पंकज घाटे
इतिहासकार म्हणून सदाशिव आठवले यांनी प्रचंड काम करून ठेवलं आहे. पण त्यांच्या व्यासंगाची, बुद्धिमत्तेची महाराष्ट्रात योग्य कदर झाली का हा प्रश्नच आहे. म्हणूनच पोटाला चिमटा घेऊन इतिहासाच्या शोधाची ‘ओसाड गावची पाटीलकी’ वागवत राहण्याच्या ‘महाराष्ट्राच्या परंपरे’त आठवले अगदी फिट्ट बसतात!
‘‘..प्रथमपासून अखेपर्यंत चार्वाक बुद्धिनिष्ठ राहिले, पण कमालीचे निष्क्रियही राहिले. त्यांचे विचार क्रांतिकारक होते, पण ती क्रांती समाजजीवनात उतरविण्यासाठी काही कार्यक्रम नाही, काही कृतीच नाही.. या अपयशाचे बरेचसे खापर इतर कारणांच्या ठिकाणी फोडता येईल; पण थोडेसे ते त्या निष्क्रिय आणि वाचाळ चार्वाकांच्या डोक्यावरच फोडावे लागेल.’’
‘‘..इतिहासाच्या वाटचालीला कोणतेही नियम नाहीत; इतिहास हा स्फूर्ती घेण्यासाठी किंवा अस्मिता जागृत करण्यासाठी वगैरे नाही.. आपले पूर्वज भूतकाळाचे मालक होते, त्यांना हवा तसा तो काळ त्यांनी घडवला.. आपण स्वतंत्र आहोत, इतिहासाच्या अंकित नाही. मानवाने इतिहासाचा योग्य तो मान अवश्य राखावा, पण त्याचा गुलाम होऊ नये.’’
ही विधानं करणाऱ्यांचे नाव नवीन पिढीतल्या वाचक-अभ्यासकांना क्वचितच ठाऊक असेल. जुन्या पिढीतल्या काही डोळस वाचकांना आपल्या स्मृतीला थोडा ताण दिल्यावर, अन्य तपशील शोधून/ आठवून त्या लेखकाच्या नावापर्यंत पोहोचता येईल. मात्र, त्या पिढीतल्या अगदी मोजक्यांच्या स्मृतिपटलावर ही वाक्यं वाचून, ते लिहिणाऱ्याच्या नावासह अनेक आठवणी, पुसट झालेले प्रसंग ठळकपणे उमटतील. ते नाव म्हणजे इतिहासकार सदाशिव आठवले! त्यांचा जन्म १९२३ मधला, हे वर्ष त्यांचं जन्मशताब्दी वर्ष.
‘चार्वाक- इतिहास आणि तत्त्वज्ञान’ (१९५८) आणि ‘इतिहासाचे तत्त्वज्ञान’ (१९६७) या एके काळी गाजलेल्या आणि मराठीतल्या आजही अभिजात मानता येतील अशा पुस्तकांतली ही दोन विधानं त्यांच्या जन्मशताब्दीप्रसंगी आठवावी अशीच आहेत. मुळात, इतिहास लिहिणं हा नुसता घडलेल्या घटनांची क्रमवार यादी देण्याचा कारकुनी प्रकार नसतो. अचूक तपशील देणं हे तर इतिहासकाराचं व्यावसायिक कर्तव्यच. पण, त्याहीपुढे जाऊन त्याला त्यानं निवडलेल्या घटनांपाठचा अर्थ-अन्वयार्थ लावावा लागतो; किंबहुना तेच त्याचं मुख्य काम असतं. त्यापुढच्या टप्प्यावरचं – इतिहासाचं तत्त्वज्ञान म्हणजे इतिहासातले नुसते अर्थच नव्हे; तर अनर्थही पाहण्याची दृष्टी. वरच्या दोनही विधानांतून सदाशिव आठवले यांची विशिष्ट इतिहासदृष्टी आणि सडेतोड, रोखठोक शैली यांचा नेमका प्रत्यय येतो.
महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेल्या इतिहासाच्या समंधाचं निदान करणारे इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर हे आठवले यांचे गुरू. नुसतं आठवले यांनी गुरू मानलं आणि शेजवलकर हो म्हणाले असा तो प्रकार नव्हता. १५ दिवस कसून शिष्यपरीक्षा झाली. शेजवलकरांनी त्यांच्याकडून अनेक छापील पत्रं, सनदा, मोडी हस्तलिखितं वाचून घेतली; अर्थ विचारले, चिपळूणकरांच्या इतिहासकल्पनांवर इंग्रजीत निबंध लिहायला सांगितला. शिष्याची तयारी ‘बरी’ वाटल्यामुळे त्यांच्या कामाला सुरुवात झाली. आठवले यांनी विषय घेतला होता, ‘नाना फडणीस आणि त्याचं राजकारण’. मराठय़ांच्या इतिहासाच्या भाष्यकारांच्या ‘आपटे-शेजवलकर’ स्कूलचे आठवले विद्यार्थी झाले. अर्थात, पुढे त्यांनी संशोधन पूर्ण केलं, तरी नाना फडणीस हा विषय जुना आहे, त्यावर नवीन लिहिण्यासारखं काही नाही, असा शेरा मारून त्यांना पीएच.डी. नाकारण्यात आली. आठवल्यांच्या प्रबंधाचे परीक्षक होते रियासतकार सरदेसाई आणि सुरेंद्रनाथ सेन. त्यावर, गुरूचा सूड शिष्यावर उगवला असा शेरा शेजवलकरांनी मारला होता.
गुरू-शिष्याच्या या नात्यात ते दोघंही एकमेकांना आदर्श मानत नव्हते. अंधविश्वास, अंधनिष्ठा दोघांच्यातही नव्हती. शेजवलकरांच्या मते, शिष्याला बुद्धी आहे, पण तिचा उपयोग नाही. आठवले यांच्या ललित साहित्याच्या वाचन-लिखाणावर त्यांचा मोठा रोष होता. गुरूची कितीही इच्छा असली तरी त्याचं सगळं ऐकेल तो शिष्य कसला? उलट ‘विभावरी वाङ्मया’च्या निमित्तानं शेजवलकरांनीही तेच उद्योग केले होते. आठवले यांनीही आपला नाद सोडला नाही.
मराठय़ांच्या इतिहासाच्या भाष्यकारांच्या ‘आपटे-शेजवलकर स्कूल’चा मोठा प्रभाव आठवले यांच्यावर होता. मराठी रियासतीत मराठय़ांच्या सत्तेची अखेरची हकिकत असलेला आठवा खंड संपादित करताना त्यांनी जे चार शब्द लिहिले ते खास ‘आठवले टच’ असणारे आहेत. मराठे इंग्रजांच्या विरोधात एक म्हणून का उभे राहिले नाहीत, यावर आठवले लिहितात, ‘ही मराठी सत्ता दौलतदारांची होती. सर्वाना दौलती टिकवण्यात स्वारस्य होते. स्वराज्य, स्वधर्म, वगैरे शब्द त्यांच्या त्यावेळच्या पत्रव्यवहारांतून पुष्कळदा येतात. पण ते नुसते शब्दच! आजच्या अर्थाने तेव्हा राष्ट्रीयत्वाची संकल्पना आलेली नसली तरी प्रादेशिक, भाषिक, धार्मिक अशा कुठल्याही स्वरूपातली एकतेची जाणीव मराठय़ांमध्ये नव्हती. त्यांची सत्ता संपुष्टात येण्याचे हे खरे कारण दिसते.
आपल्या गुरूस्थानी असलेल्या शेजवलकरांच्या लिखाणातल्या अनेक त्रुटीही आठवले यांनी वेळोवेळी नोंदवल्या आहेत. एरवी टोकाला जाऊन टीका करणाऱ्या शेजवलकरांनी इंग्रजांविरुद्ध जे ‘चौकडीचे कारस्थान’ निष्फळ ठरलं त्याबाबत हात राखून ठेवला होता. आठवले लिहितात, ‘नागपूरकर भोसल्यांबाबत मात्र ‘नागपूर अफेअर्स-१’ या पत्रसंग्रहाच्या प्रस्तावनेत बऱ्याच वेगळय़ा गोष्टी लिहून त्यांना दोषमुक्त करण्याचा उद्योग केला आहे. शेजवलकर प्रस्तावनेत काहीही लिहीत असले, तरी भोसल्यांनी पैसे खाल्ले आणि इंग्रजांना अनेक प्रकारे मदत केली, हे अनेक तत्कालीन कागदपत्रांत नमूद आहे.’
आठवले यांच्यावर रियासतकार गो. स. सरदेसाई यांच्या मराठी रियासतींच्या चार खंडांतले मिळून ९०० ते १००० पृष्ठांचं विभागीय संपादन सोपवलं होतं. ही जबाबदारी पार पाडताना त्यांनी निर्विकार, विचक्षण दृष्टी-बुद्धीची, सडेतोडपणाची, इतिहासातल्या सत्याचा पक्ष घेण्याच्या आग्रही वृत्तीची छाप उमटवली. छत्रपती शिवाजींच्या स्वराज्याची तात्त्विक बैठक आणि त्यांनी आखलेली कारभाराची चौकट त्यांच्याबरोबर आली आणि त्यांच्याबरोबरच गेली. तत्त्वाच्या किंवा ध्येयाच्या दृष्टीने शिवाजी हा एकच अपवाद झाला. राजांनी केलं ते पूर्वी कुणालाही जमलं नव्हतं, आणि नंतरही ते त्यांच्या राजकीय वारसांना जमलं नाही -समजलं नाही. मराठय़ांचा इतिहास म्हणजे शिवाजी आणि फक्त शिवाजीच. अशी आग्रही, टोकदार भूमिका सुरुवातीला आठवले यांनी मांडली असली, तरी कालांतरानं ती सौम्य झाली. (पातळ नव्हे!) मराठी रियासतीच्या तिसऱ्या खंडात एके ठिकाणी ते म्हणतात, ‘मराठय़ांच्या इतिहासात फक्त मोहिमांमागून मोहिमाच आहेत. असे असले तरी त्यामुळे मराठय़ांनी इतिहास घडवलाच नाही असे मुळीच नाही. अशीही कधी काळाची गरज निर्माण होते की जेव्हा फक्त लढायाच करणे प्राप्त असते.’ मराठय़ांमुळेच हिंदूू संस्कृती टिकून राहिली. भारताचा पाकिस्तान अथवा इराण झाला नाही हे काय कमी आहे? केवळ ही विधानं वाचून त्यांच्याविषयी निराळाच ग्रह होऊ शकेल. पण हिंदूत्वाच्या आधुनिक कल्पनांनी त्यांचं संशोधन भारलेलं नव्हतं.
इतिहासकार ज्या काळात जन्मतो, वाढतो, त्या काळाचंच तो अपत्य असतो. हे लक्षात ठेवून आपण इतिहासकारांकडे पाहायला हवं. आठवले यांनी रियासतीच्या संपादनात जी दृष्टी बाळगली होती त्यातही याचं स्पष्टीकरण सापडतं. रियासतकारांनी ज्या काळात या रियासती लिहिल्या त्या काळाच्या संदर्भातच त्यांचा अन्वयार्थ तपासला पाहिजे. देशभक्तीपर तसंच, आत्मगौरवपर लिखाणाच्या परंपरेत साने, खरे, राजवाडे, वगैरे जे इतिहासकार झाले, त्यांचा तो झेंडा रियासतकारांनी आपल्या खांद्यावर घेतला होता. त्यांच्या मांडणीत आणि विचारसरणीत जे दोष दिसतील ते कदाचित कालमानानुसार योग्य असतील असं मानलं पाहिजे! पूर्वसुरींना प्रणाम केलाच पाहिजे. पण म्हणून त्यांचा प्रत्येक शब्द त्यांचा म्हणून प्रमाण मानण्याचं कारण नाही. इतिहासाची पुन:पुन्हा नव्यानं मांडणी होत राहिली पाहिजे, नवे अर्थ उलगडत गेले पाहिजेत.
इथे एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे. नव्यानं आलेला पुरावा आपल्या मांडणीला छेद देत असला किंवा दुसऱ्या अभ्यासकाच्या उपयोगाचा कागद मिळाला तर ते त्यांचं लक्ष वेधून घेत, तो वापरायला प्रोत्साहनही देत. भारत इतिहास संशोधक मंडळात ते १९४५ सालापासून २००१ पर्यंत ये-जा करत होते. नगरच्या सारडा महाविद्यालयातून निवृत्त झाल्यानंतर १९८२ ते २००१ दरम्यान तर ते पूर्णवेळ संशोधन करत होते. या काळात सुमारे दोन हजारपेक्षा जास्त कागदांचं संशोधन आणि संपादन त्यांनी केलं. मंडळाच्या कागदपत्रांत एकदा त्यांना काही चित्रं सापडली. आठवले यांनी ती डॉ. म. श्री. माटे यांच्याकडे तो तुमचा विषय आहे, त्यावर तुम्ही लिहा असं सांगून पाठवली. असाच प्रसंग डॉ. चंद्रकांत अभंग यांच्या संदर्भातही घडला होता. रामशास्त्रींवरचं आठवले यांचं पुस्तक प्रकाशित झालं होतं. डॉ. अभंग यांना रामशास्त्रींवर दोन अप्रकाशित पत्रं मिळाली. या पत्रांमुळे आठवले यांच्या मांडणीला छेद मिळत होता. आठवले यांनी त्याचं कौतुक करून त्यावर निबंध प्रकाशित करायला सांगितलं. नव्या संशोधनाच्या, पुराव्यांच्या बाबतीत ते कायम स्वागतशील होते.
सदाशिव आठवले यांच्या व्यासंगाची, बुद्धिमत्तेची महाराष्ट्रात योग्य कदर झाली का हा प्रश्नच आहे. त्यांच्या अनेक दर्जेदार पुस्तकांची पहिली आवृत्तीही संपलेली नाही. याला ‘चार्वाक’, ‘लोकमत’, ‘लोकशाहीचा कारभार’ नावाची दोन राज्यशास्त्रावरची पुस्तकं आणि इतिहासाचे तत्त्वज्ञान हे चार अपवाद.
स. प. महाविद्यालय, राजाराम महाविद्यालय आणि एल्फिन्स्टन महाविद्यालयांत प्राध्यापकी करून पुढे कुर्डुवाडी आणि अहमदनगर इथे प्राचार्यपद भूषवूनही सलग नोकरी नसल्यामुळे निवृत्तिवेतनासारखे लाभ त्यांना मिळाले नाहीत. स्वत:च्या लेखन-संशोधनाशिवाय, अनेक दफ्तरं-कोशांचं संपादन, आयसीएचआर (कउऌफ) चा एखादा प्रकल्प, काही पुस्तकांचे अनुवाद, व्याख्यानं, पाठय़पुस्तकाचं लिखाण करून जे पैसे मिळतील त्यातून त्यांनी चरितार्थ चालवला.
बुद्धी-कर्तबगारीपेक्षा नोकरीतल्या सातत्याला अनावश्यक महत्त्व देणारे हे नियम आयुष्याचा उमेदीचा काळ सरल्यावर त्यांच्यासाठी जाचकच ठरले. उपजीविकेची भ्रांत असूनही इतिहासाच्या शोधाची – ओसाडगावची पाटीलकी – वागवत राहण्याची जी ‘महाराष्ट्राची परंपरा’ आहे त्यात आठवले अगदी फिट्ट बसतात!
मराठी विश्वकोश आणि समाजविज्ञान कोशांतलं त्यांचं कामही असंच दुर्लक्षित राहिलं आहे. ते मानव्य विद्याशाखेचे वरिष्ठ संपादक म्हणून काम करत असताना विश्वकोशाचं काम रुळावर येत पुढे जाऊ लागलं होतं. आठवले यांनी त्याच्या पुढच्या खंडांची रचना, विषय इत्यादींवर सविस्तर टिपण तयार करून त्या बृहत् कोशाची दिशा निश्चित करून दिली होती. मात्र, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या कार्यपद्धतीशी न जुळल्यामुळे त्यांनी पुढे विश्वकोश सोडला. समाजविज्ञान कोशाच्या १ ते ५ खंडांत मिळून आठवले यांनी राज्यशास्त्रावर जवळपास एक खंड होईल इतकं लिखाण केलं आहे. त्या कोशात एकूण ८८ लेखकांचं लिखाण आहे. यावरून त्यांच्या एकटय़ाच्या कामाचा आवाका कळेल. फ्रेंच विश्वकोशाचा प्रमुख संपादक म्हणून विशेष प्रसिद्ध असलेल्या दनी दीद्रोचा (ऊील्ल्र२ ऊ्रीि१३) आठवले यांच्यावर मोठा प्रभाव होता. तो १७-१८ व्या शतकातल्या ज्ञानोदय काळाचा प्रतिनिधी. आठवले यांच्या वैचारिक जडणघडणीत, वैयक्तिक आयुष्यातही युरोपातल्या उदारमतवादी, बुद्धिवादी आणि मानवतावादी आधुनिक मूल्यांचा मोठा प्रभाव दिसतो.
वि. का राजवाडे यांच्यापासून ग. ह. खरे यांच्यापर्यंत चालत आलेल्या पहिल्या पिढीच्या इतिहासकारांचा वारसा पुढे नेणाऱ्या दुसऱ्या पिढीतले ते अव्वल इतिहासकार होते. इतिहासपर लिखाणच नव्हे तर ऐतिहासिक साधनांच्या संपादनाचा वारसाही त्यांनी पुढे नेला. िहगणे, शिंदे, तुळशीबागवाले, गद्रे सावकार यांची दफ्तरं त्यांनी संपादित केली. मराठय़ांच्या इतिहासात ते अडकून पडले नाहीत. रामशास्त्री प्रभुणे, बापू गोखले, उमाजी नाईक यांची चरित्रं तसंच त्यांची ऐतिहासिक साधनंही त्यांनी प्रकाशात आणली. अकादमिक विश्वात सध्या सबाल्टर्न/ वंचितांच्या इतिहासलेखनाचा खूप बोलबाला आहे. आठवले यांनी खूप आधीच ‘उमाजी राजे, मुक्काम डोंगर’ (१९९१) सारखं पुस्तक लिहून उमाजी नाईक या १९ व्या शतकातल्या दुर्लक्षित राहिलेल्या लढवय्या, ‘न-नायका’ला नायकत्व दिलं. शिवाय, त्यांनी ‘रामायण- एका माणसाची कथा’, ‘महाभारत: ऐका भाऊबंदांनो तुमची कहाणी’, दारा शुकोह, केमालपाशा, इब्राहिम आदिलशहा, राणा प्रताप, जॉर्ज वॉशिंग्टन, कृष्णदेवराय, छत्रसाल यांची चरित्रं लिहिली. त्यांचं कृष्ण चरित्र, मराठय़ांच्या सत्तेच्या अखेरच्या टप्प्याविषयी केलेलं लिखाण अजून अप्रकाशित आहे.
२००१ मध्ये त्यांचं निधन झालं. डॉ. आर. एच. कांबळे या शिष्यानं त्यांच्या इतिहासलेखनाचा अभ्यास एका प्रकल्पासाठी करून त्यांना अक्षरांजली अर्पण केली. चार्वाकाचं पुस्तक एका हिंदी भाषिक प्राध्यापकानं स्वत:च्या नावानं हिंदीत छापलं. आठवले यांनी त्याकडेही, माझा चार्वाक हिंदी भाषिकांपर्यंत पोहोचला या उदार बुद्धीनं पाहिलं. आठवले यांच्या लेखनावर स. ह. देशपांडे टिप्पणी करतात, ‘त्यांचे भाष्य वाचताना छाती फुगून येईल, बाहू फुरफुरू लागतील असा अनुभव येणे कठीण आहे.’ इतिहासाचा तोच उपयोग मानणाऱ्या काळात सत्य सांगायला जाणाऱ्याच्या माथी सर्वाची खप्पामर्जीच येते, हीच गोष्ट खरी!
उपेक्षेची पर्वा न करता, बिकट परिस्थितीत ज्ञानमार्गाचं मूळ आकर्षण असलेला हा विद्वान त्या रस्त्यानं पुढे चालत राहिला. इतिहासकार म्हणून आठवले यांनी आपल्या मनाचे दरवाजे कायम खुले ठेवले. आपली मतं बदलली पाहिजेत असं वाटण्याइतका प्रभावी मुद्दा/ पुरावा समोर आल्यानंतर ती बदलण्याची त्यांनी कायम तयारी ठेवली. ज्ञानाच्या क्षेत्रात कुठलाही मुद्दा प्रतिष्ठेचा करू नये, अशी ठाम धारणा बाळगणारा हा इतिहासकार आजही तितकाच कालसुसंगत आहे.
लेखक रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये इतिहास विषयाचे अध्यापन करतात.