प्रत्यक्ष ’जीवनात तत्त्वांची लढाई’ इत्यादी भाषेत अव्यावसायिक रितीच्या स्वरुपात तत्त्वज्ञान आवश्यक असतेच पण व्यावसायिक, पेशा या स्वरुपात तत्त्वज्ञानाचा पद्धतशीर अभ्यास करण्यासाठी ते गरजेचे असते. तेथे पूर्णवेळ संशोधन केले जाते, जे त्या राष्ट्राचे विचारधन बनते.. बुद्धिमता हे राष्ट्राचे भांडवल असते.
भारतीय प्रबोधनकाळाचा इतिहास पाहता पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा भारतातील प्रवेश किमान दोन रीतींनी झाला, असे ढोबळमानाने म्हणावे लागते. पहिली रीत प्रबोधनाच्या रूपात होती तर दुसरी रीत शैक्षणिक रूपात (अ‍ॅकेडेमिक) आली. प्रबोधनाचा अनिवार्य, अटळ कार्यक्रम म्हणून प्रत्यक्ष जीवनात; राजकीय व सामाजिक सुधारणांच्या विविध प्रकारच्या चळवळीत ब्रिटिश तत्त्वज्ञान प्रवेश करते झाले. म्हणजे तत्कालीन इंग्लंडमध्ये ज्या सुधारणा ज्या तात्त्विक विचारसरणीच्या आधारे घडत होत्या, त्या सुधारणा व विचारसरणी भारतात पोहोचल्या. दुसरी रीत अ‍ॅकेडेमिक स्वरूपाची होती. ती विद्यापीठात तत्त्वज्ञान या नावाने अभ्यासक्रमात समाविष्ट झाली. पहिली रीत अव्यावसायिक- लोकचळवळ या स्वरूपाची होती तर दुसरी व्यावसायिक, पेशा या स्वरूपाची होती.
भारतातील ‘ब्रिटिश राज’च्या आधी मुसलमानी व मोगल सत्तेच्या काळात ग्रीक तत्त्वज्ञानाचा प्रवेश झाला होता. या काळात भारतात मदरसा आणि मक्तबा स्थापन झाल्या. अरबी व फार्सी भाषा-साहित्याबरोबरच धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, गणित, कायदा इ. विषयही तेथे शिकविले जात. यात धर्मशास्त्र वगळता इतर विषय ग्रीक विद्य्ोतून घेतले गेलेले होते. त्यात प्रामुख्याने अ‍ॅरिस्टॉटलचे तर्कशास्त्र आणि त्याचे तत्त्वज्ञान यांचा समावेश होता. दिल्ली आणि लखनौ ही मुख्य केंद्रे होती. शहा वलीउल्लाह आणि मुल्ला निझामुद्दीन  सह्लावी या दोन विद्वान, बहुभाषाविद् पंडितांनी ‘दर्स-इ-निझामी’ हा खास अ‍ॅरिस्टॉटलचे तर्कशास्त्र आणि त्याचे तत्त्वज्ञान शिकविण्यासाठी बनवलेला अभ्यासक्रम होता. शहाबुद्दीन घोरी, मुहम्मद तुघलक, फिरोझशाह तुघलक यांनी तसेच मोगल घराण्यांतील हुमायून व अकबर यांनी विद्यार्जनास खूपच उत्तेजन दिले. अकबराच्या काळात िहदू-मुस्लीम पंडित एकत्र अध्ययन करू लागले. त्याने पतंजली, भास्कराचार्य दुसरे, चरक, इब्न सीना आणि अ‍ॅरिस्टॉटलचे तत्त्वज्ञान यावर भर दिला. भारतीय मोगल काळात ब्रिटन-युरोपात फार काही घडले नव्हते. भारतात ग्रीक विद्या प्रवेश करती झाली, तिनेही मूळ धरले नाही. कारण औरंगजेबानंतरचा इतिहास वेगळा घडला. मोगल सत्तेनंतरचे जे उच्च शिक्षण ब्रिटिशांनी सुरू केले, त्यामार्फत मात्र पाश्चात्त्य-युरोपीय तत्त्वज्ञान भारतात जोमदारपणे आले.
‘प्रबोधनकालीन भारत’ या शब्दसमूहाचा अर्थ आजचा भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश. ब्रिटिशांनी विद्यापीठे स्थापन करण्यामागे दोन कारणे होती. पहिले, भारतीय अभिजनांनी युरोपीय शिक्षण पद्धतीसारखे उच्च शिक्षण मिळावे, अशी सतत केलेली मागणी आणि दुसरे ब्रिटिशांनाही राज्य कारभारात व व्यापारात कारकुनी व पर्यवेक्षणाच्या कामासाठी युरोपीय शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती. त्यानुसार १८५७ मध्ये कलकत्ता, मुंबई आणि मद्रास येथे, त्यानंतर पंजाब (१८८२), अलाहाबाद (१८८७), ढाका (१९२१), नागपूर (१९२३) ही विद्यापाठे स्थापन केली. अलीगढ येथे महम्मदन् अँग्लो -इंडियन कॉलेज (१८७५)- आजचे अलीगढ विद्यापीठ, कराचीत सिंध मदरसा युनिव्हर्सटिी (१८८५), पेशावरमध्ये इस्लामिया कॉलेज युनिव्हर्सटिी (१८१३) स्थापन झाली. पण ती ब्रिटिशांच्या पुढाकाराने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली खासगी विद्यापीठे होती. राजा राममोहन रॉय यांच्या नेतृत्वाखाली िहदू कॉलेज (१८१७) स्थापन झाले. हेही खासगी होते.     
इंग्रजी विद्य्ोचा भाग म्हणून जेरेमी बेंथम, जेम्स मिल, त्याचा मुलगा जे. एस. मिल यांनी सांगितलेला उपयुक्ततावाद आणि हर्बर्ट स्पेन्सरची उत्क्रांतिवादी नीती यांच्या रूपात पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा भारतात प्रवेश झाला. या उपयुक्ततावाद व उदारमतवादी विचारसरणीच्या प्रभावामुळेच ‘भारतीय प्रबोधनपर्व’ सुरू झाले. राजा राममोहन रॉय हे प्रबोधनकाळाचे अध्वर्यू होते. राममोहन यांना ‘आधुनिक भारताचे जनक’ म्हणण्याचे कारण तेच आहे. भारतीय ब्रिटिश प्रशासनात माऊंट एलफिन्स्टनने फ्रान्सिस बेकन, डेव्हिड हय़ूम, जॉर्ज बर्कले, जोसेफ बट्लर, तसेच जेरेमी बेंथम यांचे बरेच वाचन केले होते. ते त्याने प्रशासन करताना उपयोगात आणले. भारतात जे तत्त्वज्ञान अभ्यासक्रमात समाविष्ट झाले ते मुख्यत: विविध नतिक सिद्धांत व चिद्वाद या प्रकारचे होते.
भारतातील तत्त्वज्ञानाचा पदवीचा अभ्यासक्रम प्रथम कलकत्ता विद्यापीठात (१९०७), नंतर मुंबई विद्यापीठ (१९१० अंदाजे) व मद्रास विद्यापीठात (१९२७) सुरू झाला. कलकत्ता विद्यापीठातील पहिले भारतीय प्राध्यापक म्हणजे आचार्य ब्रजेन्द्रनाथ सील (१८६४-१९३८). सील हे बंगाली मानवतावादी तत्त्ववेत्ते म्हणून ओळखले जातात. ते ब्राह्मो समाजाचे समर्थक विचारवंत आणि स्वामी विवेकानंद यांचे वर्गबंधू होते. तुलनात्मक धर्मशास्त्र आणि विज्ञानाचे तत्त्वज्ञान हा त्यांचा विशेष अभ्यास विषय होता. ‘पॉझिटिव्ह सायन्स ऑफ द अ‍ॅनशन्ट िहदूज्’ हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. राजा राममोहन रॉय यांना ‘आधुनिक भारताचे जनक’ (दि फादर ऑफ मॉडर्न इंडिया) ही पदवी सील यांनीच दिली.  
या नीतिशास्त्रानंतर भारतीय विद्यापीठातील तत्त्वज्ञानाच्या अभ्यासक्रमात, ग्रीक तत्त्वज्ञानातील मुकुटमणी सॉक्रेटिस आणि प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल,  इमन्युएल कान्ट व हेगेलचा, त्यानंतर एफ. एच. ब्रॅडली यांचा तसेच बोझान्के, ग्रीन, बर्गासाँ, टेलर समावेश झाला. हेगेलियन चिद्वाद व अद्वैत वेदांतातील ब्रह्म या संकल्पनेचा किंवा वेदांताचा विचार सुरू झाला. यात प्रामुख्याने हिरालाल हलदर (१८६५-१९४२), कृष्ण चंद्र भट्टाचार्य (१८७५-१९४९), योगी अरिवद (मृत्यू १९५०), म. गांधी, डॉ. राधाकृष्णन, कवी इक्बाल यांचा समावेश होतो.
ढाका विद्यापीठात १९२१ला तत्त्वज्ञान विभाग सुरू झाला. डॉ. जॉर्ज लांग्ले हे पहिले विभागप्रमुख व प्राध्यापक होते. त्याच वर्षी तेथे संस्कृत विभागही सुरू करण्यात आला. आज भारतापेक्षा तेथील तत्त्वज्ञान विभागात प्राध्यापक संख्या जास्त आहे.  
खरे म्हणजे हे सारे अंदाज आहेत. कारण एकोणिसावे शतक इतके धामधुमीचे व गतिमान होते की, ‘पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा भारतातील प्रवेश’ असा काही विचार सुव्यवस्थितपणे तेव्हा झालेला नव्हता (आजही अद्यापि तो झालेला नाही.). उदाहरणार्थ, १९०२-१९०३ साली मुंबई विद्यापीठात तत्त्वज्ञानाचा पूर्णवेळ एम.ए.चा अभ्यासक्रम होता, अशी नोंद रा. भा. पाटणकर त्यांच्या ‘अपूर्ण क्रांती’ या पुस्तकात (पान १३४) करतात. त्यांनी सगळा अभ्यासक्रम दिला आहे. तर दिवंगत प्रा. डॉ. एस. व्ही. बोकील यांच्या मते मुंबई विद्यापीठात १९१० साली तत्त्वज्ञान शिकविणे सुरू झाले असावे.  
विद्यापीठात पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास होणे साहजिक होते, पण अन्यत्रही तो अभ्यासला गेला असे उदाहरण दुर्मीळ आहे, हे पाटणकर दाखवून देतात (पान १२८.). महाराष्ट्र त्या अर्थाने सुदैवी. १९२० मध्ये वाई येथे गुरुवर्य नारायणशास्त्री मराठे यांनी ‘प्राज्ञमठ’ नावाने पाठशाळा सुरू केली ते परंपरेचे ज्ञान विकसित करण्यासाठी. पण भारतीय तत्त्वज्ञानाच्या पंडितास आधुनिक राहण्यासाठी पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा समावेश त्यांच्या पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबरच त्यांनी केला होता.
या इतिहासलेखनाची साधने अतिशय अपुरी आहेत. बहुधा इंग्रज अधिकाऱ्यांनी लिहिलेले विविध प्रकारचे अहवाल आणि नंतर तत्त्वज्ञानाचे पदवीधारक झालेले भारतीय, किंबहुना प्राध्यापक झालेल्यांनी लिहिलेली आत्मचरित्रवजा लेखनातून अतिशय त्रोटकपणे ही माहिती मिळते. भारतात पहिल्या प्रथम कोण, कुठे, कसे ‘पाश्चात्त्य तत्त्वज्ञान’ या नावाने कुणाला शिकविले, हे अज्ञात आहे.’ पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा भारतातील प्रवेशाचा इतिहास हा साधारण असा आहे. पुढील लेखात ‘पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा महाराष्ट्रातील प्रवेश’ कसा झाला ते पाहू.
लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.

peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये