scorecardresearch

‘सामाजिक बांधीलकी’च्या नावाने..

आज ‘गोरगरीब, वंचित, उपेक्षित, शोषित’अशा सगळ्या घटकांना ‘सामाजिक बांधीलकी’या शब्दाशी जोडले जाते.

‘सामाजिक बांधीलकी’च्या नावाने..

आज ‘गोरगरीब, वंचित, उपेक्षित, शोषित’अशा सगळ्या घटकांना ‘सामाजिक बांधीलकी’या शब्दाशी जोडले जाते. किंबहुना हा सारा शब्दसमूह या एकाच शब्दाच्या सोबत  येतो. वस्तुत बांधीलकी म्हणून या सगळ्या घटकांसाठी आपण काही करतो आहोत असे भासविण्यापेक्षा किमान त्यांच्या जगण्याचा संकोच आपल्या हातून होणार नाही एवढे जरी पाहिले तरी बांधीलकीचे तत्त्व अनुसरता येते..
काही शब्द समाजात गुळगुळीत झालेल्या चलनी नाण्याप्रमाणे वापरले जातात. कालांतराने या शब्दातला आशयही निसटून जातो आणि उरतो तो केवळ शब्दांचा पोकळ सांगाडा. म्हणजे शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या मनात जी अर्थाची संकल्पना निर्माण होते किंवा तो शब्द सांगू पाहतो आपल्याला काही तरी असे आता अनेक शब्दांबाबत वाटत नाही. असे शब्द आपले रंग-रूपच हरवून बसतात. ‘सामाजिक बांधीलकी’ या जोडशब्दाचेही आता तसेच झालेले आहे. काही शब्दांना मूळ अर्थापेक्षाही भलतेच संदर्भ चिकटलेले असतात. मूळ शब्दाचे वजनच अशा वेळी हरवले जाते. शब्द उच्चारल्याबरोबर खरेखुरे संदर्भ लक्षात येण्याऐवजी त्या शब्दाभोवती जमा झालेली धूळच आपल्याला दिसते. ‘सामाजिक बांधीलकी’ हा शब्द आता किती प्रामाणिकपणे वापरला जातो किंवा या शब्दाचे मूल्य आता किती राखले जाते? कोणीही उठतो, म्हणतो, ‘सामाजिक बांधीलकी जपली पाहिजे’, ‘बांधीलकी म्हणून हे हे केले पाहिजे’, ‘शेवटी सामाजिक बांधीलकी आहे की नाही?’ आता ही बांधीलकी आयात कशी करता येईल किंवा कुठून तोळा-मासा विकत तरी कशी आणता येईल. आपण या ना त्या अर्थाने बांधलेलेच असतो समाजाशी. समाजात वावरताना आपल्या पर्यावरणातल्या प्रत्येक घटकाशी आपले प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नाते असते. एक नागरिक म्हणून आपण आपली भूमिका कशी पार पाडतो, किती प्रामाणिकपणे जपतो यावर अवलंबून आहे ते. ज्यांच्यापर्यंत काहीच पोहचत नाही किंवा ज्यांची हाक आपल्यापर्यंत येत नाही अशांबद्दलची जाणीव असणे ही बाब अभिनिवेशी कशी असू शकते?
‘सामाजिक बांधीलकी’ हा शब्द आता कोणाच्याही तोंडी आढळतो. राजकारण्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत आणि लेखक, कलावंत ‘सामाजिक बांधीलकी’बद्दल बोलतच असतात. हुकमी भाषणातला व्यासपीठावरचा अत्यंत खपाऊ शब्द आहे तो. कधी कधी शब्द उच्चारणाऱ्यांचा वर्तन व्यवहार आणि शब्दाची उपयोगिता यातले अंतर कोसो दूर असते. दोन टोकांवरच दोघे असतात. बोलण्याचा आणि कृतीचा काहीच संबंध नाही. किंवा काही गोष्टी या फक्त उच्चारापुरत्याच ठेवायच्या. वर्तन व्यवहारातून बाद झालेले आणि केवळ उच्चारापुरतेच शिल्लक असलेले असे शब्द मोजायचे ठरले तर मोठीच यादी होईल. अनेक शब्दांना जसा वेगळा अर्थ चिकटतो तसाच या शब्दाचा गुणधर्म हरवला जाऊन वेगळेच काही तरी या शब्दाभोवती गुंफले जाते. म्हणजे एखादा स्वस्त धान्याचा दुकानदार असेल तर तो सगळा माल काळ्या बाजारात आणणार. गावात दुकानापर्यंत ते धान्य येण्याआधी अशा माणसांच्या खासगी गोदामांमध्ये ते कुठे तरी शेतातच उतरविले जाते. ते जसे येते तसे दुसरीकडे रातोरात खपवले जाते. अंधारातच अशा धान्याला चोरवाटा फुटतात. धान्य कोणालाही मिळणार नाही ते सरळ काळ्या बाजारात जाणार. प्रत्यक्षात जो माणूस हे सगळे करणार तोच माणूस गावातल्या कुठल्या तरी धार्मिक उत्सवाच्या एखाद्या पंगतीची जबाबदारी घेणार. ‘अशा अन्नदानाचे आपल्याला काही वाटत नाही, उलट आवडते, अशा सामाजिक गोष्टी केल्या पाहिजेत,’ अशी भाषा ही माणसे बोलू लागतात. ज्या ठेकेदाराने रस्त्यांची वाट लावली किंवा गावात घेतलेल्या एखाद्या विकासकामात सिमेंटऐवजी माती वापरली असा माणूस कुठे तरी यात्रेच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करताना दिसतो. एखादा टँकर लावताना दिसतो. पाणपोई घालताना दिसतो. सर्वत्र ‘धर्मार्थ’ असे काही काही चाललेले असते. गावातले लोक अशा एखाद्याकडे जातात. एखाद्या कामाबाबतची अडचण सांगतात किंवा गावातून एवढी एवढी वर्गणी जमा झाली आहे आता तुमचा हिस्सा जरा जास्त टाका म्हणजे हे सामाजिक काम तडीला जाईल, असे सांगतात. कधी कधी असा बहाद्दर आणखीच भारी निघतो. तुमच्याने जेवढे गोळा होईल तेवढे करा, तुमच्या सगळ्यांचा जो हिस्सा आहे तेवढाच देण्याची जबाबदारी माझी एकटय़ाची असे तो म्हणतो. कुठे मंदिराचे छत टाकायचे असते, कुठे सभागृह बांधून द्यायचे असते, कुठे फरशी बसवायची असते किंवा गावात चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातल्या खर्चाची एखादी जबाबदारी घ्यायची असते. अशी माणसे मग आपली ‘सामाजिक बांधीलकी’ मनोभावे पार पाडताना दिसतात. जनताही अशा लोकांच्या दातृत्वाबद्दल भरभरून बोलते. ‘कोणतेही सामाजिक काम सांगा, गडी नाही म्हणणार नाही. कोणत्याही कामाला सढळ हाताने देणार, कोणाला खाली हाताने परत पाठविणार नाही’ अशी त्या माणसाची महती सांगितली जाते. अशी बांधीलकी पार पाडणारे सध्या कोणत्याही सामाजिक कामाची जबाबदारी आनंदाने घेताना दिसतात. गजबजलेली जी ठिकाणे असतात, मग तो आठवडी बाजार असेल, बसस्थानक-रेल्वेस्थानक असेल किंवा एखादी सार्वजनिक जागा असेल त्या ठिकाणी असे उपक्रम पार पाडले जातात. अशा एखाद्याला विचारले तर मग ‘आपल्याला आवडच आहे सामाजिक कार्याची, बांधीलकी म्हणून आपण हे सारे करतो,’ असे मजेशीर उत्तर मिळते.
‘सामाजिक बांधीलकी’ हे काही आभूषण नाही किंवा वस्त्रप्रावरण नाही परिधान करायला. आपण सुखासमाधाने जगावे, पण ते दुसऱ्याचे ओरबाडून नव्हे आणि इतरांवर अन्याय करूनही नव्हे. ही गोष्टच जर जगण्याची धारणा बनली तर मग अशा शब्दांना केवळ उच्चारापुरतेच मर्यादित ठेवण्याची गरज भासत नाही. जसा वाहणे हा नदीचा धर्म, सावली देणे हा झाडांचा, तसाच तो आपलाही असू शकतो या बांधीलकीच्या बाबतीत. ‘गोरगरीब, वंचित, उपेक्षित, शोषित’अशा सगळ्या घटकांना ‘सामाजिक बांधीलकी’ या शब्दाशी जोडले जाते. किंबहुना हा सारा शब्दसमूह या एकाच शब्दाच्या सोबत येतो. वस्तुत: बांधीलकी म्हणून या सगळ्या घटकांसाठी आपण काही करतो आहोत असे भासविण्यापेक्षा किमान त्यांच्या जगण्याचा संकोच आपल्या हातून होणार नाही एवढे जरी पाहिले तरी बांधीलकीचे तत्त्व अनुसरता येते.
बांधीलकी ही स्वभावातच असेल तर मग ती आयुष्याचाच भाग बनते, व्यक्तिमत्त्वातलाच घटक बनते. तो काही खोकला नव्हे अधूनमधून उबळ यायला. कुठे तरी शोषणातून, अवैध मार्गातून मिळवायचे आणि ते बांधीलकीच्या नावाने खर्च करायचे. असे प्रकार आता अधिक दिसू लागले आहेत आणि अशी ‘सामाजिक बांधीलकी’ पार पाडणारांची संख्याही आता वाढत आहे. मुळात बांधीलकी ही प्रदर्शनीय वस्तू नाही किंवा एखाद्या झाडाला जसे कलम करतो आपण तशी ती रोपण करण्याचीही गोष्ट नाही. ती उपजत असावी लागते. तसा बांधीलकीचा आविर्भाव न बाळगताही ती आपल्या आत असू शकते. ‘अंतरीचे धावे, स्वभावे बाहेरी’ याप्रमाणे आत कुठे तरी बांधीलकीची भावना असेल तरी ती आपल्या वर्तनातूनही येतेच.

मराठीतील सर्व धूळपेर ( Dhulper ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-09-2014 at 01:06 IST
ताज्या बातम्या