झेलम परांजपे
६ नोव्हेंबर २०२५ – माझ्या बाबांचा शंभरावा वाढदिवस. ते असते तर आम्ही काही दिवस आधीच मुंबईबाहेर कुठेतरी जाऊन शांतपणे जवळच्या काही मित्र मंडळींबरोबर साजरा केला असता. कारण बाबांना तामझाम अजिबात आवडायचा नाही. वाढदिवस साजरा करणं, छान जेवण जेवणं, गाण्यांची मैफल ऐकणं, स्वत: मित्रांसमोर गाणं म्हणणं आणि भरपूर गप्पा मारणं, जोक्स करणं… हे बाबांना खूप प्यारं आणि आम्ही तेच केलं असतं.
त्यांच्या साठीला थोडंफार तेच केलं. साठीला मित्र नव्हते, फक्त आम्ही कुटुंबीय. मस्त मजा केली. पण त्यांच्या पंचाहत्तरीला मात्र मित्रांनी तसं होऊ दिलं नाही. वसंत बापट, लीलाधर हेगडे, केकू गांधी, माधव पंडित, बाबा चिटणीस, गुरू भट असे अनेक. आम्ही मुंबईतच, वांद्र्याच्या घरी होतो आणि घरीच छोटेखानी मेजवानी केली. मोजके नातेवाईक आणि मित्र मंडळी जेवायला, गप्पा मारायला जमली होती. पण वर्देसर, वर्देसाहेब, अनुकाका …मुंबईतच आहेत कळल्यावर लोकांची रीघ लागली. हार, गुच्छ, मिठ्या मारणे, पाया पडणे… काय विचारू नका. घर भरून गेलं होतं – माणसांनी आणि फुलांनी. फुलांमुळे लोकांना बसायला जागा नव्हती. बाबांचा सलीम, व्हिन्सी, बाबूराव, हजारे, बाबा परब, गोपाळ, किती, किती नावं घेऊ… सर्व हजर होते.
मुख्य म्हणजे बाबा कुणावरही चिडले नाहीत. तुम्हाला वाटेल, ही असं का बरं म्हणते आहे? समजा, बाबांना काही आवडत नसेल, पटत नसेल, चुकीचं वाटत असेल, अगदी तीव्रतेने लोकांनी ते करू नये असं वाटत असेल आणि लोकांनी ते केलं तर बाबांचा पारा प्रचंड चढायचा. ते त्या दिवशी झालं नाही. लोकांचं प्रेम इतकं भरभरून वाहत होतं, एखाद्या नदीसारखं, की अग्नीला (संतापाला) वाव नाही मिळाला.
वाचकांना वाटेल माझे बाबा म्हणजे कोण ? अनेकांना माहीत असतील, तसेच अनेकांना, खास करून नव्या पिढीला, माहीत नसतील. माझे बाबा म्हणजे, प्राध्यापक सदानंद ऊर्फ अनु वर्दे (घरातल्यांचं, मित्रमंडळींचं आवडतं नाव). ते राष्ट्र सेवा दलाच्या मुशीत घडले. राष्ट्र सेवा दल ही एक सामाजिक समज देणारी, सामाजिक कार्य करणारी, तरुणांची धडाडीची संघटना/चळवळ. स्वातंत्र्यलढ्यात, अकरावी झाल्या झाल्या, ब्रिटिश राजवटीला विरोध केल्यामुळे, वयाच्या केवळ १८ व्या वर्षी बाबांनी तुरुंगवास भोगला. इथं एक सांगावंसं वाटतं… अकरावीत बाबा जुन्या बॉम्बे प्रेसिडेन्सीमधून सहावे आले होते. (म्हणजे तेव्हाचे महाराष्ट्र, गुजरात, थोडा कर्नाटकचा भाग आणि थोडा सिंध प्रदेशाचा भाग). इतका हुशार मुलगा. त्यामुळे आजोबांना, घरच्या सर्वांनाच वाटलं की पोरगं महाविद्यालयीन शिक्षण संपवून इंडियन सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाईल. बाबांच्याही डोक्यात बहुधा तसंच काही असावं. कारण त्यांची स्वातंत्र्यलढ्याशी तोपर्यंत ओळख झालेली नव्हती. परंतु कॉलेजमध्ये भरती झाल्यावर बाहेरचं जग दिसलं. मोठी मुलं संध्याकाळी भाषणांना, निदर्शनांना जात. बाबा त्यांच्याबरोबर जाऊ लागले. तो होता गांधीजींनी ‘भारत छोडो’चा नारा दिल्याचा काळ. तरुण मंडळी त्यात ओढली गेली होती. बाबांचंही तेच झालं. ‘भारत छोडो’ चळवळीने ते अतिशय प्रभावित झाले. आपण आपल्या देशासाठी हे केलंच पाहिजे, हे त्यांनी मनाशी ठाम ठरवलं आणि एका दिवशी घरी काहीही न सांगता निघून गेले. पुढे सरकारला विरोध केल्यामुळे त्यांना अटक झाली.
पुढे सुटून आल्यावर, राष्ट्र सेवा दलात पुन्हा सक्रिय झाले. तिथेच त्यांना त्यांची सहचारिणी, सुधा कोतवाल भेटली. सेवा दलाचं एक कलापथक होतं. कविवर्य वसंत बापटांच्या लेखणीतून अनेकविध कार्यक्रम कलापथकाने निर्माण केले. त्यात गाण्यामध्ये बाबा अग्रेसर असायचे. समूहगीतांची सुरुवात बाबांच्या बुलंद आवाजाने व्हायची. ‘महाराष्ट्र दर्शन’ या कार्यक्रमात बाबा लावणी गायचे आणि आई त्यावर नृत्य करायची. या सगळ्याबरोबरच बाबांचं महाविद्यालयीन शिक्षणही सुरू राहिलं.
अर्थशास्त्र या विषयात त्यांनी बी. ए. आणि लग्नानंतर एम. ए. केलं आणि प्राध्यापक झाले. प्राध्यापकी चालू असतानाच ते वांद्र्याचे नगरसेवक झाले. प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होतेच, पण नगरसेवक म्हणून जास्त लोकप्रिय होते. गोरगरिबांविषयी बाबांच्या मनात एक प्रकारची कणव होती, त्यामुळे त्यांनी झोपडपट्टीतील लोकांना, फेरीवाल्यांना, छोट्या दुकानदारांना, न्याय मिळवून दिला. यांच्यापैकी कोणाचीही, कुठेही, काहीही समस्या उद्भवली की बाबा तिथे धाव घ्यायचे. एकदा गमतीत कोणीतरी म्हणालं होतं, की वांद्र्यात जर आग लागली, तर आगीचा बंब येण्याआधी वर्देसाहेब पोहोचलेले असतील.
प्राध्यापकी आणि राजकारण या दोन्हींत कार्यरत असताना, अमेरिकन काँग्रेसचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकन सायन्स असोसिएशनचे सन्मानीय सदस्य म्हणून बाबांची एका वर्षासाठी निवड झाली. त्या एका वर्षात त्यांनी सहा महिने एका सेनेटरबरोबर काम केलं. सहा महिन्यांत एका काँग्रेसमनला कामात साथ दिली. बाबा तेव्हा रोज वॉशिंग्टन डी. सी. स्थित अमेरिकन कॅपिटल बिल्डिंगमध्ये जायचे. कधी सेनेटमध्ये जायचे, तर कधी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज्मध्ये. आपल्या दोन मुलांना सासू-सासऱ्यांकडे ठेवून, आपल्या पत्नीसहित बाबांनी एक वर्ष अमेरिकेत घालवलं. ३८ च्या वयात, बाबांचा मिळालेला हा खूपच सन्मान होता असं मला वाटतं.
आणीबाणीमध्ये बाबांनी पुन्हा एकदा कारावास भोगला. समाजवादी पक्षाचे नेते म्हणून त्यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायला आलेले पोलीस इन्स्पेक्टर अतिशय दिलगिरीने बोलले. ‘हे पाहा, मी वर्देसाहेबांना अतिशय मानतो. पण मला माझी ड्यूटी करणं भाग आहे. मी त्यांना अटक करून नेलं नाही, तर माझी नोकरी जाईल.’
बाबा येरवडा येथे १९ महिने तुरुंगात होते. सुटून आले, तेव्हा सर्व काँग्रेसविरोधी पक्ष एकत्र येऊन जनता पक्ष निर्माण झाला. बाबा वांद्र्यातून आमदार म्हणून निवडून आले आणि पुलोद सरकारमध्ये शिक्षणमंत्री झाले. शिक्षणमंत्री असताना बाबांनी एक महत्त्वाचा कायदा आणला. त्याबद्दल सगळे शिक्षक त्यांचे ऋणी आहेत. बाबा शिक्षणमंत्री होण्याआधी, शिक्षकांचे पगार, सरकारकडून शाळा चालवणाऱ्या संस्थेकडे जायचे. बरेच संस्थाचालक याचा फायदा घ्यायचे. शिक्षकाला त्याच्या पगाराची ठरलेली रक्कम न देता, कमी दिली जायची, बाकी पैसे संस्थेत किंवा संस्थाचालकांकडे जमा व्हायचे. सही मात्र खऱ्या रकमेच्या आकड्यावर घेतली जायची. बाबा मंत्रीपदावर आल्यानंतर काही शिक्षकांनी ही पद्धत त्यांच्या नजरेस आणून दिली. बाबांनी लगेच कारवाई केली. सरकारने, शिक्षकांचा पगार संस्थेच्या खात्यात जमा न करता, शिक्षकांच्या स्वत:च्या खात्यात जमा केला पाहिजे असा कायदा करून घेतला. त्यामुळे बाबांनी अनेक संस्थाचालकांचा रोष ओढवून घेतला, ही गोष्ट वेगळी.
त्यानंतर बाबा विधान परिषदेत होते. तिथे त्यांनी इच्छामरणावर एक विधेयक आणलं होतं. ते विधेयक ते संमत करून घेऊ शकले नाहीत, पण ४० वर्षांपूर्वी असा विचार मनात येणं, तो अभ्यासून, विधान परिषदेत विधेयक म्हणून मांडणं यावरून बाबा किती पुरोगामी होते हे कळतं.
‘साधना साप्ताहिका’चे ते संपादक होते. त्यांनी बिहारमधल्या स्त्रियांना त्यांचे हक्क समजावून दिले, त्यांना जागरूक केलं. लातूरमधल्या भयानक भूकंपानंतर, राष्ट्र सेवा दलातर्फे अनाथ मुलांसाठी ‘आपलं घर’ नामक बालगृह उभारलं. त्यासाठी सतत विविध ठिकाणांहून पैसे गोळा करत राहिले. आणि सतत, म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत तिथे जात राहिले. इतकी तेथील मुलांची त्यांना ओढ होती. असे होते बाबा…
शेवटी एकच सांगून लेख पूर्ण करते. बाबा सकाळी लवकर महाविद्यालयात जायचे, तेव्हा आम्ही झोपलेलो असायचो, ते दुपारी घरी यायचे तेव्हा आम्ही शाळेत असायचो. ते जेवून नगरपालिकेत जायचे, तिथून लोकांची कामं करायला जायचे. घरी परतायचे तेव्हा आम्ही परत झोपलेलो असायचो. मग भेटच नाही व्हायची. मग कधी कधी बाबा आमच्या डोक्यावरून हात फिरवून पापी घ्यायचे, जाग आली की म्हणायचे, झोप बेटा. पुढं मी नृत्यांगना झाले, तेव्हा माझा दिवसदेखील इतकाच व्यस्त असे. बाबा शेवटी कॅन्सरने आजारी होते, तेव्हा आम्ही तिथेच राहात असू. मी घरी आले की बाबा झोपलेले असायचे. मी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवून पापी घ्यायचे… ते डोळे उघडून खूप गोड हसायचे, आणि मग मी म्हणायचे. झोप बाबा…
लेखिका सुप्रसिद्ध नृत्यांगना आहेत.
