जगात अपेक्षांच्या ओढीतून विखुरलेलं मन एका ठिकाणी गोळा करण्यासाठी सगुणभक्ती आहे. जिवंत माणसांमध्ये विविध नात्यांच्या निमित्तानं अडकणारं, गोवलं जाणारं, गुंतणारं मन या घडीला ‘निर्जीव’ अशा सगुणरूपाकडे वळवायचं आहे. आता काहींच्या मनात असा प्रश्न येईल की मानवी संबंध आणि नात्यांकडे पाहाण्याचा हा नकारात्मक दृष्टिकोन नाही काय? त्या प्रश्नाचं निराकरण करू. प्रथम हे स्पष्ट केलं आहेच की, आयुष्यात ज्यांच्याशी आपला जसा आणि जेवढा संबंध आहे, तो तर सुटत नाही. त्यांच्यासाठी जे आणि जेवढं करायला हवं ते तर टाळता येत नाहीच. ते करायलाच हवं, जीवनसुद्धा नीरस आणि रूक्षपणे जगायचं नाही. दुसऱ्यांसाठी जे काही करू ते मनापासून आणि प्रेमानंच करायचं आहे. फक्त आपलं काय होतं की आपण कधीच कोणासाठी कोणतीही गोष्ट निरपेक्षपणे करू शकत नाही. नाती जपताना आणि नात्यागोत्यातल्या माणसांसाठी काहीही करताना आपण कर्तव्याची सीमारेषा ओलांडून मोहाने गरजेपेक्षा अधिक गोष्टीही करतो. बरं त्या करून मनातून सोडून देत नाही. अमक्यासाठी मी अमुक अमुक केलं, हे मरेपर्यंत आपण विसरत नाही. ते लक्षात असतं म्हणूनच मग आपल्यासाठी तो जे काही करतो ते आपण तराजूत तोलू लागतो आणि मग मी अमक्यासाठी एवढं केलं मग त्यानंही माझ्यासाठी तेवढं केलंच पाहिजे, अशी अपेक्षा बाळगू लागतो. आपल्याला स्वभावाच्या या कचाटय़ातून सोडविण्यासाठीच या घडीला ‘निर्जीव’ भासणाऱ्या मूर्तीला समोर आणावं लागलं आहे. एखादा माणूस मोठा विद्वान असतो, एखादा अभियंता असतो, एखादा डॉक्टर असतो, एखादा वकील असतो. थोडक्यात अनेक क्षेत्रांत मोठी मजल मारणारी जी जी माणसं असतात त्यांची ज्ञानार्जनाची सुरुवात एकसारखीच म्हणजे अ, आ, इ, ई अशी अक्षरं गिरवण्यापासूनच झाली असते! जन्मत:च कोणी वैद्यकीचं ज्ञान शिकू लागत नाही की वकिलीचं ज्ञान घेत नाही. थोडक्यात मुळाक्षरं शिकूनच जसा लौकिक ज्ञानाचा प्रवास सुरू होतो त्या मुळाक्षरांसारखीच सगुणोपासना भक्तीची मुळाक्षरं शिकवते. एखाद्या निष्णात डॉक्टरची लहानपणातल्या शिक्षणाची सुरुवात जरी मुळाक्षरांपासून झाली असली तरी आता काही तो रोज वैद्यकाच्या पुस्तकांच्या जोडीने बाराखडीचं पुस्तक वाचत नाही! पण एकेकाळी तेच गिरवल्यानं त्याला आज हे ज्ञान लाभलं आहे, यातही शंका नाही. तेव्हा भगवंताकडे वळण्याचा जो मार्ग आहे तो सगुणोपासनेशिवाय सुरू होऊच शकत नाही. कर्तव्यात जराही खंड न पाडता जेव्हा जित्याजागत्या माणसांच्या गुंत्यातून मन सुटतं आणि या घडीला अज्ञात अशा भगवंताकडे वळू लागतं तसतसं सगुणाचं ते प्रतीकच साधकाच्या अंतरंगात क्षीण का होईना, पण भक्तीभाव उत्पन्न करू लागते. क्षीण का होईना, पण भगवंताच्या दर्शनाची इच्छा उत्पन्न करू लागते. या सगुणोपासनेला श्रीमहाराज जोड देतात ती नामाची. श्रीगोंदवलेकर महाराजांनी सांगितलेला उपासनेचा पूर्वार्ध आहे- ‘‘सगुणभक्ती करावी आणि भक्तीने नाम घ्यावे!’’