सर्वव्यापी असलेल्या चित्रचक्रम भारतीय प्रेक्षकांना ‘कॉलीवूड’नामे तमीळ चित्रपटसृष्टीची जी माहिती मिळते, त्यात तेथून निपजलेल्या कमल हासन आणि रजनीकांत या नरसर्वोत्तमांची प्रतिमा पहिली असते हे दुर्दैव आहे. तुलनेने उशिरा सुरू होऊनही ‘आलम आरा’नंतर केवळ सात महिन्यांनंतर तमीळ बोलपटाची वाजतगाजत निर्मिती झाली. सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये सर्वाधिक तिकीटदर ५० आणि मल्टीप्लेक्समध्ये १२० ठेवण्याचा कायदा या चित्रसृष्टीने केला. चित्रचक्रमांच्या या सिनेराज्यात तयार होणारे चित्रपट सिंगापूर, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, जपान, मध्य आशिया, पश्चिम युरोप, उत्तर अमेरिकेत एकाच वेळी तिकीटबाऱ्या गाजवत असतात, हे हिंदी चित्रज्ञानाच्या हळकुंडात पिवळे झालेल्या आपल्यातल्या चित्रवेडय़ांना माहीत नसते. तितकीच दिग्दर्शनाची थोर परंपरा निर्माण करणाऱ्या के. बालचंद्र यांच्याबाबत बातम्यांमधून पुनरावृत्त होणाऱ्या त्यांच्या कर्तृत्वापलीकडे माहिती चित्रप्रेमींना नसते.
पद्मश्री तसेच चित्रपट जगतातील सर्वोच्च सन्मानांनी सन्मानित झालेल्या बालचंद्र यांनी कमल हासन व रजनीकांत यांना पहिल्यांदा सिनेमाच्या पडद्यावर झळकविले. नागेश, सुजाता, चिरंजीवी, जयाप्रदा, जयासुधा, सरिता, प्रकाशराज आदी दक्षिणी महाकलाकारांनाही त्यांनीच घडविले. पण ‘स्टार मेकर’म्हणून त्यांची ओळख अत्यंत त्रोटक ठरावी इतके डोंगराएवढे काम त्यांनी तमीळ चित्रपटांसाठी केले. १९५० च्या दशकात रंगभूमीवर सामाजिक प्रश्नांना वाहिलेल्या गोळीबंद संहिता त्यांनी उभारल्या. त्याचा सुपरिणाम १९६०च्या दशकांत त्यांचा चित्रपटक्षेत्रात पदार्पणात झाला. संवादलेखनासाठी उतरलेले बालचंद्र पटकथा आणि चित्रपट दिग्दर्शनासोबत या चित्रसृष्टीचा कणा बनले. आपल्या लेखनातून, दिग्दर्शनातून त्यांनी समाजातल्या बदलत्या समांतर प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला.
उत्कृष्ट कलाकृतींना तमीळ चित्रपटांमध्ये आणण्याचा त्यांनी विडाच उचलला होता. गाजलेल्या साहित्यकृती, मेघ ढाका तारासारखा चित्रपट आणि ‘तो मी नव्हेच’सारखे मराठी नाटकही त्यांनी तमीळ चित्रपटांचा विषय बनविले. जेमिनी गणेशनला ‘तो मी नव्हेच’च्या तमीळ अवतारानेच उभारी दिली. पाच दशकांमध्ये शंभराहून अधिक चित्रपट शेकडो कलाकार, तंत्रज्ञ, नवप्रश्नांशी बांधील आणि नवविचारांशी संलग्न राहून त्यांनी बनविले. ‘आईना’ नावाचा आद्य सुपरस्टार राजेश खन्नाला घेऊन तयार केलेला त्यांचा हिंदीपट आदळला, तर दुसरा ‘एक दूजे के लिए’ यशाची नवी परिमाणे हिंदी चित्रसृष्टीला देऊन गेला. बालचंद्र यांच्या कर्तृत्वाच्या पताकांचा उच्चार थोडक्यात करता येण्याजोगा नाही. हॉलीवूडपासून जगभरच्या देमार पटांचे अद्भुत आणि अतक्र्य अवतार तयार करणाऱ्या सध्याच्या चित्रचक्रम दक्षिण चित्रपटसृष्टीत ते वेगळे होते आणि त्यांच्या निधनानंतरही अतुल्यच राहणार आहेत, हे खरे.