गोपाळ काटेशिया, परिमल दाभी, अभिषेक अंगद
झारखंडमधील जैन धार्मिक स्थळाला पर्यटन क्षेत्र घोषित केल्यावरून सध्या वाद उफाळून आला आहे. या निर्णयाविरोधात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. जैन धर्मीयांचा या निर्णयावर आक्षेप का आहे, तीन वर्षांपूर्वी झालेला हा निर्णय आज चर्चेत का आला, गुजरातमधील धार्मिक स्थळावरून सुरू झालेला वाद नेमका काय आहे…
झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील पारसनाथ टेकडीचा भाग असलेले सम्मेद शिखर हे जैन धर्मीयांसाठी अतिशय महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणाचे माहात्म्य हे की, इथे २४ पैकी २० तीर्थंकरांना मोक्ष मिळाला असे मानले जाते. २०१९ मध्ये झारखंड सरकारने पारसनाथ परिसर पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केला. यात देवघर येथील वैद्यनाथ धाम आणि दुमका येथील बासुकीनाथ धाम या मंदिरांचाही समावेश आहे. त्याच वर्षी ऑगस्टमध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ही टेकडी पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असल्याचे घोषित केले. या भागात पर्यावरणकेंद्री पर्यटनाच्या प्रचंड संधी असल्याचेही त्यात नमूद होते.
प्रशासनाचे असे म्हणणे आहे की, या संदर्भातील घोषणा होऊन तीन वर्षे झाली, मात्र या काळात कोणत्याही प्रकारचा विरोध दर्शवण्यात आला नाही वा तक्रार नोंदविली गेली नाही. उपायुक्त नमन प्रियेश लाकरा यांनी सांगितले की, झारखंडमध्ये आजही कोणत्याही प्रकारे विरोध दर्शविला गेलेला नाही. शिखरजीचे प्रवक्ते ब्रह्मचारी तरुण भय्याजी यांचे म्हणणे आहे की, ‘आम्हाला या परिपत्रकाविषयी आताच माहिती मिळाली. हा भाग पर्यटनस्थळ किंवा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यापूर्वी केंद्र वा राज्य सरकारपैकीच कोणीच जैन समाजातील व्यक्तींशी संपर्क साधला नाही. डिसेंबरमध्ये कोणाच्या तरी वाचनात ही माहिती आली, तेव्हा याविषयी समजले. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांशी अनौपचारिक चर्चा केल्यानंतरही कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाहीत. त्यामुळे निदर्शने करण्यात आली.’
त्यांच्या मते, ‘इथे पर्यटनासाठी येणारे केवळ मौजमजा करण्याच्या उद्देशाने येतील. आम्हाला असे व्हायला नको आहे. या स्थळाचे पावित्र्य राखले जावे, असे आम्हाला वाटते. कोणत्याही जाती-धर्माच्या व्यक्ती इथे येऊ शकतात, केवळ त्यांनी आमच्या प्रथा पाळाव्यात एवढीच आमची अपेक्षा आहे. या भागाला पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित केले जाणे ही आमच्यासाठी समस्या ठरू शकते. यानिमित्ताने स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या भागात कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो. असे काही होऊ नये, असे आम्हाला वाटते.’
‘आम्ही या प्रश्नाची दखल घेतली आहे, हा निर्णय भाजपच्या कार्यकाळात घेण्यात आला होता,’ असे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे म्हणणे आहे. गिरिडीहच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘२२ डिसेंबरला शिखरजीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्यात आली. स्थळाचे पावित्र्य राखले जाईल, याविषयी त्यांना आश्वस्त करण्यात आले आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, म्हणून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.’
गुजरातमधील वादाचे कारण…
श्वेतांबर पंथीयांची संघटना असलेल्या ‘सेठ आनंदजी कल्याणजी पेढी’च्या सुरक्षा व्यवस्थापकाने आदिनाथदादांच्या म्हणजेच पहिले तीर्थंकर आदिनाथ यांच्या मूर्तीच्या पावलाची नासधूस केल्याची तक्रार डिसेंबरमध्ये दाखल केली. हे संगमरवरी दगडात कोरलेले शिल्प असून ते एका मंदिरात स्थापन करण्यात आले आहे. हे मंदिर शत्रुंजय डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या रोहिशाला गावात असून ते जैनांचे पवित्र पर्यटनस्थळ आहे. येथील मूर्तीची नासधूस केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी २३ डिसेंबर रोजी रोहिशाला येथील एका व्यक्तीला अटक केली. ‘या व्यक्तीने मंदिरात चोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला तिथे कोणतीही मौल्यवान वस्तू आढळली नाही. त्यामुळे वैतागलेल्या या चोराने पावलावर दगड मारला आणि त्यात बोटांचा भाग फुटला,’ असे पोलिसांचे म्हणणे आहे.
या प्रकरणाची चौकशी सुरू असताना शत्रुंजय डोंगरावरील निळकंठ महादेव मंदिराच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यावरून हिंदू धर्मातील स्थानिक गुरू स्वामी शरणानंद आणि शेठ आनंदजी कल्याणजी पेढीच्या पदाधिकाऱ्यांत वाद झाला. ‘शेठ आनंदजी कल्याणजी पेढीने हिंदू धर्मीयांच्या देवळात सीसीटीव्ही कॅमेरे लावू नयेत,’ असे स्वामी शरणानंद यांचे म्हणणे आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी उभारण्यात आलेले खांब १५ डिसेंबर रोजी उखडून टाकण्यात आले. त्यानंतर शेठ आनंदजी कल्याणजी पेढीने या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
शत्रुंजय टेकडी आणि त्याभोवतीच्या परिसराचे पावित्र्य कायम राहावे यासाठी हा भाग संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावा आणि मंदिरातील नासधूस प्रकरणाचीही चौकशी करण्यात यावी, अशी जैन समुदायाची मागणी आहे.
‘या प्रकरणाचा छडा लागला असून नासधूस करण्यामागे चोरी हा उद्देश होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र आमचा त्यावर विश्वास नाही,’ असे शत्रुंजय महातीर्थ रक्षा समितीचे प्रवक्ते अभय शाह यांचे म्हणणे आहे. मूर्तीच्या पायाचीच नासधूस का करण्यात आली असेल, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या प्रकरणी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करावी, अशी मागणी केली आहे. या परिसरात सुरू असलेले बेकायदा खाणकाम आणि अतिक्रमणांवरही कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी शाह यांनी केली आहे.