डॉ. अनिल कुलकर्णी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (एसएससी बोर्डाने) यंदा दहावी- बारावीच्या परीक्षांसाठी कडक नियमावली जाहीर केली आहे. परीक्षेतील गैरप्रकार वरचेवर वाढत आहेत, त्यामुळे या उपाययोजनांचे स्वागतच होईल. पण जवळपासचे झेरॉक्स बंद करणे, भरारी पथके वाढवणे हे सर्व वरवरचे उपाय कॉपी रोखणार का? परीक्षा ऑनलाइन घ्या किंवा ऑफलाइन घ्या, विद्यार्थ्यांनी त्यात अनेक पळवाटा शोधून काढल्या आहेत. कॉपी करण्याची भ्रष्ट परंपरा वृद्धिंगत होत आहे. काॅपी नियंत्रणात आहे की नाही याचे उत्तर शाळेच्या कंपाउंड वॉल व टॉयलेट तपासल्यास आपोआपच मिळेल. यावर्षीही कॉपी च्या बातम्या व कंपाउंड वॉल वरून चढून कॉप्या देणाऱ्यांचे फोटो येऊ शकतात… या सर्वांचा विचार सर्वंकषपणे कसा करणार? शिक्षण म्हणजे अपेक्षित वर्तन बदल, पण तो झालाच नाही, हे यामागचे मूळ कारण.
परीक्षा आम्हाला काय देते? ज्ञान नाही तर माहिती तपासते आणि वरच्या वर्गात जाण्याची संधी देते. सध्या निकाल ९०% च्या वर लागत आहेत, ही सूज आहे की बाळसे ? मूल्यमापनाचा साचा वर्षानुवर्षे तोच आहे. मूल्यमापन करणारी यंत्रणा काळानुसार सक्षम नाही. अभ्यासक्रम सातत्याने बदलत असतो, पाठ्यपुस्तके बदलतात, बदलत नाही ते फक्त मूल्यमान.
मूल्यमापनाची विश्वासार्हता कमी होत चालली आहे.मूल्यमापनाचाच नवीन आराखडा तयार करावा लागणार आहे. आहे त्या पद्धतीत, फेर मूल्यांकनाची मागणी वाढतेच आहे. शिकविणारे व शिकणारे यामध्ये समायोजन नाही, नुसते आयोजनच आहे. कागदावरच्या अध्यापनाची परीक्षा कागदावरच होत आहे. माणसाचे यश कागद ठरवत आहे, पण कौशल्ये कागदावर तग धरत नाहीत. लिहून दिलेल्या नोट्स नीट परीक्षेत लिहिल्या जात आहेत. फार थोडे शिकतात, बरेच पाहून लिहिण्याचे अनुकरण करतात.
‘फास्ट ट्रॅक कोर्ट’ होऊनही बलात्कार थांबत नाहीत तसेच उपाययोजना करूनही कॉपी थांबत नाही… याचा अर्थ शिक्षण प्रक्रियेच्या आदान-प्रदानशी आहे. कॉपी करणारे करत आहेत, तपासणारे साक्ष नाही म्हणून गुण देत आहेत व भ्रष्ट निकालाची परंपरा चालू आहे, अजून कसा डोलारा कोसळत नाही याचीच वाट पाहणे चालू आहे. कॉपीची वाळवी हळूहळू सर्व जीवन पोखरेल याचीच भीती वाटत आहे. अध्ययन-अध्यापन यांच्याशी संबंधित प्रश्नांपेक्षाही गंभीर प्रश्न परीक्षा व मूल्यमापन यासंदर्भात निर्माण होत आहेत. निरीक्षणाने व अनुवंशिकतेने विद्यार्थी जे शिकतात त्याची नोंद कोठे होते? लहानपणापासून सायकल, लुना दुरुस्त करणाऱ्या मुलांची शिक्षणापासून वाताहत होते? पैशाशिवाय शिकताच येत नाही अशी आज परिस्थिती झाली आहे. शिक्षणाच्या हक्कापासून कितीतरी जण तांत्रिक कारणामुळे वंचित आहेत, त्याचे उत्तरदायित्व कोणाचे?
जे जे परीक्षेला येणार त्याचाच अभ्यास करण्याची वृत्ती सध्या दिसते आहे. प्रश्नपत्रिका, प्रश्र्न चुकीचे असतील तर ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील कशा?अलीकडे प्रश्नपत्रिका वा तिच्यातील प्रश्न सदोष असतात, पाठ्यपुस्तकेही सदोष असतात. प्रश्नासाठी निवडलेल्या पाठ्यक्रमातील आशय अपुरा असतो, मर्यादित असतो याचाच अभ्यास करून विद्यार्थी उत्तीर्ण होतो. मूल्यमापन लेखी परीक्षा पुरतेच मर्यादित असते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासाच्या विविध पैलूंचे मूल्यमापन आजच्या आपल्या परीक्षा पद्धतीत होत नाही,परिणामी परीक्षा विश्वसनीय राहिलेल्या नाहीत. विद्यार्थ्याच्या उणिवांची चिकित्सा करून त्या दूर करण्याचे प्रयत्न वाढीला लावणे ही गोष्ट परीक्षा पद्धतीतून होऊ शकत नाही.
एखादी कृती केल्यानंतर त्या कृती आपण तपासतो, कोणत्याही शैक्षणिक किंवा इतर उपक्रमाचे मूल्यमापन केले जाते. मापन म्हणजे एखाद्या गोष्टीचे संख्यात्मक प्रमाण ठरविणे होय. व्यक्तीच्या संदर्भात मूल्यनिर्धारण व प्रकल्प कार्यक्रम किंवा अभ्यासक्रम याच्या संदर्भात मूल्यमापन या संज्ञा वापरल्या जातात. हे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्याचा समावेश होणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षण हे मानवाने संपादन केलेले एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनेक प्रकारचे बदल घडवून आणता येतात, हे बदल अपेक्षित दिशेने आणि किती झाले आहेत ते मूल्य निर्धारणामुळे कळते. मूल्यमापन किंवा मूल्यनिर्धारण हे साधन आहे साध्य नव्हे. मूल्यनिर्धारण हे केवळ संपादनाशी संबंधित नाही, तर सुधारणेशीही निगडित आहे. मूल्यनिर्धारणात निर्णयाची गुणात्मक चिकित्साही असते. मापनात केवळ मोजमाप येते. मूल्यनिर्धारणात प्रक्रियेचे परिणाम तपासले जातात पुरावा जमा करून त्याचा अर्थ लावणे म्हणजे मूल्यनिर्धारण. शाळेत सुप्त गुण ओळखुन त्यांना विकसित करणारी यंत्रणाच नाही. शाळेला फाटा देऊन अशा अनेकांनी आपले सुप्त गुण विकसित केले आहेत. शाळेत आम्हाला सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर ओळखताच येत नाहीत हा शिक्षण प्रक्रियेचा पराभवच नाही का?अनेकांचे सुप्त गुण आयुष्याच्या उत्तरार्धात विकसित होत आहेत.
विश्वास नसलेली व्यवस्था चालू ठेवणे एवढेच आपल्या हातात आहे का? ही अवस्था बदलणार कशी? परीक्षेचे आयोजन, नियोजन याबद्दल शंका नाही, त्या सुरळीत पार पाडल्या जातात ,शंका आहे ती उपयोजना बद्दल. मिळालेल्या ज्ञानाच्या उपयोजनयावर प्रश्न कमी असतात. प्राध्यापकांचे प्रश्न तयार करण्यासंबंधीचे प्रशिक्षण, प्रश्नात संदिग्धता नसणें, वैचारिक पणा नसणे, विचारप्रवृत्त करणारे प्रश्न नसणे या बाबी महत्त्वाच्या आहेत, या साऱ्यांचाच विचार करणे आवश्यक ठरणार आहे.
दहावी-बारावीच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींना कॉपीमुक्त, भ्रष्टाचारमुक्त परीक्षेसाठी शुभेच्छा देतानाच हे लक्षात ठेवू या की, आपली पारंपारिक परीक्षा पद्धतीही विषयाच्या माहितीवरच अधिक भर देते. विद्यार्थ्यांमध्ये योग्य प्रकारची अधिक रुची आणि आपल्या कल्पना इतरांपर्यंत पोचवण्याचे संप्रेषण कौशल्य निर्माण होणे आवश्यक आहे.
लेखक पुणे विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य आहेत.
anilKulkarni666@gmail.com