स्वत:च्याच धर्मावर टीका करणाऱ्याला, त्या धर्मातील अंतर्विरोध उघडे पाडून मिथकांचा खोटेपणा सर्वाना सांगणाऱ्याला अनेक आरोपांना सामोरे जावे लागते. धर्माची चिकित्सा करणारा निव्वळ स्वत: अल्पकालीन प्रसिद्धीच्या मागे आहे, इथपासून ते त्याचे हेतूच अनैतिक आहेत, अशा स्वरूपाचे हेत्वारोप करण्यात कोणत्याही धर्मातील श्रद्धावंत मंडळी धन्यता मानतातच, याचा अनुभव जेराल्ड ए. लरू यांना कॅलिफोर्नियातील जवळपास अर्धशतकाच्या वास्तव्यात अनेकदा आला होता. या चिकित्सकाने नुकताच, ९८व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
जेराल्ड हे मूळचे पाद्री. युनायटेड चर्च ऑफ कॅनडाने त्यांना १९४५ साली ख्रिस्तीधर्मीय अधिकारपद दिले. ते त्यांनी १९५३ पर्यंत सांभाळले, पण प्रश्न अधिकच पडू लागले तेव्हा चर्च सोडून धर्माच्या अभ्यासाला त्यांनी पुरातत्त्व संशोधनाची जोड दिली. या बळावर, १९५८ साली दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात बायबलकालीन इतिहास व पुरातत्त्व यांचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. हे विद्यापीठ हीच त्यांची कर्मभूमी. १९१६ साली जन्मलेले जेराल्ड वयाच्या पासष्टाव्या वर्षी (१९८१) निवृत्त होत असताना, याच विद्यापीठाच्या वार्धक्याभ्यास शाखेतील पद त्यांना देण्यात आले. त्याआधीच्या वर्षी स्वेच्छामरणाचा पुरस्कार करणाऱ्या ‘हेमलॉक सोसायटी’चे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती, ते पद त्यांनी १९८८ पर्यंत सांभाळले. २००६ मध्ये वार्धक्यामुळे विद्यापीठाच्या जबाबदाऱ्यांतून ते मुक्त झाले, तरीही डॉर्न्‍सलाइफ कॉलेजने त्यांना तहहयात प्राध्यापकपद बहाल केले होते.
या दीर्घ कारकिर्दीसाठी नव्हे, तर ख्रिस्ती धर्मातील श्रद्धांवर केलेल्या प्रहारांसाठी जेराल्ड महत्त्वाचे ठरले. ‘एन्शंट मिथ अ‍ॅण्ड मॉडर्न मॅन’ (१९७५) या पुस्तकाद्वारे त्यांनी बायबलमधील अनेक कथा कशा भाकड आहेत, हे दाखवून दिले होते. तर, ‘सेक्स अ‍ॅण्ड द बायबल’ (१९८३) या पुस्तकातून त्यांनी बायबलमध्ये उच्चस्थानी मानल्या गेलेल्या काही नैतिक आग्रहांची थेट चिकित्सा केली.  १९९३ मध्ये अमेरिकी चित्रवाणीवर ‘नोहाच्या नौकेचे अवशेष सापडले’ अशी बातमी आली, तेव्हा ‘टाइम’ मासिकात लेख लिहून, हा दावा करणाऱ्या जॉर्ज जमाल यांचा खोटेपणा आपण १९८८ सालीदेखील उघडकीस आणला होताच, तरीही तो का चालू राहतो, यावर सडेतोड भाष्य जेराल्ड यांनी केले.  १० हून अधिक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. मात्र, धर्माची आणि धार्मिक विश्वासांची ‘मानवी सवय’ फार जुनी आहे आणि या चिरपरिचयामुळे पिढय़ान्पिढय़ांच्या विचारशक्तीची काही कवाडे धर्मचिकित्सेच्या बाबतीत बंदच राहतात, हे सत्य त्यांनी अव्हेरले नव्हते.. फक्त ही कवाडे जितकी रुंद उघडता येतील, तितकी उघडण्यासाठी ते प्रयत्नशील होते.