विरोधी पक्षात आणि सत्तेत असतानाही एकाच पद्धतीने वागता येणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी काही ना काही कारणाने सतत चर्चेत राहण्याचा जणू चंगच बांधला असावा. म्हणूनच इकडे अजित पवार दुष्काळावरच्या कविता म्हणत असतानाच तिकडे ममता बॅनर्जी विरोधकांवरील विडंबन काव्य मोठमोठय़ाने म्हणत होत्या! बंगालमध्ये ३४ वर्षांच्या कम्युनिस्ट सत्तेनंतर आलेल्या तृणमूल काँग्रेसचे सरकार वेगळय़ा तोलाने वागेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात अगदी बारीक बारीक गोष्टींवरून शीघ्रकोपी ममतांनी जी वक्तव्ये केली आणि कृती केली, त्यामुळे तेथे अकारण युद्धजन्य परिस्थिती उद्भवू लागली आहे. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेच्या सुदीप्तो गुप्ता या कार्यकर्त्यांचा पोलिसांकडून झालेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्यानंतर ‘ही एक क्षुल्लक आणि किरकोळ घटना आहे’, असे वक्तव्य करून ममताबाईंनी विरोधकांचा रोष ओढावून घेतला. लगेच कम्युनिस्ट पक्षाने पश्चिम बंगालमध्ये तर आंदोलन सुरू केलेच, पण ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यात थेट त्यांच्यावरच हल्ला चढवला. नियोजन आयोगाच्या कार्यालयात झालेल्या या झटापटीने कम्युनिस्टांचाही तोल किती आणि कसा सुटला आहे, हे तर जाहीर झालेच, परंतु ममता बॅनर्जी यांनाही आपल्या एका वाक्याने काय घडू शकते, याचा अनुभव आला. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी राज्यात मोठय़ा प्रमाणात दंगा सुरू केला. एखाद्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू ही बाब अतिशय संवेदनशीलतेने हाताळायला हवी, याचे भान ममतांना नाही. पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला किंवा नाही, ही गोष्ट कदाचित तपासून घेण्यासारखी असू शकते. मात्र मृत्यू ही गोष्ट टिंगल करण्यासारखी असू शकत नाही. आपल्या प्रत्येक कृतीवर आणि वक्तव्यावर सगळ्यांचे बारीक लक्ष असते, याचे भान त्यांना असते, तर वाढत्या लोकसंख्येमुळे बलात्कार वाढतात, असे वक्तव्य त्यांनी केले नसते. आपला पक्ष अतिशय समंजस असून कम्युनिस्टच हिंसक आहेत, असे सांगताना गेल्याच वर्षी वादग्रस्त व्यंगचित्र इंटरनेटच्या माध्यमातून प्रसृत केल्याबद्दल अखिलेश महापात्रा या जाधवपूर विद्यापीठातील प्राध्यापकाला तृणमूलच्याच कार्यकर्त्यांनी कशी बेदम मारहाण केली होती आणि आयपीएल सामन्यांच्या उद्घाटन उत्सवात सहभागी झाल्याबद्दल फेसबुकवरील टिप्पणीमुळे, याच आठवडय़ात तृणमूलच्याच सुवजीत दास या युवक कार्यकर्त्यांलाही धमकीचे दूरध्वनी कसे येऊ लागले आहेत, याची आठवण त्यांनी ठेवायला हवी. आपल्याच राज्यातील नागरिकांवरील विविध प्रकारच्या अन्यायांचे हरण करण्यासाठी आपल्याला सत्ता मिळाली आहे, याचे भान सतत ठेवले नाही, की असे घडते. ममता बॅनर्जी यांनी त्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूकडे या पद्धतीने पाहिले असते, तर कदाचित त्यांच्या विरोधकांच्या हाती पेटता पलिता पडलाही नसता. आपल्या उत्साही आणि अनपेक्षित वर्तनाबद्दल ख्यातनाम झालेल्या ममतांना येत्या चार वर्षांत, आपण आधीच्या सत्ताधाऱ्यांपेक्षा वेगळे आहोत, हे सिद्ध करावे लागणार आहे. केवळ चर्चेत राहून आणि वेळोवेळी प्रक्षोभक वक्तव्ये करून हे वेगळेपण सिद्ध करता येणार नाही, हे सत्य त्यासाठी उमगावे लागेल.
संग्रहित लेख, दिनांक 11th Apr 2013 रोजी प्रकाशित
डावखुरा विरोध
विरोधी पक्षात आणि सत्तेत असतानाही एकाच पद्धतीने वागता येणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी काही ना काही कारणाने सतत चर्चेत राहण्याचा जणू चंगच बांधला असावा. म्हणूनच इकडे अजित पवार दुष्काळावरच्या कविता म्हणत असतानाच तिकडे ममता बॅनर्जी विरोधकांवरील विडंबन काव्य मोठमोठय़ाने म्हणत होत्या!

First published on: 11-04-2013 at 12:18 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Left handed oppose