मध्यमवर्गीय मुंबईकर घरात वाढलेल्या जितीश कलाटने आज जगभर चित्रकार म्हणून नाव कमावले आहे. आर्ट इन्स्टिटय़ूट ऑफ शिकागो, लंडनच्या टेट मॉडर्न व र्सपटाइन या महागॅलऱ्या, अशा ठिकाणी प्रदर्शनाचा मान मिळवणारे चित्रकार कलेच्या जागतिक इतिहासात स्थान मिळवतातच, असा आजवरचा पायंडा आहे. पण जितीशची आज दखल घेण्याचे कारण अगदी निराळे आहे.. पाश्चात्त्यकेंद्री कला-इतिहासाला भारतातून उत्तर देणाऱ्या ‘कोची मुझिरिस बिएनाल’ या द्वैवार्षिक महाप्रदर्शनाचा विचारनियोजक -क्युरेटर- अशी जितीशची ओळख आता जगभर झाली आहे.
कोचीनमध्ये २०१२च्या डिसेंबरात पहिल्यांदा ‘कोची मुझिरिस बिएनाल’ भरली होती, तेव्हा बोस कृष्णम्माचारी आणि रियाज कोमू हे या द्वैवार्षिक महाप्रदर्शनाचे दोघे संस्थापकच, चित्रकारांच्या निवडीपासून ते चित्रांमागच्या विचारांचे प्रवाह लक्षात घेऊन त्या प्रदर्शनाचे नियोजन कसे करावे, हे ठरवणारे क्युरेटरसुद्धा होते. यंदा १२ डिसेंबरच्या शुक्रवारपासून ही बिएनाल (बायएनिअल किंवा बायअ‍ॅन्युअल या शब्दाचा भारतीय तद्भव शब्द) सुरू झाली, त्यासाठी २०१३च्या नोव्हेंबरात जितीशची निवड झाली होती. १०० कलाकृती- ३३ देशांमधले ९४ चित्रकार आणि काही कोटींच्या घरात जाणारा खर्च सावरण्यासाठी ‘बीएमडब्ल्यू’सारखे प्रायोजक, गेल्या खेपेला प्रेक्षकसंख्या १० लाखांवर, असा मोठा पसारा असलेल्या या बिएनालचा डोलारा जितीशने यथास्थित सांभाळला, हेच उद्घाटनाच्या दिवशी दिसून आले. एवढे मोठे प्रदर्शन म्हणजे वेळेत काम पूर्ण होतच नाही, असा जगभर २००हून अधिक शहरांनी आपापल्या ठिकाणी सुरू केलेल्या बिएनालेंचा अनुभव असताना, जितीशच्या देखरेखीखाली ९० टक्के काम पूर्ण होऊ शकले.  अर्थात, जितीशचे मुख्य काम निराळे होते. विचारनियोजन किंवा या महाप्रदर्शनाचा अनुभव सुसूत्र असावा, प्रेक्षकाची विचारप्रक्रिया पुढे नेऊन सांस्कृतिक समृद्धी वाढवणारा असावा, हे महत्त्वाचे. तेही जितीशने केले, तेव्हा चित्रकार म्हणून किंवा चित्रकाराच्या नजरेतून जग पाहिल्याचा अनुभव त्याला कामी आला. विश्वाची अथांगता आणि क्षितिजाची सान्त कल्पना, व्यक्तिगत तरीही समाजाने यातून काही शिकावे असे कलाकार म्हणूनच घेतलेले अनुभव, जगाची काळजी कलेने करावी की करू नये यासारखा प्रश्न- अशी टोके गाठणाऱ्या कलाकृती एकसूत्र अनुभवासाठी प्रदर्शित करण्यात जितीश यशस्वी होऊ शकला, अशीच कोचीमध्ये जमलेल्या जाणकारांची पहिली प्रतिक्रिया आहे. येत्या १२ मार्चपर्यंत प्रेक्षकांची पसंतीही या महाप्रदर्शनास मिळाली तर जितीशच्या या यशावर शिक्कामोर्तब होऊन कलेतिहासातील नोंदीचे दालनही खुले होईल.