तरुण पिढी म्हणजे भविष्यानेही आस लावून पाहावे, असे वर्तमान. ही पिढी काहीतरी सर्जनात्मक घडवते आहे. तिचे कर्तृत्व समाजासमोर आणून त्यांचा गौरव करण्यासाठी ‘लोकसत्ता’ने ‘तरुण तेजांकित’ उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. या उपक्रमाच्या पहिल्या पर्वात विविध

नीलय लाखकर (संशोधक) २०१८

नीलय लाखकर या तरुणाची सिंथेरा बायोमेडिकल ही कंपनी उच्च दर्जाच्या कृत्रिम हाडांच्या निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे. या संशोधनासाठी नीलय लाखकरला २०१८मध्ये ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यानंतर नीलयच्या कामाचा विस्तार झाला आहे, त्या क्षेत्रात अनेक नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. उच्च दर्जाची कृत्रिम हाडांची किफायतशीर दरांत निर्मिती करण्याचे संशोधन नीलय लाखकरने केले. गेल्या चार-पाच वर्षांत नीलयच्या कंपनीने एक कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची उभारणी केली आहे. त्याच्या उत्पादनासाठीचा कारखाना वसई येथे सुरू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील कार्यालय हे मुख्य कार्यालय, संशोधन आणि विकास कार्यालय म्हणून कार्यरत आहे. तर उत्पादन आणि विक्रीसाठी मुंबईतही कार्यालय सुरू करण्यात आले आहे. काम वाढल्यामुळे कंपनीमधील मनुष्यबळही वाढले आहे. तसेच कृत्रिम हाडांसंदर्भातील संशोधनाचा उपयोग अन्य ठिकाणीही होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने काम सुरू आहे. त्याशिवाय आणखी काही क्षेत्रात संशोधन करण्यात आले आहे, त्या संदर्भातील एकस्व अधिकारही (पेटंट) मिळवण्यात आल्याची माहिती नीलयने दिली.

cm eknath shinde slams uddhav Thackeray over hindutva
मतपेढीसाठी भगवा नकोसा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप
Hindu Manusmriti and William Jones
विश्लेषण: भारतात वादग्रस्त ठरलेली मनुस्मृती चर्चमध्ये; का आणि कशासाठी?
Mothers day special
“एक दिवस माझा मुलगा म्हणाला की, मीही तुझ्याबरोबर भांडी घासायला येतो अन्…” वाचा, घरकाम करणाऱ्या महिलांचे अनुभवकथन….
dalai lama video controversy
दलाई लामांचा तो वादग्रस्त व्हिडिओ आणि चीनची ‘स्मीअर’ मोहीम; चीनला तिबेटच्या आध्यात्मिक नेत्याविषयी इतका द्वेष का?
readers reaction on loksatta articles
लोकमानस : आणि म्हणे विश्वगुरू, महाशक्ती!
Review of Mahesh Elkunchwars play Aatmakatha
‘ती’च्या भोवती..! सामान्याकडून असामान्याकडे!
rohit pawar post on narendra modi
“कुटुंब सांभाळण्याची भाषा तुम्हाला शोभते का?” मोदींच्या शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला रोहित पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले…
sharad pawar on religion basis reservation
“धर्माच्या आधारावर आरक्षण आम्हाला मान्य नाही”; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मोदींनी स्वत:..”

डॉ. तुषार जावरे  (संशोधक) २०१९

कुपोषणामुळे अकाली प्रसूती आणि त्यातून जन्मलेल्या अर्भकाच्या तसेच नवजात शिशूच्या मेंदूची वाढ परिपूर्ण झालेली आहे किंवा नाही, हे ‘एमआरआय’ प्रतिमांचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करून योग्य उपचार पद्धती ठरविण्यासाठीची तांत्रिक प्रणाली तयार करण्याच्या विषयात धुळय़ातील शिरपूरचा डॉ. तुषार जावरे याने संशोधन केले. या कार्यासाठी २०१९ साली त्यास ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सध्या तो शिरपूर येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात संशोधन व विकास विभागाचा अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहे. त्याला अलीकडेच डेहराडून येथील ग्लोबल एज्युकेशन आणि कॉर्पोरेट लीडरशिपतर्फे सर्वोत्कृष्ट तरुण संशोधक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन या संस्थेतर्फे संशोधनासाठी १ लाख रुपयांचे अनुदानही देण्यात आले. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित संशोधन कार्यासाठी नोंदणीकृत १५ कॉपीराइट त्याच्याकडे आहेत. दवाखान्यात दाखल होणाऱ्या रुग्णाच्या संदर्भातील पूर्व माहिती आणि त्यांच्या आरोग्य इतिहासाबद्दल इत्थंभूत माहिती उपलब्ध करून देणारे तंत्रज्ञान ‘हॉस्पिटल अ‍ॅण्ड पेशंट केअर मॅनेजमेंट सिस्टीम’ या नावाने विकसित करून त्याची पेटंट नोंदणीदेखील तुषारने केलेली आहे. अभियांत्रिकीतील विविध विषयांवर त्याची १५ पुस्तके आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थांनी प्रकाशित केलेली आहेत. विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर त्याचे ७० हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत.

सिद्धार्थ जाधव (अभिनेता) २०१९

मराठी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळख असलेला अभिनेता सिद्धार्थ जाधव याने शालेय जीवनापासूनच आपली वक्तृत्व आणि अभिनयाची आवड जोपासली. तथाकथित नायक प्रतिमेला साजेसा चेहरा नसतानाही केवळ अभिनयाच्या जोरावर सिद्धार्थने आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

२०१८ साली आलेल्या ‘सिम्बा’ या हिंदी चित्रपटातील त्याची सब – इन्स्पेक्टर संतोष तावडे ही भूमिका गाजली होती. हाच संतोष तावडे आपल्याला ‘सूर्यवंशी’ चित्रपटातही दिसला. आता यावर्षी प्रदर्शित होणाऱ्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटातही संग्राम भालेरावबरोबर संतोष तावडेची धमाल पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. विनोदी भूमिकांमध्ये सिद्धार्थचा हातखंडा असला तरी तो केवळ तिथपर्यंतच मर्यादित राहिलेला नाही. गंभीर वा वेगळय़ा धाटणीच्या व्यक्तिरेखाही तो तितक्याच तन्मयतेने साकारतो. २०२० साली प्रदर्शित झालेल्या ‘धुरळा’ चित्रपटातील त्याचा सिमेंट शेठ पाहताना अनेकांच्या डोळय़ात पाणी आले. ‘बालभारती’ या चित्रपटात संशोधक वृत्ती असलेल्या पित्याची भूमिकाही त्याने उत्तम साकारली होती. ‘प्लॅनेट मराठी’ या ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘तमाशा लाइव्ह’ या चित्रपटातील सिद्धार्थची सूत्रधार ही भूमिका विशेष लक्षणीय ठरली. त्याच्या आगामी ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटाबद्दलही प्रेक्षकांना उत्सुकता आहे. ‘अफलातून’ हा परितोष पेंटर दिग्दर्शित सिद्धार्थचा मराठी चित्रपट ‘द डिफेक्टिव्ह डिटेक्टिव्हज’ नावाने इंग्रजीत प्रदर्शित होणार आहे. तर नुकताच त्याचा ‘लग्नकल्लोळ’ हा मराठी चित्रपट चित्रपटगृहांतून प्रदर्शित झाला आहे.

विनायक हेगाणा (समाजसेवक) २०२१

युवा कृषी धोरणकर्ता व संशोधक असलेल्या, तरुण तेजांकित विनायक हेगाणा याची ब्रिटिश सरकारच्या आरोग्य व ग्रामीण विकास मंत्रालयाच्या विशेष सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर काम करणारा तो भारतातील पहिला कृषी पदवीधर संशोधक ठरला आहे. काही महिन्यांपूर्वीच ब्रिटिश सरकारच्या ‘शेव्हिनग ग्लोबल लीडर’ या पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले. ‘शेतकरी आत्महत्या शोध आणि बोध’ या त्याने लिहिलेल्या पुस्तकाची अनेक पातळय़ांवर चर्चा झाली. विनायक हेगाणा याने नऊ वर्षांपूर्वी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शिवार संसद युवा चळवळ उभी करून शेतकरी कुटुंबातील युवकांची फौज उभी केली. आत्महत्या होऊच नये यासाठी शिवार हेल्पलाइन या संकल्पनेतून  शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याच्या कार्याची विद्यापीठ स्तरावर, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई, आयआयटी मुंबई व निती आयोग, भारत सरकार यांनी दखल घेतली आहे.

समीर केळकर(व्यावसायिक) २०२१

इंजिनीअरिंग क्षेत्रात मराठी नावे असंख्य आहेत. परंतु इंजनीअिरग उद्योग क्षेत्रात मराठी नावे अभावानेच आढळतात. याला अपवाद समीर केळकरचा. समीर हा छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक असून ग्राइंड मास्टर ही त्याची कंपनी ४० हून अधिक देशातील कंपन्यांसाठी लागणारी यंत्रे तयार करते. अत्यंत नाजूक वस्तू बनविणारे यंत्रमानव ही कंपनी बनवते. तसेच आता विदेशातील संरक्षणविषयक साहित्याचे सुटे भागही या कंपनीकडून तयार केले जातात. समीर केळकर हौशी गिर्यारोहक आहे. त्यामुळे आव्हाने स्वीकारायला आवडते, असे तो आवर्जून सांगतो. सूक्ष्म तंत्रज्ञान विकासात समीर केळकर हे नाव जगभरातील उद्योगांमध्ये आदराने घेतले जाते.  ऑटोमोबाइल, धातू निर्माण, घरगुती वस्तू, पिंट्रिंग टेक्नालॉजी, हेवी इंजिनीअरिंग या क्षेत्रात समीर केळकर कार्यरत आहे. अलीकडेच भारतील रोबॉटिक प्रदर्शनातही त्याच्या कंपनीने सहभाग घेतला होता.

अजिंक्य धारिया (उद्यमी) 20२१

सॅनिटरी पॅड्सच्या विघटनासाठी प्रणाली विकसित करणाऱ्या पुण्याच्या अजिंक्य धारियाला २०२१ मध्ये ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यानंतर गेल्या दोन वर्षांत अजिंक्यच्या पॅडकेअर लॅब या कंपनीचा आणि एकूणच सॅनिटरी पॅड विल्हेवाटीच्या कामाचा सातत्याने विस्तार झाला आहे. पुरस्कार मिळाला, तेव्हा पॅडकेअर लॅब पुण्यासह तीन-चार शहरांमध्येच कार्यरत होती. मात्र, आता पॅडकेअर लॅबच्या कामाचा विस्तार देशभरातील अनेक शहरांमध्ये झाला आहे. सॅनिटरी पॅडच्या विल्हेवाटीबाबतची जागृती वाढत असल्याने अजिंक्यच्या कामाला प्रतिसादही वाढला आहे. कॉर्पोरेट कंपन्या, सरकारी आस्थापना, उद्योग क्षेत्रातून अजिंक्यनं विकसित केलेली प्रणाली बसवण्यासाठी मागणी येऊ लागली आहे. पॅडकेअर लॅब आता सुमारे पाच लाख सॅनिटरी पॅड्सची विल्हेवाट लावू लागली आहे. तसेच दररोज १.५ मेट्रिक टनांवर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे कार्बन उत्सर्जन रोखणे शक्य झाले आहे. या कामातून अनेक कचरावेचकांच्या हाताला काम मिळाले आहे. देशभरातील शहरांनंतर आता पॅडकेअर लॅब सिंगापूरमध्येही सेवा सुरू करणार आहे. अजिंक्यच्या  कंपनीतील मनुष्यबळ शंभपर्यंत वाढले आहे. त्यामुळे तरुणांना रोजगार निर्माण झाले आहेत. गेल्या दोन वर्षांत विविध माध्यमांतून पॅडकेअर लॅबने पाच कोटी रुपयांचा निधी उभारणीही केली आहे. त्यामुळे नवसंकल्पनेतून शाश्वत पर्यावरणासाठी उपाय करतानाच रोजगार निर्मितीचे महत्त्वाचे योगदान पॅडकेअर लॅब देत आहे.

विदित गुजराथी (बुद्धिबळपटू) २०१८

भारताचा २९ वर्षीय ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू विदित गुजराथीला २०१८ च्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर त्याची कामगिरी अधिकच उंचावत गेल्याचे पाहायला मिळाले आहे. २०१९ मध्ये विदित स्वित्र्झलड येथे होणाऱ्या बिल स्पर्धेचा विजेता ठरला. मग २०२० मध्ये विदितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ‘ऑनलाइन’ स्वरूपात झालेल्या फिडे ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेचे रशियासह संयुक्तरीत्या जेतेपद पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. २०२१ मध्ये भारताने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आणि विदित यावेळीही संघाचा भाग होता. २०२१ मध्ये जागतिक अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेच्या खुल्या गटात विदितने भारताकडून सर्वोत्तम कामगिरी केली. त्यानंतर २०२२ मध्ये त्याने मायदेशात झालेल्या ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत त्याने १० सामन्यांत सहा गुणांची कमाई केली. विदितने आपल्या कारकीर्दीतील सर्वात मोठे यश २०२३ मध्ये मिळवले. प्रथम आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजयात त्याने योगदान दिले. मग त्याने ग्रँड स्वीस स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याची किमया साधली आणि यासह त्याने प्रतिष्ठेच्या ‘कॅन्डिडेट्स’ म्हणजेच आव्हानवीरांच्या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. माजी कनिष्ठ जगज्जेत्या विदितला आता वरिष्ठ स्तरावर जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत स्थान मिळवण्याची संधी आहे.

‘‘कॅन्डिडेट्ससाठी तीन भारतीय (पुरुष विभागात) पात्र ठरणे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मात्र, ही स्पर्धा एका भारतीयाने जिंकली, तर तो खेळाडू मी असावा अशी माझी इच्छा आहे. या स्पर्धेत यशस्वी कामगिरी करता यावी यासाठी मी खूप मेहनत घेत आहे,’’ असे ‘लोकसत्ता’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विदित म्हणाला होता.

ऋता काळे  (संशोधक) २०२१

वृत्तपत्र आणि मासिकांच्या वाचनातून खगोलशास्त्राची आवड निर्माण झालेल्या ऋता काळेने अल्पावधीतच भौतिकशास्त्रातील संशोधनात ठसा उमटविला. रुईया महाविद्यालयात असताना ती खगोल मंडळाच्या संपर्कात आली. खगोल मंडळामुळे विज्ञानाची आवड निर्माण झाली. पुण्यातील राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र आणि टाटा मूलभूत अनुसंधान संस्थेत (एनसीआरए आणि टीआयएफआर) सहयोगी प्राध्यापक (जी) म्हणून ती कार्यरत आहे. तसेच २०२२ साली तिला विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळातर्फे (एसईआरबी) ‘महिला उत्कृष्टता पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले. क्लस्टर कोअरपासून मोठय़ा आकाराच्या संरचनेपर्यंतच्या स्केलवर वैश्विक किरण आणि चुंबकीय क्षेत्रांच्या निर्मिती आणि उत्क्रांतीमागील भौतिक यंत्रणा समजून घेण्याचा तिचा प्रयत्न आहे. मुळात संशोधनासारख्या क्षेत्रात महिलांचे प्रमाण कमी आहे. ही बाब लक्षात घेऊन महिला संशोधक, शास्त्रज्ञांची माहिती सार्वत्रिक करण्यासाठीही तिचा प्रयत्न सुरू आहे. मुलांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी शालेय स्तरावर तिच्याकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ (सीईआरबी) पुरस्कारासाठी तिची निवड करण्यात आली होती. महिला आणि मुलींसाठी विज्ञानामध्ये पूर्ण व समान प्रवेश आणि सहभागासाठी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. लिंगभाव समानता आणि महिला सक्षमीकरण साध्य करण्याच्या तिच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले आहे. रामन रिसर्च इन्स्टिटय़ूटमधून ‘मल्टी वेव्हलेंग्थ स्टडी ऑफ रेडिओ हॅलोस आणि क्लस्टर्स ऑफ गॅलेक्सीज’ या विषयावर पीएच.डी. करून एनसीआरए येथे डीएसटी इन्स्पायर फॅकल्टी म्हणून तिने काम केले आहे.

अभिजित गद्दे (संशोधक) २०२२

मुंबईतील कुलाबा परिसरात राहणाऱ्या अभिजित गद्देला विज्ञान क्षेत्रातील योगदानासाठी २०२२ साली ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ हा पुरस्कार प्रदान  करण्यात आला. अभिजितने ‘आयआयटी मुंबई’तून तंत्रज्ञान विषयात पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर न्यूयॉर्क येथील स्टोनी ब्रूक विद्यापीठातून पीएच.डी. पूर्ण केली. सध्या सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ म्हणून वाटचाल सुरू असून ‘स्ट्रिंग थिअरी’ हा अभ्यासाचा विषय आहे. २००६ साली राष्ट्रपती रौप्य पदक, २०११ साली कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून जॉन मॅककोन फेलोशिप, २०१७ साली भारत सरकारकडून रामानुजन फेलोशिप,  राष्ट्रीय प्रतिभा शोध शिष्यवृत्ती आदी विविध पुरस्कार आणि शिष्यवृत्त्या अभिजितच्या नावावर आहेत. सुपरकॉन्फॉर्मल फील्ड थिअरीवर अभिजितने संशोधन केले आहे. त्याचे आजवर ३५ हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले असून त्या शोधनिबंधांचा २ हजारांहून अधिक वेळा इतर संशोधकांनी संदर्भ म्हणजेच सायटेशन म्हणून वापर केला आहे. अभिजित टाटा मूलभूत अनुसंधान संस्थेत गणित आणि क्वांटम फील्ड सिद्धांतावर अध्यापनाचेही काम करतो.

रुद्रांक्ष पाटील(नेमबाज) २०२२

नेमबाज रुद्रांक्ष पाटीलला २०२२ च्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. ठाणेकर रुद्रांक्षची १० मीटर एअर रायफल प्रकारातील सर्वोत्तम नेमबाजांमध्ये गणना केली जाते. तो बराच काळ जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी होता. २० वर्षीय रुद्रांक्षने आपला लौकिक सिद्ध करताना जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत वैयक्तिक आणि सांघिक अशी दोन सुवर्णपदके पटकावली आहेत. प्रतिष्ठेच्या ‘प्रेसिडेंट चषक’ नेमबाजी स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावणाऱ्या रुद्रांक्षने आतापर्यंत विविध स्पर्धाच्या माध्यमांतून तब्बल १० हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि २६ राष्ट्रीय पदके मिळवली आहेत. २०२२ च्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रीय स्पर्धा, तसेच कैरो येथे झालेल्या जागतिक एअर रायफल नेमबाजी स्पर्धेत त्याने सुवर्णपदकाची कमाई केली होती. या कामगिरीच्या आधारे त्याने यंदा पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.

तसेच रुद्रांक्ष, दिव्यांश सिंग पन्वर आणि ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर यांच्या भारतीय संघाने गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात सांघिक विभागात विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावले होते. रुद्रांक्षने ६३२.५, तोमरने ६३१.६, तर दिव्यांशने ६२९.६ गुणांची कमाई करताना एकत्रित जागतिक विक्रमाचा वेध घेतला. आता जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेतही दर्जेदार कामगिरी करताना पदक मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

डॉ. दर्शना पाटील(संशोधक) २०२२

कर्करोगाचे निदान आणि उपचारांशी संबंधित परिस्थिती बदलण्याच्या दृष्टिकोनातून डॉ. दर्शना पाटील १० वर्षांपासून द्रवरूप अर्थात लिक्विड बायोप्सी, परिसंचारी टय़ूमर सेल्सच्या (सीटीसी) संशोधनात कार्यरत आहे. एमबीबीएस, एमडी पॅथॉलॉजीचे शिक्षण घेतल्यानंतर तिने स्पेनमधून मास्टर इन मॉल्युक्युलर ऑनकॉलॉजीची पदवी प्राप्त केली. सध्या ती नाशिक येथील दातार कॅन्सर जेनेटिक्समध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तिच्या पुढाकारातून २०१३ साली देशात प्रथमच लिक्विड बायोप्सीज ही कर्करोगावरील उपचारात उपयुक्त ठरणारी पद्धत आणली गेली. या पद्धतीचा १० हजारांहून अधिक रुग्णांना फायदा झाला आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने कर्करोगाचे निदान करण्यात मदत करणाऱ्या तीन वेगवेगळय़ा रक्त चाचण्यांना क्रांतिकारी संशोधनाचे मानांकन दिले आहे. कर्करोगाचे निदान केवळ रक्त तपासणीने करणारी ही पद्धत आहे. हे संशोधन करणाऱ्या गटात डॉ. दर्शना पाटील हिचा सक्रिय सहभाग आहे.

अल्फिया खान पठाण (मुष्टियोद्धा) २०२३

युवा बॉक्सर म्हणून नागपूरच्या मानकापूर भागात राहणारी अल्फिया खान पठाण ही २०२३ वर्षांसाठी ‘लोकसत्ता’ तरुण तेजांकित सन्मानाची मानकरी ठरली. ती सध्या ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी करत आहे. बॉक्सिंग क्षेत्रात मुलींची संख्या कमी असताना अल्फिया खान पठाण ही तरुणी बॅडिमटन सोडून मोठय़ा भावापासून प्रेरणा घेत बॉक्सिंग या क्रीडा प्रकाराकडे वळली. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धात सहभागी होऊन या खेळामध्ये आपला दबदबा निर्माण केला. सध्या भुसावळ येथे ती प्रशिक्षण घेत आहे. पतियाळा येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिला सुवर्ण पदक मिळाले. बॉक्सिंगच्या राष्ट्रीय स्तरावर अल्फियाचा प्रवेश ‘खेलो इंडिया’ स्पर्धेच्या माध्यमातून झाला, जिथे तिने ८० किलो गटात सुवर्ण जिंकले. पोलंडमधील २०२१ एआयबीए युवा जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत तिला सुवर्ण पदक मिळाले. खेलो इंडिया स्पर्धेसह विविध राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धात सहा सुवर्णपदकांसह एकूण नऊ पदकांची कमाई करणाऱ्या अल्फिया पठाणला विविध क्रीडा संस्थांकडून सन्मानित करण्यात आले. आशियाई ज्युनियर बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकही तिच्या नावावर आहे 

संदीप शिंदे (सामाजिक कार्यकर्ता) २०२३

यवतमाळ येथील ‘नंददीप फाऊंडेशन’चे संस्थापक संदीप शिंदे यांना २०२३ च्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे संदीप व नंदिनी शिंदे आणि नंददीप फाऊंडेशनच्या कार्याची दिशाच बदलली.

करोनाकाळात रस्त्यांवरील बेघर, मनोरुग्णांना दोन वेळेचे जेवण देण्यापासून नंददीपच्या कार्याची सुरुवात झाली होती. हळुहळू मनोरुग्णांमध्येही आपली कोणीतरी विचारपूस करतो, खायला देतो, औषधे देतो असा विश्वास निर्माण झाला आणि संदीप शिंदे हा तरुण मनोरुग्णांसाठी आशास्थान ठरला. महाराष्ट्रासह देश आणि जगातील अनेक भागांतील लोक त्याच्याशी संलग्न झाले. अगदी दुबई, अमेरिकेतूनसुद्धा संदीपच्या सामाजिक कार्यासाठी आर्थिक आणि वस्तू स्वरूपात मदत सुरू झाली. स्थानिक पातळीवर नंददीपच्या बेघर मनोरुग्ण केंद्रात वाढदिवस, जयंती, पुण्यतिथी आदी कार्यक्रमानिमित्त भोजनदान करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली. त्यामुळे दोन वेळचे भोजन कसे द्यायचे, ही मुख्य समस्या मिटली. कपडे, औषधे, भांडी आदी साहित्य स्वरूपातील मदतीचा ओघ वाढला. ‘बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र अनंत अडचणींचा सामना करत असताना तरुण तेजांकित पुरस्कार मिळाला आणि नंददीप फाऊंडेशनच्या बंद होण्याच्या स्थितीत असलेल्या कामाने उभारी घेतली,’ अशी कृतज्ञता संदीप शिंदे व्यक्त करतो.

तेजस्वी सातपुते (आयपीएस अधिकारी) २०२३

तेजस्वी सातपुते ही २०१२ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी. कर्तव्यकठोर पोलीस अधिकारी म्हणून ती परिचित आहे. पोलीस दलाला अधिकाधिक समाजाभिमुख बनवण्यासाठी तिने राबवलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे समाजामध्ये पोलीस दलाच्या प्रतिमेबरोबरच पोलीस कर्मचाऱ्यांचे नीतिधैर्यही उंचावले. तेजस्वी ही २०२३ची ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’. मुंबई येथे झोन पाचमध्ये वर्षभरापूर्वीच पोलीस उपायुक्त म्हणून तिची बदली झाली. येथे रुजू झाल्यानंतर वर्षभरात तिने सर्वात मोठय़ा पोलीस भरतीचे आव्हान पेलले. तब्बल आठ हजार ७० कर्मचाऱ्यांची भरती नुकतीच पूर्ण झाली असून त्यांना आता प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. याशिवाय चार उपक्रम तेजस्वीने सुरू केले आहेत. त्यातील पहिला उपक्रम म्हणजे ‘अस्मिता’. पोलीस दलात महिलांची संख्या वाढत आहे आणि मुंबई पोलीस दल याला अपवाद नाही. ३९ हजार पोलिसांच्या मागे साडेपाच हजार महिला पोलीस आहेत. पुरुषांच्या बरोबरीने काम करताना त्यांच्या सहकाऱ्यांनी, कुटुंबाने सहकार्य करावे यासाठी तेजस्वी सातपुतेने त्यांच्याशी संवाद साधला. दुसरा उपक्रम म्हणजे ‘ध्येय’. पुरुष, महिला अंमलदारांची मुले स्पर्धा परीक्षा देतात, पण मार्गदर्शन घेताना त्यांची आर्थिक परिस्थिती आड येते. अशा विद्यार्थ्यांचा डेटा गोळा करून त्यांच्या मार्गदर्शनाची व्यवस्था केली. सुमारे २७ मुलांना अवघ्या २५ टक्के शुल्कावर प्रशिक्षणाची व्यवस्था केली. तिसरा उपक्रम म्हणजे सम्यक चक्रवर्ती आणि नव्या नवेली नंदा यांचे ‘निमया फाऊंडेशन’. या फाऊंडेशनच्या माध्यमातून तिने कौशल्यवृद्धीसाठी मुलींना प्रशिक्षण दिले. त्यांना आता चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली आहे. चौथा उपक्रम म्हणजे ‘जॉब फेअर’. सुमारे ३३ मल्टीनॅशनल कंपन्या यात सहभागी झाल्या आणि आतापर्यंत सुमारे ३२४ मुलांना या उपक्रमाच्या माध्यमातून नोकरी मिळाली.

संकर्षण कऱ्हाडे (रंगकर्मी)२०२३

कवी, निवेदक, लेखक, दिग्दर्शक, गायक आणि अभिनेता.. अशा सतत वेगवेगळय़ा भूमिकांमधून तो प्रेक्षकांसमोर येतो आणि त्यांचा होऊन जातो. ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या झी मराठी वाहिनीवरील पहिल्यावहिल्या अभिनयावर आधारित रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून अभिनेता म्हणून पदार्पण केलेल्या संकर्षण कऱ्हाडे या तरुण कलाकाराने गेल्या पंधरा वर्षांत एक प्रयोगशील कलाकार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

संकर्षणची लेखन आणि अभिनय या दोन्हीवरची पकड दाखवणाऱ्या ‘तू म्हणशील तसं’ आणि ‘नियम व अटी लागू’ या दोन नाटकांचे प्रयोग देश-परदेशात हाऊसफुल्ल गर्दीत सुरू आहेत. त्याचंच लेखन-दिग्दर्शन असलेलं ‘सारखं काहीतरी होतंय’ हेही नाटक रंगभूमीवर गाजतं आहे. याशिवाय, सतत वेगवेगळे कलाप्रयोग करण्यात रमणाऱ्या संकर्षणचा कवितांवर आधारित अभिनेत्री स्पृहा जोशीबरोबरचा ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हाही प्रयोग रसिकांना भावतो आहे. ‘तू म्हणशील तसं’ या त्याने लिहिलेल्या आणि त्याची प्रमुख भूमिका असलेल्या त्याच्या पहिल्या व्यावसायिक नाटकाने साडेतीनशे प्रयोगांचा टप्पाही यशस्वीपणे पार केला आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ऋषीकेश जोशी लिखित- दिग्दर्शित ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटात संकर्षणची महत्त्वाची भूमिका होती.

मुख्य प्रायोजक:’ महाराष्ट्र औद्य्ोगिक विकास महामंडळ

सहप्रायोजक :’  सारस्वत को—ऑपरेटिव्ह बँक लि.

’  ग्रॅव्हीटस फॉउंडेशन 

’  पीएनजी ज्वेलर्स

’  महानिर्मिती

’  केसरी टूर्स

’  सिडको

’  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

सहाय्य:’  वैभवलक्ष्मी बिल्डर्स अँड डेवलपर्स नॉलेज पार्टनर

’ प्राइस वॉटरहाऊस कूपर्स