मराठीतील नाटय़लेखन असो की ईपीडब्ल्यू साप्ताहिकात सलग ३० वर्षे केलेली राजकीय व अर्थशास्त्रीय मीमांसा, गोपुंची बौद्धिक चमक समोरच्याला विचार करायला भाग पाडत असे..
जवळपास तीन महिन्यांचा काळ निश्चेष्टावस्थेत काढल्यानंतर गो. पु. देशपांडे गेले. हे असे जाणे अपेक्षित आणि तरीही चटका लावणारे. गोपुंच्या नाटकांसारखेच. त्यांच्या नाटकातील पात्रे एकमेकांशी फक्त बोलत. सत्यशोधक या नाटकाचा अपवाद वगळता पात्रेही मोजकीच. बर्नार्ड शॉपासून शेक्सपिअपर्यंत कुणाच्याही संहितांचे ओतप्रोत मराठीकरण करण्याची आपल्या लोकप्रिय लेखकांची क्षमता, रंगमंचावर धडधडत जाणारी आगगाडी पाहा यासारख्या जाहिराती आणि आधी कथा, मग कादंबरी, मग नाटक, मग सिनेमा अशी काही लेखकांची ठरलेली यशोरेषा या सर्वापुढे गोपुंच्या राजकीय चर्चानाटय़ांचा काय पाड लागणार होता? तरीही ती महत्त्वाची आहेत आणि राहणार आहेत. याचे कारण असे की राजकारण माणसांना कसे भिडते आणि क्रांतिविज्ञान कुठे व कसे अडते याची गोपुंसारख्या विद्वानाने मांडलेली जाण त्यापैकी अनेक नाटकांमध्ये आहे. नाटकांखेरीज गोपुंचे नाटकी निबंध आणि चर्चक निबंध किंवा त्यांची इंग्रजी पुस्तके आपल्याजवळ आता उरली आहेत. सहज भेट न होणारे, पण झाली की काही वेळात बौद्धिक चमक दाखवणारे- समोरच्याला विचार करायला भाग पाडणारे गोपु आता या पुस्तकांतून आणि त्यांच्या नाटकांचे प्रयोग पुढे झालेच तर त्यातल्या शब्दांतून भेटणार आहेत.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात चीनविषयक विशेष शाखेत गोपु हे जी. पी. देशपांडे प्राध्यापक असताना त्यांच्या हाताखाली डझनावारी पीएच.डी. झाले, पण गोपुंवर डावेपणाचा शिक्का मारण्यात महाराष्ट्राने धन्यता मानली. वास्तविक, मार्क्‍सवादी-डावे विचाराग्रह आता कसे कालबाह्य़ ठरत जाणार आहेत याचे चित्रण करणाऱ्या ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ या नाटकाचे प्रयोग अनेक शहरांत झाल्यामुळे गोपु महाराष्ट्राला माहीत झाले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादलेली असताना हे नाटक लोकांना डाव्या-उजव्या साऱ्याच कार्यकर्त्यांना, सरकारची शक्ती ही कार्यकर्त्यांची उमेद खच्ची करण्याचेच काम करते, असा इशारा देणारे ठरले होते. त्या ‘धर्मशाळे’ने अनेकांना खंबीर होण्याचा आशावादही दिला. पण खरे हेच की, ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ आधी आली आणि नंतर काही वर्षांतच एनजीओंची सद्दी या देशातील सामाजिक कार्यात सुरू झाली. राजकीय चर्चानाटय़ म्हणून नावाजले गेलेल्या ‘एक वाजून गेला आहे’ या नाटकातील पात्रांना तर गोपुंनी, स्कॉच पितापिता क्रांतीची- किंवा तिच्या अशक्यतेचीच- चर्चा करायला लावले होते. बाकीच्या नाटकांमध्येही क्रांतीपेक्षा प्रतिक्रांतीच्या प्रेरणाच कशा जिंकतात, याच्या गोष्टी गोपुंनी अन्यत्रही मांडल्या असल्याचे दिसेल. दमनशाहीने चालवलेली क्रांतिकारकांची ‘अंधारयात्रा’ असो की, क्रांतिवादी कार्यकर्त्यांचे दिशाहीनच होत गेलेले ‘रस्ते’- क्रांतिकारकाचा पराभव हे गोपुंच्या नाटकांचे सूत्रच ठरले. या पराभवाचे उदात्तीकरणही त्यांनी केलेले नाही. ‘अखेरचा दिस’मध्ये तडफदार क्रांतिकारक पुरुष पात्र आहे. नागेश नावाचे. हा गुप्तचर निघतो. क्रांती हा आदर्शवाद, ते उत्तुंग स्वप्न. त्याची मोडतोड करण्याचे, म्हणजे आदर्शभंजनाचे काम गोपुंनी बिनबोभाट केले. बोभाटा मात्र, ते राजकीय नाटककार आहेत, डावे आहेत, याचाच अधिक झाला.
राजकीय-सामाजिक बदल घडण्याच्या शक्यता, राजकीय आणि सामाजिक बदलांना समाजातूनच होणारा विरोध, कोणता बदल का आवश्यक आहे हे सांगणाऱ्या तत्त्वज्ञानातच असलेला अंतर्विरोध आणि नव्या बदलांच्या शक्यता मांडताना जुन्या फसगतींकडून शिकणे यांचा अभ्यास म्हणजे क्रांतिविज्ञानाचा अभ्यास. मार्क्‍स, लेनिन, माओ या साऱ्यांचे विचार प्रत्यक्ष जनव्यवहारात कसकसे फसले, हा काळ गोपुंनी पाहिला. महाराष्ट्रीय संतांचे क्रांतिविज्ञान कोणते, याचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. चाणक्य विष्णुगुप्त आणि रामदास यांच्यातील साम्यस्थळे या शोधामुळे गोपुंना दिसली, पण तुकारामांचे आणि एकनाथांचे ऐहिकपणही अवचित दिसले. संतांचे हे क्रांतिविज्ञान दलित साहित्याकडे आस्थेने पाहण्यासाठी आणि प्रसंगी चार खडे बोल दलित साहित्यिकांना – त्यांच्याच व्यासपीठावरून – सुनावण्यासाठी गोपुंना उपयोगी पडले. एकीकडे गोपु डावे म्हणजे आमचेच म्हणत त्यांच्याबद्दल ममत्व, ते किती श्रेष्ठ नाटककार असा निराधार अभिमान आणि दुसरीकडे चीनबद्दलची त्यांची स्वच्छ मते ऐकून यांना राष्ट्राभिमानच कसा काय नाही, असे विचारणाऱ्या उजव्यांकडून तिरस्कार, ही टोके मध्यमवर्गीय सुमारबुद्धीने गाठली होती. त्या टोकांना टाळत गोपु अभ्यासमार्गावर कायम राहिले. ‘वितंडा’ म्हणजे प्रश्न आणि प्रतिप्रश्न उपस्थित करून रूढ समजांना आव्हान देण्याची कृती. हा शब्द गोपुंनीच प्रचारात आणला आणि वितंडा हे विद्वानाचे कर्तव्यच ठरते, अशा निर्णयपूर्वक भूमिकेतून अनेकांना, अनेकदा सुनावले. फुले, विनोबा आणि सावरकर या तिघांच्या विचारांची चर्चा करणारे ‘द वर्ल्ड ऑफ  आयडियाज इन मॉडर्न मराठी’ हे पुस्तक अशा वितंडापूर्ण लिखाणाचे उत्तम उदाहरण. हीच वितंडा नाटकांत मात्र अवघ्या एखाद्या कटाक्षातून अथवा ‘..हं!’सारख्या एखाद्याच उद्गारातून किंवा निव्वळ ‘काही क्षण शांतता’ अशी सूचना कंसात देऊन समोरचे पात्र विषयच बदलते आहे असे दाखवण्याने निर्माण होते, याचे अप्रूप गोपुंना असावे.
गोपुंचा आणखी एक शब्द – भुरळभोग! गोपुंनी अध्येमध्ये कविताही लिहिल्या, त्यापैकी एकीचे ते शीर्षक. इत्यादी इत्यादी कविता या त्यांच्या एकमेव काव्यसंग्रहातल्या अनेक कविता ‘ती’बद्दलच्या असून नीतिमान संयम पाळणाऱ्या आहेत. स्त्रीचे बुद्धिमान, आदरणीय रूप पाहायचे असल्यास हा संग्रह वाचावा. गोपुंची सर्व नाटकेदेखील स्त्रीचे चित्रण अशाच प्रकारे करणारी आहेत. त्यांची नायिका एक तर तल्लख बुद्धीची किंवा इतकी सहनशील की तिच्यात हा समंजसपणा आला कुठून असा प्रश्न पडावा. ‘मलाच स्त्री कळली नाही, माझ्या पात्रांनाही समजत नाही,’ असे गोपुंनी एकदा म्हटले होते, ते निव्वळ टाळ्यांसाठी नव्हे. गोपुंच्या नाटकांतील पुरुष पात्रे नाटककाराने ठरवल्याप्रमाणे वागतात परंतु स्त्रियांमध्ये मात्र उमेद, आशा, तडफ यांची चमक असते आणि ही चमक कुठे जागी होते यावरच गोपुंच्या अनेक नाटकांची कथानके अवलंबून आहेत.
अभिनवगुप्त ते आगरकर आणि आळेकर, भास ते ब्रेख्त असे कैक काळ, त्या काळांमधल्या कैक वैचारिक ऊर्मी गोपुंनी अभ्यासल्या होत्या. त्या ऊर्मीकडे गोपु साकल्याने पाहू शकत होते. मुद्दामहून दुरान्वयाचे अवतरण निबंधाच्या प्रारंभी देणे आणि मग त्याची संगतीही लावून दाखवणे हा अठराव्या शतकापासूनचा प्रबोधनी खेळ गोपुही तरबेजपणे खेळत, ते या चतुरस्र वाचनामुळे. केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज या आदल्या पिढीच्या कवींनी आणि देवलांपासून अत्र्यांपर्यंतच्या नाटककारांनी मराठी मनावर काय संस्कार केले आहेत याची पुरेपूर कल्पना गोपुंना होती. कोणत्याही काळाचे नाते वर्तमानाशी असू शकते, यावरचा विद्यापीठीय विश्वास गोपुंकडे प्रचंड होता. साहजिकच जोतिबा फुले यांच्यावरील गोपुंचे नाटक अधिक आजचे झाले. ‘चाणक्य विष्णुगुप्त’सारख्या नाटकात वेदांतील ऋचांपासून बौद्ध धर्मप्रसारापर्यंत अनेक संदर्भ येत असले, तरी गोपुंनी नेहरूंसारख्या पोशाखातला निवेदक मध्ये आणला आहे. गोपुंची अन्य नाटके कुठल्या का होईना, वर्तमानकाळात घडतात. पण ‘चाणक्य’मध्ये ती सोय नाही. इथे प्रेक्षकांना भूतकाळच आठवणार, म्हणून हा निवेदक गोपुंनी आणला. त्या निवेदकाचे नाव द्रष्टा. विद्वान स्वत: नायक नसतो, तो फक्त निवेदक असतो, हे गोपुंना उमगले होते. साहित्यपरंपरांचा अभ्यास आणि शब्दकळा चोख असूनदेखील आपण मराठी साहित्याच्या मुख्य धारेत मोजले नाही गेलो तरी बेहत्तर अशी ईर्षां एरवी गोपुंकडे आलीच नसती. अशा निवेदकाची भूमिका आपल्याला निभावायची आहे.. मग ती विद्यापीठात असो, ईपीडब्ल्यू साप्ताहिकात सलग ३० वर्षे केलेल्या लिखाणात असो की मराठीतील नाटय़लेखन वा समीक्षेत असो, हे गोपुंना समजले होते. हा निवेदक ‘द्रष्टा’ हवा, हे त्यांनी एकदाच, तेही आडून सांगितले आणि पुन्हा क्रांतिविज्ञानाचा मागोवा घेण्यात ते गढून गेले. हे गढणे आता निमाले, आणि निवेदकाचे द्रष्टेपणही सरले.