scorecardresearch

Premium

पोटनिवडणुकीचे सर्वच पक्षांना धडे

अलीकडेच झालेल्या पोटनिवडणुका या २०१९ ची ‘उपांत्य फेरी’ म्हणून सर्वच पक्षांनी लढवल्या.

अलीकडेच झालेल्या पोटनिवडणुका या २०१९ ची ‘उपांत्य फेरी’ म्हणून सर्वच पक्षांनी लढवल्या. या निवडणुका भाजपला चांगल्याच माघारी नेणाऱ्या ठरल्या. पालघरमध्ये विजय संपादित करता आला असला तरी त्याचा आनंद जितका अंध भक्तांना झाला तितका नेतृत्वाला झाला नाही हे उघड आहे. विरोधी पक्षांचे सगळे घोडे जेव्हा संघटित होऊन दमटले गेले तेव्हा भाजपच्या पारडय़ात लोकसभेच्या चारपकी दोन जागा पडल्या. त्यातही त्यांचा वाटा मित्रपक्षांच्या सोबतीने मिळवता आला आहे. उत्तर प्रदेशमधील जनतेने योगी यांच्यावर २०१९ नंतर हिमालयात जाण्याची वेळ आणण्याची तयारी सुरू केली असावी. कारण कैराना ही भाजपची इज्जत, प्रतिष्ठा. तिच्यावरूनही भाजपला आता पळीभर पाणी सोडावे लागले. मागील विधानसभा निवडणुकीत भल्याभल्यांचा चुराडा करणाऱ्या या सत्ताधाऱ्यांनासुद्धा नामुष्कीच पदरी आली. विविध राज्यांतील विधानसभांच्या ११ पकी केवळ एकाच जागा जिंकून त्यांना मोठी हारच पत्करावी लागली. अतिरेकी बनवणारे हिंदुत्व लादून अन् निव्वळ जाहिरातींवर पसे खर्च करून आपली परिस्थिती सुधारणार नाही, यावर भाजपने आता तरी विश्वास ठेवावा.

काँग्रेसने मात्र कंबरच नाही तर सर्वाग कसून सराव करायला हवा. अनामत जप्त व्हावी इतका मोठा धक्का हा त्यांचे मानसिक, बौद्धिक खच्चीकरण करणारा आहे. पालघरमध्ये मार्क्‍सवादी पक्षही या वेळी काँग्रेसच्या पुढे गेला, यातच सगळे आले. शिवसेना मात्र आत्मसन्मान शाबूत ठेवून सत्तेतून बाहेर पडली तर जी सहानुभूती वनगा यांच्या पुत्रास उमेदवारी देऊन मिळवायची त्यांची योजना होती तशी सहानुभूती पुढच्या निवडणुकीत त्यांना मिळू शकते. बाकी सर्व आनंदी आनंद रोजच्या सारखा आहेच, तो भोगावा लागेलच !

Absentive voting
लोकसभा निवडणुकीत ‘अबसेंटिव्ह’ मतदानाचा पर्याय, ‘या’ मतदारांना घरबसल्या मतदानाची मुभा
chandrakant handore news
विधान परिषद निवडणुकीतील पराभवातून हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी
Congress leader, former chief minister, Ashok Chavan, nanded
Ashok Chavan : निष्ठावंत काँग्रेसजनांनी ‘ हात ‘ सोडला
Budget 2024 presented by Nirmala Sitharaman aiming to win the Lok Sabha elections
लोकसभा निवडणुका जिंकण्याचे लक्ष्य ठेवून मांडलेला अर्थसंकल्प

– विशाल हिरा नारायण लोणारी, नाशिक

 

मतदाराला जे कळले ते शिवसेनेला कळेल?

‘आत्मघातकी आडमुठेपणा’ अग्रलेखात (१ जून) पोटनिवडणुकींबद्दल सांगोपांग विश्लेषण आहे. ‘सर्वाना सर्वकाळ फसवू शकत नाही’ या न्यायाने पाहिले तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सामान्य मतदार यापुढे स्वत:ला फसवून घेऊ इच्छित नाही हाच संदेश दिला जातोय. कर्नाटक निवडणुकीच्या अगोदर एक दिवस नेपाळहून अयोध्येला बस चालू करणे किंवा कैराना मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अगोदर एक दिवस शेजारच्या हायवेवर रोड शो करणे या ‘राजकीय जुमल्या’चा लोकांना आता कंटाळा आलाय. म्हणूनच ‘जिना नही, गन्ना’ ही घोषणा लोकांना भावली. गांधी परिवाराच्या ‘परिवारवादा’वर दुगाण्या झाडायच्या आणि कैरानात दिवंगत खासदार हुकूमसिंग यांच्या कन्येस उमेदवारी द्यायची हा दुतोंडीपणा लक्षात न येण्याएवढा मतदार बुद्धू आहे का?

महाराष्ट्रापुरते बोलायचे तर लोकसभेसाठी भाजपला शिवसेनेची गैरज आहे. म्हणूनच मोदी-शहांच्या सूचनेनुसार भाजपतला सोम्यागोम्याही ऊठसूट ‘युतीस्तोत्र’ म्हणतोय. फडणवीसांच्या शपथविधीत ज्या मोदींनी उद्धव ठाकरेंकडे ढुंकूनही पाहिले नव्हते तेच आता ‘प्रसंग पडे बांका’ या परिस्थितीत अडकले आहेत, म्हणून ही लीनता. सध्या भ्रष्टाचार, तत्त्वनिष्ठा अशा गोष्टी फक्त सभेतील भाषणांपुरत्याच मर्यादित ठेवायच्या आणि कुठल्याही स्थितीत ‘सीट’ निवडून आणायची हेच सर्व पक्षांचे एकमेव उद्दिष्ट आहे. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेने आत्मपरीक्षण करायला हवे. शिवसेनेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रापुरते मर्यादित आहे, याचे भान उद्धव यांना यायला हवे. पुढील निवडणुका एकटय़ाने लढवणे म्हणजे आत्मघात आहे हेही लक्षात घ्यायला हवे. अशा स्थितीत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी जुळवून घेतले आणि जागावाटप केले (उघड वा छुपे) तर आजचा वनवास तरी संपेल. काही आमदार भाजपच्या वळचणीला जातील, पण ते तरी किती जणांना सामावून घेतील? आताच तिथे काँग्रेसप्रमाणे जुने आणि निष्ठावंत हा वाद उभा राहिलाय. मोदी-शहा राजकीय बनियेगिरीत हुशार आहेत. लोकसभेपुरती मानपान खुंटीला टांगून उद्धव यांची मनधरणी करतील आणि विधानसभेच्या वेळी एखादा खडसे उभा करतील ‘युती तुटली’ सांगायला. विधानसभा निवडणुकीत युती फक्त भाजपच्याच अटींवर होईल अन्यथा नाही, आणि असे झाले तर उद्धव यांचे ‘गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही’!

– सुहास शिवलकर, पुणे

 

शिवसेनेला भाजप हवाच आहे

पालघर लोकसभा पोटनिवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून साम-दाम-दंडची टोकाची भाषा झाल्यानंतर निवडणुकीच्या दिवशी भाजप पक्षाध्यक्षांनी व पक्षनेत्यांनी युतीचा सूर पुन्हा आळवला व सेना नेत्यांनी त्यावर मौन पाळले यात अजिबात नवल नाही. विशेषत: पालघर पोटनिवडणुकीचा निकाल कसा असेल याची कल्पना दोन्ही पक्षांना पूर्णपणे होती. काहीही झाले तरी २०१९ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला अगदीच टाळणे फायद्याचे नाही, हेसुद्धा शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील गुळमुळीत उत्तरावरून कळून चुकले. पालघर निवडणुकीच्या निकालाबद्दल निवडणूक आयोगाला शिवसेनेने दोष देणे म्हणजे लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासारखे आहे, यात तिळमात्र शंका नाही.

– श्रीराम गुलगुंद, कांदिवली पश्चिम (मुंबई)

 

मनसेच्या वाटेवर शिवसेना

शिवसेनेचे नेते खुल्या मनाने पराभव स्वीकारत नाहीत. दुसऱ्यांवर आरोप करून मुद्दय़ाला बगल देतात. निवडणुकीत मतदान यंत्रावर, नोकरीधंद्यात परप्रांतीयांवर आरोप शिवसेना करते. अशाने पुढील निवडणुकीत शिवसेनेचे स्थान डळमळीत होऊ शकते, याची जाणीव नेत्यांना झालेली दिसत नाही. हळूहळू शिवसेना मनसेच्या वाटेने जाणार, हे डोळ्यांवर झापडे ओढलेल्या संजय राऊत यांना कसे दिसणार?

– दिगंबर जोशी, मुंबई

 

प्रवक्त्यांचा हात, पक्षप्रमुखांना अवलक्षण

‘आत्मघाती आडमुठेपणा’ हे संपादकीय (१ जून) वाचले. देशभरातल्या पोटनिवडणुकांच्या निकालात विरोधी पक्ष भाजपसाठी नकारात्मक ठरला तरी अपवाद पालघरच्या निवडणुकीचा. तेथे शिवसेनेला अवसानघातकीपणाची शिक्षा मिळाली. ‘मंत्रालयात सहकारी आणि रस्त्यावर वैरी’ हा सेनेचा राजकीय अभिनयाचा दुहेरी पलू, चार-पाच महिन्यांकरिता ठीक होता; परंतु पाच वर्षांचा सत्ताकाळ संपत आला तरी त्यात तिळमात्र बदल झाला नाही. सेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या भडक भाषेचा शिवसेनेला फायदाच होत असे. परंतु शिवसेनेच्या विद्यमान प्रवक्त्यांची भाषा आत्मघात करून घेण्यासाठीच असते. प्रवक्ते हात दाखवतात आणि सेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अवलक्षण करून घेतात.

– उल्हास गुहागैरकर, गिरगाव (मुंबई)

 

पालघर पराभवाचे आत्मपरीक्षण हवेच

‘निवडणूक आयुक्तांवर गुन्हा नोंदवा -उद्धव ठाकरे’ ही बातमी (लोकसत्ता, १ जून) वाचली. खरे पाहता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि आत्ताची शिवसेना यांत खूप फरक आहे. त्या वेळी शिवसेनेचा जर पराभव झाला तर बाळासाहेब चिंतन करायचे की आपण कुठे कमी पडलो. पण आता तसे नाही.. पराभव झाला तर दोष निवडणूक आयोगाचा! तसे बघितले तर पालघर लोकसभेची जागा ही भाजपचीच होती. कारण कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराचे जर निधन झाले तर ती जागा त्याच कुटुंबातील उमेदवार त्याच पक्षाच्या नावावर निवडणूक लढवतो आणि निवडूनही येतो हा आजपर्यंतचा शिरस्ता. पण शिवसेनेला पालघरमध्ये अतिआत्मविश्वास नडला. सांगणे एवढेच की, पराभव झाला तर तो स्वीकारून त्याची कारणे शोधावीत. उगाच निवडणूक आयोगाला दोष देऊन काही फायदा नाही.

– राजू केशवराव सावके , वाशीम

 

मतदान यंत्रांचे रडगाणे.. मध्येच थांबलेले! 

पोटनिवडणुकीतील यशानंतर सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया ‘आता भाजपचे काही खरे नाही’ या थाटाच्या होत्या. या वेळी एक गोष्ट मात्र प्रकर्षांने जाणवली की, अवघ्या २४ तासांपूर्वीपर्यंत भाजपने ‘ईव्हीएम’चा घोळ केल्याचे रडगाणे गाणारी ही सर्वच नेतेमंडळी आताच्या विजयाचे गुणगान करताना थकत नव्हती.

– किरण बाबासाहेब रणसिंग, अहमदनगैर

 

प्रतिष्ठेच्या निवडणुकीत आयात उमेदवार का?

पालघरचा विजय हा मुख्यमंत्र्यांच्या शिरपेचात तुरा आहे हे ‘आत्मघातकी आडमुठेपणा’ अग्रलेखातील विधान वादग्रस्त आहे. उलट पालघर निवडणुकीत भाजपच्या अब्रूची लक्तरेच निघाली. मुळात वनगांच्या कुटुंबीयांची भाजपकडून उपेक्षा झाली ती अयोग्य होती व ती राजकीय चूक होती. हा निव्वळ गाफीलपणा होता. आता गडकरी, फडणवीस सर्व जण युती हवी म्हणतात. मुख्यमंत्री म्हणतात, मित्रपक्षांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढवायला नको होती. ही भूमिका वास्तववादी व प्रामाणिक असती तर भाजपने उमेदवार न देता वनगांच्या मुलाला उमेदवारी देणाऱ्या शिवसेनेच्या प्रचारातील हवाच काढून टाकायला हवी होती. त्याऐवजी भाजपने उमेदवारी दिली राजेंद्र गावित यांना, जे                 काँग्रेस उमेदवार असताना दिवंगत चिंतामण वनगा यांनी २०१४ साली पराभूत केले होते. जर ही प्रतिष्ठेची निवडणूक होती तर उमेदवार आयात करून पक्षीय राजकारणाची थट्टाच भाजपने केली. श्रीनिवास वनगांचे पक्षांतर व राजेंद्र गावित यांचे पक्षांतर यातील हा फरक लक्षात घेतला पाहिजे. पालघर राखले पण निव्वळ शेपटावर निभावले त्याचा आनंद किती मानायचा, हे सच्चा भाजप कार्यकर्त्यांनी ठरवावे.

– प्रमोद जोशी, ठाणे</strong>

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta readers letter part

First published on: 04-06-2018 at 00:20 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×