भारत आणि पाकिस्तान मंत्रिगटातील चर्चेनंतरचे एक छायाचित्र वारंवार पाहून अलीकडे वीट येऊ लागला होता. थकलेभागले विस्मरणीय असे आपले परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा आणि पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार यांच्या हस्तांदोलनाचे छायाचित्र हेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चर्चेचे फलित मानण्याची वेळ येऊन ठेपली होती. त्या मानाने आताची ताजी चर्चा जास्त फलदायक ठरली, असे म्हणायला हवे. या दोन देशांत व्यापाराच्या उत्तम संधी आहेत. अर्थात त्या व्यापाराची गरज आपल्यापेक्षा पाकिस्तानला जास्त असली तरी त्या देशातील बासमती आदीची चव आपल्यालाही लागलेली आहे. तेव्हा सरळ करायचे ते करायचे नाही आणि जे सहज जमणारे नाही त्यावरून रडत बसायचे, असे उभय देशांत गेली कित्येक वर्षे सुरू होते. तेव्हा गुंतागुंतीच्या काश्मीर-प्रश्नापेक्षा जे प्रश्न सहज सुटणारे आहेत, ते सोडवायला हवेत, याची जाणीव पाकिस्तानला झाली ते बरे झाले. त्यातूनच भारतातून येणाऱ्यांना एकाच वेळी अनेक शहरांत जाऊ देता येईल, असे प्रवेशपत्र देण्याचा करार या चर्चेत झाला. त्याचप्रमाणे व्यापारी कारणांसाठी जे पाकिस्तानात जाऊ इच्छितात त्यांना प्रवेशपत्र मिळण्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल. प्रत्यक्ष मुलाखत आदी वेळकाढू प्रक्रियांत त्यांचा वेळ यापुढे जाणार नाही. तेव्हा ही मंत्रिपातळीवरील चर्चा अत्यंत फलदायी झाली, असा सूर उभय बाजूंनी लावला. परंतु या बैठकीबाबत फार काही आशावादी राहता येणार नाही. याची कारणे दोन. पहिले म्हणजे या चर्चेनंतरच्या वार्ताहर परिषदेत हीना रब्बानी खार यांनी आपल्या भाषणात दहशतवादातील ‘द’देखील काढला नाही. जणू ही समस्याच नाही. त्यामुळे पाकिस्तान भारताबरोबरच्या संबंधांना कोणत्या दृष्टीने पाहतो हे यामुळे कळू शकेल. दुसरे असे की पाकिस्तानला हा दौरा जेवढा फलदायी आहे तेवढा तो खरोखरच तसा असता तर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पाकभेटीचे आमंत्रण स्वीकारले असते. पाकिस्तानचे अध्यक्ष खुशालचेंडू झरदारी यांच्यासकट अनेक जण सिंग यांना पाकिस्तानचे निमंत्रण देत आहेत. मंत्रिगटातील चर्चेनंतर जेव्हा असे निमंत्रण दिले जाते तेव्हा चर्चा आणि तिचे फलित एक पाऊल पुढे गेल्याचे मानले जाते. तेव्हा सिंग यांनी पाकिस्तानच्या निमंत्रणाचा स्वीकार केलेला नाही, हे पुरेसे बोलके आहे. त्याचप्रमाणे हे निमंत्रण त्यांनी नाकारलेलेही नाही, हेही महत्त्वाचे. तेव्हा पाकिस्तान उभय संबंधांबाबत जे काही गुलाबी चित्र दाखवीत आहे, तशी अर्थातच पूर्ण परिस्थिती नाही. तसे असते तर ‘द हिंदू’ या राष्ट्रीय दैनिकाच्या वार्ताहरास पाकिस्तानने या दौऱ्यासाठी वार्ताकनास येण्याचा परवाना नाकारला नसता. ‘द हिंदू’चे प्रवीण स्वामी हे एक अभ्यासू पत्रकार म्हणून ओळखले जातात. कृष्णा यांच्या दौऱ्यासाठी ते त्यांच्यासमवेत जाणार होते. परंतु पाकिस्तानने त्यांचा प्रवेश अर्ज नाकारला. म्हणजे एका बाजूला प्रवेश अर्जाबाबत उदारमतवादी झाल्याचा दावा करायचा आणि त्याच वेळी कोणतेही विशिष्ट कारण नसताना काहींना प्रवेश द्यायचा नाही, असे पाकिस्तानचे आहे. तेव्हा या मंत्रिगट बैठकीबाबत फार सकारात्मक होऊन वगैरे चालणार नाही. अर्थात हेही खरे की तीत फार नकारात्मकही काही झालेले नाही. हस्तांदोलनापलीकडे या बैठका जाऊ लागल्या हेच त्यातल्या त्यात समाधान.