जिहाद म्हणजे एक अनेक पायांची गोम.. तिचा एखादा पाय मोडला म्हणून काही फरक पडत नाही. अमेरिकेचे ड्रोनहल्ले हा जिहाद थोपवू शकत नाहीत, की हुआंतानामो बेमधल्या अमेरिकी छळछावण्यांच्या भयाने ते थांबत नाहीत. अखेर एखाद्या विचारसरणीला कायदे आणि दंडशक्तीने कसे थोपविणार? अमेरिकेतील जिहाद जेनच्या प्रकरणातून हेच भयंकर तथ्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. स्वत:ला ‘जिहाद जेन’ म्हणवून घेणाऱ्या कॉलिन लारोज या महिलेला जिहादी दहशतवादी कारवायांतील सहभागाबद्दल अमेरिकी न्यायालयाने नुकतीच दहा वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. तिचा इतिहास पाहिला की धार्मिक कट्टरतावाद रोखणे ही किती अवघड गोष्ट आहे हे लक्षात येते. जिहाद म्हटले की मुस्लीम कट्टरतावादी देशच नजरेसमोर उभे राहतात. मात्र ही महिला मूळची अमेरिकी आहे. तिचे आई, वडील अमेरिकी; तशीच तीही अमेरिकेचीच नागरिक. टेक्सास आणि पुढे पेनसिल्व्हेनिया या प्रांतात राहणारी. जीवनशैलीही अमेरिकी संस्कृतीशीच मेळ खाणारी होती. तरीही जीवनातील एका टप्प्यावर तिने मुस्लीम धर्म स्वीकारला. त्यात गैर काहीच नाही, पण ती जिहादी अतिरेकी बनली. एका स्वीडीश व्यंगचित्रकाराला ठार मारण्यास सरसावली. त्याचे कारण- त्याने प्रेषित मोहम्मदाचे व्यंगचित्र काढले. याच प्रकरणी तिला अटक करण्यात आली. येथे प्रश्न असा येतो, की हा अतिरेक तिच्यात आला तरी कुठून? याचे उत्तर तिच्या सामाजिक परिस्थितीत आहे. बालपणापासूनची अभावग्रस्तता, मानसिक अस्थैर्य, उद्ध्वस्त कुटुंबजीवन, सख्ख्या बापाने लहानपणी केलेले लैंगिक शोषण, पोट भरण्यासाठी करावा लागलेला शरीरविक्रय, एकदा केलेला आत्महत्येचा प्रयत्न हे सगळे मिळून कॉलिन लारोजची कहाणी बनते. अशी व्यक्ती धार्मिक आवाहनांना चटकन बळी न पडली तरच नवल. ती मुस्लीम धर्मविचारांच्या जवळ कशी आली हे स्पष्ट झालेले नाही. तिच्या दुसऱ्या नवऱ्याचे म्हणणे खरे मानायचे, तर तिला या धर्मात रस आहे हेही त्याला ठाऊक नव्हते. आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्येही तिला काही गम्य नव्हते, असे त्याचे म्हणणे आहे. म्हणजे अत्यंत गुप्ततेने तिने जिहादी रस्ता निवडला. इंटरनेटमधून ती समविचारींच्या संपर्कात आली. त्यातूनच त्यांनी एक दहशतवादी गट स्थापन केला. त्यात आर्यलडमधील काही महिला आणि पुरुषांचा समावेश होता. म्हणजे हा तसा आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटच. या सर्वाना पुढे अटक झाली आणि लारोज हिला तुरुंगवासाची शिक्षाही झाली, तरी यातून जो प्रश्न निर्माण झाला आहे तो भयावहच आहे. जागतिकीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेतून जी सामाजिक परिस्थिती तयार होत आहे, ती दिवसेंदिवस धार्मिक कट्टरतेला पोषक अशी बनत चाललेली आहे. हे चित्र तिसऱ्या जगात दिसत असेल, तर त्यात काही आश्चर्य नाही. ते अमेरिकेतही दिसावे हे विशेष आहे. नऊ-अकराच्या हल्ल्यानंतर अमेरिकेत एकीकडे जिहादी दहशतवादाविरोधात तीव्र जनमत तयार होते आणि त्याच वेळी अमेरिकेत इस्लामचा स्वीकार करून दहशतवादाकडे वळणारे लोकही दिसतात. तिकडे ब्रिटनसारख्या उदारमतवादी देशातही इस्लामचा किरटा प्रचार करणाऱ्या मुल्लामौलवींना मोठय़ा प्रमाणात अनुयायी मिळतात. या साऱ्याची सांगड कशी घालणार? याला ‘क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन’च्या तंग सिद्धान्तात तरी कसे बसवणार? येथे तर एकाच नागरी समाजातील द्वंद्व दिसत आहे. समाजशास्त्रज्ञ आणि विचारवंतांना आव्हानात्मक असे हे घटित आहे. याचा मुकाबला शस्त्रबलाने करता येईल. पराभव करायचा तर मात्र वेगळे उपाय शोधावे लागतील. जिहाद जेन आता शिक्षा भोगेल, पण तिच्यासारख्या प्रकरणांतून ही जाणीव निर्माण झाली तरी पुरे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jan 2014 रोजी प्रकाशित
जेन जिहादचे वैचारिक आव्हान..
जिहाद म्हणजे एक अनेक पायांची गोम.. तिचा एखादा पाय मोडला म्हणून काही फरक पडत नाही. अमेरिकेचे ड्रोनहल्ले हा जिहाद थोपवू शकत नाहीत,

First published on: 08-01-2014 at 12:19 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ideological challenge of jihad jane