अहिंसक भूमीतून नवनरेंद्राच्या सहिंसक राजकीय विजयरथाचे राजधानीकडील कूच आणि राहुलबाबांची वाह्य़ात मुक्ताफळे ऐकूनही स्थितप्रज्ञ राहणारे पंतप्रधान सिंग, अशा दोन विरोधाभासी घटनांची आठवण मागे ठेवून यंदाची गांधी जयंती साजरी झाली..
परदेशी मान्यवर नसतानाही राजघाटावरील लगबगीचा दिवस म्हणजे गांधी जयंती. कोणा अलाण्याफलाण्या देशाचे अध्यक्ष, पंतप्रधान वगैरे कोणी भारतभेटीवर आले की पुष्पांजली वाहण्यासाठी राजघाटावर येतात. आलेला पाहुणा फारच मोठा असेल तर तो एखादे रोपटेबिपटेही लावतो. परंतु भारतीय पंतप्रधानांनीच राजघाटावर यायचा मुहूर्त गांधी जयंतीचा. सर्व श्वेतवस्त्रांकित मान्यवरांचा मेळावाच या दिवशी राजघाटावर भरतो. वैष्णव जन तो तेणे कहिये..ची मंद सुरावट राजघाटाच्या कृत्रिम हिरवाईत मिसळून जाते. तरी हल्ली निर्मलाताई देशपांडे नाहीत. पूर्वी या दिवशी मान्यवरांच्या स्वागतास त्या हजर असत. पाच वर्षांपूर्वी त्या गेल्या. राजघाटावर आदराने घेतले जाणारे मान्यवर मराठी नाव त्यानिमित्ताने कमी झाले. ते एक असो. तर या दिनाच्या निमित्ताने वर्तमानपत्रे पुन्हा एकदा गांधींबाबत एखादा राहून गेलेला मुद्दा मांडणारा कोणी हरीचा लाल आहे का याचा शोध घेतात, टीव्ही वाहिन्या गांधी अभ्यासक, चरित्रकार, कलाकार, चित्रपट निर्माते आदींपैकी कोणास पकडून गांधीविचार आजही कसा लागू आहे वगैरे वगैरे चर्चा घडवून आणतात. तेही तसे योग्यच. पण गांधीविचारांचा ज्यांच्या जगण्याशी काहीही संबंध नाही वा असलाच तर रुपयाच्या नोटेवरील चित्रापुरताच असा बराच मोठा वर्ग आजपर्यंत गांधी जयंतीची वाट पाहायचा तो दोन कारणांसाठी. पहिले अर्थातच सुटी. पितृपंधरवडा, नवरात्र यांच्या आसपास २ ऑक्टोबर असतो. त्यामुळे सणासुदीच्या तयारीसाठी ही सुटी तशी कामी येत असते. आणि दुसरे कारण म्हणजे यानिमित्ताने खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून सुती कपडय़ांवर भरघोस सवलती जाहीर होत असत. त्यामुळे एरवी स्मशानशांतता जिथे सुखाने, आनंदाने नांदते, त्या खादी आणि ग्रामोद्योग केंद्रांच्या दुकानांत जरा चार माणसे दिसत. एरवी या दुकानातील उत्पादनांकडे ब्रिटिश अधिकारी नेटिवांकडे ज्या नजरेने पाहात, त्या नजरेने पाहणाऱ्या वर्गाची पायधूळ यानिमित्ताने या दुकानांत झडे. परंतु मध्यम वर्गास उपलब्ध असणाऱ्या मर्यादित सुखांच्या यादीतील असलेले हे सुख केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी अचानक काढून टाकले. परिणामी आता गांधी जयंतीचा आनंद आणि समाधान फक्त सुटीतच शोधावे आणि भागवावे लागते. तर अशा तऱ्हेने गांधी जयंतीचा सरकारी सण पारंपरिक आनंद आणि उत्साहात साजरा होत असतो. यंदाही तो झाला. यंदा या सणाचे वैशिष्टय़ दोन विरोधाभासांत सामावले गेले.
एक म्हणजे महात्मा गांधी यांच्या अहिंसक भूमीतून नरेंद्राने राष्ट्रीय राजकारणात मारलेली मुसंडी. गांधी यांच्याप्रमाणे हा नवनरेंद्रही गुजरातचा. त्या अर्थाने गुजराथी. त्यामुळे व्यवहारात चोख. काय दिले की परकीयांकडून काय मिळवता येते याचे समीकरण महात्मा गांधी यांच्याप्रमाणेच या नवनरेंद्राच्या मनातही स्पष्ट. परंतु याचे वैशिष्टय़ हे की स्वकीयांकडून काय मिळवायचे आणि त्या बदल्यात काय द्यायचे याचे गणितही त्यास अवगत. पुरावाच हवा असेल तर लालकृष्ण अडवाणी तो बख्खळ देतील. वयाच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यालाही अर्धदशक झाल्यानंतर अडवाणींचा वारू पुढील निवडणुकांत उधळण्यासाठी फुरफुरत होता. त्यास या नवनरेंद्राने ठाणबंद केले. आता तबेल्यातल्या तबेल्यात अडवाणी नाराजी, धुसफुस आदी व्यक्त करतात. परंतु अशा वेळी पाय लागो लालजी.. असे म्हणत त्यांना जाहीर नमस्कार केला की गडी शांत होतो याची या नवनरेंद्रास कल्पना आहे. मोहनदास करमचंद गांधी यांची ही जन्मभूमी त्यांच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानासाठी जगभरात ओळखली गेली. त्या अहिंसक भूमीतूनच नवनरेंद्राचा सहिंसक राजकीय विजयरथ यंदाच्या वर्षांतच दिल्लीच्या दिशेने कूच करीत निघाला. मोदी असे आडनाव लावणाऱ्या या नवनरेंद्राच्या रथाचा झंझावात इतका की भल्याभल्यांच्या डोळ्यांत त्यामुळे धूळ जाऊन त्यांस खरेखोटे कळणे मुश्कील झाले. परमेश्वर कृष्णाला रणछोडदास अशा नावाने पुजणाऱ्या गुर्जर बांधवांनी इतकी आक्रमकता त्यांच्या जन्मात पाहिली नव्हती. जे कधी पाहिले नाही ते अनुभवायला मिळाले की व्यक्तीत एक प्रकारचा चेव येतो आणि आपण असेच असावयास हवे असे त्यास वाटू लागते. परिणामी ठिकठिकाणच्या गुर्जर बांधवांसाठी नरेंद्र मोदी हे अनुकरणीय ठरू लागले. दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या हिराबाजारात जे काही झाले त्यावरून याचीच प्रचीती यावी. तेथे समारंभस्थळी जमलेले समस्त शहा, मेहता, वीरजी किंवा अन्य तत्सम महाजन या नवनरेंद्राची पायधूळ मस्तकी धारण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत होते. त्यांचेही तसे बरोबरच. धर्माला ग्लानी आली की कोणत्या ना कोणत्या रूपात मी प्रकटतो असे साक्षात भगवान श्रीकृष्णाचे वचन नवनरेंद्राच्या रूपाने पूर्ण होत असल्याचे तुपाळ समाधान त्यांच्या चेहऱ्यांवरून घामाच्या धारांमध्ये मिसळून ओघळत होते, ते त्यामुळेच. तेव्हा या गांधी जयंतीचा हा सर्वात मोठा विरोधाभास. न जाणो तो पूर्णत्वास गेलाच तर पुढील गांधी जयंतीस राजघाटावरील अग्रपूजेचा मान या नवनरेंद्रास मिळेल.
दुसरा विरोधाभास त्याहूनही अधिक मोठा. ज्या भूमीने देशाला एकापेक्षा एक तगडे योद्धे दिले, ज्यांच्या केवळ नावानेच शत्रू गर्भगळीत होत, पापी चळाचळा कापत आणि ज्यांनी आपल्या सत्यसाधनेसाठी हिंसा त्याज्य मानली नाही त्याच भूमीतून सर्व शस्त्रे म्यान करण्यात कोणताही कमीपणा न मानणारा मनमोहन सिंग नावाचा नेता निपजतो हा निसर्गाचा थोर चमत्कारच. गुरू नानक असोत वा गुरू गोविंदसिंग. त्या भूमीतील कोणाही सुपुत्राने अधर्माचा सामना निधडय़ा छातीने केला. परंतु मनमोहन सिंग यांची गोष्टच वेगळी. दूरसंचारमंत्री ए राजा असोत वा राष्ट्रकुलदीपक सुरेश कलमाडी वा अन्य कोणी. मनमोहन सिंग यांनी या सर्वाच्या अ वा कुधर्मी कृत्यांनाच धर्मकृत्ये मानले. त्यामुळे अधर्माचा विनाश करण्याचा नवाच मार्ग जगास मिळाला. हिंसकाची हिंसा हीच अहिंसा आहे असे मानणे सुरू केले की कोणीच हिंसक राहत नाही, तसेच हे. अधर्मालाच धर्मकृत्य मानायची सवय केली की प्रश्नच मिटतात. ते या सिंग यांना जमले. ज्या पंजाबच्या मातीने अधर्माचा मुकाबला करण्यासाठी प्रसंगी हिंसेचा आधार घेण्यात धन्यता मानली त्याच भूमीने अधर्मीयांचा शेजारी बसून गौरव करणारा मनमोहन सिंग हा संतसज्जनदेखील दिला. भावनेचे अत्यंत उत्कट, प्रसंगी उद्दाम असे प्रदर्शन हे एरवी पंजाबपुत्र नरवीरांचे वैशिष्टय़. परंतु मनमोहन सिंग यांचे कवतिक हे की त्यांनी तेच आपल्यातून काढून टाकले. हे ज्यास जमते त्यास आध्यात्मिक पातळीवर स्थितप्रज्ञ असे म्हणतात. म्हणजे सुख असो वा दु:ख. या भावनांच्या हाती मनाचे नियंत्रण न देता, आपल्याला काहीही लागू न देता या सगळ्याकडे पाहणे. त्यामुळे मंत्रिमंडळातील कोणाही सहकाऱ्याने काहीही उद्योग केला तरी आपला जणू त्याच्याशी संबंधच नाही, अशा नजरेने पाहण्याची कला मनमोहन सिंग यांनी स्वत:त विकसित केली. त्यांची आध्यात्मिक उंची या गांधी जयंतीच्या मुहूर्तावर अशा अवस्थेला पोहोचली की चि. राहुलबाबा गांधी यांची वाह्य़ात मुक्ताफळे ही ‘आगामी पंतप्रधानाचे चिमणे बोल’ आहेत, असे मानण्याइतकी शांतता त्यांच्या मनी नांदू लागली. काल राजघाटावर मनमोहन सिंग हे महात्मा गांधी यांच्या पुण्यस्मृतींना अभिवादन करताना आपल्या पक्षातील या काँग्रेसी अनुयायास जे जमले ते पाहून राष्ट्रपित्यास नक्कीच भरून आले असेल.
म्हणजे अहिंसेचे राजकीय तत्त्वज्ञान मांडणाऱ्याच्या जन्मभूमीतून डरकाळ्या फोडत येणारा नवनरेंद्र आणि वेळप्रसंगी अक्राळविक्राळ ताकदीचे हिंसक प्रदर्शन करण्यास न कचरणाऱ्या मातीतून आलेले काहीही झाले तरी शांतता ढळू न देणारे पंतप्रधान सिंग हा मनमोहन योगायोग कालच्या दिनी महात्मा गांधी यांच्याही लक्षात आलाच असेल. प्रश्न फक्त इतकाच की, समाधीत असले म्हणून काय झाले, इतका विरोधाभास सहन करण्याची ताकद राष्ट्रपित्याच्या त्या अशक्त कुडीत आहे की नाही, हा. आता तरी त्या मोहनदास करमचंद गांधी यांना कळले असेल.. महात्मा होणे तसे अवघडच!
संग्रहित लेख, दिनांक 3rd Oct 2013 रोजी प्रकाशित
महात्मा होणे तसे अवघडच..!
अहिंसक भूमीतून नवनरेंद्राच्या सहिंसक राजकीय विजयरथाचे राजधानीकडील कूच आणि राहुलबाबांची वाह्य़ात मुक्ताफळे ऐकूनही स्थितप्रज्ञ राहणारे पंतप्रधान सिंग,

First published on: 03-10-2013 at 01:26 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gandhi jayanti birth anniversary of mahatma gandhi celebrations