येत्या लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी योग्य नाव असून त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षात काम करताना आपल्याला आनंदच होईल, असे विधान पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी गेल्या महिन्यात केले, तेव्हाच आगामी निवडणुकीत ते स्वत: काँग्रेस आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नसणार हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे, निवडणुकीनंतर केंद्रात सत्तेवर येणारे सरकार हे तरुणांचे सरकार असेल असे काँग्रेस महासमितीचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीर केल्यानंतर राजकारणाच्या वर्तुळाला फारसा धक्का बसलेला नाही. मनमोहन सिंग हे काँग्रेसमधील अन्य नेत्यांसारखे आक्रमक स्वभावाचे आणि मुळातच, राजकारणी व्यक्तिमत्त्वच नसल्याने, पक्ष आणि सरकार असा उभा संघर्ष आपल्या कारकिर्दीत ते होऊ देणार नाहीत, हेही त्यांच्या पदावरील पहिल्या दिवसापासूनच स्पष्ट होते. शिवाय, काँग्रेसी सत्ताकारणात पक्षसंघटनेच्या विरोधात संघर्ष करण्याची प्रथादेखील नाही. त्यात, गांधी-नेहरू घराणे हा तर काँग्रेसच्या अस्तित्वाचाच आधारस्तंभ असल्याने, त्यांनी बोलावे आणि पक्षाने चालावे ही तर रीतच होऊन राहिली आहे. दोषी ठरलेल्या लोकप्रतिनिधींच्या संदर्भातील अध्यादेश सरकारने काढल्यानंतर तो तद्दन मूर्खपणा आहे, असे रोखठोक मत राहुल गांधी यांनी व्यक्त केल्यानंतर पक्षातच नव्हे, तर सरकारातही वादळ उठले. मात्र नंतर हे आपले व्यक्तिगत मत आहे, असे राहुल गांधी यांनी बजावून सांगूनदेखील पक्षाला आणि सरकारला त्यांच्या व्यक्तिगत मतापुढे झुकावे लागले. डॉ. मनमोहन सिंग यांनी तर राहुल गांधी यांचे नेतृत्व अगोदरच स्वीकारलेले असल्याने, ही कृती स्वाभाविकच होती. अपेक्षेनुसार तसे घडल्यानंतर राहुल गांधी हे काँग्रेसचे सर्वेसर्वा नेते असल्याचे सिद्ध होताच, आगामी निवडणुकीनंतरच्या सरकारचे चित्र रंगविण्याचा संपूर्ण अधिकार त्यांचाच राहतो, हेही स्पष्ट आहे. निवडणुकीनंतर काँग्रेसला सत्ता मिळाली, तर आगामी सरकार तरुणांचे असेल असे सांगून एका वाक्यातच राहुल गांधी यांनी आजवरच्या अनेक चर्चा आणि अंदाजांना पूर्णविराम दिला आहे. पहिली गोष्ट म्हणजे, काँग्रेसला सत्ता मिळाली तर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळातील पन्नाशी पार केलेल्या ६२ मंत्र्यांच्या खुच्र्या आजच डळमळीत झाल्या आहेत, आणि आगामी निवडणुकीनंतरच्या काँग्रेसी सत्ताकारणात मनमोहन सिंग यांचे स्थानही स्पष्टपणे अधोरेखित झाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांत काँग्रेसप्रणीत आघाडी आणि भाजपप्रणीत रालोआ यांचा थेट सामना होणार हे चित्र आता स्पष्ट झाले आहे. कारण, तिसऱ्या आघाडीचे चित्र निवडणुकीनंतरच्या निकालावर अवलंबून आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या आक्रमक राजकारणाची देशातील तरुण वर्गाला सर्वाधिक मोहिनी असल्याचे दिसू लागल्याने काँग्रेसच्या निवडणुकीचे नेतृत्व करण्यासाठी वयोवृद्ध नेत्यांचा चेहरा कुचकामी ठरेल, हे ओळखून राहुल गांधी यांच्या रूपाने नवी नीती देशासमोर मांडण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहेत. गेल्या निवडणुकीतही पक्षांच्या वयोमानाच्या मुद्दय़ावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली होतीच. या वेळी नरेंद्र मोदी हाच मुद्दा पुन्हा निवडणुकीच्या रणात आणणार हे ओळखून हा वाद धूर्तपणे अगोदरच निकालात काढून काँग्रेसने यंग इंडियाचा मुद्दा भाजपकडून हिरावून घेतला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Oct 2013 रोजी प्रकाशित
सरकार ‘तरुण’ होणार!
येत्या लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी योग्य नाव असून त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षात काम करताना आपल्याला आनंदच होईल,

First published on: 11-10-2013 at 12:27 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govt of youth will come to power