दिलीप पाडगावकर स्मृती व्याख्यान कार्यक्रमात ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेल्या भाषणाचा संपादित सारांश

मला पत्रकारिता करण्यासाठी पुणे सोडावे लागले, ही गोष्ट वेगळी, पण माझी पत्रकारितेची कारकीर्द पुण्यातूनच सुरू झाली. या भाषणाच्या निमित्ताने मला मागे वळून पाहण्याची आणि गोष्टी सांगता येणाऱ्या अतिशय सुंदर व्यवसायाचे आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळाली. दररोज नवीन चूक करण्याची परवानगी असणारा हा एकमेव व्यवसाय आहे. आम्ही केवळ आजसाठी काम करत असल्याने रोजचा दिवस आमच्यासाठी नवीन असतो. त्यामुळे समकालीन माध्यमे निर्णायक वळणावर कशी आली आहेत, या महत्त्वाच्या प्रश्नाकडे माझे लक्ष वेधणे आवश्यक ठरते.

sharad pawar wrote letter to cm eknath shinde
Sharad Pawar : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत शरद पवारांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र; भेटीची वेळ मागत म्हणाले…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
man meet on social media raped girl in pune
पुणे : समाज माध्यमातून झालेल्या ओळखीतून तरुणीवर बलात्कार
women s safety top national priority pm modi at lakhpati didi sammelan
महिला सुरक्षेला प्राधान्य; जळगावमधील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, अत्याचार रोखण्यासाठी केंद्राकडून सहकार्याची ग्वाही
jitendra awhad replied to raj thackeray
Jitendra Awhad : “राज ठाकरे फक्त बडबड करतात, त्यांना…”; शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर
Badlapur, Vaman Mhatre, Shiv Sena, abuse allegations, Adarsh School, female journalist,
मला बदनाम करण्यासाठी राजकीय स्टंटबाजी, शिवसेना बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांचे स्पष्टीकरण
women officer from salary provident fund team caught while accepting bribes
लाच स्वीकारताना वेतन भविष्य निर्वाह निधी पथकची महिला अधिकारी जाळ्यात

प्रत्येक पिढीप्रमाणे माझ्या पिढीचा भूतकाळ आणि वर्तमानाशी संघर्ष आहे. भूतकाळ भव्य होता यात काहीच शंका नाही आणि भविष्य हे अनिश्चित आहे, यातच त्याची गंमत आहे. तंत्रज्ञानातील प्रगती आणि मोबाइलसारखे छोटेखानी उपकरण दिवसेंदिवस अधिकाधिक स्मार्ट होत असताना बातमी ही केवळ बातमीदाराची मक्तेदारी राहिली नाही.

तेल हे केवळ तेलियांकडे ठेवावे यापेक्षा ते अधिक महत्त्वाचे आहे, असे हेन्री किसिंजर यांचे प्रसिद्ध विधान आहे. याचप्रकारे राजकारण हे राजकारण्यांसाठी मोकळे सोडू नये एवढे महत्त्वाचे आहे, असे म्हणतात. बातमीचे लोकशाहीकरण ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. बातमीदारांच्या कह्यातून बातमी बाहेर पडून ऑटो-पायलट मोडवर गेली आहे. बातमी ही आता मुक्त आहे. कोणताही वेळ न दवडता ती एका खंडातून दुसऱ्या खंडात प्रवास करते. त्यातून दोन मुद्दे उपस्थित होतात.

हेही वाचा : हे तर लोकांच्या हानीचे लाभार्थी!

५ डब्ल्यू आणि १ एच (व्हॉट, व्हेन, व्हेअर, हूम, हू आणि हाऊ) हे बातमीचे पारंपरिक स्वरूप आणि व्याख्या आता कालबाह्य झाली आहे. आताच्या परिस्थितीत बातमीच्या व्याख्येत आणखी २ डब्ल्यूंचा समावेश करावा लागेल. कधी, काय, कुठे, कुणाला, का आणि कसे हे भूतकाळात पत्रकारितेची व्याख्या ठरत होते. आता तशी स्थिती राहिली नाही. त्यामुळे ही व्याख्या समकालीन करण्यासाठी त्यात आणखी २ डब्ल्यू जोडावे लागतील. आताच का आणि पुढे काय (व्हाय नाऊ व व्हॉट नेक्स्ट) हे ते दोन डब्ल्यू आहेत.

हे अतिशय महत्त्वाचे दोन प्रश्न पत्रकाराला आजच्या काळात त्याच्या व्यवसायाशी सुसंगत ठेवण्याची परीक्षा ठरतील. हे एवढ्यापुरते मर्यादित नाही. व्यवसायही कालसुसंगत ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. प्रामाणिक, सत्य आणि विनातडजोड पत्रकारितेला देशद्रोही म्हणून हिणवले जात असल्याच्या काळात हे आणखी आवश्यक ठरते. भूतकाळात अशा गोष्टी घडल्या नाहीत असे नाही. आपल्या समाजात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तिगत हक्क यांना पवित्र मानले गेले नाही. स्वतंत्र आवाज दाबून टाकणे, हे आपले नेहमीच वैशिष्ट्य राहिले आहे.

मात्र, आता काळाचा फरक आहे. समाजालाच माध्यमांच्या विरोधात उभे करण्यात आले आहे. आणीबाणी आणि आधीच्या काळात शोषित आणि शोषकांच्या लढ्यात माध्यमे प्रमुख साधन होती. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ती महत्त्वाचा घटक होती. आता ती देशाच्या प्रगतीत अडसर ठरणारी मानली जात आहेत. माध्यमांशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही, यावर समाजातील एका घटकाचा विश्वास नाही. उच्च पदावरील एखादा व्यक्ती माध्यमे आणि पत्रकारांना प्रेस्टिट्यूट/लिब्राडू अशी विशेषणे वापरतो, त्यावेळी हा समाजघटक आनंद व्यक्त करतो. सर्वांत महत्त्वाचे असे उदारमतवाद हे मूल्य जेव्हा शाप ठरवले जाते, त्यावेळी माध्यमांचे खरे काम सुरू होते.

हेही वाचा : सायबर सुरक्षेसाठी क्षमतावाढ हवी! ३० नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय संगणक सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो, त्यानिमित्त..

त्यामुळे या संदर्भात आताच का आणि पुढे काय हे दोन प्रश्न महत्त्वाचे ठरतात. त्यांची उत्तरे द्यायची असतील तर पत्रकारांनी रंजन करणे थांबवायला हवे आणि माध्यमांचे रंजनीकरण थांबवायला हवे. माध्यमे ही रंजन करण्यासाठी नाहीत. आपण इथे व्यवस्थेला प्रश्न विचारायला आणि कोणीही सत्ताधारी असेल तरी त्याच्या नाकर्तेपणाला आव्हान देण्यासाठी आहोत. प्रसिद्ध अशा ब्रिटिश बँड क्वीन्सचा १९७७ मध्ये ‘न्यूज ऑफ द वर्ल्ड’ अल्बम आला होता. त्यात ‘वी विल रॉक यू’ हे गाणे होते. त्यामुळे काळ कोणताही असो माध्यमांनी ‘वी विल रॉक यू’ अशीच भूमिका घ्यायला हवी.

माध्यमांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देताना अथवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास हरवलेला गंभीरपणा पुन्हा आणण्यासाठी दोन गोष्टी कराव्या लागतील, असे मला प्रामाणिकपणे वाटते. पहिली गोष्ट म्हणजे राजकारणाची आसक्ती सोडायला हवी. पाडगावकरांनी माध्यमांतील राजकीय पक्षनिहाय जबाबदारी बातमीदारांकडे सोपविण्याची पद्धत बंद केली. कारण संबंधित पक्ष पाहणारा बातमीदार हा कार्यालयात त्या पक्षाचा प्रवक्ता बनत असे. ‘लोकसत्ता’नेही पाडगावकरांनी केले तेच केले…

दुसरी गोष्ट म्हणजे, दोन महत्त्वाच्या आव्हानांकडे गंभीरपणे पाहण्यास सुरुवात करायला हवी. तापमान बदल आणि कृत्रिम प्रज्ञा (एआय).

तापमान बदलामुळे भविष्यात घडणाऱ्या गोष्टी या कोविडपेक्षा कितीतरी पटीने भयंकर असतील. भारताने २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचे जाहीर केले आहे. हे प्रत्यक्षात शक्य आहे का? याबद्दल माध्यमांनी कधी प्रश्न विचारले आहेत का? आपला देश ८५ टक्के जीवाश्म इंधन आयात करतो आणि किमान पुढील दशकभर तरी तो त्यावर अवलंबून असणार आहे. मग आपण ४७ वर्षांत कार्बन उत्सर्जन शून्यावर कसे आणणार? आपली खनिज तेलाची गरज दररोज ५० लाख पिंप आहे. एका दिवसात ८६ हजार ४०० सेकंद असतात. म्हणजेच एका सेकंदाला आपल्याला ५८ पिंपे खनिज तेल लागते. बातमीदार देशाची सज्जता तपासण्यास तयार आहेत का? परंतु, खरा प्रश्न हा आहे की, आपण आव्हानांबाबत खरेच गंभीर आहोत का? याबद्दल जागरूकता निर्माण करणे हे माध्यमांचे काम नाही का?

दुसरे मोठे आव्हान म्हणजे एआय. एआयमुळे काय घडू शकते, याचे अभिनेत्री रश्मिका मंदाना प्रकरण एक झलक होते. मानवाची जागा एआय ज्या पद्धतीने घेत आहे ते हानिकारक आहे. माध्यमांनी याबद्दल अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. कारण एआयमुळे सर्वांत मोठी उलथापालथ माध्यम क्षेत्रात होईल.

हेही वाचा : महात्मा फुले आजही शेती, बेरोजगारी, आरक्षणाचे प्रश्न सोडवू शकतात!

सर्वांत मोठा धोका रोजगार जाण्याचा असला तरी एआयचा शस्त्र म्हणून वापर विध्वंसकारी ठरेल. विस्तारवादी, शक्तिशाली आणि सर्वव्यापी सरकारे एआयचा शस्त्र म्हणून वापर करू शकतील. हाच प्रकार बड्या कंपन्यांबाबत होऊ शकतो. बड्या कंपन्या सरकारशी संगनमत करून एआयचे व्यवस्थापन करणार असतील तर सध्या वाटतो त्यापेक्षा खूप मोठा धोका आहे.

माध्यमे आगामी आव्हानांना समजून घेण्यास तयार आहेत का? माध्यमांनी या आव्हानांकडे डोळे उघडे ठेवून पाहण्याची आवश्यकता का आहे? युवाल नोआ हरारी यांचे प्रसिद्ध वचन असे आहे की, कृत्रिम प्रज्ञा हा खरा धोका नसून, मानवाचा मूर्खपणा त्यापेक्षा धोकादायक आहे. आयुष्यातील प्रत्येक पावलावरील मूर्खतेला प्रश्न विचारणे हे माध्यमांचे काम आहे. समाजाला त्याच्या झोपेतून जागे करण्याची जबाबदारी माध्यमांची आहे. ही जबाबदारी कार्यक्षमपणे पार पाडण्यासाठी आधी माध्यमांना जागे होऊन वास्तवाचा सामना करावा लागेल. ते हे करतील का?
माध्यमे हे करू शकणार नाहीत, असे मानण्याचे कोणतेही कारण नाही. वस्तुत: समाजच माध्यमांना वळण लावत असतो. समाजाच्या लायकीप्रमाणे त्याला माध्यमे मिळतात. पारंपरिक माध्यमे अपयशी होत असतील तर नवीन माध्यमांचा उदय होईल. यातून पारंपरिक माध्यमे पुन्हा योग्य मार्गावर येतील. माझे अनेक सहकारी पत्रकार गंभीरपणे त्यांचे काम करीत आहेत. त्यामुळे समकालीन माध्यमे निर्णायक वळणावर आहेत याची मला खात्री आहे. ही माध्यमे योग्य मार्ग निवडतील आणि भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी ती स्वत:ला आकार देतील. मला हिंदीतील प्रसिद्ध कवी दुष्यंतकुमार यांच्या कवितेतील काही ओळी उद्धृत करण्याची इच्छा होते…
कौन कहता है के आसमान मे सुराख नही होता,
एक पत्थर तो तबियतसे उछालो यारो…
मला नक्कीच खात्री आहे की, पुढील पिढीतील माध्यमे या कवीचा सल्ला मनावर घेतील. व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे कर्तव्य ते करीत राहतील.