पटाऊ वक्तव्यांमधील तर्कचुकवेगिरी

फडर्य़ा वक्त्यांचे म्हणणे एकदम पटल्यासारखे वाटते, पण काही तरी गडबड आहे असे मनात खुटखुटत राहाते, पण नेमकी काय गडबड आहे यावर बोट ठेवता येत नाही.

फडर्य़ा वक्त्यांचे म्हणणे एकदम पटल्यासारखे वाटते, पण काही तरी गडबड आहे असे मनात खुटखुटत राहाते, पण नेमकी काय गडबड आहे यावर बोट ठेवता येत नाही. शंकानिरसन होण्यासाठी अगोदर शंका मुखर तर झाली पाहिजे! पण, ‘एवढा मोठा माणूस चुकीचे कसे बोलेल?’ असे वाटून, आधीच असलेला न्यूनगंड बळकट होतो. असे ‘लटकते प्रभाव’ मनात जमा होतात. मग स्वत:च्या बुद्धीला पटून निर्णय घेणार तरी कसा?
प्रभावी वक्त्याचे भाषण, टोनिंगचे चढउतार, पॉजेस व लयकारीमुळे सांगीतिकदृष्टय़ा सुंदर असते. भाषणाच्या ओघात याने कुठे कुठे घुमवून आणले, हे श्रोत्यांच्या लक्षात येत नाही. असे एकेक भाषण जर, अनेक कार्डावर मुद्देनिहाय लिहून काढले आणि कार्डे पसरून ती एकमेकांशी लावून पाहिली, तर त्यातील अनेक गडबडी/विसंगती ध्यानात येतील. एखादे म्हणणे बरोबर असल्यानेही छान वाटू शकते, पण यावरून छान वाटल्याने बरोबर ठरते, असे मात्र अजिबात नाही.
कुठलेही विधान उलटय़ा बाजूने (व्यत्यास) खरे असेलच असे नाही. किंबहुना बहुतेक वेळा नसतेच, ही खूणगाठ बांधूनच पुढे जायला हवे. म्हणजे ताíकक घोटाळे टाळण्याची एक निश्चित सुरुवात तरी होईल. उदाहरणार्थ कलाकृतीची श्रेष्ठता ही तिच्या लोकप्रियतेवरून ठरवू नये, असे जरी मानले तरी, मग लोकप्रिय न ठरणारी प्रत्येक कलाकृती, त्याखातर श्रेष्ठ ठरत नसते. किंवा, अिहसाव्रती पलटवार करणार नाही हे खरेच, पण पलटवार न करणारा तो अिहसाव्रती, असे ठरत नाही. तो भित्रा असेल वा दबा धरून असेल! एकच तर्कदोष सोडवून पाहू. ही तीन विधाने घ्या. १. भांडवलदार स्वार्थी असतात. २. कामगार भांडवलदार नसतात. त्या अर्थी (देअरफोर) ३. कामगार स्वार्थी नसतात.
प्रत्यक्षात कामगारही स्वार्थी असतात, हे तर दिसते आहे. येथेही ‘स्वार्थी असणे हे फक्त आणि फक्त भांडवलदारांनाच शक्य असते’ असा विधान १चा व्यत्यास खरा मानून घोटाळा झालेला आहे. व्यत्यास खरा नसू शकतो हे तर्कशास्त्रातील एक सूत्र मी सांगितले. अशी भरपूर सूत्रे आहेत. (इन्ट्रोडक्शन टू लॉजिक, लेखक आय. एम. कोपी)
पण महत्त्वाचा मुद्दा असा की, प्रभावी वक्तेअशा उघड उघड तार्किक गफलती करत नाहीत. ते असे पाहातात, की त्यांच्या युक्तिवादाच्या तार्किक गाभ्यापर्यंत, तुम्हाला पोहोचूच द्यायचे नाही. म्हणूनच तर्कदोषांपर्यंत पोहोचूच न देण्यासाठी केलेले अवैध भाषिक डावपेचही, वाद-दोषांत अर्थात फॅलसीजमध्ये, आवर्जून समाविष्ट केलेले असतात.  
अप्रस्तुत आधार व संदिग्धता
दमदाटी, अभिमान, पवित्र म्हणून प्रमाण, असे जे जे अ-वैचारिक व भावनांना हात घालणारे प्रकार चालतात, त्यांना भुलून चालणार नाही. एखादी रूढी दीर्घकाळ चालली तरी ती त्याज्य असू शकते. यावर कोणी, ‘आपले पूर्वज काय मूर्ख होते का?’ असे म्हटले तर ‘अजूनही त्यांच्या काळात वावरणारे तुम्ही मूर्ख आहात’ असे उत्तर देता आले पाहिजे.  
‘कोण बोलतोय पहा!’ हा अजून एक हमखास टाकला जाणारा डाव आहे. योग्य वादात, ‘विधान करणाऱ्याची लायकी काय?’ हा मुद्दा नसून, ‘विधानाची लायकी काय?’ हा मुद्दा असतो. ‘कायद्याचं बोला’ या सिनेमात मकरंद अनासपुरेच्या तोंडी हे तत्त्व छान येते. ‘‘मी सनदी वकील नाही, हे आत्ता सिद्ध झाले, पण म्हणून मी आत्तापर्यंत जे सिद्ध केले, ते असिद्ध कसे काय ठरते?’’ जर कोणी धर्ममरतडाच्या आविर्भावात उपदेश ठोकू लागले, तर ‘तुम्ही स्वत: तरी पाळता काय?’ हा नतिक अधिकाराचा प्रश्न रास्त आहे. पण विधान म्हणून पाहाता, वेडाच्या झटक्यात बरळलेले विधानसुद्धा, जर सत्य असले तर ग्राह्य़ धरणे, ही विवेकवादाची एक कसोटी आहे.  
वादमुद्दय़ाशी संबंध नसलेल्या गोष्टी मांडणे, ही प्रभावी वक्त्यांची खेळी असते. एक माजी अर्थमंत्री, एका संमेलनाच्या समारोपाच्या भाषणात म्हणाले होते, ‘‘हे म्हणतात शेतकऱ्यांनाही प्राप्तिकर लावा. अरे, शेतकऱ्यांनी स्वातंत्र्यलढय़ात केवढा त्याग केला होता! आपला कोरडवाहू तीन एकराचा शेतकरी. बिचारा काय टॅक्स देणार?’’(टाळ्या) स्वातंत्र्यसनिकांसाठी ज्या योजना असतील त्यातून शेतकऱ्यांना वगळले आहे काय? ज्याला इन्कम टॅक्स लिमिटच्या वर वट्ट नफा होऊ शकतो, तो शेतकरी ‘बिचारा’ कसा?  पण टाळ्यांच्या गजरात असे प्रश्न सुचणे थांबलेले असते.
एकाच युक्तिवादात एक शब्द दोन अर्थानी वापरणे हा संदिग्धतेचा गरवापर असतो. ‘नो-बडी’ इज परफेक्ट, आय अ‍ॅम ‘नो-बडी’, देअरफोर आय अ‍ॅम परफेक्ट! यात केलेला ‘नो-बडी’चा वापर पाहा. पळवलेल्या विमानातील ‘निष्पाप नागरिक’ निष्पापच असतील कशावरून? यात निष्पापचा अर्थ कधीच कोणतेच पाप न केलेले असा नसून, ‘त्या समरप्रसंगात’ सहेतुकपणे न उतरलेले पण यदृच्छया सापडलेले, इतकाच आहे.     
शब्दाचा अर्थ जरी एकच असला तरी तो वाक्यात वेगळेच काही ध्वनित करू शकतो. जो कधीच दारू पीत नाही त्याच्याही बाबतीत ‘तो आज प्यायलेला नाही’ हे विधान सत्यच असते, पण ‘म्हणजे एरवी पितो’ असे उगाचच ध्वनित होते.
शब्दांचा क्रम चुकला की विनोद होतात किंवा गंभीर चुकाही होऊ शकतात. विनोदाचे उदाहरण म्हणजे ‘लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाला’ऐवजी ‘पन्नासाव्या लग्नाच्या वाढदिवसाला’. गंभीर चूक म्हणजे, ‘काही तमिळ-अतिरेकी िहदू असतात’पासून ‘काही तमिळ िहदू-अतिरेकी असतात’ अशी वाक्यरचना फिरविणे. अण्णा हजारे एकदा, राजकीय पक्ष घटनाबाह्य़ आहेत, असे म्हणाले होते. घटनेनुसारचे सगळे कायदे हे काही घटनेच्या ‘मजकुरा’त नसतात. येथे ‘बाह्य़’ने, ‘भंग करणारे’ असे ध्वनित होते.
एरवीही ‘बाह्य़’ म्हणजे कशाच्या बाहेर हे स्पष्ट हवे? उदाहरणार्थ मेंदूत चालणारी विद्युत-रासायनिक प्रक्रिया ही ‘शरीराच्या आत’, पण ‘जाणिवेच्या बाहेर’ चालते. कितीही मेंदूतज्ज्ञ झाला, तरी त्याला ‘समोरचे फूल सुगंधी आहे’ असेच अनुभव येतात. जर ‘‘माझ्या अमुक मज्जापेशीने तमुक मज्जापेशीत इतका करंट मारला’’ असे ‘अनुभव’ यायला लागले, तर त्याला वेगळ्याच तज्ज्ञाकडे न्यावे लागेल!   
गृहीतातच साध्य आणि शितावरून भातावर  
‘भिक्षा वाटून घ्या’, हे कुंतीचे उद्गार वाच्यार्थाने घेण्यामागे पांडवांना द्रौपदीचा मोह पडला, हेच खरे कारण होते. द्रुपदाला अशा लग्नाची धम्र्यता पटविताना युधिष्ठिर म्हणतो, ‘‘माझे मन कधीच अधर्माकडे घेत नाही, परंतु ते या विवाहाकडे ओढ घेते आहे. त्याअर्थी हा विवाह धम्र्यच असणार.’’ धम्र्यतेची सार्वत्रिक कसोटी ‘मनाला’ लावण्याऐवजी युधिष्ठिराने ‘त्याचे मन’ हीच कसोटी बनवली आहे!   .  
 ‘जे होणार असते ते झाल्याशिवाय राहात नाही’ हे एक निर्थक वाक्य आहे. कारण ‘अमुक होणार आहे’ ही भविष्यवाणी कोणी केलेली असती तर ती खरी ठरली असती, इतकेच म्हणता येईल. पण जे कोणाच्याच मनातही आले नाही आणि झाले तर ते ‘होणार असणे’ कुठेच अस्तित्वातच नसेल. झाले आहेच म्हटल्यावर मागाहून, ‘होणारच होते’ म्हणण्याला तर अजिबातच अर्थ नाही. गृहीतातच साध्य लपवणे व ते बाहेर काढून दाखवणे या प्रकाराला सिद्धसाधकाचा दोष किंवा पेटीशिओ प्रिन्सिपी असे म्हणतात. सगळेच गूढवाद या दोषाने ग्रस्त असतात.
शितावरून भाताची परीक्षा या तत्त्वाला इंडक्शन असे नाव आहे. पण ज्या भांडय़ातले शीत घेतले त्याच भांडय़ातल्या भाताविषयी हे ठीक आहे, जगातील सर्व भांडय़ांतले सर्व भात नव्हेत. सोयीस्कर असेल, तर एक-दोन केसेसवरून एक तथाकथित सामान्य नियम मान्य करायचा, अशी वाईट सवय अनेकांना असते. त्यात न बसणारे उदाहरण दाखवले तर ‘‘अपवादानेच नियम सिद्ध होतो’’ असे धादांत चुकीचे विधान फेकले जाते. अपवादाने नियम बाधितच होत असतो. नव्या माहितीला सामावण्यासाठी नियम दुरुस्त करावा लागतो. ‘‘अपवादानेच नियम सिद्ध होतो’’ हे धादांत चुकीचे विधान ज्या विचारातून आले, तो अगदी वेगळा आहे. जेव्हा ‘सर्व काही अनुभवमात्रच आहे’ अशी विधाने केली जातात तेव्हा ‘सर्व काही’त न मोडणारे काही उरतच नाही व त्यामुळे उलटा ताळा घेता येत नाही. याउलट सजीव हे स्वत:ची प्रत काढू शकतात यासाठी, निर्जीव वस्तू तसे करू शकत नाहीत, हा उलटा ताळा उपलब्ध आहे. ईश्वराबाबत, ‘पुराव्याचे नसणे हा नसण्याचा पुरावा नसतो’ हा एपिग्रॅम झकास आहे, पण म्हणून ‘असण्याचा पुरावा’ मिळत नसतो. विधान तपासता आले पाहिजे. सत्य विधान हे बाधित होऊ शकणारे, पण अद्याप बाधित न झालेले असे असले पाहिजे.
वैचारिक बेशिस्तीचा अंदाधुंद कारभार सर्वत्र चालू आहे. तो चालवणाऱ्या बेपर्वा ‘प्रचारवंतां’ना तुमच्या व्याख्या सांगा, तुमची मध्यवर्ती विधाने सांगा, ती बरोबर कशावरून ते सांगा, अशा मागण्या करून वठणीवर आणले पाहिजे. ते वठणीवर येवोत न येवोत, पण वैचारिक शिस्तीच्या आग्रहामुळे आपल्या जीवनात विवेकपूर्ण निर्णय घेण्याची, आपली क्षमता तरी निश्चितच वाढेल.
* लेखक हे कामगार संघटनांचे उत्पादकता सल्लागार, तसेच तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत.  त्यांचा ई-मेल rajeevsane@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व गल्लत , गफलत , गहजब ! बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Impact of effective speech

ताज्या बातम्या