‘अर्थशास्त्रातील विश्वासार्हता-क्रांती’ हा प्रणव पाटील यांचा लेख (२१ ऑक्टोबर) वाचला. विविध चाचणीवजा प्रयोगांच्या पद्धती वापरून कार्यकारणभाव निश्चित करणे, निरीक्षणाद्वारे व नमुन्याच्या पडताळणीतून, विश्लेषणातून निष्कर्ष काढणे यामुळे अर्थशास्त्राची विश्वासार्हता वाढेल यात शंका नाही. अर्थशास्त्र हे विज्ञानासारखे शास्त्र नाही. अर्थशास्त्र मानवी वर्तनावर अवलंबून असते आणि वर्तन हे वेळ, काळ, स्थिती, देश, भावभावना या सर्व घटकांवर अवलंबून असते. विज्ञानात या घटकांना कमी स्थान असते. असे असले तरीही, (उदाहरणार्थ) ग्रामीण शाळांतील वेतनवाढीच्या प्रोत्साहनाने व नियंत्रणाचा बडगा वापरल्यामुळे शिक्षकांच्या कार्यक्षमतेत होणारा बदल याबाबतीत केलेला प्रयोग नक्कीच प्रशंसनीय आहे. पैसा, वेळ, नैतिक प्रश्न हे जरी अडथळे असले तरी चाचणी प्रयोग उपकारकच ठरू शकतात. परंतु चाचणी प्रयोग करताना नैसर्गिक प्रयोगाइतकी सहजसुलभता किंवा वस्तुनिष्ठता निर्माण करणे हे मात्र तितकेच कठीण ठरेल. मात्र त्यामुळेच, चाचणी प्रयोग करणे हे नक्कीच नैसर्गिक प्रयोग करण्यापेक्षा नक्कीच कठीण असतात.

अशा प्रकारचे लहान प्रमाणावरील प्रयोग करण्याची मुभा ही प्रत्येक राज्यव्यवस्थेने अर्थशास्त्रज्ञांना व समाजशास्त्रज्ञांना देणे गरजेचे आहे. किंबहुना असे प्रयोग करण्यासाठी शासन व्यवस्थेने प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. विविध प्रकारच्या अर्थशास्त्रीय प्रयोगांना सहकार्य केल्यास, विशेषत: भारतातील अर्थशास्त्रज्ञांना नक्कीच प्रेरणा मिळेल. शासनाला आपली ध्येयधोरणे आखताना याचा फायदा होईल. त्याहूनही अर्थशास्त्राची विश्वासार्हता वाढण्यास मदत होईल.  – केशव पाटील- वासरीकर, नांदेड</strong>

बांगलादेश पूर्वेकडील पाकिस्तान होऊ नये…

‘बांगलादेशात अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी कायद्याची मागणी’ हे वृत्त वाचले (लोकसत्ता- २१ ऑक्टोबर) बांगलादेश तसेच जम्मू काश्मीरमध्ये अल्पसंख्याकांना लक्ष्य करून होत असलेले हल्ले आणि हत्या हा भारतासाठी चिंता आणि तणाव वाढवणारा विषय आहे. अफगाणिस्तानात सत्तेवर आलेले तालिबानी, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद, चीनचा विस्तारवाद, युद्धखोरी आणि आता बांगलादेशमध्ये उचल खात असलेला धार्मिक मूलतत्त्ववाद यामागे निश्चितच सूत्रबद्ध आखणी, संरचना आणि सूत्रधार आहेत. चौफेर कोंडी करून, कधी घोषित तर कधी अघोषित युद्ध करून भारताला जेरीला आणणे असा  हा कुटिल डाव आहे. हे एक घातसूत्र आहे. बांगलादेश हा पूर्वेकडील पाकिस्तान होणार नाही याची दक्षता आणि काळजी घेणे अत्यावश्यक आहे. हा नाजूक आणि स्फोटक प्रश्न हाताळताना आततायीपणा करून चालणार नाही. संरक्षणव्यवस्था आणि परराष्ट्रनीती यांचा यात कस लागणार आहे. देशांतर्गत कायदा, सुव्यवस्था, धार्मिक, सामाजिक शांतता आणि सलोखा अबाधित राखला पाहिजे. सणासुदीच्या तोंडावर  दहशतवादाचे देशावर घोंघावत येणारे हे गहिरे संकट आहे.  – डॉ. विकास इनामदार, पुणे

आपल्या देशात अल्पसंख्य किती सुरक्षित आहेत?

‘शेजार ‘धर्म!’’ हे संपादकीय (२० ऑक्टोबर) वाचले. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांकडे बहुसंख्याकांनी अल्पसंख्याकांवर केलेला अत्याचार या आधारावर बघायला हवे आणि याची कारणे शोधायला हवीत. हे शोधताना आपण स्वत:ला प्रश्न करायला पाहिजे की, आपल्या देशात अल्पसंख्य किती सुरक्षित आहेत? काय त्यांच्या सुरक्षेसाठी आपण सक्षम आहोत? महाराष्ट्रात लग्नाचा एक प्रकार आहे आष्टकोष्ट. या प्रथेत बहीणभावाची जोडी दुसऱ्या बहीणभावाच्या जोडीशी लग्न करते. त्यात मजेचा विषय असा आहे की एका जोडप्याचे भांडण झाले की दुसरे जोडपे तुझी बहीण वा भाऊ माझ्या बहीण वा भावासोबत का भांडतो म्हणून भांडते. तशीच स्थिती सध्या बहुसंख्याक व अल्पसंख्याक गटांची आहे  बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार झाला की भारतात मुस्लिमांना त्रास देणे व भारतात मुस्लिमांवर अत्याचार झाल्यास बांगलादेशात हिंदूंना त्रास देणे, ही साखळी अशीच चालू राहणार का? – कीर्तिवर्धन विलास भोयर, हिंगणघाट (जि. वर्धा)

सुट्ट्या नाण्यांसाठी व्हेंडिंग मशीन लावली तर?

‘बेस्टकडे सुट्ट्या नाण्यांचा पाऊस’ ही बातमी (लोकसत्ता- १९ ऑक्टोबर) वाचली. एकेकाळी सुट्ट्या पैशांवरून बसमध्ये, हॉटेलमध्ये, दुकानांमध्ये अगदी पानपट्टीच्या टपरीवरसुद्धा भांडणे होत. परंतु आज हीच नाणी एवढी जमा झाली आहेत की, ठेवायला जागा नाही आणि कोणी घेतही नाहीत. परदेशात विमानतळावर, मेट्रो स्टेशनवर, पेट्रोलपंपावर नोटांच्या बदल्यात नाणे देणारी व्हेंडिंग मशीन्स लावलेली असतात. तशीच व्हेंडिंग मशीन्स आपल्याकडे लावली तर हा प्रश्न सुटू शकेल.  – मिलिंद कोर्लेकर, ठाणे</strong>

भवितव्य भकास करणारा विकास

‘वृक्षवल्ली सोयरी वगैरे’ हे संपादकीय (२१ ऑक्टोबर) वाचले. उत्तराखंड व केरळच नव्हे, अतिरिक्त विकासाच्या ध्यासापोटी माणसाने निसर्गाविरुद्ध अघोषित युद्धच पुकारले आहे आणि ते थांबण्याचे नाव नाही. अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे यंदा कोयना धरणाचे तीन दरवाजे उघडल्यावर तांबडे लाल पाणी बाहेर पडू लागले; जे एरवी पांढरे स्वच्छ असते. तिथे राहणाऱ्या लोकांना याचे मोठे आश्चर्य वाटले मग लक्षात आले की कोयना धरण परिसरात असलेली विपुल वृक्षसंपदा झपाट्याने कमी झाली आहे आणि ही प्रक्रिया अखंड सुरू आहे. विशेषत: डोंगर टेकड्यांची धूप थांबविण्यात झाडांचा (मुळांचा) फार मोठा सहभाग असतो. झाडेच नष्ट केली तर जमिनीची धूप थांबणार कशी? ही माती नदीच्या प्रवाहातून जात असताना पात्र उथळ करते, परिणामी नदीची जलसंचय क्षमता कमी होते आणि पाणी पात्राबाहेर पडून महापुराचे संकट गडद होते. यापुढे तरी पर्यावरणाभिमुख विकास हा आपला परवलीचा शब्द झाला पाहिजे. निसर्गावर अत्याचार करून केलेला विकास भावी पिढ्यांचे भवितव्य भकास करणारा असेल हे वेळीच लक्षात घेतले पाहिजे. – अशोक आफळे, कोल्हापूर</strong>

नुसती पोस्टरबाजी

‘निवडणुकांसाठी नवा घाट?’ हा लेख वाचला. अतिशय मोठमोठे आकडे योजनेसाठी जाहीर करूनही फक्त आर्थिक ताकद लावून काही योजना यशस्वी होत नसतात. त्यासाठी नियोजनबद्ध आखणी, सदसद्विवेक कार्य व शाश्वत विकास यांची जोड हवी. उगीच योजना प्रसिद्धीसाठी कोट्यवधींचा खर्च करून स्वत:चा राजकीय फायदा बघून पोस्टरबाजी करून काहीही हाती येणार नाही.  – पंकज सूर्यकांत कोकणे, बीड

loksatta@expressindia.com