सीरिया हा एक प्राचीन आणि समृद्ध संस्कृती, सभ्यतेचा इतिहास असलेला देश आहे. सीरियाची राजधानी दमास्कस हे जगातल्या सतत वस्ती असलेल्या प्राचीन शहरांपैकी एक आहे. मात्र गेल्या अनेक वर्षापासून सीरियात भयंकर गृहयुद्ध सुरू झाले, हजारो निरपराधही त्यात मृत्युमुखी पडले आहेत आणि काही लाख लोकांनी सीरियातून पळून जाऊन इतर देशात आश्रय घेतला आहे. खुद्द सीरियाचे सर्वेसर्वा बशर अल-असद यांना गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सीरिया सोडून पळून जावे लागले. रशियाने त्यांना आश्रय दिला आहे. एकेकाळी अल कायदाचा कमांडर असलेला अहमद हुसेन अल-शरा उर्फ अबू मोहम्मद अल-जोलानी यांनी सत्ता काबीज केली आहे. त्यानंतर दमास्कसच्या प्रसिद्ध उम्मायद मशिदीतून त्यांनी अलीकडेच जाहीर केले : “आता सीरियाचे लोक खऱ्या अर्थाने देशाचे मालक झाले आहेत आणि संपूर्ण मध्यपूर्वेसाठी (पश्चिम आशियासाठी) नवीन इतिहास लिहिला गेला आहे.” – याच भाषणात सगळ्यांना समान संधीची त्यांनी हमी दिली. पण मार्च महिन्यात अल्पसंख्याक अलावाई समाजाच्या अनेक लोकांची लष्कराशी संबंधित हिंसक संघटनांनी हत्या केली. अगदी अलीकडे, अल्पसंख्याक ड्रुझ लोकांची बेदुईन समाजाच्या लोकांनी कट्टर सुन्नी जमातीच्या लोकांशी मिळून मोठ्या प्रमाणात हत्या केली. सीरियात शांतता निर्माण होण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाहीत. दुसरीकडे ड्रुझ लोकांना ‘वाचवण्यासाठी’ इस्रायल पुढे आला आहे! अर्थातच, गाझा पट्टीतले हल्ले न थांबवताच इस्रायली फौजा आता सिरियाकडे वळल्या आहेत.
इस्रायली हल्ल्यांनतंत सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी शनिवारी (१९ जुलै) घाईघाईने युद्धबंदी जाहीर केली. तरीदेखील बेदुईन (बदाऊन) आणि ड्रुझमध्ये सुवाईदा प्रांतात चकमकी सुरूच होत्या. आता (२१ जुलै) मात्र ते थांबले आहे. बेदुईन हल्लेखोरांनी सुवाईदा प्रांतातून माघार घेतली आहे. या प्रांतात ड्रुझ बहुसंख्याक आहेत. आताच्या संघर्षाची सुरुवात दमास्कसच्या दक्षिणेतून झाली. एका ड्रुझ धार्मिक गुरूने मोहम्मद पैगंबर यांचा कथित अपमान केल्याची एक ऑडिओ क्लिप समाज माध्यमात फिरत होती, हे निमित्त झाले. आपण अपमान केलेला नाही, असा तातडीचा खुलासा संबंधित धार्मिक गुरूने करूनही संघर्ष पेटलाच. बेदुईन कट्टरवाद्यांनी ड्रुझ लोकांवर हल्ले आरंभले. ड्रुझ लोकांनीही त्यांचा सशस्त्र प्रतिकार केला. दमास्कसच्या जवळ असलेल्या जरायना आणि सहनया ही गावे आणि मोठ्या संख्येने ड्रुझ राहत असलेल्या सुवाईदा भागात हिंसा पसरली. ड्रुझ समाजाचे नेते शेख हिकमत अल-हिजरी हे या हल्ल्यांना ‘नरसंहाराची मोहीम’ संबोधून शांततेचे आवाहन करत होते. पण संघर्ष पेटलाच.
अल-जोलानी यांनी राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर ड्रुझ, अलावाई, ख्रिस्ती व अन्य अल्पसंख्याक समाजाने आपल्या धार्मिक आणि राजकीय अधिकारांचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी केलेली आहे. त्यावर सीरियाच्या या नवीन सत्ताधाऱ्यांनी अल्पसंख्यांकाच्या अधिकारांचे संरक्षण केले जाईल, असे आश्वासन दिले होते. पण ते आश्वासन पोकळच ठरले आहे. सिरियातील अलावाई पंथीय समाज हा प्रामुख्याने समुद्रकिनारी राहतो, त्यांच्या लटाकिया शहरावर मार्च महिन्यात हल्ले करण्यात आले. त्यात १५०० हून अधिक स्त्रीपुरुष मारले गेले. बशर अल-असद अलावाई आहेत आणि हा समाज बऱ्यापैकी श्रीमंत आहे. अलावाई किंवा अलावी हे शिया आहेत आणि सीरियात सुन्नी मुस्लिम बहुसंख्याक आहेत. सीरियात असद घराण्याची ५० वर्षाहून अधिक काळ सत्ता होती. त्या काळात अलावाई समाजाचे लोक महत्त्वाच्या राजकीय व लष्करी पदांवर होते.
अलवाईंच्या नंतर आता ड्रुझ समाजाला लक्ष करण्यात येत आहे. या भागात १३ ते १८ जुलै दरम्यान झालेल्या संघर्षात सात बालके, १० महिला, माध्यमांशी संबंधित दोन जणांसह एकूण ४२६ जण मारले गेले. ड्रुझ हा अल्पसंख्याक संप्रदाय सीरिया, लेबेनोन, जोर्डन आणि इस्रायल मध्ये पसरलेला आहे. त्यांचे मूळ इस्लाम मध्ये आहे; पण इतर धर्मांच्या विचारातून देखील बऱ्याच गोष्टी ड्रुझ पंथाने घेतल्या आहेत. अनेक शतकातून विकसित झालेला त्यांचा एक विचार आहे. त्यांच्यासाठी मोझेस यांचे सासरे जेथरो आदरणीय आहेत. जेथरो ‘झाकलेले’ प्रेषित असल्याचे ड्रुझ मानतात. सीरियात अंदाजे सात लाख ड्रुझ लोक राहतात. इस्रायलमध्ये ड्रुझ पंथीयांची लोकसंख्या सुमारे दीड लाख आहे, त्यापैकी २०००० हून अधिकजण इस्रायलच्या ताब्यात असलेल्या गोलान टेकड्यांच्या भागात राहतात. सीरियाशी १९६७ मध्ये झालेल्या युद्धात सामरिक महत्त्व असलेल्या गोलन टेकड्यांवर इस्रायलने ताबा मिळवला होता आणि १९८१ पासून हा भाग इस्रायलच्या प्रशासकीय नकाशातही आला. आंतरराष्ट्रीय समुदाय आजही गोलान टेकड्यांना ‘इस्रायलच्या ताब्यात असलेला सीरियाचा भाग’ मानत असला, तरी अमेरिकेने मात्र त्याला मान्यता दिली आहे.
सीरियातील ड्रुझ लोकांवर करण्यात आलेल्या हल्ल्याविरोधात, त्यांच्या मदतीला गोलान टेकड्यांच्या भागातील अनेक ड्रुझ सरहद ओलांडून सिरीयामध्ये गेले होते. अनेक तरुण मुले तर पहिल्यांदा त्यांच्या सीरियातील नातेवाईकांना भेटली. इस्रायलने ‘ड्रुझ लोकांच्या संरक्षणासाठी’ सीरियावर हल्ले केले. इस्रायली हल्ले १६ जुलै रोजी थेट सीरियाची राजधानी दमास्कस येथे, राष्ट्राध्यक्षांच्या घरावर आणि संरक्षण मंत्रालयावर झाले. यात ड्रुझ लोकांविषयीच्या कथित कळवळ्यापेक्षा, सीरियाला धडा शिकवण्याची संधी इस्रायलसाठी महत्त्वाची होती, असे पश्चिम आशियातील काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इस्रायलने यापूर्वीही अनेकदा सीरियावर हल्ले केले आहेत. जोलानी सरकार आल्यावर गेल्या सात महिन्यांत इस्रायलने सीरियावर ९८७ लहानमोठे हल्ले केले आहेत आणि सीरियाच्या १८० चौरस किलोमीटर जमिनीवर ताबा मिळवला आहे. असद सत्तेतून गेल्यानंतर इस्रायलच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
ड्रुझ समाजाच्या संरक्षणासाठी इस्रायल सरकारवर देशांतर्गत दबावही आहे. ड्रुझ पंथीय तरुण इस्रायलच्या लष्करात नियमित सेवा देतात आणि यहुदी-ड्रुझ लोकांमध्ये चांगले संबंधही आहेत. सीरियाला कमकुवत करण्याचे इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांचे धोरण तर प्रथमपासूनच आहे. असद यांच्या काळात सीरिया नेहमी इराण सोबत अचे. इराणवर अवलंबून असलेल्या लेबनॉनमधील हेझबोल्ला संघटनेचे सशस्त्र बंडखोर सीरियाच्या मदतीला नेहमीच धावून येत. मात्र गेल्या पावणेदोन वर्षांत, सात ऑक्टोबर २०२३ ला हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने प्रामुख्याने गाझा पट्टीवर केलेल्या आक्रमणात, जवळपास ७० हजार पॅलेस्टीनी मारले गेले; तसेच याच काळात इस्रायलने लेबेनोनवर हल्ले करून हेझबोल्ला संघटनेलाही कमकुवत केले. गेल्या वर्षाच्या अखेरीस सीरियात अल-जोलानीने सत्ता काबीज केली. हेझबोल्ला वर्तमान सीरियन सरकारला मदत करण्याची शक्यता नाही आणि मदत करण्याची त्याची स्थितीसुद्धा नाही. गाझा येथील हत्याकांडाच्या विरोधात जगभर नेतान्याहू यांचा निषेध होत असतानाच, सीरियाला कमकुवत करण्याची ही ‘उत्तम’ संधी नेतान्याहू यांना मिळाली आहे.
असद यांची सत्ता गेल्याने सर्वात जास्त आनंद अमेरिकेला झाला असावा. अगदी २०११ मधील ‘अरब स्प्रिंग’ पासूनच असद- विरोधकांना अमेरिका मदत करत आली आहे. त्यामुळेच, सीरियात उलथापालथ होताच जोलानी यांना भेटण्यासाठी अमेरिकेचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांना दमास्कसला पाठवले. जोलानी यांनी पाश्चात्त्य देशांना सीरियावरील निर्बंध उठवण्याची विनंती केली. जोलानींच्या ‘हयात तहरीर अल-शाम’च्या नेत्यांशी आणि अमेरिकन अधिकाऱ्यांची ती पहिली औपचारिक बैठक होती. वास्तविक याच ‘हयात’ला २०१८ मध्ये अमेरिकने दहशतवादी संघटनांच्या यादीत टाकले होते. पण आता बदललेल्या परिस्थितीत अमेरिकेने काही आठवडयांपूर्वीच, ती दहशतवादी नसल्याचे जाहीर केले.
मे महिन्यात सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे २५ वर्षानंतर अमेरिका आणि सीरियाचे प्रमुख पहिल्यांदा भेटले. रियाध येथे ट्रम्प यांनी आपण सीरियावरील निर्बंध हटवणार, अशी घोषणा केली. त्यानंतर ‘गल्फ कॉ-ओपरेशन कौन्सिल’च्या बैठकीत ट्रम्प यांनी, ‘येथे जमलेल्या सर्व माननीय नेत्यांच्या मदतीने आम्ही सीरियाच्या नवीन सरकारशी संबंध सुधारण्याचा विचार करत आहोत.’ अशी ग्वाही दिली. सीरियात परत गेल्यानंतर जोलानी यांनी निर्बंध उठवण्याचा ट्रम्पचा निर्णय ‘निर्भय’ आणि ‘हिंमतवान’ असल्याची साखरपेरणी केली. मात्र त्याचवेळी त्यांनी कोणाचेही नाव न घेता हिकमत अल-हिजरी व अन्य काही ड्रुझ नेत्यांकडे इशारा करता म्हटले होते की ‘त्या लोकांनी आमच्या सरकारला विरोध केला आहे आणि ते इस्रायलच्या जवळ आहेत’.
अमेरिका सीरियात आजही सक्रिय आहे. तुर्कीये येथील अमेरिकेचे राजदूत थोमस बराक यांनी शनिवारी सांगितले की इस्रायल आणि सीरिया युद्धबंदीसाठी सहमत झाले आहेत आणि जोलानी समर्थक तुर्कीयेचा त्याला पाठिंबा आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी ड्रुझबहुल परिसरांत जाऊन कट्टर इस्लामींना पायबंद घालण्याची जबाबदारी आता सीरियाच्या लष्कराची आहे, अशी तंबी दिली. एकंदरीत, सीरियात अंतर्गत युद्धबंदी झाली आहे… पण ती किती दिवस टिकेल, हे कुणालाच सांगता येणार नाही अशी स्थिती आहे!
लेखक ज्येष्ठ पत्रकार व मानवी हक्क अभ्यासक आहेत. jatindesai123@gmail.com
((समाप्त))