आसियान शिखर परिषदेतसुद्धा त्यांनी एक वेगळाच ठसा उमटवला. अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रांस, कॅनडा, जर्मनी, इजराईल, युरोप, सौदी अरब, आफ्रिका अशा अनेक देशांना मोदींच्या नेतृत्वातील भारताशी मैत्री हवी आहे.
भारताच्या चंद्रयान-३ ने २३ ऑगस्ट २०२३ ला चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केलं. जगातील हा पहिला पराक्रम आहे, जो भारताने करून दाखवला. हा दिवस यापुढे ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ म्हणून ओळखला जाईल, अशीही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. चंद्रयान-३ नंतर सूर्ययान यशस्वीपणे प्रक्षेपित करून त्यांनी जगाला भारताच्या सामर्थ्याचा परिचय दिला आहे. १७ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्य मंत्रालय ‘आयुष्मान भव’ मोहीम राबवणार आहे. ही मोहीम अनेक अर्थाने विशेष आहे, कारण या मोहिमेचा उद्देश देशातील ३५ कोटी लोकसंख्येला आरोग्यसेवांचा लाभ मिळवून देणे हा आहे.
हेही वाचा – कार्यकर्तृत्वातून मोदींचे टीकाकारांना चोख उत्तर
गेल्या एक वर्षाच्या कार्यकाळाची सुरुवात सर्वप्रथम शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून दिल्या जाणाऱ्या निधीला मूर्त रूप देण्याचे मोठे काम मोदींनी केले तर दुसरीकडे मजूर, छोटे दुकानदार व अन्य छोट्या कामगारांसाठी कामाची उत्तम व्यवस्था तसेच वृद्धापकाळी निवृत्तीवेतनाची सुविधा खात्रीने देण्याने झाली. करोनाच्या काळात कोट्यवधी गरिबांच्या खात्यात थेट पैसे जमा करणे, गरिबांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्यापासून केवळ राजकीयच नव्हे, तर समाजाच्या सर्व घटकांशी विचार विनिमय करून पंतप्रधान मोदींनी या कठीण काळात आपल्या कुशल प्रशासनाद्वारे एक अनुकरणीय उदाहरण प्रस्तुत केले. संपूर्ण जगाला करोनाची लस पुरवून त्यांनी जगापुढे एक आदर्श निर्माण केला.
भारताला सुरक्षेच्या दृष्टीने स्वावलंबी करण्यासाठी क्षेपणास्त्रे, लढाऊ विमानं आणि शस्त्रास्त्रांचे भारतात उत्पादन तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अभूतपूर्व निर्णय मोदींनी घेतले आणि ते प्रत्यक्षात यशस्वी करून दाखवले. जम्मू-काश्मीरबाबतचा अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा अशक्यप्राय भासणारा निर्णय प्रत्यक्षात आणणे आणि तिहेरी तलाकपासून मुस्लीम महिलांची मुक्तता ही ठळक उदाहरणे सर्वांसमोर आहेत.
नोटाबंदीसारख्या भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाईसाठी त्यांनी नियम केले, ज्यामुळे भ्रष्टाचारी उघड झाले आणि देशातील भ्रष्टाचार कमी झाला. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भाविष्यासाठी त्यांनी अनेक कामे केली. सर्वांना शिक्षण आणि रोजगार देण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यासाठी अनेक योजना राबवल्या. तरुण पिढीच्या रोजगारासाठी मेक इन इंडिया, स्किल इंडिया, स्टार्ट अप इंडिया इत्यादी योजना सुरू केल्या आणि त्यासोबत गृहउद्योग आणि लघुउद्योगांना प्रोत्साहन दिले. त्यांनी डिजिटल इंडिया मोहीम सुरू केली, त्यातून सर्व कामे डिजिटल पद्धतीनं होऊ लागली आणि माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा प्रचार केला गेला. प्रत्येक गाव आणि शहर डिजिटलायझेशननं जोडलं गेलं. भारतात अनेक ठिकाणी मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. मोदी यांनीच स्वच्छ भारत अभियानही सुरू केले, त्याचं प्रतिबिंब आपल्या शहरांत, गावांत दिसू लागले आहे.
हेही वाचा – हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास वर्मानातही महत्त्वाचा का?
अलीकडे नरेंद्र मोदी यांना ४१वा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. मोदींनी लोकहितार्थ कामांच्या अंमलबजावणीसाठी तसेच लक्ष्याची पूर्तता आणि इतर विविध यशस्वी कार्यक्रमांसाठी मानसिकता परिवर्तन, ध्येय पद्धत, देखरेख आणि सामूहिक सहभाग या दृष्टिकोनाचा अवलंब केला आहे.
थोडक्यात, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून सर्वत्र विकास झाला आहे. मोदींच्या सकारात्मक धोरणांमुळेच आज भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. भारताच्या सर्वांगीण आणि वेगवान विकासाचे श्रेय त्यांनाच जाते. विश्वस्तरावर त्यांच्या कार्याला आणि नेतृत्वाला मान्यता मिळाली आहे. नरेंद्र मोदी हे विश्वगुरू आहेत आणि या उपाधीला शोभेल असेच त्यांचं कार्य आहे, असे म्हणावे लागेल.
लेखक महाराष्ट्र भाजपचे सहमुख्य प्रवक्ता, तसेच ‘भाजप ओबीसी मोर्चा’ महाराष्ट्र प्रभारी आहेत.
d_ashish@hotmail.com