अतृप्त वासनांच्या सोबत मरण हे त्या वासनापूर्तीच्या ओढीने नव्या जन्माचं कारणच बनतं.. असं मरण ‘हे पेरणें’ आणि त्यामुळे ‘जन्म हे उगवणे’ ठरतं.. अचलानंद दादांच्या या उद्गारांनी हृदयेंद्रच्या मनात विचारतरंग उमटू लागले..
हृदयेंद्र- खरंच या जन्मात मी जी जी र्कम करतो, त्यामागे कोणती ना कोणती कामना असते, वासना असते, इच्छा असतेच.. व्यवहारातलं साधं कर्मही मला निष्काम करता येत नाही.. असा मी साधना करू लागतो तीसुद्धा निष्काम होतच नाही.. माझ्या मनातल्या अतृप्त इच्छांच्या पूर्तीची जपमाळच तर अंतरात फिरत असते! या वासनापूर्तीच्या धडपडीतून जी जी कर्म होतात ती फळं निर्माण करतात.. ती कर्मफळं भोगूनच नष्ट होतात..चांगल्या कर्माची चांगली फळं आणि वाईट कर्माची वाईट फळं. ती कर्मफळं भोगत असतानाच नवनव्या कामना तरंगांनी मन व्यापत असतं.. त्यातून पुन्हा नवनवी कर्म आणि त्यातून नवनवी कर्मफळं.. खरंच दादा सर्वच अतृप्त कामनांचा खेळ! तो संपवायचा तर निर्वासन होता आलं पाहिजे.. पण ते सोपं का आहे? श्रीगोंदवलेकर महाराजही म्हणत ना? ‘वासनेतच आपला जन्म आहे म्हणून ती मारणं कठीण आहे!’
अचलदादा – शब्द नीट ऐका बरं! वासना मारणं ‘कठीण’ आहे, असं श्रीमहाराज सांगतात, ‘अशक्य’ आहे, असं सांगत नाहीत!
हृदयेंद्र- (हसून) हे खरंच की! आता कर्मू असता ना तर लगेच उसळून त्यानं विचारलं असतं की, ‘वासना मारायची गरजच काय?’
अचलदादा- (ठामपणे) कर्मेद्रसारख्यांमुळे तुमचंही फावतच म्हणा! तुमच्याही मनात तर येतंच की वासना मारायची काय गरज आहे? फक्त ते उघडपणे न विचारून तुम्ही स्थितप्रज्ञता जोपासता.. तो विचारून मोकळा होतो आणि तुम्हाला उत्तराचाही लाभ होतो! (अचलदादांच्या बोलण्यात पूर्वीचा स्पष्टवक्तेपणा मधेच उसळल्याच्या जाणिवेनं हृदयेंद्र अस्वस्थ झाला.. स्वभाव शरणता कुणाला सुटली आहे का? पण त्यामुळे सुरू असलेल्या चर्चेला बाधा येते, त्या विचारानं हृदयेंद्र दुखावला.. मग त्याला वाटलं आपलं हे दुखावणं दादा आपल्याला फटकारत आहेत, त्यामुळे अहं दुखावल्यातून तर आलेलं नाही? त्याची सूक्ष्म वेदना त्याच्या चेहऱ्यावर उमटल्यावाचून राहिली नाही. दादाही मग हळुवारपणे बोलू लागले..) वासना ओसरल्याशिवाय ‘मरण हे पेरणें। जन्म हें उगवणें’ हा क्रम संपणार नाही.. वासनासुद्धा कुणाला धरून असते? ‘मी’ लाच ना? हा ‘मी’ तरी खरा आहे का?
हृदयेंद्र- नाही भ्रामकच आहे..
अचलदादा- मग तरी तो मला खरा का वाटतो?
हृदयेंद्र- मायेच्या प्रभावामुळे..
अचलदादा- अगदी बरोबर! म्हणूनच तर विठा महाराज काय सांगतात? ‘मरण हें पेरणें जन्म हें उगवणें। हे मायेची खूण जाणीतली।।’ ही मायेची खूण आहे. हा ‘जन्म’ आणि हा ‘मृत्यू’ मायेच्या आधीन आहे.. मायेच्या प्रांतातला आहे. ही माया.. मायेचा हा प्रभाव जर संपवायचा असेल तर हे नारायणा तुझा संग फक्त पुरेसा आहे!
हृदयेंद्र- (आनंदून) ओ हो!
अचलदादा- ‘मरण हें पेरणें जन्म हें उगवणें। हे मायेची खूण जाणीतली।। संग तुझा पुरे संग तुझा पुरे। संग तुझा पुरे नारायणा।।’ हा ‘नारायण’ म्हणजे विष्णू नव्हे बरं का! नारायणाची फोड माहीतच आहे ना?
हृदयेंद्र- हो नर अधिक अयन..
अचलदादा- अयन म्हणजे घर.. नरदेह रूपी घरात प्रकटलेला सद्गुरु हाच खरा नारायण आहे! त्या नारायणाचा.. त्या सद्गुरुचा केवळ संगच पुरेसा आहे.. त्या संगानं काय होईल?
हृदयेंद्र- शंकराचार्य म्हणतात त्याप्रमाणे.. सत्संगत्वे नि:संगत्वं!
अचलदादा- बरोबर! ‘मना संग हा सर्व संगास तोडी’ या सद्गुरुंच्या संगानं जगाचा संग.. जगाच्या प्रभावाचा संग.. जगप्रभावरूपी मायेचा जाणिवेतला संग संपतो.. या सत्संगानं जगापासून नि:संगत्व येतं.. ते झालं की? ‘नि:संगत्वे निर्मोहत्वं’.. मनातला मोह दूर होतो.. मग ‘निर्मोहत्वे निश्चस चित्तं’.. चित्त निश्चल होतं.. स्थिर होतं.. स्वस्थ म्हणजे स्वरुपात स्थित होतं. आणि ही स्थिती म्हणजेच जीवनामुक्ती नाही का? जीवनातील चिंता, काळजी, भीती, अस्थिरता यांच्या बंधनातून भुक्ती नाही का? ‘निश्चल चित्ते जीवन्मुक्ती:!’ जगत असतानाच ही मुक्ती साधायची तर हे नारायणा.. हे सद्गुरो केवळ संग तुझा पुरे, संग तुझा पुरे!!
चैतन्य प्रेम