मोदी मंदिरे बांधण्याऐवजी शौचालये बांधा असे सांगतात, तेव्हा ती केवळ माताभगिनींना शौचालयांअभावी जे भोगावे लागते त्याविषयीची तळमळ नसते, की तरुण श्रोत्यांसमोर केलेले अवसरविनोदनही नसते. ते धोरणांतील बदलांचे द्योतक असते.
चेन्नै एक्स्प्रेस नामक शतकोटवर्गीय चित्रपटामध्ये ती मीन्नम्मा नामक बाला ‘कजरा रे’च्या चालीवर ‘तू जा रे तू जा रे, तू शौचालय में जा रे’ हे गीत मोठय़ा झोकात म्हणताना दाखवली आहे. ते ऐकून अनेकांच्या पोटात वातगोळा उठला, असे म्हणतात! ते बरोबरच आहे. अखेर आपल्या कानांनाही काही सवयी लागलेल्या असतात. सुंदर तरुणीच्या मुखातून आलेला शौचालय हा शब्द कानांमध्ये कसेसे करणारच. म्हणून तर आपल्याकडील भद्रलोक कधी शौचालय वा संडासला जातो, असे म्हणत नसतात. ते बहिर्दिशेस जातात. परसाकडे जातात. शहरी साहेब टॉयलेटला जातात. जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या क्रियांची लाज बाळगणे यालाच सुसंस्कृतता म्हणतात की काय कोण जाणे, परंतु त्यामुळे उगाच अशा शब्दांना समाजसेन्सॉरची कात्री लागली आहे. शाब्दिक पर्यावरणाचा परिणाम वास्तवावर कसा आणि किती होतो, हा संशोधनाचा विषय आहे. परंतु जनगणनेच्या ताज्या अहवालानुसार देशातील २४ कोटी ६६ लक्ष घरांपकी निम्म्याहून अधिक, ५३.१ टक्के घरांमध्ये शौचालयांची सुविधा नसावी आणि त्याच वेळी ६३.२ टक्के घरांमध्ये मात्र दूरध्वनी असावेत, ही आकडेवारी या विषयावर बरेच काही बोलून जाते. शौचालयांहून मोबाइल अधिक हे काही निरोगी विकासाचे चिन्ह नाही. म्हणूनच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी देवालयाच्या आधी शौचालय बांधावे असा जो ‘गांधीवादी’ संदेश दिला आहे त्याचे स्वागतच केले पाहिजे.
 तशी ही नवी गोष्ट नाही. आधी पोटोबा, मग विठोबा असे आपल्या पूर्वसुरींनी म्हणूनच ठेवले आहे. भाजपच्या नवनरेंद्रांनी त्याचीच री ओढली, असे म्हणता येईल. अखेर पोट भरण्याइतकेच ते व्यवस्थित रिकामे होणे ही गोष्ट आयुर्वेदानेही महत्त्वाची मानली आहे. पुरीष आणि मूत्राचे यथासांग विरेचन होत नसेल, तर ते विविध रोगांस आमंत्रणच ठरते, असे आयुर्वेद सांगतो. तेव्हा हा पोटोबाही महत्त्वाचा. नवनरेंद्रांनी आणि त्यांच्याही आधी काँग्रेसच्या जयराम रमेशांनी तेच सांगितले होते. जयराम यांनी तर भावनेच्या भरात शौचालयास मंदिरांहून अधिक पावित्र्य बहाल केले होते. त्याचा मथितार्थ असा, की देहमंदिर स्वच्छ असेल, तरच मग पुढच्या कर्मकांडांना महत्त्व. राज्य सरकारने मध्यंतरी मोठय़ा उत्साहाने हागणदरीमुक्त गाव योजना राबवली होती. हे सगळे संत गाडगे महाराजांच्या परंपरेशी नाते जोडणारे आहे. गाडगेबाबांनी आपली उभी हयात लोकांना आत्मिक, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात व्यतीत केली. पण आम्ही मुळचेच करंटे. आम्ही गाडगेबाबांचीच मंदिरे बांधली आणि गावखेडय़ांच्याच नव्हे, तर शहरांच्याही हागणदऱ्या केल्या. हे चित्र बदलावे म्हणून जयराम रमेश यांनी हाक दिली. ज्या घरात शौचालय नसेल, त्या घरात लग्न करू नका, असे आवाहन त्यांनी तरुणींना केले. तर हिंदू सनातन्यांनी त्यांच्या गंड आणि सवयीनुसार, हा आमच्या धर्मावर हल्ला आहे. िहमत असेल, तर मंदिरांऐवजी शौचालयांची तुलना मशिदींशी करून बघा, असे वाह्यात आव्हान त्यांना आपापल्या मुखपत्रांतून दिले. सनातन्यांचा हा वैचारिक बद्धकोष्ठ समजण्यासारखा आहे. तेव्हा नवनरेंद्रांवर प्रवीण तोगडियांसारख्या वाचाळवीरांनी केलेली टीका फार गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. एक मात्र खरे, की नवनरेंद्रांनी ‘आधी शौचालय, मग देवालय’ असे विधान करून रा. स्व. संघ आणि भाजपची ‘सांगताही येईना आणि सहनही होईना’, अशी केविलवाणी अवस्था करून ठेवली आहे.
परंतु हा केवळ शौचालयापुरता मर्यादित मुद्दा नाही. मोदी यांच्यासारखा हिंदुत्ववादी नेता, जो पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवारही आहे, तो जेव्हा मंदिरे बांधण्यावर लाखो रुपये खर्च करण्याऐवजी शौचालये बांधा असे सांगतो, तेव्हा ती केवळ माताभगिनींना शौचालयांअभावी जे भोगावे लागते त्याविषयीची तळमळ नसते, की तरुण श्रोत्यांसमोर केलेले अवसरविनोदनही नसते. ते धोरणांतील बदलांचे द्योतक असते. राममंदिर हा भाजपच्या प्रचारातील रामबाण मुद्दा आहे. सध्या तो भाताबंद आहे. परंतु भाजपची मातृसंघटना असलेला रा. स्व. संघ मात्र तो विसरण्यास तयार नाही, हे वारंवार दिसून आले आहे. हा मुद्दा आपण त्यागल्यास तो हिंदुत्ववादी राजकारणावरील मोठा कलंक ठरेल हे जाणण्याचा धोरणीपणा संघनेतृत्वाकडे निश्चित आहे. म्हणूनच संघाने कुंभमेळ्यात जाऊन राममंदिर हा देशाच्या अस्मितेचा मुद्दा आहे, अशी गर्जना करायची, विश्व हिंदू परिषदेने चौरासी कोसी यात्रा काढून तो मुद्दा पेटता ठेवायचा आणि भाजपने मात्र मंदिर उभारणीच्या आश्वासनपूर्तीआड आघाडीचे राजकारण येते असे म्हणत तो बाजूला ठेवायचा, असे राजकारण सातत्याने सुरू असते. मंदिर ही भाजपची प्राथमिकता नाही, असे मात्र कोणीच म्हणत नसते. परंतु मोदी यांनी आता निवडणुकीच्या तोंडावर तोच संकेत दिला आहे. आपण ही निवडणूक विकासाच्या प्रश्नांवरच लढविणार हे ते वारंवार सांगत असतात. याचा अर्थ ते हिंदुत्वाला तिलांजली देणार असा नाही. याचा अर्थ एवढाच आहे, की देशातील जनतेला, खास करून तरुणाईला राजकारणातील धर्मवादी विचारधारांचे आवाहन भिडेनासे झाले असल्याचे मोदी यांच्या नीटच लक्षात आले आहे. आणि त्याचा दुसरा अर्थ असा, की मंडल आणि कमंडल या संघर्षांत कमंडल डळमळीत झाले आहे.
 एकंदर मोदी यांनी आपल्या वक्तव्यातून आगामी निवडणुकीची ‘बहिर्दिशा’च स्पष्ट केली आहे. अनेकांना याचे आश्चर्य वाटते, हिंदुत्ववाद्यांना त्याचा खेदही वाटत असेल, परंतु मोदी हे सातत्याने गांधीजींचे नामस्मरण करत असतात. ते काही गांधी संघाला प्रात:स्मरणीय आहेत म्हणून नव्हे. हा महात्मा किती उंचीचा राजकारणी होता, हे मोदी यांनी नक्कीच ताडले आहे. त्यांच्या अलीकडच्या प्रत्येक राजकीय कृतीतून ती जाणीव दृग्गोचर होत असते. मिठाचा सत्याग्रह हा जसा नुसताच कर रद्द करण्यापुरता उरत नसतो, तो ब्रिटिश सत्तेचा पाया डळमळीत करण्याचा प्रयत्न बनतो. त्याचप्रमाणे शौचालयाचा मुद्दा हा केवळ शौचालयाचा राहत नाही, तर तो देशाच्या विकासशून्यतेचा, सरकारी अकार्यक्षमतेचा मुद्दा बनतो हे मोदी यांनी जाणले आहे. प्रत्येक गोष्ट, अगदी मलविसर्जनाची व्यवस्थाही सरकारनेच करावी, अशा लोकांच्या अपेक्षा असतात. कल्याणकारी राज्यव्यवस्थेचा स्वीकार करण्याचा हा दुष्परिणाम मानला, तरी हे वास्तव आहेच. जनतेच्या अशा अपूर्ण अपेक्षांचाच योग्य वापर करून मोदी ही निवडणूक लढविणार, हे त्यांच्या वक्तव्यांतून दिसते आहे. तेव्हा मुद्दा देशाचा किती विकास झाला असा असणार नाही, तर किती व्हायचा राहिला असा असणार आहे. देशातील ४६.९ टक्के लोकांच्या घरांमध्ये शौचालये आहेत. उरलेल्यांतील ३.२ टक्के लोक सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात. हे ठीकच आहे. पण बाकीचे ४९.८ टक्के लोक उघडय़ावर बसतात त्याचे काय, असा हा प्रश्न असणार आहे. मंदिरांचा मुकाबला करणे सोपे. पण पोट रिकामे करण्याच्या व्यवस्थेचे आव्हान कसे पेलणार, हा आता काँग्रेसपुढचा प्रश्न राहणार आहे आणि ते आव्हान पेलण्याचा मार्ग शोधला, तरी लगेच दुसरा प्रश्न उभा राहणार आहे. तो म्हणजे पोट रिकामे करण्याआधी ते भरावे लागते. त्याचे काय करणार? नवनरेंद्राने काँग्रेसला अगदीच सुलभ कोंडीत पकडले आहे.