चौदावे दलाइर् लामा यांचा पुनर्जन्म किंवा त्यांचा वारस आणि तिबेट याच्याशी संबंधित मुद्दे गेल्या वर्षभरात अधिक ठळकपणे समोर आले आहेत. यंदा मार्चमध्ये प्रसिद्ध झालेल्या चौदावे दलाई लामा यांच्या ‘व्हॉइस ऑफ द व्हॉइसलेस’ या पुस्तकामुळे हा विषय अधिक अधोरेखित झाला. या पुस्तकात चौदावे दलाई लामा म्हणतात की, ‘‘माझ्या पश्चात तिबेटच्या भविष्यासाठी हे पुस्तक एक चौकट ठरेल अशी मला आशा आहे.’’ चीनच्या तिबेट तत्त्वज्ञान संशोधन केंद्राचे उपमहासचिव व संशोधक ली डेचेंग यांनी मार्च २०२५ मध्ये म्हटले आहे की, ‘‘पुढच्या दलाई लामांचा परदेशात पुनर्जन्म झाला असे घोषित केले गेले, तर तो पुनर्जन्म बेकायदेशीर ठरेल,’’ पुढे त्यांनी असेही म्हटले की अमेरिकेच्या निरीक्षणांचा चीनवर काहीही परिणाम होणार नाही. चिनी अधिकाऱ्यांनी तिबेटविषयक हालचालींना गती दिली आहे, हे ५ जून रोजी झालेल्या एका विशेष, पण महत्त्वपूर्ण बैठकीमुळे स्पष्ट झाले. ही बैठक होती चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग आणि चीनने नियुक्त केलेले पंचेन लामा ग्याल्तसेन नॉरबू यांच्यात. या बैठकीमुळे हे स्पष्ट झाले की, सीसीपी म्हणजेच चिनी कम्युनिस्ट पार्टीत वरिष्ठ पातळीवरून या विषयाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
२०२४ पासून तिबेट स्वायत्त प्रदेशात (TAR) या बाबींवर विशेष भर दिला जात आहे. तिबेट स्वायत्त प्रदेशातील युनायटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंट (UFWD) चे अधिकारी जवळपास प्रत्येक महिन्यात मठांची पाहणी करत आहेत. ऑगस्ट २०२४ ते एप्रिल २०२५ या काळात तिबेट स्वायत्त प्रदेशातील युनायटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंटच्या प्रमुखांनी वैयक्तिकरीत्या किमान सहा महत्त्वाच्या मठांची पाहणी केली आहे. तिबेट स्वायत्त प्रदेशाचे पक्ष सचिव आणि तिबेट स्वायत्त प्रदेशाच्या पीपल्स गव्हर्नमेंटच्या अध्यक्षांनीही हीच भूमिका घेतली आहे. त्यांनी सर्वांनी तिबेटी बौद्ध धर्माला ‘नव्या युगातील चिनी वैशिष्ट्यपूर्ण समाजवादाशी’ सुसंगत करण्याची, तिबेटी बौद्ध धर्माचे चिनीकरण अधिक गतीने करण्याची, आणि चिनी राष्ट्रासाठी एक दृढ सामूहिक भावना निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली आहे. याचबरोबर, सीमा संरक्षणावरही लक्ष केंद्रित करण्यात आले असून, सीमा संरक्षित गावे वाढवण्यावर विशेष भर दिला जात आहे. ५ जूनच्या बैठकीचे महत्त्व अधोरेखित करताना, ‘पीपल्स डेली’ या चिनी मुखपत्राने आपल्या पहिल्या पानावर एक छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये तिबेटविषयक बाबींमध्ये थेट सहभागी असलेले चीनचे सर्वोच्च नेते उपस्थित असल्याचे दाखवले आहे. हे नेते होते,
वांग हुनिंग- पोलिटब्युरो स्थायी समितीचे सदस्य आणि चायनीज पीपल्स पोलिटिकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्स (CPPCC) चे अध्यक्ष.
काय ची : पोलिटब्युरो स्थायी समिती सदस्य आणि चिनी कम्युनिस्ट पार्टी ( CCP) मध्यवर्र्ती समितीच्या जनरल ऑफिसचे संचालक
ली गानजीए : पोलिटब्युरो सदस्य आणि युनायटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंटचे प्रमुख
क्षी जिनपिंग हेदेखील या बैठकीला उपस्थित होते. उपाध्यक्ष असल्यापासूनच त्यांना तिबेटविषयक गोष्टींमध्ये विशेष रुची आहे. २००६ मध्ये झेजियांग प्रांताचे पक्ष सचिव असताना पहिल्या जागतिक बौद्ध परिषदेचे आयोजन करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
ग्याल्तसेन नॉरबू यांच्यासोबत दोन भिक्खू उपस्थित होते, मात्र त्यांची ओळख जाहीर करण्यात आली नाही. हे भिक्खू बहुधा त्यांचे शिक्षक असावेत.
वांग हुनिंग हे चिनी कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख विचारवंत तसेच चिनी पीपल्स पोलिटिकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्स (CPPCC ) चे अध्यक्ष उपस्थितांमध्ये होते. अल्पसंख्याक जमाती आणि धार्मिक प्रश्न या विषयांचा त्यांचा अभ्यास आहे. त्यांचा तिबेट प्रकरणांशी दीर्घकालीन संबंध आहे. २०१६ मध्ये ते तिबेटचे प्रतिनिधी म्हणून नॅशनल पीपल्स काँग्रेस (NPC) मध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर वांग हुनिंग यांनी तिबेटला किमान दोन वेळा भेट दिली. जुलै २५ ते २७, २०२३ या तीन दिवसांच्या अभ्यास दौऱ्यात त्यांनी ल्हासा, शानन आणि न्यिंगत्री या ठिकाणी भेट दिली आणि सिचुआनझ्रतिबेट रेल्वेच्या नियोजन व बांधकामाची पाहणी केली. २७ ऑगस्ट २०२४ रोजी ल्हासा येथे झालेल्या चौथ्या तिबेट मदतकार्य बैठकीत वांग हुनिंग यांनीही भाग घेतला.२७ ऑगस्ट २०२४ रोजी ल्हासा येथे झालेल्या चौथ्या तिबेट मदतकार्य बैठकीलादेखील वांग हुनिंग यांनी उपस्थिती लावली होती.
काय ची यांचाही तिबेटशी दीर्घकालीन संबंध आहे. पोलिटब्युरोचे सदस्य आणि बीजिंगचे पक्ष सचिव म्हणून त्यांनी बीजिंग महानगरपालिकेच्या ‘एड तिबेट’’ प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला होता आणि ५ते ६ सप्टेंबर २०२१ दरम्यान तिबेटला गेलेल्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले होते. पोलिटब्युरो सदस्य ली गानजीए यांची यंदा एप्रिलमध्येच संयुक्त मोर्चा कार्य विभागाच्या (UFWD) प्रमुखपदी नियुक्ती झाली. हा विभाग अल्पसंख्याक आणि धार्मिक बाबींशी संबंधित प्रश्न हाताळतो. ली गानजीए एका दशकाहून अधिक काळ तिबेटशी संबंधित आहेत. शान्डोङचे पक्ष सचिव असताना, ली गानजीए यांनी जुलै २०२१ मध्ये तिबेटला प्रतिनिधी मंडळ नेले होते. मदतकार्य अधिक बळकट करणे हा त्यामागचा हेतू होता; आणि त्याच्याच पुढच्या महिन्यात ल्हासामध्ये शान्डोङ प्रांताकडून सुरू असलेल्या पाठबळाच्या कामावर एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.
५ जून रोजी झालेल्या बैठकीतील चर्चेबाबत फारशी माहिती उघड करण्यात आलेली नाही, परंतु चौदाव्या दलाई लामांच्या पुनर्जन्म प्रक्रियेत पेंचेन लामांची भूमिका ही चर्चेच्या अजेंड्यात सर्वोच्च स्थानी असण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, तिबेटी बौद्ध भिक्खूंनी चिनी कम्युनिस्ट पक्षाशी जोडून घ्यावे आणि तिबेटी बौद्ध धर्माच्या चिनीकरणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, हाही एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचे मानले जाते.
पेंचेन लामांसोबत झालेल्या बैठकीत क्षी जिनपिंग यांनी केलेली टिप्पणी ‘शिन्हुआ’मधून प्रसिद्ध झाली आहे. ही टिप्पणी बऱ्यापैकी बोलकी आहे. त्यातून अनेक गोष्टी सूचित होतात. नेतृत्वाबाबतच्या क्षी जिनपिंग यांच्या चिंतेचे प्रतिबिंब या टिप्पणीमधून दिसून येते. त्यात क्षी जिनपिंग ‘‘पेंचेन रिनपोछे तिबेटी बौद्ध परंपरेतील देशभक्ती आणि धार्मिक भक्ती या परंपरांना पुढे नेतील आणि राष्ट्रीय एकता व जातीय ऐक्य यांचे दृढपणे रक्षण करतील’’ अशी आशा व्यक्त करतात. पेंचेन लामा अधिक अभ्यास करतील आणि ‘धार्मिक पातळीवर अधिक प्रावीण्य मिळवतील.’ अशी अपेक्षाही क्षी जिनपिंग यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी ग्याल्तसेन नॉरबू यांना ‘‘चिनी राष्ट्रासाठी एक मजबूत सामुदायिक भावना निर्माण करण्याचे आणि तिबेटी बौद्ध धर्माच्या चिनीकरणात अधिक प्रभावी भूमिका बजावण्याचे’’ आवाहन केले. त्याचबरोबर, क्षी जिनपिंग यांनी ग्याल्तसेन नॉरबू यांना ‘‘नेहमी सावध, शिस्तबद्ध राहावे आणि उत्तम नैतिक चरित्र राखावे’’ असा सल्लाही दिला आहे. गेल्या वर्षभरात युनायटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंटचे प्रमुख आणि किमान दोन पार्टी सचिव यांच्यासह इतर वरिष्ठ सीसीपी अधिकाऱ्यांनीही ग्याल्तसेन नॉरबू यांना असाच सल्ला दिला आहे. चीनने नियुक्त केलेल्या पेंचेन लामा यांना अधिक महत्त्व देण्यात आतापर्यंत झालेला संकोच आणि क्षी जिनपिंग यांच्या सूचक टिप्पणींमधून हे स्पष्ट होते की, चिनी नेतृत्वाला पेंचेन लामांच्या विश्वासार्हतेबद्दल अजूनही खात्री नाही, किंवा पेंचेन लामा धार्मिक शास्त्रांमध्ये पुरेसे प्रवीण नाहीत, असे त्यांना वाटते. तरीही, ऑक्टोबरमध्ये झेजियांग प्रांतात होणाऱ्या सहाव्या जागतिक बौद्ध परिषदेच्या वेळी सीसीपी ग्याल्तसेन नॉरबू यांना तिबेटी बौद्ध धर्मातील गेलुग संप्रदायातील दुसऱ्या क्रमांकाची व्यक्ती म्हणून सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करेल, अशी शक्यता आहे.