मी जन्मभर आपल्या निसर्गवैविध्यावर आणि संस्कृतीवैविध्यावर, भाषावैविध्यावर मनापासून प्रेम केले आहे. ईशान्य भारत हा निसर्गवैविध्याचे आणि संस्कृतीवैविध्याचे आगर आहे. कोलकात्याच्या संख्याशास्त्रीय संस्थेतल्या माझ्या मोहन रेड्डी या मित्राकडे मणिपुरातला नटबर श्याम नावाचा विद्यार्थी १९९१ साली पीएचडी करायला दाखल झाला. नटबरला मणिपुरातल्या डोंगरातल्या समाजांच्या निसर्ग व्यवस्थापनावर अभ्यास करायचा होता. तेव्हा मोहन रेड्डीने मी पण त्याला मार्गदर्शन करेन का असे विचारले. साहजिकच मी ही संधी तत्परतेने स्वीकारली. इथल्या गावांत १९६० च्या सुमाराला रस्ते पोहोचले आणि त्याबरोबरच तिथल्या जंगलांवर तुटून पडणारे लाकडाचे व्यापारी आणि ख्रिास्ती धर्मप्रचारकही पोहोचले. डोंगरातल्या कुकींसारख्या आदिवासींनी आपली मूळची निसर्गपूजा सोडून देऊन ख्रिास्ती धर्म स्वीकारला. निसर्गपूजेतून तिथे आधी सुमारे २० टक्के भूभाग देवरायांच्या रूपात राखून ठेवला होता. या देवराया हे पाखंड आहे आणि ताबडतोब तोडून टाकाव्यात असे धर्मप्रचारकांनी सांगितल्यावरून मोठ्या प्रमाणावर देवराया तोडल्या गेल्या. पण काही गावकऱ्यांच्या ध्यानात आले की या देवराया त्यांच्यासाठी हितकारक होत्या. विशेषत: त्यांच्या अडसरामुळे फिरती शेती करताना लावलेली आग पसरत नव्हती. म्हणून सांटिंग आणि इतर काही गावकऱ्यांनी त्या देवराया पुनश्च वाढवल्या होत्या. सांटिंगवासीयांनी गावाभोवतीची वर्तुळाकार देवराई व्यवस्थित पुनर्स्थापित केली होती. हे सारे पाहायला आम्ही तिघे झाडी तुटलेला उभा डोंगर तुडवत सांटिंगला पोहोचलो. तिथल्या मुखंडाच्या बांबूने बनवलेल्या सुबक घरात तळ ठोकला. खुशीत राहिलो पण गावातल्या लोकांशी संवाद साधायला नटबर मणिपुरीत विचारणार आणि मग त्यांचे उत्तर आम्हाला अनुवाद करत सांगणार असे चालले होते शिवाय त्यांच्या चिनी-तिबेटी कुळातल्या भाषेचा एकही शब्द मला कळत नव्हता. तशी माहिती मिळत होती, पण थेट बोलण्यातला आनंद नव्हता. पण दुसऱ्याच दिवशी ही अडचण दूर झाली. सांटिंगचे तीन सीमा सुरक्षा दलात काम करणारे युवक सुट्टीवर गावात परतले होते. ते सगळे सफाईने हिंदी बोलत होते आणि त्यांच्याशी बोलत मी मला हवी ती माहिती मोठ्या समाधानाने मिळवली. त्यांनी सांगितले की सैन्याच्या सर्व शाखांतील सैनिक परस्परांशी हिंदीत संवाद साधतात. वर एक वेगळीच माहिती मिळाली. ते म्हणाले की आम्ही भरती झाल्यावर हिंदी सिनेमे पाहात आणि हिंदी गाणी ऐकत भराभर हिंदी शिकतो. मुंबईतील बॉलीवूडने सर्व भारताला एकत्र आणण्याचे महत्कार्य केले आहे!

१९७३ पासून मी बेंगळूरुच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मध्ये कार्यरत होतो. तिथे रुजू झाल्यावर तत्परतेने कानडी भाषा शिकून घेतली होती आणि कानडीत बोलत, भाषणे देत कर्नाटकातल्या समाजात समरस झालो होतो. मुंबईप्रमाणेच बेंगळूरुमध्ये कन्नड भाषक अल्पसंख्येत- सुमारे ३६ टक्के आहेत. इंग्रजांनी बेंगळूरु हा लष्करी तळ बनवला होता आणि लष्करात काम करणारे तमिळ भाषक इथे मोठ्या संख्येत आहेत. बेंगळूरुहून आंध्र प्रदेशची सीमा अगदी जवळ आहे आणि शहरात तेलगू भाषकसुद्धा मोठ्या संख्येने आहेत. केरळातले सुशिक्षित लोक मोठ्या प्रमाणात देशभरात फैलावले आहेत आणि त्यांच्यातले अनेक जण बेंगळूरुत स्थायिक झालेले आहेत. शिवाय मराठी भाषकसुद्धा आहेत कारण बेंगळूरु शहर आणि आसपासचा काही भाग हा आदिलशहाने शिवाजीराजांचे तीर्थरूप शहाजीराजे यांना जहागीर म्हणून दिला होता. त्यांच्याबरोबर पहिल्यांदाच दक्षिणेत कपडे शिवण्याची प्रथा आली आणि इथले सगळे शिंपी मराठी भाषक आहेत. शहाजी राजांच्याच काळात घोरपडे सरदारांनी कर्नाटकात सांडूर येथे आपली सत्ता प्रस्थापित केली होती. यांच्याबद्दलची मोरोपंतांची एक आर्या प्रसिद्ध आहे : ‘भोजासम कविताप्रिय, कर्णासम दानशूर घोरपडे, ऐसे असता माझ्या देणगीचा का तुम्हास घोर पडे?’ बेंगळुरात अनेक कोंकणी आणि सुशिक्षित मराठी भाषकही स्थायिक झाले आहेत. यांच्यातले दोन प्रसिद्ध क्रीडापटू प्रकाश पादुकोण आणि राहुल द्रविड यांची क्रीडा अकादमी बेंगलोर जोमाने चालते. या कुणाविरुद्धही हे कानडी नाहीत म्हणून कानडी चळवळ करणारे आक्षेप घेत नाहीत. कानडी चळवळ करणारे केवळ सीमा भागातल्या बेळगाव वगैरे मराठी लोकांच्या चळवळीला प्रतिसाद म्हणून त्या भागात येऊन भांडतात. एकदा मला बेळगावला कर्नाटक राज्य विज्ञान परिषदेच्या अधिवेशनात भाषण द्यायचे होते आणि अर्थातच मी इतरांप्रमाणेच कानडीत भाषण दिले. बेळगावचे मराठी चळवळे मला म्हणाले की तू मराठीचा विद्रोह करत आहेस. उत्तर दिले, की मी मराठीवर भरपूर प्रेम करतो आणि खुशीत मराठीमध्ये लेखन करतो. पण मराठीचे प्रेम म्हणजे कानडीचा द्वेष हे मला बिलकूल रुचत नाही.

धारवाडचे शंकर बाळदीक्षित जोशी कानडी तसेच मराठी साहित्य, संस्कृती आणि इतिहासाचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी ‘मऱ्हाटी संस्कृती : काही समस्या’ नावाचे मराठी पुस्तक लिहिले आहे. कानडी भाषेत मरा म्हणजे झाड आणि हट्टी म्हणजे पुंज. तेव्हा मरहट्टी म्हणजे झाडी. शं. बा. जोशींच्या मते मराठी हा शब्द मरहट्टीवरून आलेला आहे. वसंत बापट एका कवितेत म्हणतात: ‘तुम्हास तुमचे रुसवे फुगवे घ्या सगळा नाजूक नखरा, माझ्यासाठी राहील गाठी मरहट्ट्याचा हट्ट खरा’. विठ्ठलाची पूजा कर्नाटकातून महाराष्ट्रात आली आणि म्हणूनच गदिमांनी ‘‘कानडा राजा पंढरीचा’’ हा प्रसिद्ध अभंग लिहिला आहे.

शहाजींचे दुसरे पुत्र म्हणजे शिवाजी राजांचे सावत्र भाऊ यांना शहाजींनी तंजावूरची आपली जहागीर बहाल केली होती. या तंजावूरच्या भोसले घराण्यातले सरफोजी भोसले (१७७७ -१८३२) यांनी सरस्वती महाल हे ग्रंथालय जोपासले. हा आशियातील एक प्राचीन आणि समृद्ध ग्रंथसंग्रह आहे. त्यांनी मुद्रणालये स्थापून अनेक शास्त्रीय, धार्मिक आणि साहित्यिक ग्रंथ तमीळ, मराठी आणि संस्कृत भाषांमध्ये प्रकाशित केले. शिवाय धन्वंतरी महाल नावाचे आधुनिक पद्धतीचे वैद्याकीय संशोधन केंद्र स्थापन केले. तंजावूरचे अनेक मराठी भाषक शास्त्रज्ञ माझे मित्र होते. घरी मराठी बोलत तरी तमिळ आणि इंग्रजीत तरबेज होते. तंजावुरात कोणीही त्यांना हे परभाषिक म्हणून हिणवत नव्हते.

थोरल्या बाजीरावाच्या कारकीर्दीत मराठ्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात फैलावला. त्याचे सरदार गायकवाड गुजरातेत बडोद्याचे राज्यकर्ते झाले. तसेच मध्य प्रदेशात होळकर इंदूरचे, शिंदे ग्वाल्हेरचे, पवार धरचे आणि उत्तर प्रदेशात न्यूळे झाशीचे राज्यकर्ते झाले. यातून आपली मराठी कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या पंचप्रांतांत प्रतिष्ठेला पोहोचली आहे. इंदूरचे राजकवी भा. रा. तांबे मराठीतील एक प्रतिभाशाली कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंवर अजूनही हिंदीत पोवाडे गायले जातात.

इंग्रजांनी मुंबई हे बंदराचे गाव व्यापार आणि उद्याोगाचे केंद्र म्हणून विकसित केले. पारशी लोक सुरतेला लाकडी गलबते बांधण्यात तरबेज होते. त्या समाजात हे सुतारही सुशिक्षित होते. त्यामुळे पारशांमधून टाटा, वाडिया असे अनेक उद्याोजक पुढे आले. गुजराती समाजात व्यापाराची परंपरा आहे आणि अनेक गुजराती लोकांनी मराठी मुंबईमध्ये गिरण्यांसारखे उद्याोग स्थापन केले. ‘राजा हरिश्चंद्र’ हा मूकपट दादासाहेब फाळके यांनी १९१३ साली मुंबईतच तयार केला आणि आज बॉलीवूड संपूर्ण भारतात चित्रपटनिर्मितीत अग्रेसर आहे.

महाराष्ट्रावर १८१८ साली कब्जा केल्यानंतर इंग्रजांनी कोकणात प्रचंड प्रमाणावर जंगलतोड केली. त्यातून तिथली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आणि तिथून मोठ्या प्रमाणात पोट भरण्यासाठी लोक मुंबईकडे लोटले. त्यांची पिळवणूक करत त्यांना गिरण्यांत आणि इतरत्र कामावर घेतले गेले. अलीकडे उत्तर प्रदेश, बिहार राज्यांत मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाल्यामुळे तिकडचे लोकही मुंबईत कामाच्या आशेने येऊन राहिले आहेत. यामुळे आज मराठी भाषक मुंबईत मराठी भाषक अल्पसंख्य, सुमारे ४५ टक्के इतके झाले आहेत. हे प्रमाण बेंगळूरुहून जास्तच आहे. पण बेंगळुरात कन्नडभाषक परभाषकांवर आम्हाला तुम्ही इथे नकोत म्हणून हल्लाबोल करत नाहीत. मग महाराष्ट्रालाच ही असहिष्णुता कशाला हवी आहे? अखेर आपण सगळे भारतीय आहोत आणि बडोद्यात, तंजावुरात, इंदुरात, ग्वाल्हेरात, झाशीला जशी आपली मराठी मंडळी ताठ मानेने स्थानिक भाषकांबरोबर आनंदाने नांदतात तसेच मुंबईतही आपण परभाषकांबरोबर गुण्यागोविंदाने राहू या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

madhav.gadgil@gmail.com