विकाऊ वृत्त, राडिया ध्वनिफिती, झालेच तर देशातील एकमेव खास आम आदमी अरविंद केजरीवाल यांचा माध्यमे विकली गेल्याचा आरोप आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सट्टेबाजी या सगळ्या पाश्र्वभूमीवर महेंद्रसिंह धोनी विरुद्ध झी समूह आणि न्यूज नेशन नेटवर्क यांच्यातील वादाकडे पाहावे लागेल. गेल्या महिन्यापासून या दोन वृत्तउद्योगांच्या वाहिन्या आणि संकेतस्थळे यांतून भारतीय, खरेतर बीसीसीआयच्या क्रिकेट संघाचा कर्णधार धोनी याच्याविरुद्ध बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहेत. त्यातून धोनीचे आयपीएल स्पर्धेतील सामनानिश्चिती आणि सट्टेबाजी प्रकरणांशी संबंध असल्याचे दाखविण्यात येत आहे. मात्र या सर्व बातम्या बदनामीकारक व खोडसाळ असल्याचे धोनी याचे म्हणणे आहे. त्याविरोधात तो मद्रास उच्च न्यायालयात गेला होता. त्यावर न्यायालयाने या दोन वृत्तउद्योगांना त्याच्या विरोधातील अशा प्रकारच्या बातम्या पुढील १५ दिवस प्रसिद्ध करू नयेत, असा मनाई आदेश दिला. वरवर पाहता हे दोन वृत्तवाहिन्या आणि एक सेलेब्रिटी खेळाडू यांच्यातील भांडण असे प्रकरण दिसते. मात्र ते त्याहून व्यापक आहे. क्रिकेट आणि माध्यमे यांचे संबंध सर्वज्ञात आहेत. एकमेका साह्य़ करीत या दोन्ही क्षेत्रांनीही अर्थपंथ कसा पादाक्रांत केला, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. क्रिकेट हा खेळ वाहिन्यांना मोठी प्रेक्षकसंख्या मिळवून देणारा खरा; पण त्यावरून क्रिकेटच्या कारभाऱ्यांनी िडगा मारण्याची आवश्यकता नाही. केवळ दूरचित्रवाणी वाहिन्यांना डोळ्यांसमोर ठेवून क्रिकेटने ट्वेंटी-२० सारखे प्रकार जन्मास घातले आहेत. तेव्हा हे दोघेही परस्परावलंबी आहेत. मात्र माध्यमांचे काम बातम्या देणे हेही आहे. त्या क्रिकेट विश्वाच्या विरोधात जाऊ लागल्यानंतर सगळे बिनसले. सट्टेबाजी आणि सामनानिश्चितीने क्रिकेटचा भाव उतरल्यानंतर तर क्रिकेटचे कारभारी आणि खेळाडू यांना माध्यमे अधिकच खुपू लागली. धोनीने आपल्या संदर्भातील बातम्या देण्यावरच मनाई आणण्यासाठी न्यायालयात धाव घेणे, हा त्याचाच भाग. न्यायालयातही धोनीची बाजू कोण मांडत आहे, तर तमिळनाडूचे माजी अॅटर्नी जनरल पीएस रमण. हे महोदय भारतीय क्रिकेट बोर्ड, एन. श्रीनिवासन आणि त्यांचे सट्टेबाजीग्रस्त जावई मयप्पन यांचीही वकिली करतात. तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावणारच. परंतु ही एक बाजू झाली. या आणि अशा प्रकरणांत माध्यमांची भूमिका ही रामशास्त्री बाण्याचीच असते असे नाही. मुळात रामशास्त्र्यांच्या भूमिकेत जाणे हे माध्यमांचे काम नाही. माध्यमांनी कशा प्रकारे वृत्तांकन करावे याचे काही संकेत आहेत. विश्वासार्हता, निरपेक्षता ही त्यांतील मूलभूत गोष्ट. छापील माध्यमांचे वय मोठे. त्यामुळे तेथे हे संकेत बऱ्यापैकी रुजले आहेत. इलेक्ट्रॉनिक आणि अंकीय माध्यमे, निदान भारतात तरी अजूनही वयात येत आहेत. पुन्हा त्यांचा धावण्याचा वेग मोठा. त्यामुळे हे असे जुनेपुराणे संकेत म्हणजे त्यांना गळ्यातील ओढणे वाटत नसतील तर आश्चर्य. अशा परिस्थितीत वृत्तपत्रीय संकेत धाब्यावर बसण्याची वृत्ती दिवसेंदिवस बळावते आहे. त्यात विश्वासार्हतेचा बळी जात आहे. धोनीच्या प्रकरणात या दोन वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या बातम्या खऱ्या की खोटय़ा हा खूप पुढचा प्रश्न झाला. त्या बातम्या आपण विंदू दारासिंह आणि संपत कुमार यांच्या स्टिंग ऑपरेशनमधून आलेल्या माहितीवर आधारित असल्याचे या वाहिन्यांचे म्हणणे आहे. पण येथे प्रश्न स्टिंग ऑपरेशननामक उपद्व्यापाच्या विश्वासार्हतेचाही आहे. धोनी विरुद्ध वृत्तवाहिन्या या भांडणाचा निकाल न्यायालयात लागेलच. परंतु त्यामुळे निर्माण झालेले मुद्दे मात्र निकालात काढता येणार नाहीत. क्रिकेट हा खेळ म्हणून सोडून देता येईल. माध्यमांना मात्र विश्वासार्हतेसाठीची लढाई रोज रोज लढावीच लागणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Mar 2014 रोजी प्रकाशित
विश्वासार्हतेची लढाई!
विकाऊ वृत्त, राडिया ध्वनिफिती, झालेच तर देशातील एकमेव खास आम आदमी अरविंद केजरीवाल यांचा माध्यमे विकली गेल्याचा आरोप

First published on: 20-03-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahendra singh dhoni files rs 100 cr defamation case against zee news