‘पाऊस असून टंचाई’ सतीश कामत यांचा लेख (सह्यद्रीचे वारे, १९ एप्रिल) वाचला. कोकणातील, खासकरून रत्नागिरी जिल्ह्यतील अनेक खेडय़ांना, वाडय़ांना, कोंडांना फाल्गुन महिन्यापासूनच तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. पाण्याच्या बाबतीत निसर्ग कोकण प्रदेशावर प्रसन्न आहे. घाटमाथा, घाटमाथ्याच्या पश्चिमेकडील उतार व सह्याद्रीच्या ऐन पायथ्याशी जो भूप्रदेश आहे, तेथे तर दीडशे इंचांपेक्षा जास्त पाऊस पडतो. तरीही कोकणात पाणीटंचाई जाणवते, कारण पाणी साठवून ठेवण्याची पुरेशी व्यवस्था केलेली नाही. विविध राजकीय पक्षांचे नेते, जिल्हा व तालुका पातळीवरील पुढारी यांचा नाकर्तेपणा हेच या पाणीटंचाईचे कारण आहे. ही वस्तुस्थिती कामत यांनीही समोर आणली आहेच.
सह्याद्रीच्या पूर्व उतारावर व पूर्व उताराच्या पायथ्याशी ज्या प्रकारची धरणे (पवना, पानशेत, भाटघर, धोम, उरमोडी.. वगैरे) बांधली आहेत व कालवे बांधले आहेत, त्या प्रकारची पाणी साठविण्याची व्यवस्था कोकणात, विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात होऊ शकणार नाही. या जिल्ह्यातील तांबडमातीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता नाही. त्यामुळे, ‘पाणी जिरवा’ ही संकल्पना या प्रदेशात फारशी उपयुक्त नाही. ‘पाणी अडवा, पाणी साठवून ठेवा’ असे धोरण या प्रदेशासाठी राबविले पाहिजे. लहान मोठय़ा नद्या, नाले यांवर सिमेंट कॉंक्रीटचे कायमस्वरूपी बंधारे बांधणे, एकाच जलप्रवाहावर एकाखाली एक असे बंधारे बांधून बंधाऱ्यांची साखळी निर्माण करणे, हा एक उपाय असू शकतो. टेकडय़ांच्या माथ्यावर बहुतांशी कातळ असतो. त्या ठिकाणी, सिमेंट काँक्रीटच्या साठवण टाक्या व जाड पॉलिथिनचे अस्तरीकरण केलेली साठवण तळी बांधणे व त्यांतील पाणी सायफन पाइपद्वारे खालच्या भागात पुरविणे यांसारखे खास उपाय ‘कोकण पॅटर्न’ म्हणून योजले पाहिजेत.
कोकणात पडणाऱ्या पावसाद्वारे मिळणारी बहुतांश जलसंपत्ती समुद्रात वाहून जाते; ही जलसंपत्ती संपूर्ण महाराष्ट्राची संपत्ती आहे असा दृष्टिकोन ठेवून या पाण्याची साठवण व उपयोग झाला पाहिजे.
पश्चिम महाराष्ट्रात जनावरांसाठी वैरण कमी पडते. कोकणात पाणी साठवून ठेवले व त्यावर चारा पिके घेतली तर कोकण पश्चिम महाराष्ट्रातील पशुधनासाठी चारा पुरवू शकेल किंवा कोकणातच पशुसंगोपन व दुग्ध व्यवसाय निर्माण करता येईल. आज स्थिती अशी आहे की कोकणातील दुकानांत पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या दुधाच्या पिशव्या विकल्या जातात.
– मुकुंद गोंधळेकर, पनवेल (जि. रायगड)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संवेदनशीलता कुणाकडे आहे?
‘जनाची तरी..?’ हा ‘अन्वयार्थ’ (१९ एप्रिल) वाचला. सेल्फी काढणे तसा ज्याचा त्याचा प्रश्न, पण जेव्हा हा ‘सेल्फी’ उच्चपदस्थ व्यक्ती काढतात, तेव्हा तो स्वत:पुरता मर्यादित राहत नाही. तसेच ग्रामीण विकास मंत्र्यांबाबत झाले. त्यांना पाणी दिसले, आनंद झाला आणि घेतला सेल्फी. त्याचप्रमाणे महसूलमंत्र्यानी हेलिकॉप्टरने दौरा केला, त्यात भरपूर पाणी वाया गेले. या ठिकाणी थोडी आठवण करून द्यावी वाटते. मागच्या सत्ताधारी पक्षात असे असंवेदनशील वक्तव्य करणारी होती, जसे धरणातील पाण्याबाबत इ.आणि नंतर त्यांना सत्ता गमवावी लागली. हे जर असेच राहिले तर यांची दशा तशीच करण्याइतकी जनता संवेदनशील आहे.
– सिद्धान्त खांडके, लातूर

आनंद आणि जबाबदारी
वास्तविक मंत्री किंवा लोकप्रतिनिधींनी समाजात वावरताना, सार्वजनिक जबाबदाऱ्यांचे भान ठेवणे अपेक्षित असते. लातूरचा दुष्काळ दौरा हा पालकमंत्री या नात्याने पंकजा मुंडे यांचा महत्त्वाचा दौरा होता. परंतु त्या ठिकाणी ‘सेल्फी’ काढून पंकजाताईंनी प्रसंगाचे गांभीर्यच दुर्लक्षित केल्याचे जाणवले. ‘बंधाऱ्यातील पाणी पाहून आनंद झाल्याने, कामाची छायाचित्रे काढली-’ हे स्पष्टीकरण पटण्यासारखे नाही. कारण ही सर्व छायाचित्रे समाजमाध्यमांवर झळकली आहेत.
-रविकांत श्रीधर तावडे, नवी मुंबई.

काही सेल्फीवाले, काही झोपाळू..
पंकजा मुंडे यांनी सेल्फी काढला म्हणून लोकसत्तेने पहिल्या पानावर फोटोसकट बातमी छापली. परत आतल्या पानावर फोटोसकट त्याचा ‘अन्वयार्थ’ छापला हे काही योग्य नव्हे. पाणीटंचाई म्हणून सगळ्यांनी सुतकी/ गंभीर चेहऱ्याने वावरण्याची गरज नाही. बंधाऱ्यामध्ये पाणी होते म्हणून त्यांनी सेल्फी काढला तर गहजब कशाला? सेल्फीचा मोह भल्याभल्यांना आहे. मोदीजी सगळीकडे सेल्फी काढतात, गंभीर प्रश्नाच्या वेळी संसदेत थोर लोक चक्क झोप काढतात, ते चालते?
– संदीप पेंढारकर

हे कसे पटावे?
‘हे फोटो मी हौस म्हणून काढलेले नाहीत तर साईबंधारा आणि मांजरा नदीपात्रात खोदलेल्या खड्डय़ात पाणी पाहून समाधान वाटले त्यामुळेच फोटो काढले,’ हे पंकजा मुंडे यांच्या सेल्फीमागील खरे कारण असले तरी ते विरोधकांना कदापिही पटणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ. आज अनेक गावांमध्ये ४/ ५/ ८ दिवस पाणी मिळत नाही. पाण्यासाठी लोकांना मैल मैल पायपीट करावी लागते आणी एका हंडय़ासाठी त्यांना ५०-१०० रुपये मोजावे लागतात. ही झाली पाण्याची कथा. आता मद्यउद्योगाकडे नजर टाकली तर असे दिसते की, मुळात लोकांना घोटभर प्यायला पाणी नाही आणि सरकारने मुळात मद्यउत्पादन बंद करण्याऐवजी, तिथे १० टक्के पाणीकपात करायची तर काही उद्योगांनी एक शिफ्ट तात्पुरती बंद करायची यावर ऊहापोह करणे योग्य नव्हे. थोडक्यात सरकारला लोकांची तहान भागवण्यापेक्षा मद्यउद्योग कसे सुरक्षित राहतील याचीच जास्त काळजी असल्याचा संदेश यातून जातो.
– गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली पूर्व (मुंबई)

गोपीनाथ मुंडे आठवत राहतील..
गोपीनाथ मुंडे यांची आठवण गावोगावी निघावी अशी परिस्थिती सध्याच्या फडणवीस सरकारातील मंत्र्यांनी आणून ठेवली आहे. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपमध्ये राहूनही काही पथ्ये पाळली. सांस्कृतिक किंवा धार्मिक बाबतीत त्यांनी कधीच पक्षाची भूमिका न रेटता आपले बहुजनत्व शाबुत ठेवले. याशिवाय त्यांनी लोकांना दिलासा देताना कधी तोल ढळू दिला नाही. याउलट त्यांच्या राजकीय वारसदार ( ‘लोकांच्या मनातील मुख्यमंत्री’ ?) पंकजा मुंडे यांनी मात्र वारसा उलटा फिरवण्याचा पण केलेला दिसतो.
– सचिन आनंदराव तांबे, पिंपळसुटी (ता. शिरूर, जि. पुणे)

हातमिळवणीच्या आरोपातून बाहेर पडा!
पनामा पेपर्स प्रकरणात अमिताभ बच्चन यांचे नाव येताच केंद्र सरकारने या अभिनेत्यास ‘अतुल्य भारत’ चा सदिच्छादूत (ब्रँड अ‍ॅम्बेसिडर) नेमण्याचा निर्णय लांबणीवर टाकत काळ्या पैशाच्या प्रकरणात सावध पवित्रा घेतला आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेऊन पनामा पेपर्स प्रकरणी गंभीर असल्याचा इशारा दिला आहे. हे झाले केंद्र सरकारच्या एका भूमिकेबाबत. पण राज्यात काय सुरू आहे?
सुमारे सत्तर हजार कोटी रुपयांचा खर्च करून एक टक्का सिंचन झाले नसल्याचे अहवालात जाहीर होऊनही दोषींना शिक्षा होत नाही. समिती, एसीबीची चौकशी व आता ‘वर्क ऑडिट’ करीत वेळ्काढूपणा सुरू आहे. यातील दोषींना देण्यात येणाऱ्या शिक्षेच्या दबावाचा राजकारणात उपयोग केला जात आहे.
राज्य सरकारने या गैरव्यवहारातील आरोपींवर तात्काळ कारवाई करून जनतेसमोर आम्हीही सिंचन प्रकरणात गंभीर आहोत हे सिद्ध करावे आणि विरोधकांशी हातमिळवणी करीत असल्याच्या आरोपातून बाहेर पडावे.
– विवेक तवटे, कळवा.

आता अपेक्षा पदकाची..
सध्या संपूर्ण भारत ‘आयपीएल’मय झाला असताना आणि एरवीही इतर क्रीडाप्रकारांना माध्यमांतून क्रिकेटपेक्षा कमीच महत्त्व मिळत असताना, दीपा कर्मकार या महिला जिम्नॅस्टने आपल्या कामगिरीने सर्वानाच दखल घ्यायला भाग पाडले. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट ठरण्याचा इतिहास दीपाच्या कामगिरीने रचला गेला. या अगोदर १९५२ मध्ये दोन, १९५६ मध्ये तीन, १९६४ मध्ये सहा अशा एकूण ११ पुरुष जिम्नॅस्ट्सनी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तब्बल ५२ वर्षांनंतर भारतीय जिम्नॅस्ट ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहे; यावरूनच दीपाचे यश लक्षात येते. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणे हे तिचे पुढचे ध्येय असेल आणि भारतीयांचीही तीच अपेक्षा असणार आहे.
– दीपक काशिराम गुंडये, वरळी.

दीपानेही ‘नादिया’ व्हावे!
भारतीय जिम्नॅस्टिक संघटनेत गेल्या काही वर्षांत खेळ बाजूला राहिला असून गटातटाचे राजकारण पराकोटीला गेले आहे. दोन गटांपैकी कोणता गट राष्ट्रीय जिम्नॅस्टिक फेडरेशनचा अधिकृत गट, यावरून सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अशा पाश्र्वभूमीवर मूळची त्रिपुरा राज्यातील असलेल्या दीपा कर्मकारचे यश आणखीच उठून दिसते. या निमित्ताने रोमानियाच्या नादिया एलेना कोमानेकीची आठवण ताजी झाली. नादियाने १९७६ च्या माँट्रियल ऑलिम्पिकमध्ये वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी तीन सुवर्णपदके जिंकताना ऑलिम्पिक जिम्नॅस्टिक्सच्या इतिहासात सर्वप्रथम १० पैकी १० गुण मिळवत उच्चांक केला होता. अशीच कामगिरी, यंदा ब्राझिलमधील रिओ दि जानेरो शहरात होणाऱ्या ३१ व्या ऑलिम्पिकमध्ये दीपाने करावी!
प्रदीप शंकर मोरे, अंधेरी पूर्व (मुंबई)

मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Letter to editor
First published on: 20-04-2016 at 04:33 IST