निकुंज प्रेमानंद सावंत

शिवकाळाच्या अगोदरपासून कोकण प्रदेशावर सावंत, मोरे, शिर्के, सुर्वे आणि दळवी अशी पाच राजघराणी राज्य करीत होती. त्या पैकी सावंत घराण्यांच्या नोंदीवरून रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यातले ‘गोवेले’ गाव आणि तळ कोकणातली चार गावे- प्रभावली, रत्नागिरी, भिरवंडे आणि सावंतवाडी या पाच ठिकाणी सावंत यांचे लहान मोठे पडाव होते. त्या पैकी गोवेलेचे सावंत घराणे हे मूळचे परमार वंशीय असून या गोवेलेकर सावंत घरण्याला शिवकाळाच्या अगोदरपासूनचा इतिहास लाभलेला आहे. म्हणूनच आज देखील गोवेलेचे परमार वंशीय सावंत घराने आपल्या नावा पुढे ‘गोवेलेकर सावंत’ फार अभिमानाने लावतात. याच गोवेलेकर सावंत राजांनी शिवाजी महाराजांना सुप्रसिद्ध ‘श्री भवानी तलवार’ भेट दिल्याची हकीकत ‘शिव दिग्विजय बखरी’मध्ये आढळते.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

ही तलवार इथे कशी?

सभासद बखर व शिव दिग्विजय बखर या दोन्ही बखरींच्या आधारे गोवेले येथे सावंत घराणे राज्य करीत होते. शिवकाळाआधी जंजिऱ्याच्या सिद्धीच्या अंमलाखाली असलेले हे सावंत घराणे राजे कायजी सावंत यांच्या मृत्यूनंतर महाराजांशी सख्य राखून राहिले. या सावंत घराण्याच्या एकनिष्ठतेमुळे तळेगड, गोशाळगड, हरिहरेश्वर, म्हसळा, श्रीवर्धन, माणगांव इत्यादी परिसर हबसाणात असूनही शिवरायांच्या अमलाखाली राहिले. गोवेलेकर सावंतांचे पिढीजात प्रदेश कायम राखून त्या घराण्यातील राजे ‘मालजी सावंत’ हे शूर वीर शिवरायांनी पदरी हजारी मनसबदार म्हणून राखला. मालजी सावंत हे राजे कायजी सावंत यांचे उत्तर अधिकारी. वरील कथेत शिवरायांना ‘श्री भवानी तरवार’ (तलवार) देणारे ते हेच राजे मालजी सावंत.

हेही वाचा – हा उपक्रम आता इतर राज्यांमध्येही राबविला जावा

जेधे शकावली व करीना या आधारे १ जानेवारी १६५६ ते १५ सप्टेंबर १६५६ या कालावधीत शिवराय जावळी व रायरी घेऊन त्यावर आपला अंमल बसविण्यासाठी कोकणात होते. जावळी प्रकरणाआधी सन १६५० ते १६५१ मध्ये गोवेले येथील सावंतांचे राज्य स्वराज्यात समाविष्ट करून मग जावळीमध्ये शिवरायांनी पाचर मारली. गोवलेकर सावंतांना स्वराज्यात सामील केल्यावर जावळीची मोहीम यशस्वी केली. नंतर सन १६५७ मध्ये साम्राज पंत पेशवे व बाजी घोलप यांना हबसाणात जंजिरा मोहिमेवर पाठविले आणि तेव्हापासून जंजिऱ्यास धडक देण्याचा मार्ग मोकळा झाला. एक गोष्ट निश्चित दिसून येते की गोवेलेकर सावंत हे स्वराज्यात सामील झालेले कोकणातील पहिले राजे होते.

शिवरायांच्या सुप्रसिद्ध श्रीभवानी तलवारीचा इतिहास असा की, पोर्तुगीज व्यापारी पाश्चात्य पात्याच्या धोप तरवारी (तलवारी) चौल, रेवदंडा, कोर्लाई या भागात विक्रीसाठी आणत असत. गोवेले गावात सावंत घराण्याकडे आजही अशा पद्धतीच्या तरवारी आहेत. यावरून येथील सावंतांच्या शिबंदीला शस्त्राची चांगली पारख होती असे समजते. गोवेले गावातील ज्यू वसाहतीचे अवशेष लक्षात घेता या गावाचा पोर्तुगीज व्यापाऱ्यांशी संबंध होता. गोवेले गावच्या सावंत राजास ते ज्यू लोक पोर्तुगीजांकडून तरवारी खरेदी करून पुरवत.

दृष्टान्ताची बखर-नोंद

गोवेलेकर सावंत राजांनी शिवाजी महाराजांना सुप्रसिद्ध ‘श्री भवानी तरवार’ भेट दिल्याची हकीकत शिव दिग्विजय बखरीत पुढील प्रमाणे आढळते : ‘‘महाराजांची स्वारी श्री हरिहरेश्वराचे दर्शन घेऊन गोवेलेच्या मार्गे जाता सावंतांचे घरी धोप- तरवार नामी चांगली आहे २०० होनाच्या किमतीची. त्यावरून आख्येची तरवार आपणाजवळ असावी; परंतु सरदार लोकांनी जवळचे राहणार अगर आसमंतात लौकिकवान पुरुषांजवळ उत्तम वस्तू असल्यास, अभिलाष इच्छा धरू नये… … ….परंतु जगदंबस्वरूप त्या तरवारीने महाराजांचे स्वप्नी येऊन सांगितले की, तू आपल्या हाती धरून, कोणत्याही युद्धास गेल्यास, अल्प सैन्य असले तरी, मोठा समुदाय सैन्याच्या दुसरीयाचा असला तरी, त्या फौजेचा भंग होऊन, यश तुजला येईल. ती तलवार माघारी देऊ नको. तिची पूजा करून सदोदित जवळ ठेवणे. हेच रात्री सावंतास दृष्टान्त झाला की, तरवार महाराजास देऊन, त्यांचे सख्य कर. मी अतःपर तुझपाशी राहत नाही, जाते. ते ऐकून कारभारी यांस बोलावून वर्तमान सांगितले. सर्वांचे विचार तरवार देऊन महाराजांचे सख्य करून घ्यावे हे उचित. त्या अन्वये सावंत येऊन महाराजास भेटून तरवार नजर केली. तिचे नाव ‘तुळजाभवानी’ ठेविले.’’

हेही वाचा – नावावरून सिंहांचाही धर्म शोधायचा का?

ग्रँट डफचा इतिहास

इंग्रजी इतिहासकार लेखक ग्रँड डफ आपल्या मराठ्यांच्या इतिहास लेखनात ‘श्री भवानी तरवारी’ संदर्भात सांगतो, “देवी भवानीच्या नावाने ओळखली जाणारी तरवार वारंवार वापरातील आहे. पूजनीय आदर भावाने सातारा येथील राजांकडून ती जपली गेली आहे”. २० जानेवारी १६७० ते ३१ जुलै १६७० या कालावधीत महाराज ‘रायरी’चा ‘रायगड’ करण्यासाठी कोकणात विसावले. याच सुमारास स्वराज्याशी इमान राखून असलेल्या गोवलेकर राजे मालजी सावंतांची शिवरायांस आठवण झाली. मालजीराजे सावंत सरदार भरवस्याचे जाणून किल्ले रायगडच्या पायथ्याकडील कोंझर (कुंज विहार) गावी किल्ले रायगडच्या मार्गावरील प्रमुख मेट / चौकी बांधून त्यास गडाचे संरक्षक प्रमुख नेमले. त्या परिसराचे पूर्ण माहितगार तसेच स्वराज्याची नेकदार असे हे राजे मालजी सावंत किल्ले रायगडची परवानगी मेट रक्षू लागले. हशम मावळे सरदार या सदराखाली सभासद बखरीत माल सावंत यांचे नाव आहे. त्यावरून ते पायदळाचे हजारी सरदार होते. राजमाता जिजाऊ मासाहेब यांचा पाचाड येथील राजवाड्याच्या संरक्षणाची प्रमुख जबाबदारी देखील सरदार मालजी सावंत यांची होती. ७ मार्च १६७३ रोजी कोंडाजी फर्जंदाने पन्हाळा वर धडक मारली. याबाबत सभासद बखर सांगते की मग अण्णाजी दत्तो सुरणीस यांनी सरदार माल सावंत, मावळे यांचा हजारी यांस सांगून हल्ला करून पन्हाळा किल्ला आदिलशाही होता तो घेतला. या मोहिमेबाबत चिटणीस बखर सांगते की, ‘अण्णाजी दत्तो सुरणीस व माल सावंत यास पन्हाळा प्रांती पाठविले. त्यांनी पन्हाळा वगैरे घेतले. तदनंतर साताऱ्यातील अनेक किल्ले जैसे चंदन वंदन, नंदगिरी, परळी किल्ला स्वराज्यात समाविष्ट करून घेतले. महाराज स्वतः रायगडावरून हा नवीन प्रदेश व किल्ले पाहणी करिता गेले आहेत’ लगेच वाई प्रांत जिंकून वाईचा किल्ला स्वराज्यात घेतला. सिरवळ व कोल्हापूरचा किल्ला देखील घेतला. स्वराज्याचा विस्तार हुकेरी आणि रायबागपर्यंत पसरवण्यात सरदार मालजीराजे सावंत यांचा सिंहाचा वाटा होता अशी माहिती सभासद बखरमध्ये सापडते.

आजच्या वास्तु-खुणा

किल्ले रायगडच्या घेऱ्यातील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन हाती घेण्यासंदर्भात माहिती देताना सरदार मालजी सावंत यांच्या घराण्यातील १२ वे वंशज या नात्याने आम्ही रायगड किल्ल्याचा ऐतिहासिक आणि भौगोलिक अभ्यास करत सादर केलेल्या माहितीनुसार कोंझरहून पाचाडला जाण्यास पूर्वी एक मुख्य शिवकालीन वाट होती. रायगड किल्ल्याची नाते खिंडीच्या दिशेने संरक्षणाची जबाबदारी गोवेलेकर सावंतांची होती. तसा संदर्भ शां. वि. आवसळकर लिखित ‘रायगडची जीवनकथा’ या पुस्तकातदेखील सापडतो. याच परिसराला आज देखील पाचाड आणि कोंझर गावचे ग्रामस्थ ‘सावंतांची बाग / सावंतांचा भाग’ असे संबोधतात कारण या परिसरात सरदार मालजी सावंत यांचा राहता वाडा आणि त्यालगत एक बाग देखील होती. या परिसरात गोवेलेकर सावंतांच्या नावाने अनेक प्रचलित वास्तू आम्हाला संशोधनात सापडलेल्या आहेत. या ऐतिहासिक वास्तूंच्या यादीत किल्ले रायगडचे प्रमुख चौकीचे ठिकाण म्हणजे सावंतांचे मेट, गोवेलेकर सावंत घराण्यातील राजे मालजी सावंत यांचा स्मारक चौथरा, राजे मालजी सावंत यांचे समाधी स्थळ, गोवेलेकर सावंत यांच्या नावाने प्रचलित तलाव, झरा, सुरमाळ, घोड्यांची पागा, आंब्याचे मेट, अन्नछत्र, किल्ले रायगडाची मुख्य शिवकालीन बैलगाडीची वाट, इत्यादी वास्तूंचा समावेश आहे. प्रत्यक्षात किल्ले रायगडवरील केलेले हवाई सर्वेक्षण आणि ऐतिहासिक नोंदी यांच्या सहाय्याने, इतिहास तज्ज्ञांच्या मदतीने लवकरच आम्ही आमच्या घराण्याचा आणि किल्ले रायगडच्या समृद्ध घेऱ्यातील इतिहास सर्वसामान्य शिवप्रेमी जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करू.

nikunjswnt@gmail.com

Story img Loader