डाव्यांचा अपवाद वगळता ११ पक्षांची आघाडी व्यक्तिकेंद्री, विरोधाभासांनी भरलेली अशीच आहे. हे पक्ष तूर्त तरी भाजप आणि काँग्रेसपासून सारखेच दूर राहण्याचा दावा करीत असले तरी त्याचाच दुसरा अर्थ सारखेच जवळ असाही होतो..
मृगाच्या धारा कोसळू लागल्यावर रानोमाळ उगवणाऱ्या कुत्र्याच्या छत्र्या या पावसापासून वाचायचे असेल तर खऱ्या छत्रीस पर्याय ठरू शकत नाहीत. जवळपास ११ पक्ष येऊन मारून मुटकून तयार होत असलेल्या तिसऱ्या आघाडीबाबत असे म्हणता येईल. यातील बरेच पक्ष फक्त काही प्रांत वा शहरांपुरतेच तग धरून आहेत. ते ते प्रांत वा शहर सोडले तर अन्यत्र त्यांना काहीही स्थान नाही. त्याची प्रमुख कारणे दोन. एक म्हणजे अन्यत्र आपल्यासाठी स्थान असावे अशी दृष्टीच त्यांच्याकडे नाही. ज्यांना आहे त्यांना त्यासाठी प्रयत्न करण्यात रस नाही. कारण गावात जेवढा मान मिळतो तो दुसऱ्या गावात मिळत नाही. परिणामी यातील बरेचसे नेते हे आपापल्यापुरते ग्रामसिंहच आहेत. निवडणुका आल्यावर आपापल्या ग्रामसिंहत्वाची जमेल तितकी किंमत वसूल करणे हे एकमेव उद्दिष्ट या पक्षांचे असते. यांतून त्यातल्या त्यात अपवाद करावयाचा झाल्यास डाव्या पक्षांचा करता येईल. ही डावी मंडळी आपले कालबाहय़ तत्त्वज्ञान हृदयाशी कवटाळून जग आपल्याला कधी कवटाळेल या स्वप्नात असतात. वैचारिक पराजय सहन करण्याच्या डाव्यांच्या क्षमतेस तोड नाही. डाव्यांचा हाच.. क्षणभरही थरकू नको.. हा बाणा हा ताज्या तिसऱ्या आघाडीच्या मागे आहे. इतके आशावादी असणे अन्य कोणास झेपणारे नाही. ते डावेच करू जाणे. खरे तर वैयक्तिक पातळीवर जगतानाच्या त्यांच्या धर्मनिरपेक्षतेविषयी शंका घेण्याचे कारण नाही. परंतु प्रश्न त्यांच्या व्यक्तिगत सैद्धांतिकतेचा नाही. तर तो त्यांच्या सामायिक राजकीय शहाणपणाचा आहे. त्या बाबत ते अन्यांइतकेच लबाड ठरतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे कम्युनिस्टांना जयललिता यांच्या अण्णा द्रमुकबाबत वाटू लागलेला पुळका. या कम्युनिस्टांतील ज्येष्ठ मार्क्सवादी कम्युनिस्ट तिसऱ्या आघाडीच्या केंद्रस्थानी आहेत आणि या ११ पक्षांच्या आघाडीत धर्मनिरपेक्षता हा समान धागा आहे, असे त्यांचे म्हणणे. अतिशयोक्ती अलंकाराचे उदाहरण म्हणून ते देता येऊ शकेल इतके ते अवास्तव आहे. एका बाजूला मार्क्सवादी दावा करणार धर्मनिरपेक्ष आघाडीचा, या आघाडीत त्यांच्या मांडीला मांडी लावून कम्युनिस्ट बसणार. मग तेच कम्युनिस्ट चेन्नईत जाऊन जयललिता अम्मांच्या दर्शनाची वाट पाहणार आणि त्यांच्याशी आघाडी करणार. एवढे केल्यावर अण्णा द्रमुक हा पक्ष कोणत्या कोनातून पाहिल्यावर तो निधर्मीपणाच्या व्याख्येत बसतो, हे तरी कम्युनिस्टांनी जनतेस सांगावे. अण्णा द्रमुक या पक्षास धर्मनिरपेक्षतेचे प्रमाणपत्र देणे म्हणजे द्रमुकचे करुणानिधी यांचे पुटपुटणे हे उच्च दर्जाची वक्तृत्व कला आहे असे सांगण्यासारखेच. या जयललिता भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही दलातही होत्या आणि काँग्रेसही त्यांना परकी नव्हती. त्या अद्याप या नव्या एकादशी आघाडीत सहभागी झालेल्या नाहीत. तरीही कम्युनिस्टांनी त्यांच्याशी आघाडीबाह्य़ संधान साधलेले आहे. हे एकच उदाहरण नाही. तिसऱ्या आघाडीचा समस्त प्रयोगच हा अशा विरोधाभासांनी भरलेला आहे.
या महत्त्वाकांक्षी आघाडीस नवीन पटनाईक यांचा बिजू जनता दल आणि प्रफुल्ल महंत यांचा आसाम गण परिषद यांनी पहिल्याच दिवशी टांग दिली. ही आगामी काळात होऊ घातलेल्या घटनांची चुणूक म्हणावयास हवी. राजस्थानात भाजपच्या वसुंधरा राजे सत्तेवर पुन्हा आल्यानंतर पटनाईक यांची खुर्ची भाजपच्या दिशेने सरकू लागली आहे. वसुंधरा राजे आणि नवीन यांच्या राजकीय दोस्तीत आता नवीन काही नाही. त्यामुळे भाजपस केंद्रात सरकार बनवण्याची संधी मिळाल्यास पटनाईक आपले पळीपंचपात्र घेऊन नरेंद्र मोदी यांच्याशेजारी आपला पाट मांडणारच नाहीत, असे नाही. आसाम गण परिषदेचेही तेच. त्यामुळे या दोन महत्त्वाच्या पक्षांनी अनुपस्थित राहून तिसऱ्या आघाडीच्या स्वप्नांना ती फुलायच्या आधीच नख लावले आहे, असे म्हणावयास हवे. या आघाडीत हरदनहळ्ळी दोड्डेगौडा देवेगौडा यांचा जनता दल सेक्युलरदेखील आहे. या देवेगौडा यांना कर्नाटकातही आता कोणी विचारीत नाही. याआधीही त्यांची काही फार मोठी ताकद होती असे नाही. परंतु राजकारणात काही काही गोष्टी केवळ योगायोगाने घडून जातात. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री होऊन गेले त्याचप्रमाणे देशात देवेगौडा आणि इंदरकुमार गुजराल यांना पंतप्रधानपद मिळून गेले. जेव्हा सर्व एका उंचीचे असतात त्या वेळी चतुर आपल्याला ज्याच्याकडून कमीत कमी धोका आहे अशा व्यक्तीची निवड करतात हा इतिहास आहे. देवेगौडा आणि गुजराल हे या इतिहासाचे प्रतीक. यातील गुजराल आता नाहीत. परंतु देवेगौडा मात्र या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते या भ्रमात नसतील असे म्हणता येणार नाही. या अकरा पक्षीयांत लक्ष द्यावे असे दोनच. एक म्हणजे शरद यादव व नितीशकुमार आणि दुसरीकडे मुलायमसिंग यादव. यापैकी शरद यादव आणि नितीशकुमार हे बिहारात सत्तेवर आहेत तर मुलायमांची यादवी उत्तर प्रदेशात आहे. तिसऱ्या आघाडीत राजकीय धुगधुगी असलीच तर ती फक्त या दोघांमुळेच. त्याच वेळी या चौथ्यांदा वा पाचव्यांदा होत असलेल्या तिसऱ्या आघाडीत काही अंगभूत विरोधाभास आहेत आणि ते सर्वच्या सर्व व्यक्तिकेंद्रित आहेत. या तिसऱ्या आघाडीसाठी डाव्या पक्षांचा पुढाकार आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांची तृणमूल त्यापासून फटकून वागेल, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य. ममताबाईंचा डावा विरोध इतका तीव्र आहे की त्या तशीच वेळ आली तर निधर्मीवादाचे कुंकू पुसायला मागेपुढे पाहणार नाहीत आणि भाजपला पाठिंबा देतील. पण डाव्यांशी त्यांनी सहकार्य करणे शक्य नाही. तीच गत अण्णा द्रमुक आणि द्रमुक यांची. आताच्या तिसऱ्या आघाडीस जयललितांच्या अण्णा द्रमुकची साथ अपेक्षित आहे. म्हणजे करुणानिधींचा द्रमुक असणार नाही. तसेच मुलायमसिंग यांचा समाजवादी पक्ष असल्यामुळे मायावती यांचा बहुजन समाजवादी पक्ष या आघाडीत सामील होणार नाही.
हे अंगभूत दोष नमूद करायचे कारण त्यामुळे या आघाडीचे वास्तववादी रूप लक्षात यावे. आणि दुसरे असे की काँग्रेस आणि भाजप या दोन्हींपासून समान अंतर राखणार असल्याचा दावा जरी या आघाडीकडून केला जात असला तरी मूलत: ही आघाडी ही भाजपविरोधी असणार आहे. खरे तर यातील बऱ्याच पक्षांनी कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर.. यात मायावती यांचा बहुजन समाजवादी पक्ष आला, ममता बॅनर्जी यांचा तृणमूलही आला आणि जयललिता यांचा अण्णा द्रमुकही आला.. या आधी भाजपशी युती केली होती. म्हणजे यांचा निधर्मीवादाचा बुरखाच खोटा ठरतो. तेव्हा आता तशीच वेळ आली तर ही मंडळी पुन्हा भगवी कफनी आपल्या गळय़ाभोवती घालून घेणारच नाहीत, असे ठामपणे म्हणता येणार नाही. परंतु याचा अर्थ असाही नाही की ते काँग्रेसच्या कळपात जाणार नाहीत. तेव्हा हे पक्ष तूर्त तरी भाजप आणि काँग्रेसपासून सारखेच दूर राहण्याचा दावा करीत असले तरी त्याचाच दुसरा अर्थ सारखेच जवळ असाही होतो, हे आपण ध्यानात घ्यावयास हवे.
तेव्हा या तिसऱ्या आघाडीचे सार इतकेच की भाजपला पायात पाय घालून कसे पाडता येईल याचा प्रयत्न करायचा, तसे खरोखरच झाले तर काँग्रेसच्या साह्य़ाने सत्तेत सहभागी व्हायचे आणि तेही जमणार नसेल तर तिसऱ्या आघाडीचे गाजर मोडून भाजपशी सौदा करायचा. काँग्रेस वा भाजप ज्या पक्षाची सरशी होईल तिकडे ही ११ पक्षीयांच्या तिसऱ्या आघाडीची निधर्मी एकादशी जाईल, याबाबत संशय नसावा.
संग्रहित लेख, दिनांक 27th Feb 2014 रोजी प्रकाशित
ज्याची सरशी, त्याची एकादशी
डाव्यांचा अपवाद वगळता ११ पक्षांची आघाडी व्यक्तिकेंद्री, विरोधाभासांनी भरलेली अशीच आहे. हे पक्ष तूर्त तरी भाजप आणि काँग्रेसपासून सारखेच दूर राहण्याचा दावा करीत

First published on: 27-02-2014 at 04:08 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is indian parties unite in third front a viable option for india