scorecardresearch

विशुद्ध राष्ट्रीयत्वाचे मूर्तिमंत प्रतीक

जागतिक इतिहासात अनेक गुणसंपन्न व्यक्तिमत्त्व व धुरंधर नेते होऊन गेले. अनेकदा छत्रपतींची तुलना या दिग्गज मंडळींशी केली जाते.

विशुद्ध राष्ट्रीयत्वाचे मूर्तिमंत प्रतीक

रवींद्र माधव साठे

छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४८वा शिवराज्याभिषेक दिन अलीकडेच संपन्न झाला. जागतिक इतिहासात अनेक गुणसंपन्न व्यक्तिमत्त्व व धुरंधर नेते होऊन गेले. अनेकदा छत्रपतींची तुलना या दिग्गज मंडळींशी केली जाते. उदाहरणार्थ- युद्ध संचलनासाठी सिकंदर, हॉनीबाल व नेपोलियन; जनता निराशेच्या गर्तेत सापडली असताना जनतेचे मनोधैर्य टिकविण्यात यश मिळवलेले अब्राहम लिंकन व चर्चिल; जनतेत प्रखर राष्ट्रभाव जागृत करणारे मॅझिनी व बिस्मार्क; राष्ट्रनिर्माण कार्यात अग्रणी असणारे कमाल पाशा इत्यादी. परंतु संपूर्ण गुण समुच्चयाच्या दृष्टीने छत्रपती या सर्वांपेक्षा निश्चितच उजवे ठरतात. छत्रपतींनी शून्यातून सृष्टी निर्माण केली. ते केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाला सदासर्वकाळ प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहेत. १८५७च्या स्वातंत्र्यसमरात जे प्रमुख सेनापती होते त्यांना छत्रपतींची प्रेरणा होती. ब्रिटिशांविरुद्धच्या लढाईत जे क्रांतिकारक होते त्यांचेही शिवाजी महाराज प्रेरणास्रोत होते. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, संघ संस्थापक डॉ. हेडगेवार, नेताजी सुभाषचंद्र बोस या सर्वांसाठी छत्रपती हे स्फूर्तिस्थान होते.

लोकमान्यांनी पूर्व इतिहासाचे स्मरण हा राष्ट्रीयत्वाचा मुख्य घटक असतो, असे म्हटले होते. याच कल्पनेतून त्यांनी शिवजयंती उत्सव एक राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करण्याचे ठरविले. लोकमान्यांनी शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केल्यानंतर ब्रिटिशांनी शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वावर शिंतोडे उडविण्यास प्रारंभ केला. तत्कालीन इंग्रजी वृत्तपत्रांचा यात पुढाकार होता. शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा केलेला वध, शिवाजी हे अखिल भारतीय व्यक्तिमत्त्व नसून महाराष्ट्रापुरते संकुचित आहेत, ते केवळ हिंदू संप्रदायाचे नेतृत्व करणारे आहेत अशा प्रकारचे आक्षेप घेतले गेले. लोकमान्यांनी आपल्या धारदार लेखणीतून अग्रलेखांद्वारे या आक्षेपांना उत्तर दिले. ते ‘मराठा’मध्ये लिहितात, ‘जरी या कार्याचा प्रारंभ महाराष्ट्रात स्वाभाविकपणे झाला असला तरी शिवाजींची दृष्टी ही अखिल भारतीय होती. संपूर्ण राष्ट्र आणि राष्ट्राविषयी भक्ती ही शिवरायांची दृष्टी महाराष्ट्राबाहेरच्या मान्यवरांनीसुद्धा मान्य केली आहे.’ शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, कर्नाटकमध्ये बसरूरचे बंदर लुटले असाही अपप्रचार त्या वेळी करण्यात आला. वास्तविक सुरत लुटण्यात आली त्या वेळी महाराजांनी गुजरातवर नव्हे, तर औरंगजेबावर आक्रमण केले होते. तसेच बसरूरवरचे आक्रमण हे कर्नाटक नव्हे तर पोर्तुगीजांवर होते. ब्रिटिशांच्या अपप्रचाराला बळी न पडता गुजरात व कर्नाटकातील साहित्यिकांनी छत्रपतींची योग्य बाजू मांडत आपल्या साहित्यातून ‘राष्ट्रपुरुष’ म्हणून छत्रपतींचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यामुळे शिवाजी महाराजांविषयी स्फूर्तिदायक साहित्य भारतातील सर्व राज्यांत निर्माण झाले.

शिवाजी हे व्यक्तिमत्त्व हिंदूंपुरते मर्यादित होते, या इंग्रजांच्या अपप्रचारास उत्तर देताना टिळक लिहितात, ‘आम्ही जो शिवाजी उत्सव करीत आहोत त्यामध्ये शिवाजी हा राष्ट्रपुरुष आहे, ही भावना आहे. शिवाजींच्या काळी मुसलमान आक्रमक होते, म्हणून शिवरायांना त्याचा प्रतिकार करायचा होता, ही तर गोष्ट खरीच आहे. त्यांच्याविरुद्ध लढून त्यांना स्वराज्य स्थापन करावयाचे होतेच. परंतु यामध्ये हिंदू-मुसलमान हा प्रश्न नव्हता तर अन्यायाचा प्रतिकार आणि स्वराज्याची स्थापना, ही भावना होती. वास्तविक जो-जो अन्यायाचा प्रतिकार करील आणि या राष्ट्रात स्वराज्य स्थापन व्हावे म्हणून प्रयत्न करील तो-तो आमचा राष्ट्रपुरुष आहे.’ अफझलखानाचा वध करून शिवाजींनी औरंगजेबाला थेट संदेश पाठवला. हिंदू समाज जयिष्णू आहे, तसा वर्धिष्णू आहे, क्षमाशील आहे तसा क्रोधशील आहे, सर्वसमावेशक आहे तसा निवडकही आहे. छत्रपतींनी नीरक्षीरविवेकबुद्धीने अफझलखानाचा वध केला. त्यात गैर काहीच नव्हते.

छत्रपतींच्या जीवन चरित्राकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. ते पूर्ण अभ्यासले तर शिवाजी महाराजांनी एक अलौकिक हिंदू राजा या नात्याने भारतीय इतिहासात मौलिक योगदान दिल्याचे अधोरेखित होते. ज्या वेळी संपूर्ण हिंदुस्थान हतबल झाला होता, हिंदूंचे स्वराज्य स्थापन करू शकतील असे सामर्थ्य असलेल्या मोठमोठ्या हिंदू सरदारांनी स्वराज्यस्थापनेची हिंमत सोडली होती. सर्वत्र आत्मविश्वासाचा अभाव होता, अशा वेळी एका कोपऱ्यात, ‘मी हिंदवी स्वराज्याची स्थापना करीन’ ही प्रतिज्ञा महाराजांनी केली. आपल्या मनातील ही आकांक्षा आपल्या सवंगड्यांच्या मनात रुजविली; दक्षिणेत पाच प्रबल बादशहांचे व उत्तरेत मोठे मोगली साम्राज्य. स्वतःकडे तशी साधनसामग्री नसताना स्वराज्य स्थापनेची आकांक्षा धारण करणे, हे अत्यंत साहसाचे व आत्मविश्वासाचे काम होते. हे अचाट साहस शिवाजींनी केलेच आणि इतरांच्या मनामध्ये ते रुजवून चारही बाजूंनी येणाऱ्या संकटांना तोंड देत पुरून उरेल असे संघटन उभे केले.

माओ-त्से-तुंग, हो-चि-मिन्ह, चे ग्वेवेरा इत्यादींनी ‘गुरिल्ला वॉरफेअर’ (गनिमी कावा) उत्कृष्ट रीतीने चालविले होते, परंतु या मंडळींचा जन्म होण्याच्या शेकडो वर्षे आधी स्वयंप्रतिभेच्या आधारावर, एकीकडे सर्वसाधनसंपन्न साम्राज्य व दुसरीकडे साधनविरहित अशा थोड्या लोकांचा गट असताना लढाईत या तंत्राचा- गनिमी काव्याचा उपयोग करणे, त्याचा विकास करणे, हे शिवाजी महाराजांचे वैशिष्ट्य होते. एका फ्रेंच लेखकाने म्हटले आहे की, त्या वेळी नकाशे उपलब्ध नसताना भौगोलिक रचना व विशेष स्थलवर्णन यांचे विस्तृत ज्ञान शिवाजींना कसे होते याचे आश्चर्य वाटते. त्या वेळी लढाईचे एक नवे अभूतपूर्व तंत्र महाराजांनी विकसित केले. त्यांच्या कर्तृत्वाचा हाही एक पैलू आहे. शिवाजी महाराजांनी केवळ राज्य स्थापन केले एवढेच नाही, तर आदर्श संस्कृती, धर्म यांच्या आधारावर एक संपूर्ण रचना निर्माण करण्याचा बृहत्प्रयास केला, हे त्यांचे योगदान आहे.

शिवाजी महाराजांच्या रचनात्मक कार्याचा देशावर जो काही परिणाम झालाए त्याचे फारसे महत्त्व कोणाच्या ध्यानात येत नाही. ते रचनात्मक व्यवस्थेचे प्रणेते होते. त्यांची स्वतःची अशी विशेष मुलकी व्यवस्था व सैनिक व्यवस्था होती. हिंदूंच्या इतिहासात ‘विक्रमादित्य’ ही एक मानाची पदवी होती. परंतु महाराजांनी ती पदवी न घेता ‘छत्रपती’ ही पदवी का घेतली हे समजून घेणे आवश्यक आहे. शिवाजी महाराज हे ‘विक्रमादित्य’ तर होतेच, ते सांगण्याची आवश्यकताच नव्हती. पण ‘मी विक्रमादित्य आहे’ या गोष्टीवर त्यांनी भर दिला नाही. तर ‘मी छत्रपती आहे’ असे त्यांनी म्हटले. ‘छत्र’ या शब्दात जनतेसाठी ‘छाया’ व ‘संरक्षण’ हा मानसिक साहचर्याचा एक विशेष भाव आहे. त्यावर महाराजांनी जोर दिला. शिवाजी हे एक हिंदू राजे होते, तेव्हा ते ‘सेक्युलर’ होते हे ओघानेच आले. कोणत्याही राष्ट्रनिर्मात्याला केवळ राजकीय, शासकीय विचार करून चालत नाही. केवळ सैनिकी विचार करून चालत नाही. समाजाचाही विचार करावा लागतो.

केवळ एका व्यक्तीच्या मनामध्ये आले, कोणा आईच्या आणि वडिलांच्या मनामध्ये आले की आपला मुलगा राजा व्हावा, म्हणून त्याचे राज्य निर्माण झाले असे नव्हते; तर त्या वेळी सर्व देशांमध्येच एक जागृतीकरण चालले होते. शिवाजी हा एक प्रकारे शतकानुशतके जो एक वैचारिक व सांस्कृतिक प्रवाह अक्षुण्णपणे वाहत आलेला होता त्याचे संकलित फळ होय. शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वामुळे या प्रवाहाला चालना मिळाली असे म्हणता येईल. राज्यस्थापना हा शिवाजी महाराजांचा एकलकोंडा प्रयत्न नव्हता. या देशात परकीय आक्रमण सुरू झाल्यापासून त्याविरुद्ध हिंदूंचा प्रतिकार व स्वराज्यरक्षण याचा जो अखंड प्रयास सुरू होता, त्याचा एक महत्त्वपूर्ण भाग होता. आपल्यासमोर ज्या पद्धतीने देशाचा इतिहास ठेवला जातो त्यामुळे एक चुकीचे विकृत चित्र उभे राहते. आपण इतिहासात वेगवेगळे कालखंड शिकतो. त्यात हिंदू कालखंड, मुस्लीम कालखंड, ब्रिटिश कालखंड असे वर्णन असते. परंतु एकाच वेळी भारतात सर्वत्र यावनी साम्राज्य होते असे चित्र नसून त्यांच्याविरुद्ध हिंदूंचा अखंड प्रतिकार सुरू होता. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये तो सुरू होता आणि त्यात एकही दिवस खंड पडला नव्हता. उदाहरणार्थ पंजाबने झेंडा खाली ठेवला न ठेवला तो राजपुतान्याने तो हाती घेतला. राजपुतान्याच्या हातून तो पडतो न पडतो तोच विजयनगरने तो घेतला आणि विजयनगरच्या हातून तो खाली येत न तोच तो रायगडाने उचलला. अशी ही अखंडता व सातत्य या प्रयत्नांत आहे. त्यामुळे यवनांविरुद्ध लढण्याची ही जी राष्ट्रीय अस्मितेची परंपरा आहे, त्या परंपरेचे शिवाजी महाराज एक तेजस्वी आविष्कार होते. देशात तोपर्यंत सर्वत्र पराभूत मनोवृत्ती प्रसृत झाली होती. ती नाहीशी करणे हे राज्य स्थापन करण्यापेक्षाही अवघड काम होते आणि ते महाराजांनी केले.

(क्रमशः)

लेखक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे सचिव आहेत.

मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या