दत्ता बारगजे

१ डिसेंबर या जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त. तो दिवस होता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा…! संपूर्ण देश तोरणं- पताकांनी सजला होता. तीन दिवस सगळीकडे धामधूम होती.

Mumbai crime Encounter fame encounters criminality Police
चकमक आणि चकमक फेम
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
After 75 years of independence ST bus started for the first time in Naxal-affected Gardewada
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनतर नक्षलग्रस्त गर्देवाडात ‘लालपरी’ अवतरली; गावात पहिल्यांदाच…
pune get honor to host annual army day parade in january
पुण्याला मिळणार मोठा मान… जानेवारीमध्ये लष्कराचा महत्त्वाचा कार्यक्रम
MHADA Mumbai, applications house MHADA,
म्हाडा मुंबई मंडळ सोडत : एका घरासाठी अंदाजे ५३ अर्ज; अर्ज विक्री – स्वीकृतीची मुदत संपुष्टात
Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश
vandana gupte article Freedom only for freedoms sake
‘ती’च्या भोवती…! स्वातंत्र्य केवळ स्वातंत्र्यासाठीच!
Three accountants and NHM employees fired for diverting provident fund money
चंद्रपूर : पीएफचे लाखो रुपये स्वतःच्या खात्यात वळवले; तीन लेखापाल, कार्यक्रम अधिकाऱ्यावर…

आदल्या दिवशी इन्फंट इंडिया संस्थेतील चिमुकला ‘शिवप्रसाद’ शाळेतील स्वातंत्र्यदिनाची, झेंडावंदनाला जाण्यासाठी उत्सुकतेने तयारी करत होता. तेवढ्यातच शाळेतून त्याच्या आईला निरोप आला ‘शिवप्रसादला उद्या शाळेत पाठवू नका.’ त्याचे आई -वडील एचआयव्ही बाधित असल्याचे कळल्याने शिवप्रसादला शाळेत बसवायला इतर पालकांचा विरोध आहे. “नाहीतर आम्ही आमची मुलं शाळेत पाठवणार नाही… त्याला एकट्यालाच बसू द्या”. असं ते म्हणतात.

शिक्षक शिवप्रसादच्या पालकांना म्हणाले, सगळ्यांचं कशाला नुकसान करता? अशाने शाळा बंद पडेल. त्यापेक्षा त्याला एकट्याला घरी राहू द्या. आईने त्यांना विनंती केली की माझा मुलगा एचआयव्ही पॉझिटिव्ह नाही. तो व्हायरस मुक्त आहे. त्याचा अहवाल पहा. त्याला या स्वातंत्र्य महोत्सवापासून दूर ठेवू नका. तरीही शिक्षकांनी स्पष्ट नकार दिला. शिवप्रसादची आई रडली. एचआयव्ही बाधित असल्याने लहानपणापासून वाट्याला आलेला सामाजिक व शैक्षणिक संघर्ष तिच्या मन: पटलावरून सरकत गेला. आपल्या वाट्याला आलेल्या वेदना व संघर्ष ‘शिव’ व्हायरसमुक्त असूनही त्याच्या वाट्याला येतो की काय, याची भीती तिच्या मनाला स्पर्शून गेली. त्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमाला मात्र शिवप्रसादला जाता आलं नाही. भविष्यात सुवर्ण महोत्सवही साजरा होईल पण हा ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ शिवप्रसादसाठी अमानवीय संघर्षाचा इतिहास बनला.

हेही वाचा : मराठ्यांना टिकणारे आरक्षण हवे असेल तर, एवढे करावेच लागेल…

तो पुन्हा- पुन्हा आपल्या आईला विचारत राहिला, ‘पण मी आता कोणत्या शाळेत जाऊ…?’ त्या इवल्याशा कोवळ्या मनात यानिमित्ताने कशाचं बीजारोपण झालं असेल आणि भविष्यात ते कोणत्या रूपाने अंकुरेल याची तीळमात्रही कल्पना येत नाही. याविषयी आम्ही शाळेत पालक सभा बोलवली. जाणकारांचं मार्गदर्शन, समुपदेशन घडवून आणलं. देशभरातील अनेक वृत्तपत्रांनी वृत्तपत्रांनी दखल घेतली. अनेक शासकीय- प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शाळेला भेटी दिल्या. मुंबईहून राज्य बाल हक्क आयोगाने हजेरी लावत शाळेला भेट दिली आणि गावात सभा घेतली. आम्हीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल ११ दिवस उपोषण करत या मुलाला स्वीकारा म्हणून अनेक शाळांना आवाहनं केली. पण यश आलं नाही. शेवटी आम्हालाच माघार घ्यावी लागली अन् शिव एक वर्ष शिक्षणापासून वंचित राहिला.

इन्फंटचा पहिला विद्यार्थी, म्हणजेच शिवप्रसाद हा विशालचा एकुलता एक मुलगा… आरोग्याच्या अनेक खडतर तपश्चर्या पार करत ‘अग्निदिव्यातून’ त्याचा जन्म झाला. त्याचा व्हायरस मुक्त ‘जन्म’ हाच माता-पित्यांच्या जीवनातील परमोच्च आनंद होता. शिव हा उच्च विद्याविभूषित व्हावा म्हणून एखाद्या सजग पालकाप्रमाणे त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकण्याचं स्वप्नही त्यांनी पाहिलं…! विशाल हा जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिका चालवतो. या माध्यमातून राज्यात व परराज्यात मृतदेह वाहून नेण्याचं काम तो करतो. शिवला केजीमध्ये प्रवेश मिळाला, हा विशालसाठी दुसरा सुखद धक्का होता. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. शिव फक्त दोनच महिने शाळेत गेला. तो इन्फंट इंडिया संस्थेचा बालक असल्याची चाहूल लागताच पालक वर्गात एकच खळबळ उडाली अन् विरोध सुरू झाला. शिव सांगत होता, तिथली मुलं त्याच्याबरोबर कधी जेवली नाहीत, खेळली नाहीत, बोलली नाहीत. तो एकटाच बसत होता. त्या मुलांना त्यांच्या पालकांनी तसं सांगितलं होतं, असं शिक्षक सांगतात.

हेही वाचा : जगात मुस्लिमांच्याच बाबतीत असे का घडते, याचा कुणीतरी मुस्लिम नेता विचार करेल का? 

गोंडस आणि तरतरीत शिवच्या वाट्याला या कोवळ्या वयात, काही कळण्याआधीच एकाकी, एकलकोंडं, अस्पृश्य जगणं आलं ते केवळ गैरसमजातून! त्याच्या इंग्रजी शिक्षणाचं ‘स्वप्न’ गुंडाळावं लागलं ते कायमचंच…! आज तो जिल्हा परिषद शाळेत पहिल्या वर्गात शिकतो आहे. यावर्षी जूनमध्ये जिल्हा परिषद शाळेत पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली. इन्फंटच्या एचआयव्हीबाधित मुलांना शाळेत बसण्यास मज्जाव करण्यात आला. ग्रामस्थांनी अक्षरशः शाळेला कुलूप ठोकलं. तसे फोटोही काढले आणि समाज माध्यमांवर व्हायरलही केले. पर्यायाने आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात शाळा भरवावी लागली. ग्रामस्थांनी मोर्चे, आंदोलनं करत प्रखर विरोध केला. सर्व शासकीय यंत्रणा पुन्हा शाळेकडे आल्या. शाळेत नऊ दिवस विद्यार्थी येत नव्हते. फक्त शिक्षक व इन्फंटची ४५ मुलं अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक जाणकार, समुपदेशक येत होते. भेटी देत होते.

या सर्व विचारांचं मूळ मला वाटतं शिक्षण अन् शिक्षकांत आहे. शिक्षक देशाला घडवतो, असं म्हटलं जातं. म्हणून शिक्षक स्वतः ‘माणूस’ असला पाहिजे अन् आपल्या विद्यार्थ्यांनाही त्याने शिक्षणासोबतच माणुसकीचं शिक्षण दिलं पाहिजे. शिक्षकच जर विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्हीबाबत गैरसमज पसरवत असतील, त्यांना शेवटच्या बाकावर बसवणं, प्रश्न न विचारणं, तिरस्काराने पाहणं, मुलांच्या पालकांना भडकवणं, त्यांच्या मनात एचआयव्हीबाबत भीती तयार करणं असं करत असतील तर असे शिक्षक कशी पिढी घडवणार? या अन् अशाच शिक्षकांनी निर्माण केलेल्या पिढीतील ही माणसं असतील का जे डॉक्टर असूनही एचआयव्ही बाधितांचा तिरस्कार करतात… एचआयव्ही बाधित महिलेची डिलिव्हरी करताना निष्काळजीपणा करतात… एचआयव्ही बाधिताला रुग्णालयात एका कोपऱ्यात जागा देऊन वेळप्रसंगी अस्पृश्य वागणूक देतात… हे आम्ही पाहिलं, अनुभवलं आहे. मग ते जी सेवेची शपथ घेतात ती फक्त कागदावरच असते काय?

हेही वाचा : ..तर मग भाजपच्या ‘परंपरे’चे काय?

समाजातील अनेक घटकांत एचआयव्ही एड्सबाबत गैरसमज असणं यात नवल नाही. नवल आहे ते फक्त तुमच्या माझ्यासारख्या स्वतःला विद्या विभूषित, सुशिक्षित समजणाऱ्या, वैज्ञानिक दृष्टिकोन प्रगल्भ झालेल्या माणसांचं! मानवी मूल्यांचं अवमूल्यन होतांना आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो. नव्हे, त्यात कळत नकळत सहभागी होण्याचं दुर्भाग्यही आपल्या वाट्याला आल्याशिवाय राहत नाही. संघर्षांशिवाय काहीच मिळत नाही हे खरं असलं तरी हा संघर्ष निर्माण करण्यासाठी समाजच कारणीभूत नाही का? या निमित्ताने एड्स दिन किंवा एड्स जनजागृती सप्ताह यांचं सिंहावलोकन करण्याची वेळ आहे. केवळ रॅली, घोषणाबाजी, भाषणं, समुपदेशन यातून जनजागृती होणार नाही तर ठोस कृती कार्यक्रमांची आवश्यकता आहे. सकारात्मक बोलल्याने सकारात्मकच घडेल यावरचा माझा विश्वास आता कमी होत चालला आहे. १८ वर्षे मी या समस्येसोबत जगतो नव्हे, होरपळतो आहे. आपण फक्त एड्सदिन साजरे करतो. वरकरणी सांगतो की आता बऱ्यापैकी एड्स निर्मूलन झाले आहे. समाजाचा दृष्टिकोनही बदलला आहे, वगैरे…वगैरे. तर मग आमच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली होताना पाहून आपल्या संवेदना का जागृत होत नाहीत? समुपदेशनाचा समाजावर काय परिणाम झाला याचं मोजमाप कुठं आहे? समाज आता एचआयव्ही बाधितांना स्वीकारत असेल तर इन्फंटमध्ये आजही ‘वेदना स्मशानभूमी’ची गरज का आहे? का १८ वर्षावरील मुलंही इथंच राहतात? पाच -पंचवीस नातीगोती असूनही अनेक एचआयव्ही बाधित महिलांना का घ्यावा लागतो इन्फंटचा आधार?

एकीकडे आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आणि दुसरीकडे मानवी मूल्यांच्या अवमूल्यनाची शोकांतिका आमच्या वाट्याला येते, यापेक्षा दुर्भाग्य स्वातंत्र्य महोत्सव साजरे करणाऱ्या देशात कोणतं असेल? एड्स जनजागृती केवळ कागदावरच न राहता कृतिशीलतेतून व्हावी. आपल्या सर्वांची ती महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. मी माझ्या परीने वेगवेगळया माध्यमातून दररोज समाजाला धडका देत आहे. मुंगीच्या पावलाने का होईना बदल घडून आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात बऱ्यापैकी यशही मिळतं आहे. माझा व्यक्तिश: कोणालाही विरोध नाही. मानसिकता बदलल्याशिवाय पर्याय नाही यावर माझा ठाम विश्वास आहे. कोणतीही व्यक्ती वाईट नसते. केवळ विचारांना झालेला एचआयव्हीचा संसर्ग समूळ नष्ट करण्यासाठी सद्विचारांची लस शोधण्याचं काम आपल्याला करायचं आहे.

लेखक इन्फंट इंडिया या सामाजिक संस्थेचे संस्थापक आहेत.
infantindiapali@gmail.com