दक्षिण मुंबईच्या दोन किनाऱ्यांवरची ‘ताज’ आणि ‘ओबेरॉय’ ही पंचतारांकित हॉटेले असोत की हुतात्मा चौकातील ‘स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक’ (आता ‘झारा’) वा ‘हाँगकाँग बँके’च्या दमदार इमारती.. ओमानचा नवा राजवाडा असो की भारताच्या पंतप्रधानांनी प्रशंसामय भाषणानिशी उद्घाटन केलेला ‘अटल बोगदा’ .. या साऱ्या बांधकामांशी ज्या ‘शापूरजी पालनजी अॅण्ड कंपनी’चा संबंध आहे, तिचे आजीव अध्यक्ष असलेले पालनजी शापूरजी मेस्त्री २८ जून रोजी निवर्तले. सुमारे ५५ हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेची व्यवस्था वयाच्या नव्वदीत लावून मगच, ९३ व्या वर्षी ते गेले, तेव्हाही ‘टाटा समूहाचे सर्वात मोठे (१८.४ टक्के वाटा) एकल भागीदार’ ही त्यांची आणखी एक ओळख आवर्जून सर्वच माध्यमांनी सांगितली.
‘शापूरजी पालनजी कंपनी’ १५५ वर्षांची. १९२९ मध्ये पालनजी जन्मले, तोवर त्यांच्या आजोबांनी टाटांच्या अनेक कंपन्यांचे बांधकाम केले होते. चरित्रकारांचा निर्वाळा असा की, टाटांनी तेव्हा पैशांऐवजी कंपनीचे भागभांडवल या कंपनीच्या धुरीणांना दिले. पुढे पालनजींच्या वडिलांनीही टाटांचे भांडवल राखले, पण पालनजींनी टाटा कुटुंबातील अनेकांचा हिस्सा खरेदी करून टाटा समूहातील वाटा वाढवला. त्यामुळेच ‘फॅण्टम ऑफ द बॉम्बे हाऊस’ म्हणून पालनजींना ओळखले जाई. बॉम्बे हाऊस या टाटा मुख्यालयातून होणाऱ्या कोणत्या निर्णयावर पालनजींचा कसा ‘अदृश्य’ प्रभाव असेल याच्या चर्चाही रंगत. वास्तविक तेव्हाच्या काळात, या कथित प्रभावातून गैर असे काही फार घडले नव्हते. पण पालनजींचा टाटा समूहावरील प्रभाव कथितच राहिला आणि यातूनही उरले ते पालनजींचे ‘अदृश्य’ असणे. वाळकेश्वरला समुद्रकाठच्या प्रासादात ते राहात. कार्यालयही कुलाब्याला अपोलो बंदर भागात, पण त्याचे प्रवेशद्वार आडगल्लीत. ‘टाटा’मधील कुणा उच्चपदस्थांशी ते फार बोलले नाहीत आणि सार्वजनिक जीवनातही दिसले नाहीत. कंपनीने सामाजिक दायित्व निभावले, पण त्याचे श्रेय कधी पालनजींनी घेतले नाही. ‘एसीसी’ या टाटांच्या कंपनीची सूत्रे १९९० च्या दशकात त्यांनी हाती घेतली, तेव्हाच्या वार्षिक भागधारक सभांतील भाषणे वगळता व्यासपीठांवरही दिसले नाहीत. वास्तुरचनाकार हफीज कॉन्ट्रॅक्टर यांच्यासारख्या इन्यागिन्या मंडळींतच ऊठबस. टाटा खानदानातील नोएल टाटा हे त्यांचे जावई, ही सोयरीक असूनही पालनजींचे कनिष्ठ पुत्र सायरस यांना २०१६ मध्ये टाटा समूहाच्या सर्वोच्च पदावरून पायउतार व्हावेच लागले, त्या घटनामालिकेतून रतन टाटांची व्यवसायनिष्ठा जशी दिसली होती तशीच, तोवर निवृत्त झालेल्या पालनजींची नको तिथे आपला प्रभाव न वापरण्याची समजही दिसून आली होती. थोरले पुत्र शापूर यांच्या हाती मुख्य व्यवसाय सोपवून २०१२ साली ते निवृत्त झाले. मुलाखती वगैरेही फार न देता राहू लागले. २०१६ मध्ये त्यांनी ‘पद्मभूषण’ स्वीकारले, तेव्हा कुठे ते आर्यलडचे नागरिक असल्याचे लोकांना कळले!
ते नागरिकत्व त्यांनी २००३ पासूनच घेतले होते, ते पत्नी पॅट्सी या तिथल्या असल्यामुळे. जगभरच्या ७० देशांत ज्यांनी वाडवडिलांच्या व्यवसायाचा व्याप वाढवला, त्या पालनजींसाठी नागरिकत्व ही फार मोठी गोष्ट नव्हती. ‘मुगल-ए- आजम’ या चित्रपटात त्यांच्या वडिलांनी पैसा ओतल्यामुळे त्याची रिळे तसेच पटकथेवरील सर्व हक्क पालनजींना वारशाने मिळाले, त्या चित्रपटाचे रंगितीकरण आणि पुढे तर त्यावर आधारित नाटक यांसाठी निधी पुरवून पालनजींनी तो वारसा सांस्कृतिकदृष्टय़ा जिवंत ठेवला इतकेच. पण बाकी चित्रपट क्षेत्राशी त्यांचा संबंध नव्हताच.. मृत्यूनंतर त्यांच्यावर एखादी ‘ओटीटी चित्रपटमालिका’ मात्र निघू शकेल!