ठिकाण : उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील एक कुग्राम. दौंडिया खेडा. पात्रे : राजाराव रामबक्ष सिंग हा तिथला राजा आणि १८५७ च्या बंडातला योद्धा. शोभन सरकार. त्या परिसरातला बाबा. चरणदास महंत. शरद पवार यांच्या खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री. या शोभन सरकार यांना स्वप्न पडले. स्वप्नच ते. पोट बिघडले तरी पडते! अर्थात हा सामान्यांचा नियम. सरकारला स्वप्न पडत नसते. सरकार स्वप्ने दाखविते. भारत निर्माणाची, इंडिया शायिनगची. येथे मात्र थोडे वेगळे झाले. सरकारनामक बाबाला हजार टन सोन्याचे स्वप्न पडले. त्यांनी ते महंतांना दाखविले. महंत छत्तीसगढचे. त्यामुळे त्यांची खाणीखदानांशी जुनीच जानपहचान. तशात ते पडले केंद्रीय कृषी राज्यमंत्री. त्यामुळे नाही म्हटले, तरी या देशाची धरती सोना उगले, उगले हिरामोती यावर त्यांची नितांत श्रद्धा. त्यापोटी त्यांचाही बाबांच्या सोन्याच्या स्वप्नावर बावनकशी विश्वास बसला. उन्नावच्या गर्भात असे उद्याचा उष:काल, असेही त्यांना वाटून गेले असेल. पण त्यांनी भूगर्भ सर्वेक्षण विभाग आणि भारतीय पुरातत्त्व विभागाला कामाला लावले. आणि सुरू झाली, देशाची पहिली गुप्तधन शोध मोहीम. रात्रीच्या अंधारात खड्डे घेऊन, नरबळी वगरे देऊन गुप्तधनाचा शोध घेण्याची खरे तर आपली पद्धत. पण तिला या वेळी फाटा देण्यात आला. दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या कॅमेऱ्यांसमोर या मोहिमेचे थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे. ज्यांना शक्य झाले, ते त्या मोहिमेचा आँखो देखा हाल जाणून घेण्यासाठी घटनास्थळी गेले. ज्यांना शक्य नव्हते, ते चित्रवाणी संचाच्या पडद्यावरूनच तो सोनेरी खेळ पाहू लागले. बाकीचे म्हणजे तुम्ही-आम्ही, उन्नावला तळ ठोकून बसलेले च्यानेलवाले, झालेच तर शरद पवार, नरेंद्र मोदी आदी यावर वेडय़ांचा बाजार म्हणून टीका करू लागले. साबणातही सोने शोधणारांच्या देशात अशा सरकारी शास्त्रीय उत्खननावर टीका होणे हे जरा अतिच झाले. वस्तुत: यास वेडेपणा म्हटले, तर मग प्रश्न असा उभा राहतो, की आपले सरकार काय वेडे आहे? पुरातत्त्व खात्याचे अधिकारी काय अहमक आहेत? त्यांना खोदकामाचा आदेश देणारे मंत्री काय मूर्ख आहेत? मुळीच नाहीत. गाजराची पुंगी तयार करण्यात हातखंडा असलेल्या आपल्या राजकीय नेत्यांना मूर्खच मूर्ख म्हणतील! उन्नावचा खजिना हीसुद्धा एक गाजराची पुंगीच आहे. वाजली तर सरकारी खजिन्यात दे धनाधन होईल. न वाजली, तर पुरातत्त्व खात्याला किमान काही खापराचे तुकडे तरी सापडतीलच. नुकसान कोणाचेच नाही. मधल्या काळात लोकांच्या डोळ्यांत तेवढाच सोन्याचा धूर जाईल. ज्याची आपली ओळखही नाही अशी व्यक्ती कौन बनेगा करोडपतीमध्ये मालामाल होते आणि आपण आपल्या बाजल्यावर बसून कौतुकाने टाळ्या पिटतो. त्या वेळच्या आनंदाची, औत्सुक्याची जातकुळी आपणास या सोनेशोधाकडे टक लावून पाहात असलेल्या गर्दीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. सरकारनामक सत्तायंत्रणेला आणखी काय हवे असते? तुम्ही टीव्हीवर मालिकांचे ताजमहाल पाहा, जाहिरातींमधून स्वप्नांचे कुतुबमिनार पाहा, सोन्याचा शोध पाहा, नेत्यांचे कलगीतुरे पाहा आणि सुखी राहा, आनंदी राहा. हाच या सगळ्या गोष्टींचा अंतिम उद्देश असतो. मतदारराजासाठी नेहमीच असे सुवर्णमृग उभे केले जातात. त्यातलाच हा एक प्रकार. उन्नावच्या सुवर्णशोध मोहिमेचा अर्थ इतकाच आहे, चोवीस कॅरेट स्पष्ट!