अमेरिकेवरला ‘चिनी फुगा’ फुटला, पण आणखीच फुगला... | US shoots down Chinese spy balloon and politics, foreign relations | Loksatta

अमेरिकेवरला ‘चिनी फुगा’ फुटला, पण आणखीच फुगला…

अमेरिकेने क्षेपणास्त्र-मारा करून पाडलेल्या चिनी ‘बलून’मुळे दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट यामुळे रद्द झाली आणि संबंध आणखीच बिघडले… एवढे काय झाले?

US, Chinese spy balloon, politics, foreign relations
अमेरिकेवरला ‘चिनी फुगा’ फुटला, पण आणखीच फुगला… ( Image -लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

ओंकार सांगळे

अमेरिकेच्या आकाशात गुरुवारपासून एक अनोळखी, परकी वस्तू दिसू लागली… तो ‘बलून’ होता… १०० वर्षांपूर्वी हवाई प्रवासासाठी साहसी लोकच वापरायचे तसा मोठा फुगा- हेलियम वायूवर आणि हल्ली सौर ऊर्जेवर चालणारा. अगदी १९६० च्या दशकापर्यंत या महा-फुग्यांचा वापर हवामान अभ्यासासाठी होत असे. आता ‘ड्रोन’च्या युगान बलूनसारखी वस्तू दुर्मीळच, पण तरीही तो बलून अमेरिकी छायाचित्रकारांना आधी दिसला, मग सरकारी यंत्रणांकडे ही माहिती पोहोचल्यावर खातरजमा झाली आणि हा महा-फुगा साधासुधा नसून चीनने सोडलेला आहे, हेही अमेरिकेच्या लक्षात आले! मग अमेरिकेती, विशेषत: रिपब्लिकन- धार्जिण्या माध्यमांनी हलकल्लोळ सुरू केला… ‘हा हेरगिरी करण्याच्या उद्देशाने सोडला गेलेला फुगा असावा’ असेच साऱ्यांचे म्हणणे, त्याला थेट दुजोरा सरकारकडून कधी मिळतो, याचीच वाट आता सारेजण पाहू लागले.

तोवर, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांची ठरलेली चीन-भेट रद्द झाल्याचेही तातडीने घोषित करण्यात आले. बलून दिसल्यानंतर उद्भवलेली स्थिती पाहाता ही भेट आम्ही बेमुदत स्थगित करतो आहोत, परिस्थिती निवळताच भेटीची नवी तारीख जाहीर होईल, असे खुद्द ब्लिंकेन यांनीच चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांना दूरध्वनीवर सांगितल्याचा अधिकृत तपशील अमेरिकी परराष्ट्र खात्याने दिला. मात्र हा निव्वळ साधा हवामान-अभ्यास करणारा बलून असू शकतो, त्यात हेरगिरी वगैरे काही नसावे, असा निर्वाळा ‘टाइम’ साप्ताहिकाने काही तज्ज्ञांच्या हवाल्याने दिला. अशा प्रकारचे चिनी बलून पूर्ण फुगल्यावर ९० फुटांपर्यंत व्यासाचे होतातच, त्यात नवे काही नाही, असे हे तज्ज्ञ ‘टाइम’ला सांगत होते. पण हा फुगा ‘२०० फूट उंच आणि तेवढ्याच व्यासाचा आहे,’ अशीही माहिती ‘बीबीसी’ आदी वाहिन्यांवरून दिली जात होती. फुग्याचे आता करणार काय, म्हणून पत्रकारांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना गाठले… शनिवारी कॅम्प डेव्हिड तळावर जाता-जाता, ‘या बलूनवर आजच मारा करून तो फोडला जाईल’ अशी माहिती राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी प्रसारमाध्यमांना दिली. ‘फक्त समुद्रातील सुरक्षित जागेची वाट आमची विमाने पाहाताहेत, तशी जागा मिळाल्यावर तो बलून फोडण्यास आमची विमाने सज्जच आहेत’ असे बायडेन सांगत होते. त्यामुळे ‘२०० फूट व्यासाच्या’ या महाकाय फुग्याचे गूढ आणखीच वाढले होते.

… या फुग्यातली हवा आता निघून गेली आहे, तशीच आतापर्यंत अमेरिकेच्या ताठर भूमिकेतलीही हवा निघून गेलेली दिसते, ती कशी?

अर्थात, अमेरिकेने चीनचा फुगा फोडण्याचे काम फत्ते केलेच… शनिवारी दुपारी अमेरिकी वेळेनुसार दोन वाजून ३९ मिनिटांनी- म्हणजे भारतीय वेळेनुसार रविवारच्या पहाटे- साउथ कॅरोलायनाच्या किनाऱ्यापासून सहा मैल अंतरावरील समुद्रात, जमिनीपासून ६० हजार ते ६५ हजार फुटांवर उडणारा हा चिनी फुगा फोडला गेला. अमेरिकेची दोन सुसज्ज ‘एफ-२२’ लढाऊ विमाने या कामगिरीवर गेली होती, दोन्ही विमानांकडे खालून वर मारा करू शकणारी ‘साइडवाइन्डर’ क्षेपणास्त्रे होती… ५८ हजार फुटांवरून उडणाऱ्या एका अमेरिकी ‘एफ-२२’ने या बलूनचा अचूक वेध घेतला आणि काही मिनिटांत ही विमाने आपापल्या तळांवर परतलीसुद्धा.

आता त्या बलूनचे अवशेष समुद्रातून शोधून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत समुद्रातील दीड चौरस किलोमीटरचा टापू शोधून झाला आहे, असे आणखी टापू शोधले जातील… मग या बलूनवरील यंत्रे नेमक्या कोणत्या प्रकारची माहिती जमा करत होती, हेही उघड केले जाईल. थोडक्यात, या बलूनचा गवगवा होऊ लागला तेव्हापासूनच बायडेन प्रशासनानेसुद्धा या संकटात संधी शोधली आणि ‘आम्ही चीनला कसे चोख प्रत्युत्तर देतो पाहा’ हे दाखवण्याची कामगिरी अमेरिकी माध्यमांच्या साक्षीने सुरू केली, एवढे नक्की. जगभरातल्याच माध्यमांचे लक्ष या प्रकरणाकडे असताना आता तर, अमेरिकेचे पक्षीय राजकारणही बलूनमुळे तापते आहे.

चिनी बलूनने अमेरिकी हद्दीत धुसखोरीची हिंमत केलीच कशी, असा बायडेन-विरोघकांचा – अर्थात रिपब्लिकनांचा सवाल आहे. त्यावर , वाॅशिंग्टहून प्रकाशित होणाऱ्या ‘द हिल’ या पत्राने, डोनालिड ट्रम्प यांच्या कार्यकाळातही तब्बल तीनदा बलून दिसला होता, परंतु तेव्हा गाजावाजा न करता प्रकरण दडपण्यात आले, असे वृत्त कोणत्याही नेमक्या तारखांचा इल्लेथ न करता दिले आहे.

बलून-कांडाचा अंतर्गत राजकारणाचा रंग असा चढत असताना, पण याचा आंतरराष्ट्रीय राजकारणातील फायदा आता बायडेन प्रशासनाला हवा आहे, असे दिसते. आमच्याकडील टेहळणी यंत्रणा अत्यंत अद्ययावत असल्यानेच, आधी न सापडलेल्या बलूनसारख्या गोष्टींवर आता आम्ही नियंत्रण आणू शकलो आहोत’ अशा शब्दांत जो बायडेन यांची प्रचार यंत्रणा, देशी आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही पातळ्यांवर बायडेन प्रशासनाची प्रतिमा उजळवू लागली आहे.

चीनचे डाफरणे!

चीनची या प्रकरणातली भूमिका सुरुवातीला थंड्या प्रतिसादाची होती. अमेरिकी अहवालांमुळेच आम्हाला कळू शकले की आमचा बलून तिथपर्यथ गेला, असा चीनचा पहिला खुलासा होता. हवामान अभ्यासासाठी असे बलून उपयोगी पडतातच, असे चीनमधील सरकारी वृत्तसंस्थांशी बोलणाऱ्या चिनी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र हा बलून कोठून सोडण्यात आला होता, तो कोणता अभ्यास करणार होता किंवा त्याचा अपेक्षित प्रवास किती दिवसांचा होता, यापैकी कशाचाही कोणताच तपशील चीनने पुरवलेला नाही किंवा “ आम्ही चौकशी करतो आहोत / करू” असेसुद्धा म्हटलेले नाही. उलट अमेरिकेवरच चीन डाफरू लागला… हा फुगा निव्वळ हवामान-अभ्यासासाठी होता, तो भरकटला हे खरे, पण अमेरिकेपर्यंत पोहोचल्याचे तुमच्या बातम्यांमुळेच आम्हाला कळले, तरीही तुम्ही आधी आमची मदत न घेता त्यावर मारा केलात, परराष्ट्रमंत्र्यांची भेटसुद्धा परस्पर तहकूब केलीत, हा राजनैतिक संकेतांना पायदळी तुडवण्याचाच प्रकार आहे- असा चीनचा चढा सूर.

आजही चीनने हा कांगावखोर सूर कायम ठेवला आहेच, शिवाय चीनमध्ये गुंतवणूक करू पाहणाऱ्या अमेरिकी कंपन्यांवर आता आणखी अटी घातल्या जातील, असेही घोषित केले आहे.

यातून स्पष्ट होते ते एवढेच की, ‘चीन… चीन…’ असा बागुलबोवा अमेरिकेसारख्या देशातही केला जातो, म्हणूनच एका बलूनमुळे अमेरिकी परराष्ट्र मंत्र्यांची चीन-भेट थांबवली जाते. अमेरिका आणि चीनमध्ये शीतयुद्ध होणारच नाही, असे छातीठोक सांगतानाच ‘चीन हा अमेरिकेच्या तुलनेने बराच लहान आहे’ असे सुचवणाऱ्या पाश्चात्त्य राजनैतिक-पंडितांनाही हा धक्काच आहे… कारण चीनचा फुगा पुरेसा फुगलेला असल्याचेच बलून प्रकरणातून दिसून आले आहे.

मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 16:27 IST
Next Story
केंद्रीय अर्थसंकल्प भारतीय गरिबांना सर्वोत्तम आरोग्यसेवा देऊ शकेल?