हृदयेंद्र तन्मयतेनं आणि जणू अगदी पोटतिडकीनं बोलत होता. साधकाच्या वागण्या-बोलण्यात माधूर्य आलं, आकर्षणशक्ती आली की या घाटात वेगनियंत्रक कसा निकामी होतो आणि मग मुक्कामाकडे न जाता गाडी कशी वेगानं घसरते, हेच तो सांगत होता! तो म्हणाला-
हृदयेंद्र – जेव्हा लोकेषणा आणि वित्तेषणेनं अंत:करण अधोगामी होऊ लागतं तेव्हा कुठलं आज्ञाचक्र नि काय! अहो सद्गुरूंच्या आज्ञेकडेच पूर्ण दुर्लक्ष होऊ लागतं. सद्गुरूआज्ञा हे आधी जीवनाचं लक्ष्य होतं. तेच राहात नाही. उलट आपलाच डिंडिम वाजवणं, आपला बडेजाव वाढणं हीच सद्गुरूकृपा आणि सद्गुरूसेवा वाटू लागते! गाडी चालवण्यासाठी वाहतुकीचे नियम वारंवार वाचावे लागतात ना? तसं ज्याला या घाटरस्त्यानं सुखरूप जायचं आहे त्यानं नाथांचं ‘चिरंजीवपद’ वारंवार वाचलं पाहिजे. नव्हे चित्तात धारणच केलं पाहिजे. ज्याला हे भान नाही तो आज्ञाचक्रात स्थिर कसा होणार? या आज्ञाचक्रात स्थिर होण्यासाठीच माउली मोठा मार्मिक बोध करीत आहेत, ‘आंबया डहाळी फळे चुंबी रसाळी’! याचे दोन अर्थ आहेत!
योगेंद्र – दोन अर्थ?
हृदयेंद्र – हो! एक अर्थ असा की, आंब्याची डहाळी अर्थात आंब्याची पानं सदोदित रसाळ आम्रफळाला स्पर्श करीत असतात, पण त्याची गोडी ती चाखत नाहीत! अगदी खरं पाहिलं तर ज्या झाडाची पानं आहेत, त्याच झाडाची फळं आहेत. दोघांचा जीवनाधार, जीवनरसाचं मूळ एकच आहे! तरी फळाला झाडाचं पूर्णत्व मानलं जातं. फुलं, पानं, फांद्यांचे आकार आणि रंग डोळ्यांना सुखद वाटतात, पण फळ तृप्ती देतं! तर पहिला अर्थ असा की, माणूस हा परमात्म्याच्या जवळ असूनही त्याची गोडी न चाखता लोकेषणेच शेणच खाण्यासाठी धडपडतो..
कर्मेद्र – पण मुळात परमात्मा प्रत्येकाच्या अंतर्यामी आहेच ना? मग त्याची गोडी काय चाखायची?
कर्मेद्र – प्रत्येकात तो आहेच, पण तशी जाणीव खरंच आहे का? ती असेल तर ही चर्चाही संपेलच, पण जीवनातली सर्व तक्रारच संपेल. ती जाणीव नाही म्हणून गोडी अनुभवली जात नाही..
ज्ञानेंद्र – आणि दुसरा अर्थ?
हृदयेंद्र – तो तर फारच सुंदर आहे.. फळ जर पानांत लपलं नाही ना, तर पक्षी ते पिकण्याआधीच टोचून टोचून खाऊन टाकतील! तशी साधना सद्गुरूआज्ञेनुसार आणि गुप्तपणे केली नाही ना, तर लोक ती परिपक्व होण्याआधीच खाऊन टाकतात! पानांत लपलेलं आम्रफलच पिकतं आणि रसाळ होतं. तशी एकांतातली साधनाच परिपक्व होते, रसमय होते!
ज्ञानेंद्र – वा!
कर्मेद्र – ख्यातिच्या भाषेत सांगायचं तर ‘भीषोण शुंदोर’!
हृदयेंद्र – अशी साधना पक्व झाली ना, तरच आज्ञाचक्रातून वर जाता येतं. अशी पक्व साधना करण्याची अंत:करणाची वृत्ती होणं, हाच ‘आजिचेरे काळी शकुन सांगे’ आहे. अशी साधना घडत गेली तरच तो परमात्मा जाणिवेत येतो. त्याच्या अस्तित्वाच्या अनंत खुणा देतो! ज्ञानदेव म्हणे जाणिवे ये खुणे। भेटती पंढरीराणे शकुन सांगे!!
कर्मेद्र – अस्तित्वाच्या खुणा म्हणजे?
डॉ. नरेंद्र – हृदयेंद्रजी ‘पैल तो गे काऊ’ मी अनेकदा ऐकलं आहे, पण तुम्ही लोकांनी योगमार्गानं आणि भक्तीमार्गानं जो अर्थ उकलायचा प्रयत्न केलात ना, तो फार भन्नाट आहे. पण सहज एक शंका आली म्हणून विचारतो हं.. कुंडलिनी शक्ती जागी झाल्याशिवाय खरी साधना होत नाही का? आणि कुंडलिनी शक्ती काय केवळ योगमार्गानंच जागी होते का? नामप्रधान भक्तीमार्ग, पूजा-कर्मकांडप्रधान उपासनामार्ग आणि निर्विचार होण्याचा ज्ञानमार्ग यांचा कुंडलिनीशी काही संबंध आहे का?
हृदयेंद्र – डॉक्टरसाहेब तुमचा प्रश्न खरंच छान आहे. या उत्तरात कर्मेद्रच्याही प्रश्नाचं उत्तर येईलच..
कर्मेद्र – माझ्या प्रश्नाचं उत्तर? मी काय प्रश्न केला होता?
हृदयेंद्र – घ्या! अरे तूच नाही का विचारलंस अस्तित्वाच्या खुणा म्हणजे काय? तर ऐका..
कर्मेद्र – जरा थांब ना यार.. मी सिगारेट घेऊन आलोच..
कर्मेद्र गेला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहात डॉक्टर नरेंद्रांनी विचारलं, ‘‘तो प्रेमभंग झाला तेव्हाच हे व्यसन लागलं का यांना?’’ हृदयेंद्र पुटपुटला.. ‘‘हो.’’
चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अभंगधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mango twig
First published on: 10-02-2015 at 12:59 IST