विक्रमवीर सुनील गावस्कर हा जेव्हा क्रिकेटवेडय़ांचे परमदैवत होता, तेव्हा जीवनाचे सार सांगणारे एक गीत कुणा संगीतकाराने त्याच्या मुखातून वदवून घेतले होते. क्रिकेटच्या मदानावरचा कोणत्याही चेंडूला सीमापार टोलविण्याचा सूर गावस्करच्या गळ्याला नसला, तरी त्या गाण्याला त्याच्या चाहत्यांनी रसिकतेने पसंतीची पावती दिली. जीवन हे क्रिकेटच्या खेळासारखे आहे, असे त्या गाण्याचे सार होते. थांबला तो संपला हा संदेश समाजापर्यंत पोहोचावा हा त्या संगीतकाराचा हेतू मात्र या गीतामुळे साध्य झाला होता. तसे तर, कोणत्याही गोष्टीची तुलना क्रिकेटशी करता येणे शक्य आहे, हे जरी खरे असले, तरी राजकारण आणि क्रिकेट यांच्यातही असेच साम्य असेल, हे मात्र आता नव्याने जाणवू लागले आहे. गावस्करच्याच पिढीतील एरापल्ली प्रसन्ना या गोलंदाजाने, क्रिकेटच्या मदानावरच्या आजच्या स्थितीचे जे वर्णन केले आहे, ते सध्याच्या राजकारणालाही तंतोतंत लागू पडते. एके काळी भारताच्या फिरकी गोलंदाजीचा जगभरात दबदबा होता. ही फिरकी भल्याभल्यांना चकवा द्यायची आणि दांडी गुल झाली तरी चेंडू कुठून आला, या विचाराने चक्रावतच फलंदाज मदानावरून परतायचा. ती फिरकी सध्या हतबल झाल्याची प्रसन्ना यांची खंत आहे. सध्या मदानावर फिरकी गोलंदाजी होत असली तरी फलंदाजाची दांडी उडविणे हे गोलंदाजाचे लक्ष्य नसतेच, असा सूर त्यांनी लावला. आता हेच वर्णन राजकारणाच्या सध्याच्या मदानावर नेले, तर तिथेदेखील हीच परिस्थिती दिसते. राजकारणाच्या मदानावरही, फिरकी गोलंदाजी सगळेच करतात, पण प्रतिस्पध्र्याचा त्रिफळा उडविण्याची क्षमता मात्र एकाही चेंडूत नसते आणि गोलंदाजाची तशी इच्छादेखील दिसत नाही. राजकारणाच्या मदानावरचे फिरकी गोलंदाज केवळ प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी गोलंदाजी करीत असावेत आणि या चेंडूमुळे आपण त्रिफळाचीत होणार नाही, याची पूर्ण जाणीव असलेले फलंदाज मात्र हवेतच बॅट फिरवून चौकार-षटकारांचा आव आणत असावेत, असे अलीकडे दिसते. क्रिकेटच्या मदानावर अलीकडे फिरकी गोलंदाजांचे लक्ष्य स्टम्पवर नसते, तर चेंडू फलंदाजाच्या पायावर आदळावा आणि फलंदाजाची ‘लेग बिफोर’ विकेट पडावी अशीच गोलंदाजाची अपेक्षा असावी, असे प्रसन्ना यांचे निरीक्षण आहे. हे निरीक्षण नेमके क्रिकेटबाबत होते की राजकारणातील सद्यस्थितीवर त्यांना क्रिकेटच्या दृष्टान्तातून मार्मिक भाष्य करावयाचे होते, हे समजू शकत नाही. पण प्रसन्ना यांना राजकारणात तेवढासा रस असल्याचे एकिवात नाही. आजकाल सर्वानाच सगळीकडेच राजकारण दिसत असल्याने, प्रसन्ना यांचे हे मत एकल्यावर, नरेंद्र मोदींनी मारलेला टोला म्हणजे अडवाणींच्या दिशेने टाकलेला फिरकी चेंडू तर नव्हता ना, असे उगीचच वाटण्यास वाव आहे. पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहिली की अपेक्षाभंगच होतो, हे मोदींचे मत आहे. पण या मतामुळे अडवाणींची दांडी उडणार नाही. कारण पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारे आणि अपेक्षाभंगाचा अनुभव असलेले ते काही एकमेव नेते नाहीत. शरद पवारांपासून मुलायमसिंग यादवांपर्यंत आणि मायावतींपासून नितीशकुमारांपर्यंत प्रत्येकाला मोदींचा हा फिरकी चेंडू आपल्या पायावर आदळण्यासाठीच आला आहे असे वाटू शकते. पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणाऱ्यांप्रमाणे, तर गेलाबाजार एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणारे दादा, आबा सगळीकडे असू शकतात. मोदींची फिरकी त्यांच्याही पायाला बांधलेल्या बािशगाला, म्हणजे क्रिकेटच्या भाषेत, पॅडला आदळू शकते. समोरचा पंच बोट वर करून ‘आऊट’ देत नाही, तोवर राजकारणाच्या मदानावरच्या सगळ्या फलंदाजांना आपली आपली फलंदाजी करता येईल, अशी माफक फिरकी चालतच राहणार आहे!!
संग्रहित लेख, दिनांक 9th Sep 2013 रोजी प्रकाशित
क्रिकेट म्हणजे राजकारण तर नव्हे?
विक्रमवीर सुनील गावस्कर हा जेव्हा क्रिकेटवेडय़ांचे परमदैवत होता, तेव्हा जीवनाचे सार सांगणारे एक गीत कुणा संगीतकाराने त्याच्या मुखातून

First published on: 09-09-2013 at 01:03 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is cricket politics