राघवेंद्र मण्णूर
अहमदाबाद येथील विमान अपघात घडून गेलेल्याला आता महिना झाला. गेले काही दिवस या अपघातावर विविध माध्यमांत चर्चा सुरू आहे. नुकताच या प्रकरणाचा प्राथमिक तपास अहवाल प्रसिद्ध झाला. यात फ्युएल स्विचमध्ये बिघाड होता की पायलटने तो चुकून बंद केला, यावर मतभेद आहेत. पण एक सत्य निर्विवाद आहे, अवघ्या ३२ सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. या अपघाताच्या निमित्ताने सुरक्षेसंदर्भातील मार्गदर्शक सूचना, सल्ले किंवा शिफारशी यांकडे आपण किती गांभीर्याने पाहतो, याचे प्रामाणिक उत्तर शोधणे गरजेचे आहे. बोइंगच्या अपघातामागे नेमके काय कारण होते, हे तपासातून पुढे येईलच, पण निष्काळजी वृत्ती सार्वत्रिक असल्याचे दिसते. मग ते औद्योगिक क्षेत्र असो, नागरी, शैक्षणिक, रेल्वे व रस्ते वाहतूक व सार्वजनिक व्यवस्थापनात… सुरक्षिततेचे संकेत, निरीक्षणे आणि सल्ले गांभीर्याने घेतले जात नसल्याची अनेक उदाहरणे दिसतात.

औद्योगिक सुरक्षा सल्लागार म्हणून काम करताना अनेकदा अशा त्रुटी दिसून येतात. एकदा एका मोठ्या मॉलच्या ऑडिटवेळी मल्टिप्लेक्सच्या पंपहाऊसमधून फायर पंपच गायब असल्याचे आढळले. आम्ही तसा उल्लेख अहवालात केला. पण पुढच्या वर्षी तेथील परिस्थिती जैसे थेच! अखेर मुख्य व्यवस्थापकांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांना याचे संभाव्य गंभीर परिणाम समजावून सांगावे लागले. त्यानंतरच उपाययोजना झाली.

अशाच एका औद्योगिक आस्थापनेत सलग दोन वर्षे सुरक्षा ऑडिट करूनही आमच्या शिफारशींवर अंमलबजावणी झाली नव्हती. तिसऱ्या वेळी मी ऑडिट करण्यास स्पष्ट शब्दांत नाकर दिला- कारण निव्वळ शिफारस म्हणजे फक्त एक औपचारिकता राहते आणि ते सुरक्षिततेच्या मूळ हेतूला हरताळ फासणारे असते.

दरवेळी प्रश्न फक्त खर्चाचा नसतो, दृष्टीकोनाचाही असतो. एकदा एका मोठ्या कारखान्याच्या ऑडिटच्या समारोपाची बैठक सुरू होती. त्यात मुख्य व्यवस्थापकाने मला विचारले, “जर रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) आगीत जळणारच असेल, तर त्याभोवती महागडे स्प्रिंकलर मी का लावावेत?” मी त्यांना समजावून सांगितले की रोहित्रातील १५-२० हजार लिटर मिनरल तेल जळाल्यास ते केवळ मालमत्तेचे नुकसान न करता पर्यावरण प्रदूषित करते. विषारी धूर वातावरणात पसरतो. प्राणवायू कमी होते, शिवाय परिसरातील अनेकांच्या जीवाला आणि मालमत्तेला धोका निर्माण होतो तो वेगळाच. अर्थात, त्यांना सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) खाली हीही एक जबाबदारी आहे, हे पटल्याने त्यांनी लगेचच कार्यवाहीचे निर्देश दिले, पण हे अपवादात्मक. बऱ्याच ठिकाणी अजूनही सुरक्षेबाबतचा दृष्टिकोन ‘खर्च टाळण्याचा’ असतो.

सार्वजनिक सुरक्षेचेही हेच चित्र आहे. रेल्वे अपघात, रस्ते अपघात किंवा शालेय बसच्या दुर्घटना यामध्येही तीच वृत्ती दिसते. एकदा अंबरनाथ स्थानकात रुळ ओलांडताना अपंग झालेल्या व्यक्तीला प्रत्यक्ष समोर बसवूनही प्रवासी रुळ ओलांडत होते. पोलिसांना मग बडगा उचलावा लागला. आपण असा आपला जीव धोक्यात का घालतो? वाहनचालक मोबाइलवर बोलत गाडी चालवतात, हेल्मेट घालत नाहीत, वेगाने गाडी चालवतात, रस्ते सुरक्षा नियम पायदळी तुडवले जातात. यातून काय दिसते?- ‘अपघात दुसऱ्यालाच होतो’ असा एक आंधळा आत्मविश्वास असतो का? ही मानसिकता बदलायला हवी. ‘माझं काही होणार नाही’, ‘हे आपल्याला लागू होत नाही’, ‘सल्ला म्हणजे केवळ सूचना, बंधन नाही’ – ही मानसिकता फक्त चुकीची नाही, तर धोकादायक, प्राणघातकही ठरू शकते. अपघाताच्या बाबतीत क्षणात ओढावते ते संकट, नंतर उभे राहतात त्याचे परिणाम हे लक्षात घेतले पाहिजे.

मात्र काही संस्था आदर्शही आहेत. सर्व अस्थापने, संस्था, उद्योग सुरक्षेकडे दुर्लक्षच करतात असेही नाही. काही जाणीवपूर्वक आणि अतिशय काटेकोरपणे काम करतात. तिथे सुरक्षा अधिकाऱ्याला सन्मानाचे स्थान असते, निर्णयप्रक्रियेत त्याला सहभागी करून घेतले जाते आणि स्वतंत्र जबाबदारी दिली जाते. अलीकडेच वाचले की, टाटा समूहाच्या चेअरमननी वार्षिक सर्वसाधारण सभेत स्पष्टपणे जाहीर केले की, ‘सुरक्षा हा यापुढे फक्त एक विभाग न राहता, प्रत्येक प्रक्रियेचा, अग्रक्रमाने, अविभाज्य भाग असेल.’ त्यांनी संपूर्ण व्यवस्थापनाला सर्व पातळ्यांवर सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. ही घोषणा एक आदेश नसून सांस्कृतिक परिवर्तनाची सुरुवात आहे. टाटा समूहाकडे अनेक संस्था आदर्श म्हणून पाहतात. त्यांच्या या पावलामुळे केवळ त्यांच्या उद्योगगटातच नव्हे, तर देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही सुरक्षेच्या दृष्टीकोनात सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे.

१९८७ मध्ये अल्कोआ (ॲल्युमिनियम कंपनी ऑफ अमेरिका) कंपनीचे सीईओ म्हणून पहिल्या वार्षिक सभेत पॉल ओ’नील यांनी फक्त कामगारांच्या सुरक्षिततेवर भाष्य केले — नफा, खर्च किंवा उत्पादन याचा उल्लेखही केला नाही. त्यांनी ‘झिरो इन्ज्युरी’ हे ध्येय जाहीर केले. सुरुवातीला गुंतवणूकदारांना धक्का बसला, पण पुढे कंपनीची कामगिरी आणि नफा दोन्ही प्रचंड वाढले. ही घटना ‘द पॉवर ऑफ हॅबिट’ या चार्ल्स डुहिग लिखित पुस्तकात सविस्तर दिली आहे.

निष्कर्ष: सुरक्षा ही फक्त निवड नव्हे, ती सामूहिक जबाबदारी आहे. आपले जीवन अमूल्य आहे, याची आपल्याला कल्पना असते. पण त्या अमूल्यतेचे रक्षण करण्यासाठी आपण सावधगिरी बाळगतो का, नियमांचे पालन हे केवळ बंधन म्हणून नव्हे, तर जीवनरक्षक पाऊल म्हणून स्वीकारतो का? बहुतेकदा जिथे अपघात होतात, तिथे आधी दिलेल्या अनेक इशाऱ्यांकडे, सूचना, शिफारशी, निरीक्षणांकडे दुर्लक्ष केलेले दिसते. या सूचना वाचल्याच जात नाहीत. वाचल्या तरी त्या अंमलात आणल्या जात नाहीत.

प्रत्येक शिफारस ही एक ‘इशारा’ असते. ती ऐकायची की दुर्लक्ष करायचे हा निवडीचा प्रश्न नसून, जबाबदारीचा मुद्दा आहे. आपण सारे मिळून जर सुरक्षा ही संस्कृती म्हणून स्वीकारली, तर समाज अपघातांपासून बऱ्याच प्रमाणात सुरक्षित राहू शकेल.

‘An ounce of prevention is worth a pound of cure.’ हे बेंजामिन फ्रँकलिन यांचे म्हणणे प्रत्येकाने गांभीर्याने घेणे अत्यंत गरजेचे आहे.

(लेखक औद्योगिक सुरक्षा सल्लागार आहेत.)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

raghman011@gmail.com