माणसे खेळ खेळतात, याचे सर्वात महत्त्वाचे एक कारण हे की, खेळातून माणसाच्या मनातील आदिम भावनांचा निचरा होतो. माणूस सुसंस्कृत बनण्यास त्यातून मदत होते. मात्र अ‍ॅशेस क्रिकेट मालिकेत विजय मिळविल्यानंतर त्या उन्मादात खेळपट्टीवरच लघुशंका करणारे इंग्लंडचे क्रिकेटपटू पाहिल्यानंतर खेळ माणसाला सुसंस्कृत बनविण्यास साह्य़भूत होतात, या गोष्टीवर लहान मूलही विश्वास ठेवणार नाही. ऑस्ट्रेलिया हा इंग्लंडचा पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ. त्याच्याविरोधात अ‍ॅशेस मालिकेत विजय मिळविल्यानंतर इंग्लंडच्या संघास परमानंद होणे स्वाभाविक होते. त्यांनी तसा आनंदोत्सव साजराही केला. त्यात काहीही गैर नाही. गैर होते ते त्या भरात त्यांनी क्रिकेटच्या मैदानात, तेही चक्क खेळपट्टीवर जे कृत्य केले ते. हे क्रिकेटचे मैदानही साधेसुधे नव्हते. अ‍ॅशेस मालिकेसाठी ज्याला पंढरी मानतात ते हे ‘ओव्हल’ मैदान. त्यावर लघुशंका करून इंग्लंडच्या त्या खेळाडूंनी या खेळाबरोबरच आपल्या देशाची प्रतिमाही डागाळली आहे. क्रिकेटच्या अतिव्यापारीकरणामुळे या खेळात ज्या प्रकारच्या प्रवृत्ती शिरल्या आहेत, त्यांच्याकडून खरे तर कोणत्याही सुसंस्कृतपणाची अपेक्षा करणेच चूक आहे. आज कोणत्याही दोन संघातला सामना- मग तो भारत आणि पाकिस्तानमधील असो की इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील असो- एखाद्या धर्मयुद्धाप्रमाणेच खेळला जातो. हे कशामुळे घडते? ज्या खेळातून खिलाडूवृत्तीची जोपासना व्हावी, त्यातून खेळाडूंच्या आणि प्रेक्षकांच्याही मनात ‘जिहादी’ मानसिकता निर्माण व्हावी, हा अत्यंत रोगट प्रकार आहे. रोमन साम्राज्यात नागरिकांना भुलविण्यासाठी ग्लॅडिएटर्सचे हिंसक खेळ आयोजित केले जात असत. क्रिकेट हा आजच्या युगातील त्याच प्रकारचा खेळ बनविण्यात आला आहे. इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस मालिका सुरू होण्यापूर्वीच दोन्ही देशांच्या ज्येष्ठ खेळाडूंप्रमाणेच संघटकांकडूनही एकमेकांच्या कुरापती काढल्या जातात. त्या अनेकदा वैयक्तिक शेरेबाजीपर्यंतही पोहोचतात. एकमेकांना डिवचण्याचेही सतत प्रयत्न केले जातात. ही असंस्कृतता म्हणजेच किलर इन्स्टिंक्ट अशी काहीशी विचित्र लोकभावना तयार झालेली आहे. वस्तुत: या सामन्यात विजय मिळाला म्हणजे इंग्लंडने तीर मारला असे नाही. अनेक अनुभवी खेळाडूंनी निवृत्ती स्वीकारल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ कमकुवत झाला आहे. तेव्हा अ‍ॅशेस मालिकेत घरच्या मैदानावर इंग्लंडचे वर्चस्व राहणार हे आधीच निश्चित झाले होते. तरीही आपण ऑस्ट्रेलियाची जिरविली या आनंदात इंग्लंडच्या खेळाडूंनी शेवटची कसोटी संपल्यानंतर ‘ओली पार्टी’ केली आणि नंतर त्यांनी ‘तो’ प्रकार केला. आपल्या देशातील अनेक खेळाडू मैदानाला नमस्कार करूनच आत प्रवेश करतात. हा संस्काराचा भाग झाला. तो इंग्लंडमधील खेळाडूंकडून अपेक्षितही नाही. परंतु सभ्यपणाच्या संस्कारांची तरी त्यांच्याकडून अपेक्षा होती. तिचा त्यांनी भंगच केला. इंग्लंडमध्ये स्पॉटफिक्सिंग करणाऱ्या अन्य देशांमधील खेळाडूंवर बंदीची कारवाई झाली आहे. इंग्लंडच्या खेळाडूंनी केलेले गैरवर्तन हा स्पॉटफिक्सिंगइतका गंभीर गुन्हा नाही. पण तो खेळाला काळिमा फासणारा प्रकार आहे. या घटनेबद्दल प्रसारमाध्यमांनी जे रान उठविले त्यामुळे या खेळाडूंवर कारवाई होईलही. पण म्हणतात ना, थेंबाने जे गेले ते हौदाने भरून येत नाही. या घटनेमुळे क्रिकेटच्या सभ्यपणाची ‘वावडी’ एकदाची विरली ती पुन्हा कधीही उठणार नाही.