सामान्य मतदारासाठी हा काळच मती गुंग करणारा दिसतो.. कुणी कुणाची नावे घ्यावीत, कुणी कुणाला नावे ठेवावीत आणि कुणाचे नाव टाकण्याचे पाऊल कुणी उचलावे, याला पक्षबंधनांचाही धरबंध राहिलेला नाही.. नाव ज्याच्याशी जोडले गेले त्याचेही नाव घ्यायचे नाही ही एक तऱ्हा; तर ज्यांच्याशी संबंध येणार नाही त्यांची नावे घेत राहायचे ही दुसरी!
महाराष्ट्रात सध्या नाव घेणे वा न घेणे हा मोठा चर्चेचा विषय झाल्याचे दिसते. महाराष्ट्र संस्कृतीत नाव घेणे यास एक पारंपरिक अर्थ आहे. विवाहप्रसंगी नवे संबंध जोडले जात असताना नववधूने आपल्या भावी पतीचे नाव उखाण्यात घेण्याची प्रथा अगदी अलीकडेपर्यंत पाळली जाते. परंतु निवडणुकीच्या वातावरणात या नाव घेण्यास वा न घेण्यास वेगळे संदर्भ येऊ शकतात. सध्या तसे झाल्याचे दिसते. अर्थात काही जणांना विवाह सोहळय़ांचा काळ आणि निवडणुकांचा हंगाम यांची तुलना करण्याचा मोह अनावर ठरू शकतो. विवाहाप्रमाणे निवडणुकांच्या हंगामातही नवनवे संबंध जोडले जात असतात याकडेही काही लक्ष वेधू पाहतील. त्यामुळे सध्याच्या विवाह मुहूर्ताच्या काळाप्रमाणे निवडणूक काळातही नाव घेण्यास एक आगळे महत्त्व येऊ शकते. राज ठाकरे यांनी कोणाचे नाव घेतले, उद्धव यांनी कोणाचे घेतले नाही, या हंगामांचे सर्वाधिक अनुभवी शरद पवार यांनी कोणाकोणाची नावे घेतली, कोणाची टाकली आणि कोणास ठेवली या सगळय़ाकडेच समस्त राज्य डोळय़ात तेल आणि कानात प्राण आणून लक्ष ठेवताना दिसते.
सर्वात प्रथम राज ठाकरे यांनी घेतलेल्या नावांबद्दल. राज्य राजकारणाच्या आखाडय़ातील सर्वात आकर्षक आणि तरुण पक्ष राज यांचा. स्वयंवरात रूपवती तरुणीने कोणास माळ घातली याकडे जसे अनेकांचे लक्ष असावे त्याप्रमाणे राज ठाकरे यांच्यावर समस्त राजकीय व्यवस्थेचा डोळा आहे, असे म्हटल्यास गैर ठरू नये. सुरुवातीला काही काळ या राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील एकापेक्षा अनेक उत्सुक राजकारण्यांना सोडून शेजारील गुर्जरप्रांतीय नरोत्तम नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणी सुरू केली होती. या नरोत्तमाचा दबदबा महाराष्ट्रातही मोठय़ा प्रमाणावर असल्याने राज यांचा हा गुर्जर घरोबा महाराष्ट्रातही कौतुकाचा विषय बनून गेला होता. या गुर्जर नरपुंगवाचे कैसे चालणे, कैसे औद्योगिक बोलणे, कैसे रस्ते बांधणे, कैसे पूल उभारणे वगैरेंचे वर्णन ऐकून मराठी मतदारांचे कान जणू किटलेच होते. एखाद्या विवाहोत्सुक तरुणीने भावी सासुरवाडीचे वर्णन ऐकवून समस्तांना वात आणावा तसाच हा प्रकार. परिणामी महाराष्ट्रातील मनसे धाकल्या हिंदुहृदयसम्राटाच्या संगे सुखाने नांदणार असाच सर्वाचा ग्रह झाला. त्यामुळे मनसेकारांचे ज्येष्ठ बंधू शिवसेनाकार उद्धोजी खट्टू झाले. त्यास कारणही तसेच. गुर्जर नरपुंगवाच्या प्रेमावर आपला अधिकार पहिला असे त्यांचे म्हणणे. राजकीय अर्थाने त्यांचेही तसे बरोबरच. उद्धोजींची शिवसेना गेली दोन दशके भाजपच्या गळय़ात गळा घालून आहे. भाजप नेतृत्वाचा गळा बदलला म्हणून आपला गळा आवळला जाईल असे कधी त्यांना वाटले नव्हते. परिणामी भाजपच्या अंगणात डरकाळय़ा फोडीत असलेला गुर्जर सिंह सेनेच्या महाराष्ट्र व्याघ्रास सोडून राजकारणाच्या अंगणात नव्याने आलेल्या रेल्वे इंजिनाशी संगत वाढवताना पाहून उद्धोजी नाराज होणे तसे साहजिकच. परंतु या संगतीस तडा खुद्द मनसेकारांनीच दिला. त्यांनी या गुर्जर नरपुंगवाचे नाव घेणेच सोडले आणि वर त्यास नावे ठेवणे सुरू केले. मनसेकार भावी पंतप्रधानास बोल लावू लागल्याने भाजपच्या भगव्या गोटात चांगलीच खळबळ उडाली. राज यांनी नरेंद्र मोदी यांना नावे ठेवली ती ठेवलीच पण थोरल्या हिंदुहृदयसम्राटांचे नाव घेऊन भाजप आणि थोरल्या हिंदुहृदयसम्राटांची सेना यांत गोंधळ उडवून दिला.
खरे तर रिवाजाप्रमाणे धाकल्या हिंदुहृदयसम्राटाचे नाव थोरल्या हिंदुहृदयसम्राटांचे चिरंजीव उद्धोजी यांनी घ्यावयास हवे. कारण दोघांचेही पक्ष दोन दशकांहून अधिक काळ आघाडीबंधनात अडकून आहेत. अशा वेळी या आघाडीबंधनाचे आगामी नेते धाकले हिंदुहृदयसम्राट नरेंद्रजी मोदी हे उद्धोजींचे भाग्यविधाते ठरतात. भारतीय परंपरेनुसार आपल्या उद्धारकर्त्यांचे नाव आदराने घेणे हे उद्धोजींचे कर्तव्य ठरते. निवडणुकीची रणधुमाळी अप्रत्यक्षपणे सुरू होऊन आठवडे लोटले, सेना-भाजप, नुसती सेना आणि नुसती भाजप, नवखासदार रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा सगळय़ांच्या मिळून तीन तीन सभा झाल्या. सर्वानी आपल्या निष्ठा नरेंद्रजी मोदी यांच्या चरणी जाहीरपणे वाहिल्या. परंतु या सर्व सभांत उद्धोजी ठाकरे यांनी धाकले हिंदुहृदयसम्राट नरेंद्र मोदी यांचा एकदाही उल्लेख केल्याचे कोणीही ऐकले नाही. या अनुल्लेखामुळे भाजपच्या संघकळपात उद्धोजींविषयी नाराजी असून आपल्या उद्धारकर्त्यांचे नाव घेण्यास ते का बरे टाळाटाळ करीत आहेत, असा प्रश्न नागपुरातील रेशीम ते पुण्यातील मोती बागेत गटागटाने चर्चिला जात आहे. याबद्दल मुंबईतील बापू ज्याप्रमाणे भक्तास लक्षलक्ष नामस्मरणाचा रतीब घालावयास सांगतात तसे उद्धोजींकडून नरेंद्रजप करवून घ्यावा असा एक पर्याय या दोन बागांत चर्चिला गेला. परंतु तसे केल्यास ऐन निवडणुकांच्या तोंडावर उद्धोजींना श्रम होण्याची शक्यता असल्याने तो तेथेच सोडून दिला गेला. राज हे मोदींचे नाव घेतील असे वाटत असताना त्यांना नावे ठेवून ते बाळासाहेबांचे नाव घेतात, उद्धव बाळासाहेबांचे नाव घेत नाहीत आणि नरेंद्रभाईंचे नाव घ्यायलाही लाजतात याबद्दल या दोन्ही बागांत सामुदायिक सुस्कारे सोडण्यात आले. हे कमी म्हणून की काय निवडणूक संबंधनिपुण शरदरावजी पवार यांनी इतक्या जणांची नावे घेणे सुरू केल्याने सर्वच जण चक्रावून गेले. सध्या खरे तर बारामतीकर काँग्रेसबरोबरच्या बंधनात आहेत आणि आणखी काही काळ हा संसार चालेल अशी त्यांच्यासकट सर्वाना खात्री आहे. परंतु तरीही राजकारणात कोणीही अस्पृश्य नाही असे सांगत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे कटाक्ष टाकल्याने सर्वाचीच मती गुंग झाली.
खरेतर सामान्य मतदारासाठी हा काळच मती गुंग करणारा दिसतो. तिकडे द्राविडभूमीतील नेत्या सुश्री जयललिता या उत्तर देशीय भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांना सहकार्य करणारे उजवे वळण घेतील असे वाटत असतानाच त्या अचानक डावीकडे वळल्या. त्यांनी आकस्मिकपणे एबी बर्धन आणि प्रकाश करात यांची नावे घेऊन अनेकांना बुचकळय़ात पाडले. उत्तरेत मुलायमसिंग हेही आणखी कोणाकोणाची नावे घेऊ लागले आहेत. वंगदेशीय ममता बॅनर्जी यांनी स्वत:चेच नाव घेऊन आपले तृणमूलत्व सिद्ध केले आहे तर शेजारील बिहारात मुख्यमंत्री नीतिशकुमार हे नव्या नावाच्या शोधात आहेत. त्याच राज्यातील नटवर्य लालूप्रसाद यादव यांनी रामविलास पास्वान यांचा हात हाती धरून काँग्रेसचे नाव घेतल्याने नवा घरोबा तयार झाला आहे.
अशा तऱ्हेने या निवडणूक वातावरणात कोण कोणाचे नाव घेईल हे जनसामान्यांना कळेनासे झाले आहे. काही चतुरजनांनी नाव घेण्याच्या परंपरेतील वाह्यातपणाचा संबंध निवडणुकीच्या काळाशी जोडून एक नवेच चित्र उभे केले आहे. नाव घेण्याच्या पद्धतीचे विडंबन करू पाहणारे एका उखाण्याचा दाखला हमखास देत. अमुकरावांबरोबर सिनेमा पाहिला सायको आणि तमुकरावांचे नाव घेते ढमुकरावांची बायको हा तो उखाणा. या उखाण्यातून नको ते वास्तव समोर येते असे काही म्हणतील. परंतु निवडणुकांच्या हंगामात हा उखाणा अस्थानी ठरतो काय, हे वाचकांनीच ठरवावे.
———-