जगभरात घेतल्या जाणाऱ्या अत्यंत आव्हानात्मक परीक्षांपैकी एक म्हणून गणल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सनदी सेवा परीक्षांच्या ताज्या निकालांनुसार, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत थोडे कमी असले तरी महाराष्ट्रातून या परीक्षेत सुमारे पाऊणशे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतानाच अन्य बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आयोगानेच अधिकृतपणे जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यंदा ५ लाख ३६ हजार ५०६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या परीक्षेच्या इतिहासातील हा उच्चांक ठरला. १०९२ पदांसाठी सुमारे पावणेतीन लाख विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती. एकीकडे भारताच्या कार्यकारी आणि अमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेबद्दल जनमानसात असणारी नाराजी आणि त्याच वेळी या यंत्रणेत सकारात्मक बदल घडवून आणण्याचे आव्हान स्वीकारण्याची युवाशक्तीची तयारी या निमित्ताने दिसून येते. तसेच पदसंख्या आणि परीक्षार्थी संख्या यांचे गुणोत्तर लक्षात घेता भारतीय युवक-युवती कोणत्याही स्पर्धेस किती कणखर मानसिकतेने सामोरे जातात हेही स्पष्ट होते. या निकालात शास्त्र शाखा, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन क्षेत्राची शैक्षणिक पाश्र्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी होती. खासगीकरणानंतर ‘कॉपोरेट’ क्षेत्रातील संधी, पगाराचे उत्तुंग आकडे आणि आलीशान जीवनशैली यांसारखी आकर्षणे असतानाही व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी या परीक्षांकडे वळताना- यशस्वी होताना दिसत आहेत. नोकरीतील स्थैर्य, समाधानकारक पगार, खासगी क्षेत्राच्या तुलनेत व्यापक अधिकार आणि ‘सिस्टिम’बद्दल असलेली अस्वस्थता योग्य मार्गाने प्रवाहित करण्याची इच्छा, यांचेच हे फलित मानावे लागेल. गेल्या काही वर्षांच्या निकालानंतर प्रामुख्याने पुढे आलेली आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, या परीक्षेत यश मिळवण्याच्या बाबतीत शहरी भागांच्या तुलनेत – विशेषत: महाराष्ट्र राज्याच्या संदर्भाने- ग्रामीण किंवा निमशहरी पाश्र्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांची सातत्याने वाढणारी संख्या. यशस्वी उमेदवारांच्या प्रतिक्रियांवरून हे स्पष्ट होते की, या यशात मेहनतीपेक्षाही प्रेरणेचा वाटा अधिक महत्त्वाचा असतो. आजही ग्रामीण भागात सरकारी अधिकाऱ्याला असलेला मान, सरकारी कार्यालयांचे अधिकारक्षेत्र, सरकारी अधिकाऱ्याला असलेल्या जनसेवेच्या संधी यांचे तेथे राहणाऱ्या उमेदवाराला भानही असते आणि म्हणूनच आकर्षणही. तुलनेने शहरी भागात तरुणांच्या मनात सरकारी पदांबद्दलचे कुतूहल, या अधिकारपदांचे भान-जाणीव आणि आकर्षण कमी दिसते. याचे प्रतिबिंब आयोगाच्या परीक्षांच्या निकालावरही उमटते. सरकारी कार्यालयांमधून आपली कामे करून घेताना – आपले हक्क मिळवताना गावातील तरुण-तरुणींना पदोपदी करावा लागणारा संघर्ष त्यांना ‘भारतीय सनदी सेवां’मध्ये यशस्वी होण्याची प्रेरणा देतो आणि प्रेरणेचे हे इंधन स्पर्धापरीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी चिकाटी पुरविते. स्वाभाविकच पायाभूत सुविधा आणि मार्गदर्शनाच्या मर्यादांवर हे युवक मात करताना दिसतात. या सकारात्मक मुद्यांबरोबरच एका ‘अवघड’ मुद्याकडे लक्ष देणे भविष्याच्या दृष्टीने गरजेचे आहे. यंदा कित्येक वर्षांनंतर आयोगाच्या अधिसूचनेतील पदांची संख्येने ‘हजारी’ पार केली. त्या तुलनेत आणि आपल्या राज्याचे मागील वर्षांचे निकाल पहाता यंदा महाराष्ट्र तुलनेने मागे पडला, हेच खरे. विद्यापीठीय अभ्यासक्रमांची कालबाह्य़ता, स्पर्धा-परीक्षांसाठी मारकच ठरावी अशी परीक्षा-तपासणी पद्धती यांचा मोठा फटका आपल्याला बसतो हे सत्य शासकीय पातळीला स्वीकारले जाणे म्हणूनच महत्त्वाचे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th May 2013 रोजी प्रकाशित
‘सनद’शीर प्रतिष्ठा..
जगभरात घेतल्या जाणाऱ्या अत्यंत आव्हानात्मक परीक्षांपैकी एक म्हणून गणल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सनदी सेवा परीक्षांच्या ताज्या निकालांनुसार, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत थोडे कमी असले तरी महाराष्ट्रातून या परीक्षेत सुमारे पाऊणशे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतानाच अन्य बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
First published on: 06-05-2013 at 12:38 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honour of upsc success